Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

साठेबाजांवर कारवाईच्या मागणीसाठी कोल्हापुरात मोर्चा
कोल्हापूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

 

जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या साठेबाज व्यापाऱ्यांना अटक करून त्यांना तुरुंगात धाडावे या मागणीसाठी आज रामभाऊ चव्हाण प्रणीत जनशक्तीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात असलेल्या महिलांनी पोलिसांचे कडे मोडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करून आणि नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न करून धमाल उडवून दिली. या मोर्चाचे नेतृत्व रामभाऊ चव्हाण यांनी केले.
सध्या सणासुदीचे दिवस आहेत. महागाई प्रचंड वाढली आहे. तूरडाळ, हरभरा डाळ, खाद्यतेल, चहापूड, साखर यांचे दर गगनाला भिडले आहेत. नफेखोर व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंचा बेकायदा साठा केला आहे. बाजारात या वस्तूंची टंचाई निर्माण करण्यात आली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आणि प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत या मागणीसाठी गंगावेश येथून हा मोर्चा काढण्यात आला होता.
घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा पोहोचल्यानंतर प्रवेशद्वारावर पोलिसांनी हा मोर्चा अडविला. तथापि मोर्चातील महिलांनी पोलिसांचे कडे तोडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रवेश केला. तेथूनही त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण त्यात त्यांना यश आले नाही. मग या महिलांनी तिथेच ठाण मांडले आणि घोषणाबाजी सुरू केली. जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांना मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले. आम्ही विविध ठिकाणी धाडी घालून अन्न धान्याचे साठे जप्त करीत आहोत. आपणासही साठेबाजांची काही माहिती असेल तर ती आम्हाला सांगावी, आम्ही कठोर कारवाई करू असे आश्वासन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात रामभाऊ चव्हाण आणि शैलजा पाटील, भारती आडूरकर, स्वाती केसरकर, शारदा गवंडी, स्वाती चव्हाण या महिलांचा सहभाग होता.