Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे विटंबन केल्याच्या घटनेचे पंढरपुरात पडसाद
पंढरपूर, ६ ऑगस्ट/वार्ताहर

 

वसमत (जालना) येथे अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या विटंबनेचे पडसाद पंढरपुरात उमटून सकाळी अकराच्या सुमारास अज्ञात कार्यकर्त्यांनी गोपाळपूर नाका, लहूजी वस्ताद चौक, भक्ती मार्ग या ठिकाणी बसेसवर दगडफेक केली. यात सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले असून, सोलापूर, कोल्हापूर बसच्या चालकांस मुका मार लागला आहे
वसमत जालना येथे अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या विटंबनेची वार्ता पंढरीत येताच सकाळी अकरा वाजता सोलापूर-पंढरपूर मार्गे कोल्हापूरला निघालेल्या एस.टी. बसला दोन मोटारसायकलवरून केंद्रे महाराज मठाजवळ अडवून दगडफेक केली. यात समोरच्या काचा व मागील काचा फोडण्यात आल्या.
त्यानंतर मंगळवेढा-पुणे ही बस गोपाळपूर नाक्याच्या पुढे प्रवासी उतरण्यासाठी उभी राहिली असता झाडीतून दगडफेक करून मागील व पुढील काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर भक्तिमार्गावर विजापूर- पंढरपूरमार्गे पुण्यास जाणाऱ्या कर्नाटक डेपोच्या बसवर दगडफेक करण्यात आली. यात सर्व मिळून ४० हजारांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज आहे.
ही घटना समजताच डीवायएसपी प्रमोद होनराव, शहर निरीक्षक इंगेवाड, उपनिरीक्षक राठोड, मुंढे यांनी आपले पोलीस सहकारी घेऊन घटनास्थळी हजर होऊन पाहणी करून संवेदनशील अशा संत पेठ, जुनी पेठ, भक्ती मार्ग, कराड नाका या ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. शहरात शांतता असून, शहरातील घटनेबाबत पोलीस स्टेशनला खबरच नाही, याबाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.