Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

चंदगड-गडहिंग्लजला प्रतिमहाबळेश्वर बनविण्याचा कुपेकरांचा मानस
सावंतवाडी, ६ ऑगस्ट/वार्ताहर

 

तिलारी-रामघाट- पारगड या सह्य़ाद्रीच्या पट्टय़ात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पातील हवेवर वीज निर्मिती विंड मिल्स प्रकल्पाचे सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी दिली. सावंतवाडी- दोडामार्ग तालुक्याचा सह्य़ाद्री पट्टा आणि चंदगड- गडहिंग्लज तालुक्यातील प्रदूषणविरहित भागाला प्रतिमहाबळेश्वर बनविण्याचा मानस आहे, असे ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर कुपे या गावी पत्रकारांशी बोलत होते. आंबोली- कुंभवडे, कुंभवडे- केगदवाडी- पारगड व पारगड- रामघाट- तिलारी हा पट्टा प्रतिमहाबळेश्वर करण्याचा मानस असून त्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. तिनशे कोटी रुपयांची गरज आहे, असे श्री. कुपेकर म्हणाले. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात काही भाग आणि चंदगड व गडहिंग्लज तालुक्यात प्रतिमहाबळेश्वर बनविण्यात येणाऱ्या संकल्पनेचा गाभा आहे, असे कुपेकर म्हणाले. आंबोलीत वर्षांविहारासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. विदेशी पर्यटक तारकर्ली सारख्या भागाला पसंती देत असल्याचे आपणास सांगण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी दोन हजार कोटी रुपये शासनाने दिल्यास हिंदुस्थानात सिंधुदुर्गचा लौकिक होईल. या भागात पर्यटनाची खाणच आहे. येथे विदेशी पर्यटक मोठय़ा प्रमाणात येऊ शकतात. त्यासाठी दूरदृष्टीची गरज आहे, असे श्री. कुपेकर म्हणाले. आंबोली- कुंभवडे- केगदवाडी ते पारगड या मार्गावर प्रदूषण विरहित वर्षां पर्यटन, तसेच पुढे पारगड- रामघाट व तिलारी प्रकल्प भागातही एक सर्किट निर्माण होऊ शकते. हा भाग प्रतिमहाबळेश्वर बनविण्याची संकल्पना सरकार समोर ठेवली जाईल, असे श्री. कुपेकर म्हणाले.
हा पट्टा ट्रेकिंगसाठी उपयुक्त आहे. रामघाट ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व आहे, असे सांगून पारगड किल्ला पाहिल्यावर छत्रपतींची दूरदृष्टी दिसते असे ते म्हणाले. रामघाट- तिलारी ते पारगड भागात वाऱ्यावर वीज निर्माण होणारी विंडमिल्स सर्वेक्षण सुरू आहे. विंडमिल्स सुरू झाल्यानंतर गावातील स्ट्रीट लाईट व घरातील लाईटचा प्रश्न निकालात निघेल. या भागात वारे मोठय़ा प्रमाणात असल्याने वीज निर्माण होण्यास उपयुक्त भाग असल्याचे त्यांनी सांगितले.
पारगड व सामानगडांचा विकास करतानाच सामानगडाची पर्यटन निधीतून डागडुजी करून ते पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात आले, तसेच आजरा येथील रामतीर्थ विकास व तीर्थक्षेत्र विकास कुपेकर यांच्या दूरदृष्टीतून झाला. पत्रकारांना ते प्रकल्प दाखविण्यात आले. या वेळी कोल्हापूर बांधकाम सभापती संग्रामसिंह कुपेकर उपस्थित होते.