Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

कृष्णात खोत व काळसेकर यांना राजारामबापू वाङ्मय पुरस्कार
इस्लामपूर, ६ ऑगस्ट/ वार्ताहर

 

राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी व महाराष्ट्र साहित्य शाखा इस्लामपूर यांच्या वतीने मराठी भाषेतील ज्येष्ठ व नवोदित साहित्यिकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतीस देण्यात येणारे यंदाचे लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार साहित्यिक कृष्णात खोत यांच्या ‘रौंदाळा’ या कादंबरीस व प्रथम प्रकाशन विभागातला पुरस्कार ऋत्विक काळसेकर यांच्या ‘काळोखाच्या तळाशी’ या कवितासंग्रहास देण्यात येत असल्याची घोषणा राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह प्रा. श्यामराव पाटील यांनी केली.
या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे. लवकरच जाहीर कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचेही प्रा. पाटील यांनी सांगितले. कृष्णात खोत यांची ‘रौंदाळा’ ही कादंबरी मुंबईच्या पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केली आहे.कादंबरीस देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप रोख सात हजार रुपये, गौरवचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. या पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या कादंबऱ्यांतून खोत यांच्या कादंबरीची निवड करण्यात आली आहे.
ऋत्विक काळसेकर यांच्या ‘काळोखाच्या तळाशी’ या काव्यसंग्रहास देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप रोख पाच हजार रुपये, गौरवचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. दि. १ जानेवारी ते दि. ३१ डिसेंबर २००८ या एक वर्षांच्या काळात प्रथम प्रकाशित झालेल्या व पुरस्कारासाठी राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीकडे प्राप्त झालेल्या पुस्तकातून काळसेकर यांच्या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. काळसेकर यांचा कवितासंग्रह मुंबई येथील लोकवाङ्मयगृहाने प्रकाशित केला आहे.
राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी व ‘मसाप’ शाखा इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृतींना दरवर्षी लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार देण्यात येणार आहेत. यंदापासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिकांच्या वाङ्मय कृती व नवोदित साहित्यिकांच्या प्रथम प्रकाशित वाङ्मय कृती अशा दोन विभागांतून ‘रौंदाळा’ या कादंबरीची व ‘काळोखाच्या तळाशी’ या कवितासंग्रहाची त्रिसदस्यीय निवड समितीच्या वतीने निवड करण्यात आल्याचेही प्रा. श्यामराव पाटील यांनी सांगितले.