Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

आचारसंहितेपूर्वी फेरीवाल्यांसाठी नियमावली करण्याची मागणी
कोल्हापूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

 

फेरीवाल्यांसाठी पोटनियम त्वरित तयार करण्यात यावेत असे आदेश राज्य शासनाने राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांना दिले असून पोटनियम कशाप्रकारचे असावेत त्यासंबंधीचा एक मसुदाही राज्य शासनाने पाठविला आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हे पोटनियम तयार करण्यात यावेत अशी मागणी फेरीवाल्यांच्या सर्व संघटनांच्या एकत्रित बैठकीत करण्यात आली. अध्यक्षस्थानी सुरेंद्र शहा हे होते.
पोटनियम करताना संपूर्ण शहराची पाहणी करण्यात यावी, फेरीवाल्यांच्या नोंदी केल्या जाव्यात, स्थिर फेरीवाले आणि फिरते फेरीवाले यांची संख्या निश्चित करण्यात यावी, पोटनियम राष्ट्रीय फेरीवाला धोरणांच्या चौकटीत करण्यात यावेत असे आदेश राज्य शासनाने महापालिका, नगरपालिकांना दिले आहेत.
कोल्हापूर शहरासाठी महापालिकेने पोटनियम त्वरित करावेत या मागणीसाठी एका व्यापक शिष्टमंडळाने महापौर आणि आयुक्त यांची दिनांक ६ ऑगस्ट रोजी भेट घेऊन त्यांना निवेदन देण्याचा निर्णयही फेरीवाल्यांच्या बैठकीत घेण्यात आला. फेरीवाल्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी फेरीवाल्यांचा एक महामेळावा घेण्यात यावा किंवा महापालिकेवर एक धडक मोर्चा नेण्यात यावा अशा कांही सूचना या बैठकीत करण्यात आल्या. महापौर आणि आयुक्तांना शिष्टमंडळ भेटल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन मेळावा व धडक मोर्चाचा निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीत भाकपचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, जनशक्तीचे सुभाष वोरा तसेच दिलीप पवार, चंद्रकांत नागावकर, रघुनाथ कांबळे, रमाकांत उरसाल, मारूती भागोजी, बजरंग फडतारे, किरण गवळी,जहाँगीर मेस्त्री, राजू बागवान, नामदेव गावडे, राजू घोसे, बंडू वेळापुरे, प्र.द.गणपुले आदींनी भाषणे केली.