Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

सोलापूर जिल्ह्य़ातून शिवसेनेचे सहा आमदार निवडून येतील- बरडे
सोलापूर, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

 

आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ात शिवसेनेचे किमान सहा आमदार निवडून येतील, असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्य़ातील शिवसेना पदाधिकारी व प्रमुख शिवसैनिकांचे शिबिर येथील शिवस्मारक सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. सेनेचे नेते दिवाकर रावते यांनी या शिबिरात प्रमुख मार्गदर्शन केले. तत्पूर्वी पक्ष संघटनेच्या ताकदीचा आढावा घेताना बरडे यांनी गेल्या २००४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ात शिवसेनेचे चार आमदार निवडून आले होते. सामान्य जनतेत वाढत्या महागाईमुळे सत्ताधारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल प्रचंड राग असल्यामुळे त्याचा फायदा यावेळी शिवसेनेला होईल,असा दावा केला.
रावते यांनी विधानसभा निवडणुकीत गाफिल न राहता शिवसैनिकांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणावेत,असे आवाहन केले. शिवसैनिकांच्या परिश्रमाशिवाय विधानसभेवर भगवा झेंडा फडकू शकत नाही. म्हणून तमाम शिवसैनिकांनी एकदिलाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार शिवशरण पाटील, विष्णू कारमपुरी, नगरसेविका अस्मिता गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले. शिबिराचे सूत्रसंचालन धुत्तरगावकर यांनी केले. या शिबिरास पदाधिकाऱ्यांसह प्रमुख शिवसैनिकांची लक्षणीय उपस्थिती होती.