Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

कोल्हापुरात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
माहेरच्या लोकांनी केली नवऱ्याची धुलाई
कोल्हापूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

 

अवघ्या दहा महिन्यांपूर्वी लग्न होऊन सासरी गेलेल्या शहनाज शेख या नवविवाहितेला आपल्या नवऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचे लक्षात येताच तिने साळोखे पार्क येथील घरी बुधवारी रात्री गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. शहनाजचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात आणला तेव्हा तिच्या माहेरच्या नातेवाइकांनी शहनाजचा नवरा आसिफ याची रुग्णालयाच्या आवारातच धुलाई केली. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी चौघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
कळंबा रोडवरील वारे वसाहत येथे राहणारी शहनाज हिचे साळोखे पार्क येथे राहणाऱ्या आसिफ रमजान शेख याच्याशी दहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. आसिफ हा एका ऑर्केस्ट्रामध्ये काम करतो आहे. या ऑर्केस्ट्रामधीलच एका युवतीशी त्याचे अनैतिक संबंध होते. शहनाजला या अनैतिक संबंधाची माहिती कळताच तिने आसिफला जाब विचारायला सुरुवात केली. त्यातून वाद होऊ लागले. आसिफ आणि त्याच्या कुटुंबीयांकडून शहनाजचा मानसिक आणि शारीरिक छळ होऊ लागला. या छळाला कंटाळून शहनाजने ओढणीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
बुधवारी राखीपौर्णिमा असल्याने शहनाजकडून राखी बांधून घेण्यासाठी तिचा भाऊ झहीर हा तिच्या घरी जाणार होता, मात्र आसिफच्या प्रेयसीने त्याला फोन करून तुम्ही सीपीआर रुग्णालयात या असा निरोप दिला. झहीर हा रुग्णालयात येताच त्याला आपली बहीण शहनाज हिने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. त्याने आसिफला याबद्दल विचारले असता आसिफने व त्याच्या मित्रांनी झहीरला मारहाण केली. त्यानंतर झहीर याने वारे वसाहत येथील आपल्या मित्रांना व नातेवाइकांना रुग्णालय आवारात बोलावून घेतले. त्या वेळी आसिफ हा रुग्णालयातील पोलीस चौकीत बसला होता. तेथे जाऊन झहीर व त्याच्या नातेवाइकांनी त्याला बेदम मारहाण केली. आसिफ व त्याच्या कुटुंबीयांनी शहनाजला गळफास लावून ठार मारले आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा, त्याशिवाय आम्ही शहनाजचा मृतदेह घेऊन जाणार नाही, असे पोलिसांना सांगितले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. राजारामपुरी पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा आसिफ याच्यासह चौघाजणांना ताब्यात घेतले. अधिक तपास सुरू आहे.