Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

मुंबई, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी
गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार येथे २५ ऑगस्ट २००३ रोजी दोन शक्तिशाली बॉम्बचा स्फोट घडवून एकूण ५२ निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तीन आरोपींना आज विशेष ‘पोटा’ न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. मोहमद हनीफ सइद, त्याची पत्नी फहमिदा आणि अशरत अन्सारी हे तिन्ही आरोपी लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेचे सदस्य आहेत. या तिघांनी केलेले कृत्य निर्विवादपणे अमानुषपणाचे असल्याचे विशेष ‘पोटा’ न्यायाधीश एम. आर. पुराणिक यांनी मान्य केले. स्फोट घडविल्याप्रकरणी ‘पोटा’ न्यायालयाने प्रथमच एका दाम्पत्यासह तिघांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली. या खटल्यात तब्बल सहा वर्षांनी देण्यात आलेल्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते.

मनसेचा दणका!
स्वत:चेच बोगस रेशन कार्ड पाहून मुख्य न्यायाधीश स्तंभित
मुंबई, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी मतदाराची ओळख पटविण्यासाठी रेशन कार्ड हा अधिकृत पुरावा म्हणून मान्य करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांपुढे त्यांच्याच नावे तयार केले गेलेले बनावट रेशन कार्ड सादर केले तेव्हा खुद्द मुख्य न्यायाधीशांसह सर्वचजण स्तंभित झाले.देशात अन्यत्र कुठेही मतदानाच्या वेळी मतदाराची ओळख पटविण्यासाठी रेशन कार्ड हा अधिकृत पुरावा मानला जात नाही. मात्र फक्त महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी रेशन कार्ड हा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचा आदेश निवडणूक आयोगाने ११ एप्रिल रोजी काढला होता.

रिपब्लिकन ऐक्य प्रकाश आंबेडकर वजा!
मुंबई, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

भारिप -बहुजन समाज पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना वगळून रिपब्लिकन पक्षांच्या विविध गटांचे ऐक्य घडविण्यात आल्याची घोषणा आज रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, टी. एम. कांबळे, राजेंद्र गवई आदी प्रमुख नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत केली. पूर्वीचा ऐक्याचा अनुभव लक्षात घेऊन यावेळी गटांचा महासंघ न करता सर्व गट विसर्जित करून एकसंध पक्ष बांधण्यास सर्व नेत्यांनी मान्यता दिली, असा दावा या नेत्यांनी केला. मात्र आजच्या बैठकीसाठी आठवले यांनी त्यांनाच मानणाऱ्या काही जणांना स्वतंत्र गट म्हणून बसविल्याने आठवले यांच्या हेतूविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

‘एटीकेटी’ला स्थगिती
शिक्षणमंत्र्यांची दुसऱ्यांदा नाचक्की!
मुंबई, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी
मार्च २००९ च्या शालांत परीक्षेत एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही ‘एटीकेटी’ देऊन इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी पात्र ठरविण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम स्थगिती दिली. अकरावीच्या प्रवेशासाठी ९०:१० कोटा लागू करण्याचा निर्णय बेकायदा ठरवून रद्द केला जाण्यापाठोपाठ आज दिलेली ही स्थगिती हा शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मनमानी कारभारास मिळालेला दुसरा न्यायालयीन दणका आहे.

नरिमन हाऊसबद्दल पोलीस अनभिज्ञ
प्रणब धल सामंता , नवी दिल्ली, ६ ऑगस्ट

मुंबईमध्ये गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर अधिकारी स्तरावर दिसलेली कमालीची अनास्था तसेच पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत शासकीय लालफितीच्या कारभारामुळे निर्माण झालेले अडथळे यांचे सविस्तर विश्लेषण या हल्ल्याची चौकशी करणारे माजी राज्यपाल व माजी केंद्रीय गृह सचिव राम प्रधान यांच्या नेतृत्वाखालील समितीने आपल्या अहवालात केल्याचे कळते. दहशतवाद्यांनी नरिमन हाऊसवर हल्ला करेपर्यंत या इमारतीत ज्यू लोक राहातात हेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहीत नव्हते. तसेच मुंबईत आलेल्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी कफ परेड पोलिसांच्या अख्यत्यारित असलेल्या पाच गस्ती नौकांना त्वरित हालचाल करणे शक्य होते परंतु सागरी सेतूविरोधात वरळी येथे सुरू असलेल्या निदर्शनांच्या बंदोबस्तात या गस्तीनौका त्या दिवशी अडकून पडल्या होत्या.

‘स्वाइन फ्लू’चे निदान आता मुंबईतच
जहांगीर आणि रुबी रुग्णालयांवर गुन्हा दाखल
मुंबई, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी
‘स्वाईन फ्लू’चे निदान करण्यासाठी आता मुंबईतच लाळेची चाचणी करण्याची सुविधा पालिकेने उपलब्ध केली आहे. एकटय़ा कस्तुरबा रुग्णालयावर ताण पडू नये म्हणून पूर्व आणि पश्चिम उपनगरात खास विभाग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा पाटणकर -म्हैसकर यांनी आज पालिका सभागृहात दिली. या प्रकरणी विरोधी पक्षनेते राजहंस सिंग यांनी चर्चा उपस्थित केली होती. परळ येथील हाफकिन संस्थेत रुग्णांच्या लाळेची चाचणी करण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत हे नमुने पुण्याला पाठविण्यात येत होते. तसेच असेच एक केंद्र कस्तुरबामध्येही सुरू करण्यात येणार आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील संभाव्य रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत म्हणून दोन्ही उपनगरात खास विभाग सुरू करण्यात येणार आहेत, असे मनीषा पाटणकर -म्हैसकर यांनी सांगितले.
रिदाप्रकरणी पोलिसांत तक्रार
स्वाइन फ्लूने निधन झालेली सेंट अ‍ॅन्सची विद्यार्थिनी रिदा शेख हिच्या उपचारात हयगय व निष्काळजीपणा केल्याप्रकरणी जहांगीर व रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयांच्या संचालकांसह डॉ. संजय आगरवाल यांच्याविरुद्ध रिदाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवावा, अशी तक्रार आज बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधितांनी राष्ट्राची माफी मागावी व पाच कोटींची भरपाई द्यावी, या मागणीसाठी ग्राहक न्याय मंचकडेही तक्रार दाखल करण्यात येणार आहे. डॉ. आगरवाल हे जहांगीर रुग्णालयाच्या पॅनलवर असून, सुरुवातीस त्यांनीच रिदावर उपचार केले होते. जहांगीर रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. काही नमुने तपासणीकरिता रुबी हॉलमध्येही पाठविण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीच्या या सर्वच पातळ्यांवर हयगय व निष्काळजीपणा झाल्याने रिदाला वेळीच योग्य उपचार मिळू शकलेले नाहीत. त्यामुळेच तिचा मृत्यू ओढवला , असे या अर्जात म्हटले आहे.
नायडूमध्ये अकराशे जणांची तपासणी
नायडू रुग्णालयात दिवसभरात सुमारे तेराशे रुग्णांची काल तपासणी करण्यात आली. तर आज दिवसभरात अकराशे रुग्णांची तपासणी झाली. त्यापैकी १२१ जणांचे संशयित म्हणून नमुने एनआयव्हीला पाठविण्यात आले. आतापर्यंत नायडूमध्ये दाखल झालेल्यापैकी ९७ विद्यार्थ्यांना लागण झाली.

 

प्रत्येक शुक्रवारी