Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

बँक कर्मचाऱ्यांच्या संपाला चांगला प्रतिसाद
औरंगाबाद, ६ ऑगस्ट/खास प्रतिनिधी
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सतर्फे पुकारण्यात आलेल्या संपाला औरंगाबाद जिल्ह्य़ामध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सर्व बँकांचे व्यवहार थंड होते. बँकांमध्ये शुकशुकाट होता. या संपामुळे मराठवाडय़ातील आठही जिल्ह्य़ांत पाच हजार कोटींचे व्यवहार थंडावले.विविध बँक कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी क्रांतिचौकात सभा घेतली. या सभेमध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या वेतन करारासंदर्भात बँकर्सच्या आडमुठय़ा भूमिकेवर टीका केली.

नृसिंह कारखान्याच्या अध्यक्षपदी साळवे, उपाध्यक्षपदी पारवे
परभणी, ६ ऑगस्ट/वार्ताहर

नृसिंह सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी एकनाथ साळवे तर उपाध्यक्षपदी विश्वनाथ पारधे यांची निवड झाली. कृषी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांच्या ताब्यात असलेल्या या साखर कारखान्यावर त्यांचे कट्टर विरोधक श्री. साळवे यांनी बाजी मारल्याने हा वरपूडकरांना मोठा झटका आहे. मात्र या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई झालेली असल्याने साखर कारखान्याचे पुनरुज्जीवन हे विद्यमान संचालक मंडळासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

‘स्वाइन फ्लू’च्या भीतीने रुग्णालयात गर्दी
औरंगाबाद, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

शहरापासून सव्वा दोनशे किलोमीटर अंतरावर पुण्यात अवतरलेल्या ‘स्वाईन फ्लू’चे संकट ओढावले जाऊ नये यासाठी स्थानीय प्रशासनासोबतच नागरिकही पुढे सरसावले आहेत. आपल्या आरोग्याची काळजी घेत थोडीदेखील थंडी-ताप, पडसे वाटल्याबरोबर नजीकच्या रुग्णालयात जाताना लोक दिसून येतात. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत स्वाईन फ्लूची धास्ती घेतलेले रुग्ण पोहोचताना दिसतात.

आंदोलक व पोलिसांच्यात उमापूरमध्ये चकमक
गेवराई, ६ ऑगस्ट/वार्ताहर

पीक कर्जाच्या कारणावरून उमापूर येथे बँकेला कुलूप ठोकून रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांमध्ये व पोलिसांच्यात चकमक झाली. या घटनेत पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला, तर आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. यामध्ये पंधराजण जखमी झाले असून पोलिसांनी २५ जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान उमापुरात तणावपूर्ण शांतता आहे.
उमापूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेकडून शेतकऱ्यांना कर्ज देताना भेदभावाची वागणूक दिली.

स्वाइन फ्लूचा फायदा घेण्यासाठी ठेकेदार सरसावले
औरंगाबाद, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

स्वाईन फ्लूची धास्ती सर्वानीच घेतली असली तरी मास्क उत्पादक आणि विक्रेते याचा फायदा घेण्यासाठी सरसावले आहेत. अनेकांनी आज शासकीय रुग्णालय, पालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडील सॅॅम्पल (नमुना) सादर केले. ‘ऐनवेळी साठा मिळणार नाही. आत्ताच बोला आणि कमी किमतीत मिळवा’ असे आमिषही दाखविण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ठेकेदारांचा येथे जास्तीतजास्त मास्क विकण्यावर भर असल्याचे दिसून येते.

नोकरीच्या वादातून युवकाचा खून
औरंगाबाद, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

तुझ्यामुळे माझी नोकरी गेली, असा आरोप करत युवकाला मारहाण होत असताना सोडविण्यासाठी गेलेल्या युवकाचा खून करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलर फॅक्टरीच्या परिसरात घडली. गणेश ग्यानोजी लोखंडे (वय २४) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुरेश बाबुजी गोसावी (गिरी), त्याची मुले राजेश, ज्ञानेश्वर आणि पत्नी बेबीबाई या चौघांना अटक केली आहे.

राहण्यासाठी पिंजरा नाही, फिरण्यासाठी जागा नाही!
‘सिद्धार्थ’मधील पांढऱ्या वाघांची व्यथा
औरंगाबाद, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी
राहण्यासाठी पिंजरा नाही आणि पिंजऱ्याचे काम सुरू असल्यामुळे फिरण्यासाठी जागा नाही, अशी अवस्था सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील पांढऱ्या वाघांची झाली आहे. तब्बल बारा दिवसांपासून वाघ बंदिस्त असल्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अवघ्या दोनच दिवसांत पिंजरा दुरुस्त करण्यात येईल, असे आश्वासन ठेकेदाराने दिले होते. मात्र बारा दिवसानंतरही पिंजऱ्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.

‘सिडको भूखंड व सदनिकांच्या मालकी हक्काबाबत निर्णय घ्या’
राज्य सरकारला नोटीस
औरंगाबाद, ६ ऑगस्ट/खास प्रतिनिधी
नव्या औरंगाबाद शहरातील सिडको-हडकोमधील भूखंड व सदनिकांना मालकी हक्क प्रदान करण्याचा निर्णय १५ ऑगस्टपूर्वी घ्यावा, अशी नोटीस राज्य सरकारला बजावण्यात आली आहे. १५ ऑगस्टपूर्वी हा निर्णय घेतला नाही तर सिडकोवासीयांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही या नोटीशीमध्ये देण्यात आला आहे.

माहिती अधिकाराचा असाही वापर!
खराब माल खपविण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव; मारहाणीची तक्रार
औरंगाबाद, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी
आगीचे वृत्त समजताच वेळेचीच नव्हे तर जीवाची पर्वा न करता घटनास्थळी जाऊन लोकांच्या प्राणांची तसेच वित्तहानी टाळण्याकामी व्यस्त राहणाऱ्या अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांना माहितीच्या अधिकाराची धमकी देत गुन्हे दाखल करून होरपळवण्याचा प्रयत्न झाला आहे. खराब माल खपविण्यासाठी हा सारा खटाटोप झाल्याचे उघड होत आहे.

बीड जिल्हय़ात ८१ लाखाच्या वसुलीकडे दुर्लक्ष
गौण खनिज चोरी
बीड, ६ ऑगस्ट/वार्ताहर
फकीरजवळा येथील गौण खनिज चोरीप्रकरणी वीटभट्टी मालक आणि सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून ८१ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश बजावून वर्ष उलटले तरी एक पैसाही वसूल झाला नाही. त्यामुळे सरकारी नियमांना बासनात गुंडाळून प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने या भागात मोठय़ा प्रमाणात गौण खनिजाची चोरी बिनबोभाट सुरू आहे.

विदर्भात बँकांचे व्यवहार ठप्प
नागपूर, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

राष्ट्रीयीकृत बँकांच्या देशव्यापी संपाच्या पहिल्याच दिवशी आज विदर्भात सुमारे दोन ते अडीच हजार कोटींचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. आजच्या संपाचा सर्वाधिक फटका पेन्शनधारकांना बसला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये गर्दी असते. मात्र, बँकांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपामुळे ग्राहकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. मात्र, एटीएममध्ये एक दिवस पुरेल इतकी रक्कम ठेवण्यात आल्याने पहिल्या दिवशी तरी परिणाम जाणवला नाही. मात्र, उद्या, ग्राहकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. राष्ट्रीयीकृत बँकांनी देशव्यापी संप पुकारल्याने विदर्भातील सर्व बँकांमध्ये कुठलेही कामकाज झाले नाही.

पोलिसांच्या मदतीने खताचे वाटप
बीड, ६ ऑगस्ट/वार्ताहर

शेतकऱ्यांनी खताचा ट्रक शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणून लावल्यानंतर पोलिसांनी खताचे वाटप नियमानुसार शेतकऱ्यांना केले. वसंत अ‍ॅग्रो एजन्सीच्या मदतीने पोलीस ठाण्यातच २० टन खतवाटप करण्यात आला. बीड जिल्ह्य़ात मागील काही दिवसांपासून खताची टंचाईमुळे मोठय़ा प्रमाणात शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने मागणीच्या तुलनेत खताचा साठा मागवून घेतला असला तरी व्यापारी मात्र कृत्रिम टंचाई निर्माण करून जास्तीच्या दराने खत विकण्याचा प्रयत्न करीत आहेत. ५ ऑगस्टला सकाळी ट्रक (क्र. एमएच-३१-एपी-२२८५) हा युरिया खताचा ट्रक सुबोध केएसके या एजन्सीला शोधत मोंढय़ात फिरत असताना तो वसंत अ‍ॅग्रो एजन्सीकडे गेला तेव्हा या दुकानदाराने हे खत आपले नसल्याचे सांगितले. ही एजन्सी नगर रोडला असल्याचे सांगितल्याने या ट्रकचाचालक गाडी घेऊन नगर रोडकडे आला. दरम्यान, मोंढय़ात आल्यानंतर या गाडीत युरिया खत असल्याचे शेतकऱ्यांना समजले. काही शेतकऱ्यांनी या गाडीचा पाठलाग केल्यानंतर पोलिसांनाही कळविण्यात आले. हा ट्रक पोलीस ठाण्यात आणल्यानंतर वसंत अ‍ॅग्रो एजन्सीच्या पावती बुकावरून शेतकऱ्यांना रांगा लावून खतवाटप करण्यात आले. दरम्यान, हा प्रकार कार्यालयातील चुकीमुळे घडल्याचे सांगण्यात आले.

बँकांच्या संपाने लातूरमध्येही कामकाज विस्कळीत
लातूर, ६ ऑगस्ट/वार्ताहर

देशभरातील सरकारी बँक कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, निवृत्तीवेतन या व अन्य मागण्यांसाठी जिल्ह्य़ातील सरकारी बँक कर्मचारी दोनदिवसीय संपावर गेले आहेत. त्यामुळे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने हा संप पुकारला आहे. कायद्यानुसार राष्ट्रीयीकृत बँकेत काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना नवा वेतन करार नोव्हेंबर २००७ मध्ये करणे केंद्र शासनास भाग होते. पगारवाढीची मागणी बँका व केंद्र शासनाकडे चर्चा व वाटाघाटीसाठी प्रलंबित आहे. शहरातील स्टेट बँक ऑफ हैदराबाद, मुख्य शाखा चंद्रनगर येथे बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. या संपामुळे सर्व कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

पूर्ववैमनस्यातून पुंड कुटुंबाला मारहाण;
जिंतूर, ६ ऑगस्ट/वार्ताहर

जिंतूर तालुक्यातील मौजे इटोली येथील दत्तराव लक्ष्मण पुंड यांच्या कुटुंबांवर मध्यरात्रीच्या वेळी अचानक हल्ला करून प्रू्ववैमनस्याच्या कारणावरून गावातीलच काही लोकांनी बेदम मारहाण केली असून या मारहाणीत सातजण जखमी झाले. पैकी तिघा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दत्तराव पुंडे हे इटोली येथील शेतातील आखाडय़ावरच राहतात. बुधवारी मध्यरात्रीच्या वेळी गावातीलच चार जणांनी पुंड यांच्या आखाडय़ावर हल्ला केला व लाठय़ाकाठय़ांनीसर्व कुटुंबाला बेदम मारहाण केली. दत्तराव पुंड, सखुबाई पुंड, विठ्ठल मुंडे हे तिघे या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. चतुराबाई पुंड, रुक्मिणीबाई पुंड, कैलास पुंड, अनुसया हेही या मारहाणीत जखमी झाले आहेत.

संपाला नांदेडमध्येही चांगला प्रतिसाद
नांदेड, ६ ऑगस्ट/वार्ताहर

पगारवाढ तसेच निवृत्तीवेतनाबाबतच्या मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या दोनदिवसीय संपाला नांदेड जिल्ह्य़ात चांगला प्रतिसाद मिळाला. या संपाचा फटका सर्वसामान्य ग्राहकांसह व्यापाऱंनाही बसला. संघटनेचे स्थानिक नेते जसबिरसिंग तुटेजा, मालू, पी. के. वाघमारे, किशोर कासराळीकर, श्रीमती अय्यर आदींनी सहभाग नोंदविला. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर भविष्यात हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

उस्मानाबादमध्ये आजपासून कार्यशाळा
उस्मानाबाद, ६ ऑगस्ट/वार्ताहर
नगर वाचनालय व राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १० ऑगस्टदरम्यान ग्रंथप्रदर्शन कार्यशाळा व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवादाच्या पहिल्या दिवशी ‘आजची पत्रकारिता’ या विषयावर प्रा. जयदेव डोळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. साहित्यिक व पत्रकारितेतील अनुभव असणारे आसाराम लोमटे, चित्रकार व विचारवंत भ. मा. परसवाळे, शेतीच्या प्रश्नावर अमर हबीब यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. सायं. ६ ते ८ या वेळेत नगर वाचनालयात ही व्याख्याने होणार आहेत.नगर वाचनालयाची स्थापना होऊन १०० वर्षे झाली आहेत. या वाचनालयाच्या वतीने ग्रंथप्रदर्शन व कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे. ११ ऑगस्टला कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. याचे उद्घाटक जिल्हा माहिती अधिकारी राधाकृष्ण मुळी असणार आहेत.

२ सप्टेंबरपासून ‘साफसफाई महिना’
औरंगाबाद, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी
शहराची साफसफाई ही निरंतर चालणारी प्रक्रिया असली तरी त्यात सुधारणा आणण्यासाठी २ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा साफसफाई महिना म्हणून पाळण्याचा निर्णय पालिका आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी घेतला आहे. त्यासाठी आतापासूनच जनजागृती करण्याचे संबंधितांना आदेशीत करण्यात आले आहे.आम्ही दररोजच साफसफाई करतो, त्यामुळे या महिन्यात आणखी वेगळे काय करायचे, असा प्रश्न अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनात आला होता. त्यावर आपला परिसर स्वच्छ झाला आहे, असे आपल्या मनाला वाटले पाहिजे. आपले मन हाच या सफाई मोहिमेचा निकष असल्याचे डॉ. भापकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार पालिकेचा आरोग्य विभाग आणि प्रभाग अधिकारी आतापासूनच कामाला लागले आहे. यापूर्वी साफसफाई आणि स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले होते. मात्र यासाठी असा खास महिना पाळण्यात आलेला नाही. डॉ. भापकर यांच्या या उपक्रमामुळे शहराच्या स्वच्छतेत किती फरक पडतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

जालना जिल्ह्य़ात पाऊस सरासरीपेक्षा कमी
जालना, ६ ऑगस्ट/वार्ताहर
जून आणि जुलै महिन्यात जालना जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. या दोन महिन्यांचे सरासरी पर्जन्यमान ३१०.७८ मि.मी. असले तरी प्रत्यक्षात २३०.९३ मि.मी. एवढी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्टमध्येही आजपर्यंत पाऊस बेपत्ताच आहे.जून आणि जुलै महिन्यांचा विचार करता सर्वात कमी म्हणजे ३९.१५ टक्के पाऊस घनसावंगी तालुक्यात झाला आहे. अन्य सात तालुक्यांतील ही टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. जालना ७६.२९ टक्के, बदनापूर ६८.१९ टक्के, भोकरदन - ८९.६२ टक्के, जाफराबाद ८७.९५ टक्के, परतूर ७३.८८ टक्के, मंठा ७२.०४ टक्के आणि अंबड ६०.२१ टक्के.

गॅस्ट्रोच्या साथीने महिला मृत्युमुखी
हिंगोली, ६ ऑगस्ट/वार्ताहर
औंढा नागनाथ तालुक्यातील यहळेगाव सोळंके येथे गॅस्ट्रोच्या साथीने सावित्री महादू शेळके या महिलेचा मृत्यू झाला असून औंढा ग्रामीण रुग्णालयात काही रुग्ण आहेत, तर गावामध्ये आरोग्य पथक दाखल झाले आहे. यहळेगाव सोळंके येथे ३ ऑगस्टपासून दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याने औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात रेखा घोंगडे, सारिका घोंगडे, सीता सोळंके, ताई सोळंके, सावित्री सोळंके यांना दाखल केले. सावित्री शेळके यांनाही औंढय़ाच्या रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना हिंगोलीच्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला असता त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना घरीच ठेवल्याने औषधोपचाराअभावी मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. डॉ. देविदास आढे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथक आले आहे.औंढय़ाच्या रुग्णालयात ६ ऑगस्टपर्यंत रत्नमाला धोंगडे, रंभाजी धोंगडे, रामकृष्ण सोळंके, गिरजा धोंगडे, जिजाबाई शेळके, सुजाता घोंगडे, रेखा सोळंके, रेखा पांडुजी सोळंके, जिजाबाई धोंगडे, सुमन सोळंके, अशोक मुदनर, वैभव सोळंके, पार्वती सोळंके यांच्यावर औषधोपचार चालू आहेत.

तालुका क्रीडा स्पर्धेत केवळ ११ शाळांचा सहभाग
लोहा, ६ ऑगस्ट/वार्ताहर
४७ माध्यमिक शाळा, पण तालुका क्रीडा स्पर्धेत केवळ ११ शाळांचा सहभाग. अशा अवस्थेत तालुका स्तरावर क्रीडा धोरण सुरू असेल तर ऑलिम्पिक खेळाडू, राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळाडू कसे तयार होतील, असा संतप्त सूर यानिमित्ताने उमटला.तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेला आज सुरुवात झाली. तालुका क्रीडा अधिकारी गंगालाल यादव यांच्या उपस्थितीत नगरसेवक वसंत पवार यांनी उद्घाटन केले. सहारा मैदानावर सुरू झालेल्या क्रिकेट स्पर्धेत १४ वर्षांखालील मुले गटात शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय (लोहा)- प्रथम तर मातोश्री अनुसयाबाई (सोनखेड)- द्वितीय. १९ वर्षांखालील मुले गटात श्रीशिवाजी हायस्कूल (सोनखेड) प्रथम, तर मातोश्री अनुसयाबाई माध्यमिक विद्यालय (सोनखेड)- द्वितीय क्रमांक मिळवून या शाळेनी विजय संपादन केला.

अतिसाराच्या साथीने नऊ जण रुग्णालयात
सोयगाव, ६ ऑगस्ट/वार्ताहर
तालुक्यातील डाभा येथे दूषित पाण्यामुळे गावात डायरियाची (अतिसार) लागण झाली असून नऊ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खडके यांनी सांगितले की, गावात संडास, वांत्या सुरू झाल्याचे समजताच सावळतबारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. वऱ्हाडे व एक वैद्यकीय पथक डाभा गावात आले असून रुग्णांवर उपचार सुरू केले असून परिस्थिती आटोक्यात आहे.येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून पाण्याचे नमुने घेतले असून नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे.डाभा गावाजवळ असलेल्या काही गावांत सव्‍‌र्हेक्षण सुरू करणार आहे. काही दिवसांपूर्वी दूषित पाण्यामुळे हिवरी गावात एका बालकाचा मृत्यू झाल्यामुळे दूषित पाण्याची समस्या उग्र रूप धारण करीत आहे.

पीकविमा भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत
बीड, ६ ऑगस्ट/वार्ताहर
बँकेतील गर्दी लक्षात घेता सरकारने या वर्षांसाठी खरीप हंगामात पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ दिली असून ३१ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी संबंधित शाखेत विमा हप्ता भरावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.या वर्षीही पावसाच्या हुलकावणीमुळे मोठय़ा प्रमाणात पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकांमध्ये गर्दी केली आहे.

अण्णाभाऊ साठे जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात
मानवत, ६ ऑगस्ट/वार्ताहर
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ८९वी जयंती येथील विविध संघटना, शाळा, महाविद्यालयातून साजरी करण्यात आली.नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयामध्ये आज सकाळी तालुक्यातील डेंगळी पिंपळगाव येथील शेख रुस्तुम या कलाकाराने कलापथकाने अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर गायन केले, तर माध्यमिक विद्यालयात मुलांची भाषणे झाली.

पालिका कर्मचाऱ्यांचा मोर्चा
लातूर, ६ ऑगस्ट/वार्ताहर
विविध प्रलंबित मागण्यांसाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा काढण्यात आला.सहावा वेतन आयोग लागू करावा या व अन्य मागण्यांसाठी नगर परिषद कर्मचारी चार दिवसांपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे लातूर शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.

कॉँग्रेसच्या केंद्रीय समितीचे सदस्य रविवारी बीडमध्ये
बीड, ६ ऑगस्ट/वार्ताहर

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्रासाठी नियुक्त केलेले समिती सदस्य तथा प्रभारी मोहन प्रकाश जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येत असून ते विधानसभेच्या मतदारसंघातील पक्षकार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत, अशी माहिती जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड्. शाहूराव जाधव यांनी दिली.बीड जिल्ह्य़ात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यस्तरीय काँग्रेस कमिटीचे पथक चाचपणी करून गेल्यानंतर आता केंद्रीय कमिटीचे सदस्य मोहन प्रकाश हे ९ ऑगस्टला जिल्ह्य़ात येत आहेत. शिवसांस्कृतिक सभागृहात विधानसभेच्या सहाही मतदारसंघांतील कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन निवडणुकीबाबत चर्चा करणार आहेत. यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, मंत्री, खासदार, आमदार आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन अ‍ॅड्. जाधव यांनी केले.

रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ४०० कर्मचाऱ्यांच्या भरतीला मंजुरी
नांदेड, ६ ऑगस्ट/वार्ताहर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ४०० नवीन कर्मचाऱ्यांच्या भरतीला राज्य शासनाने हिरवा कंदिल दाखविला आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अस्थायी असलेले १६८ कर्मचारी कायम होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी दिली. गेल्या वर्षभरापासून विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विभागातील रिक्त जागा भरण्यात याव्यात, ज्यांनी विद्यापीठ उभारताना जमिनी दिल्या त्यांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी यासाठी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने ४०० नवीन पदांना मान्यता देण्याचा आदेश दिला. तशा आशयाचे पत्र आज विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाले. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे विद्यापीठातील १६८ अस्थायी कर्मचारी कायम होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी दिली. नवीन पदांना मंजुरी मिळाल्याने विद्यापीठातील वेगवेगळ्या विभागांतील कामकाज सुरळीत व गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चार दरोडेखोरांना अंबडमध्ये अटक
अंबड, ६ ऑगस्ट/वार्ताहर

शहरात गेल्या तीन महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीतील चारजणांना नांदेड व अंबड पोलिसांनी एकत्रित कारवाई करून जेरबंद केले. यातील तीन परळी येथील तर एक देलगूर येथील रहिवासी आहे.पोलीस सूत्रांनुसार, जळगाव पोलिसांच्या ताब्यात असलेला कुख्यात दरोडेखोर आंतरराज्य दरोडेखोर टोळीचा प्रमुख अश्विन बलसार याच्याकडून मिळालेली माहिती नांदेड पोलिसांना कळविल्यावरून नांदेड पोलिसांचे विशेष शाखेचे पथक मंगळवारी सकाळी अंबड शहरात दाखल होऊन अंबड पोलिसांच्या सहाय्याने शहरातील राऊतनगरमध्ये तीन महिन्यांपासून राहणारे बच्चनसिंग मंगलसिंग बावरी (वय ३०), भीमा रामभाऊ माने (वय ३३, रा. परळी) तर कुरेशी मोहल्ल्यातून जगजितसिंग आचलसिंग दुधानी (वय २०, रा. शिवाजी चौक, परळी) व तारासिंग पुजारीसिंग ताक (रा. जुना बस स्टॅण्ड, देगलूर, जि. नांदेड) यांना जेरबंद केले. त्यानंतर त्यांना नांदेडला घेऊन गेले. ही कारवाई नांदेडचे जिल्हा पोलीसप्रमुख सत्यनारायण चौधरी आणि जालनाचे पोलीसप्रमुख संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. नांदेडच्या पथकात उपनिरीक्षक सुरेश पाडवी यांच्यासह जमादार कोडावर, रब, वानोळे, भोये, चालक मुजीब तसेच अंबडच्या पथकात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दिलपाक, चत्रभुज नागरगोजे, एन. डी. शेळके यांच्यासह जमादार सय्यद, अंतराम रुपेकर यांचा समावेश होता.

श्रद्धाच्या खुनातील मोटार जप्त
नांदेड, ६ ऑगस्ट/वार्ताहर

पुणे येथील संगणक अभियंता श्रद्धा छाजेडचा मारेकरी अनमोल जब्बाल याने गुन्ह्य़ात वापरलेली ह्य़ुंदाई कार वसमत पोलिसांनी बुधवारी रात्री नांदेडच्या रेल्वे स्थानक परिसरातून जप्त केली.पुणे येथील एका कंपनीत काम करणाऱ्या अनमोल जब्बाल याने त्याच कंपनीत काम करणाऱ्या श्रद्धा छाजेड हिचे पुण्यातून अपहरण करून नांदेडपासून २० कि.मी. अंतरावर असलेल्या कुरुंदा येथे हत्या केली होती. त्यानंतर त्याने तिचे शव कुरुंदा शिवारात टाकून तेथून पलायन केले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. पुणे पोलिसांसमोर अनमोल जब्बाल हा नाटय़मयरित्या शरण आल्यानंतर वसमत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. न्यायालयाने त्याला १० दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक माणिक पेरके हे बुधवारी रात्री आरोपी अनमोलसमवेत नांदेडमध्ये आले. त्याने गुन्ह्य़ात वापरलेली ह्य़ुंडाई (क्र. एमएच-१-डीई-९४१) कार पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातून जप्त केली आहे. या कारमध्ये रक्ताचे डाग होते. नांदेडच्या श्वान पथकाला पाचारण केल्यानंतर श्वानाने अनमोलच्या अंगावर झडप घातली. हत्या करून श्रद्धाचे शव कुरुंदा शिवारात टाकून अनमोल हा नांदेडमध्ये आला.

मृत अर्भकाला सोडून माता-पित्याचे पलायन
औरंगाबाद, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी
मृत बालकाला सोडून आई आणि वडिलांनी शासकीय रुग्णालयातून पलायन केले. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. मातेचे अर्धवट नावच फक्त समजू शकले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. संगीता साठे नावाची एक महिला बुधवारी शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाली होती. सायंकाळी तिची प्रसुती झाली. मात्र बाळ वाचू शकले नाही. मृत बाळ जन्माला आल्याचे समजताच काही वेळाने संगीता आणि तिचा पती असे दोघेही गायब झाले.रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते आढळून न आल्यामुळे पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.महिलेला रुग्णालयात दाखल करत असताना दाखल करणाऱ्याने स्वत:चे नाव संदीप बागुल असल्याचे सांगितले होते. तो नंतर दिसलाच नाही. संगीता हिचे वय, गाव किंवा अन्य माहिती रुग्णालयाने नोंदवून घेतली नाही. बाळाचे पार्थिव शवागृहात ठेवण्यात आले आहे.

तलवार, कुकरी बाळगणाऱ्यास अटक
औरंगाबाद, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी
घरामध्ये दोन धारदार तलावारी आणि एक लोखंडी कुकरी बाळगणाऱ्यास गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सिद्दीकी यांच्या पथकाने काल अटक केली. राजेंद्रसिंह रणजितसिंह ठाकूर (वय ४५, रा. चौराहा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तो स्टँप विक्रेता म्हणून काम करतो. त्याच्याकडे तलवारी असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा घालून त्याला अटक करण्यात आली.

दागिन्यांची चोरी
औरंगाबाद, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

केशवनगरी येथील माधव अपार्टमेंटमध्ये अभिजित विद्याधर सदावर्ते यांच्या घरात घुसून चोरटय़ांनी २३ हजार रुपये किमतीचे दागिने पळविले. चोरटय़ांनी सदनिकेचा कडी, कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातून दागिने पळवून नेले.

‘सद्भावना ठेवल्यास गावे तंटामुक्त होऊ शकतात ’
गेवराई, ६ ऑगस्ट/वार्ताहर
राग, लोभ व मत्सर ही वादाची कारणे आहेत. रागाला आवर घातला आणि इतरांविषयी सद्भावना ठेवल्यास गावे तंटामुक्त होऊ शकतात, असे प्रतिपादन विधी सेवा समिती अध्यक्ष व प्रधान दिवाणी न्यायाधीश डब्ल्यू. जे. दैठणकर यांनी केले.विधी सेवा समिती तालुका गेवराई व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मिरकाळा येथे कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्या. डब्ल्यू. जे. दैठणकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सहदिवाणी न्यायाधीश आर. एस. कानडे, न्या. टी. के. चव्हाण, न्या. ए. एम. मुजावर, पोलीस निरीक्षक दिनकर गायधनी, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अप्पासाहेब गरुड, साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पाटीलबा मस्के आदी उपस्थित होते. या शिबिरात ‘तंटामुक्त गाव’ या विषयांसह इतर कायद्यांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.न्यायाधीश टी. के. चव्हाण , संतोष अहिर, हरिश्चंद्र पाटील यांनी या वेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुभाष निकम, सूत्रसंचालन प्रा. आश्रुबा मुंडे यांनी केले. आभार संचालक कुमार ढाकणे यांनी मानले.

‘ उदगीर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा’
उदगीर, ६ ऑगस्ट/वार्ताहर
तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, या मागणीचे निवेदन येथील उपजिल्हाधिकाऱ्यांना युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आले.तालुक्यातील डोंगराळ भागातील सोयाबीन, तूर, ज्वारीची पिके पावसाअभावी पूर्णपणे जळून गेली आहेत. पिण्याच्या पाण्याचीही परिस्थिती गंभीर बनली आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही अवघड झाला आहे. निसर्गाच्या कोपामुळे सर्वसामान्य जनता तसेच शेतकरी त्रस्त झाले आहेत. उदगीर तालुका संपूर्ण दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, गेल्या वर्षीची थकीत सोयाबीनची रक्कम द्यावी आदी मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांना देण्यात आले. निवेदनावर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बस्वराज पाटील-नागराळकर, विजयकुमार चवळे, रामकिशन सोनकांबळे, शेख महमद यांच्या सहय़ा आहेत.

‘शिवाजी महाराजांच्या तंत्र आणि मंत्राची गरज’
अंबाजोगाई, ६ ऑगस्ट/वार्ताहर
शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यपद्धतीत अवलंबिलेल्या व्यवस्थापन तंत्र आणि मंत्र राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत छत्रपती शिवाजी महाराज यांचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले. ताई महोत्सव व्याख्यानमालेतील ‘शिवरायांचे व्यवस्थापन तंत्र आणि मंत्र’ या विषयावरील चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते.कोकाटे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी राज्यकारभार पाहताना त्यांनी अवलंबिलेले व्यवस्थापनाचे तंत्र आणि मंत्र हा महत्त्वाचा विषय आहे. नाही. महाराजांनी आपल्या राज्यपद्धतीमध्ये अवलंबिलेले व्यवस्थापनाचे तंत्र आणि मंत्र आजच्या राजकारण्यांनी राबवावे, असे आवाहन त्यांनी केले.

‘राष्ट्रवादी काँग्रेस हा साखर सम्राटांचा गट’
बीड, ६ ऑगस्ट/वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राजकीय पक्ष नसून सग्यासोयऱ्यांचा आणि साखर सम्राटांचा गट आहे. या पक्षाला सामान्य माणसाबद्दल आस्था नाही अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अशोक तावरे यांनी केली. तालुक्यातील पालवन येथील मनसेच्या शाखेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. तावरे म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठी माणसांचे हित मनसे सोडून कोणीच पाहत नाही. काँग्रेसमधील काही साखर सम्राट असणारे सगेसोयरे खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बाजूला झाले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मात्र सामान्य माणसाचे हित पाहण्यापेक्षा राष्ट्रवादीतील साखर सम्राटांचे हितच या पक्षांकडून जोपासले गेले आहे. या साखर या साखर सम्राटांना सत्तेपासून हद्दपार करून मनसेच्या प्रवाहात जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

संपामुळे बँकेतील व्यवहार बंद
लोहा, ६ ऑगस्ट/वार्ताहर
राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आज भारतीय स्टेट बँक व देना बँकेतील व्यवहार बंद होते. पेन्शनधारकांचे मासिक पगार, कर्मचाऱ्यांचे वेतन, दैनंदिन व्यवहार, परीक्षेसाठी आवश्यक ड्राफ्ट यावर या संपामुळे परिणाम झाला.

भा.ज.प.विद्यार्थी आघाडीचा उद्या मेळावा
गंगाखेड, ६ ऑगस्ट/वार्ताहर
भारतीय जनता पक्ष विद्यार्थी आघाडीच्या तालुका कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी (८ ऑगस्ट) शहरात आयोजित करण्यात आला आहे.समर्थ गंगाधर मंगल कार्यालयात विद्यार्थी आघाडीच्या वतीने पक्ष संघटन मजबुतीकरण, युवकांच्या समस्या या विषयावर मेळावा आयोजित केला आहे. यावेळी ‘राजकारणात युवकांचा सहभाग’ या विषयावर परिसंवादही होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा नेते डॉ. मधुसूदन केंद्रे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष धनंजय मुंडे तसेच मराठवाडा संघटनमंत्री सुधाकर भोयर यांची उपस्थिती असणार आहे.

हक्कासाठी राष्ट्रपतींना निवेदन
भोकरदन, ६ ऑगस्ट/वार्ताहर
राजपूत, परदेशी, मीना समाजाच्या न्याय हक्कासाठी समाजाच्या शिष्टमंडळाने देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची ३१ जुलैला राष्ट्रपती भवनात महाराष्ट्र ग्राहक संरक्षण सेलचे प्रदेशाध्यक्ष जे. बी. राजपूत व शिवराणा मित्रमंडळाचे संस्थापक रंजीत डेडवाल यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. महाराष्ट्रातील राजपूत, परदेशी, मीना या समाजाचा विमुक्त जातीमध्ये समावेश करून समाजाला न्याय द्यावा अशी विनंती शिष्टमंडळाच्या वतीने राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना करण्यात आली. शिष्टमंडळात डॉ. जे. बी. राजपूत, रंजीत डेडवाल, फुलचंद डेडवाल, डॉ. सुभाष राजपूत, भीमसिंग डेचरवाल, विजयभैय्या बोथरा आदींचा समावेश होता.

राजस्व अभियानाची सुरुवात
निलंगा, ६ ऑगस्ट/वार्ताहर
महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी व महसूल दप्तर नोंदी अद्ययावत करण्यासाठी १ ऑगस्टपासून तालुक्यात राजस्व अभियानाची सुरुवात झाली असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब मुपडे यांनी दिली. तालुक्यात जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांच्या आदेशान्वये व उपविभागीय अधिकारी मंदार वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्व अभियानाची सुरुवात झाली आहे. यात १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान गावातील मुख्य ठिकाणी सातबारा व ८ अचे वाचन करण्यात येणार आहे

लोककलावंतांचा मंगळवारी मोर्चा
हिंगोली, ६ ऑगस्ट/वार्ताहर
परिवर्तन कला महासंघ जिल्हा शाखेच्या वतीने कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दिलीप साठे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.मोर्चात सांप्रदायिक मंडळे, भजन मंडळ, बारी मंडळ, कला पथक, वाघ्या मुरळी भजनी मंडळ, खडी गंमतवाले, शक्ती तुरेवाले, ऑर्केस्ट्रा कलावंत, जलसाकार, शाहीर, संगीत भजनी मंडळ, बँडवाले सहभागी होणार आहेत.

अंबेकर यांच्या शोधनिबंधास मान्यता
परभणी, ६ ऑगस्ट/वार्ताहर
चेन्नई येथे ७ ते ९ ऑगस्टदरम्यान आयोजित ब्रिटिश कॉन्सिल, रिजनल लँग्वेज ऑफिस ऑफ अमेरिकन सेंटर, नवी दिल्ली व इंग्लिश लँग्वेज टिचर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी क्विन्स शिक्षण शास्त्र महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी अंबेकर यांच्या शोधनिबंधास मान्यता मिळाली.

डॉ. गायकवाड यांचा सत्कार
जिंतूर, ६ ऑगस्ट/वार्ताहर
नवजीवन लॅबचे संचालक व महाराष्ट्र आयुर्वेद संघाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचा पतंजली योग समितीतर्फे उत्कृष्य योग शिक्षक म्हणून डॉ. गायकवाड यांचा सत्कार ‘राज्यस्तरीय एकता गौरव’ पुरस्कार देऊन करण्यात आला. या अध्यक्षस्थानी यादवराव साखरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्य प्रभारी दादा जोशी, बापू पाडाळकर होते.

डीपरची कार्यकारिणी घोषित
लातूर, ६ ऑगस्ट/वार्ताहर
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना डीसीटी १० परीक्षेची संधी मिळावी या हेतूने सीईटी प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शनपर प्राध्यापक, विद्यार्थी व पालक यांचा मेळावा येथील महात्मा बसवेश्वर विद्यालयात झाला. अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार होते. या वेळी डीपरची लातूर जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. ती अशी- अध्यक्ष डॉ. नागोराव कुंभार, कार्याध्यक्ष प्रा. व्ही. आर. गायकवाड, सचिव एस. एम. पाटील, कोषाध्यक्ष प्रा. भाऊसाहेब सरवदे, विभागीय अध्यक्ष प्रा. एस. बी. चव्हाण.

अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन
वसमत, ६ ऑगस्ट/वार्ताहर

लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती कौठा रस्ता येथील वॉर्ड क्र. १८ मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. ध्वजारोहण एम.सी.ई.डी.चे बी.सी. खंदारे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मरवणूक काढण्यात आली राजकुमार एंगडे, बी.सी. खंदारे, बी. सी. उबाळे, चक्रवर्ती कांबळे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.