Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

गेटवे, झवेरी बाजार बॉम्बस्फोटातील आरोपींना मृत्युदंड!
मुंबई, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

 

गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार येथे २५ ऑगस्ट २००३ रोजी दोन शक्तिशाली बॉम्बचा स्फोट घडवून एकूण ५२ निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तीन आरोपींना आज विशेष ‘पोटा’ न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. मोहमद हनीफ सइद, त्याची पत्नी फहमिदा आणि अशरत अन्सारी हे तिन्ही आरोपी लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेचे सदस्य आहेत. या तिघांनी केलेले कृत्य निर्विवादपणे अमानुषपणाचे असल्याचे विशेष ‘पोटा’ न्यायाधीश एम. आर. पुराणिक यांनी मान्य केले. स्फोट घडविल्याप्रकरणी ‘पोटा’ न्यायालयाने प्रथमच एका दाम्पत्यासह तिघांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली. या खटल्यात तब्बल सहा वर्षांनी देण्यात आलेल्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते.
याच तिघा आरोपींनी त्यापूर्वी घाटकोपर येथे बेस्टच्या बसमध्येही बॉम्ब ठेवला होता. त्यामध्ये दोन जण ठार झाले होते. त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार येथे दोन शक्तिशाली स्फोट घडविले हे कृत्य अमानुषपणाचा कळस असल्याने हा विरळाच गुन्हा आहे त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा देणेच उचित ठरेल, हा अभियोग पक्षाचा युक्तिवाद ‘पोटा’ न्यायालयाने मान्य केला आणि तिघा आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. तीन दिवसांपूर्वी या आरोपींना विशेष ‘पोटा’ न्यायालयाने या स्फोटांप्रकरणी दोषी ठरविले होते आणि त्यांना गुरुवारी शिक्षा ठोठावण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे सकाळपासूनच न्यायालयाच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा ठोठावताच पोलिसांनी त्यांना तीन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या कारागृहाकडे हलविले. न्यायालयाबाहेर फहमिदाने हंबरडा फोडला तेव्हा तिचा पती हनीफ हा तिच्याशेजारी शांतपणे उभा होता. तर ‘इस अंधे कानूनसे क्या इन्साफ मिलेगा’ अशी प्रतिक्रिया अशरत अन्सारी याने व्यक्त केली. पोटा कायद्यातील कलम ३(२) आणि भादंवितील कलम (३०२) (खून), ३०७ (खुनाचा प्रयत्न) आणि १२० (ब) कटकारस्थान रचणे या आरोपांखाली दोषी ठरवून न्यायालयाने शिक्षा ठोठावली. स्फोटके कायदा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्यातील कलमांचाही वापर करण्यात आला.
अशा प्रकारचे अमानुष कृत्य केल्यास कायदा गुन्हेगारांची गय करीत नाही, हाच संदेश या निकालाद्वारे अतिरेक्यांना मिळाला आहे, असेही उज्ज्वल निकम म्हणाले. हनीफ आणि फहमिदा यांच्या १६ वर्षीय मुलीलाही स्फोटातील सहभागाप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र ती कायदेशीरदृष्टय़ा सज्ञान नसल्याने अभियोग पक्षाने तिच्याविरुद्धच्या आरोपांची चौकशी न करण्याचा निर्णय घेतला. तर अन्य आरोपी मोहमह लाडूवाला आणि मोहमद बॅटरीवाला यांना पोटा न्यायालयाने दोषमुक्त केले.