Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

रिपब्लिकन ऐक्य प्रकाश आंबेडकर वजा!
मुंबई, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

 

भारिप -बहुजन समाज पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना वगळून रिपब्लिकन पक्षांच्या विविध गटांचे ऐक्य घडविण्यात आल्याची घोषणा आज रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, टी. एम. कांबळे, राजेंद्र गवई आदी प्रमुख नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत केली. पूर्वीचा ऐक्याचा अनुभव लक्षात घेऊन यावेळी गटांचा महासंघ न करता सर्व गट विसर्जित करून एकसंध पक्ष बांधण्यास सर्व नेत्यांनी मान्यता दिली, असा दावा या नेत्यांनी केला. मात्र आजच्या बैठकीसाठी आठवले यांनी त्यांनाच मानणाऱ्या काही जणांना स्वतंत्र गट म्हणून बसविल्याने आठवले यांच्या हेतूविषयी शंका व्यक्त केली जात आहे.
पक्षाचे राजकीय धोरण आणि भूमिका ठरविण्यासाठी येत्या ११ ऑगस्ट रोजी बैठक होणार असून त्यानंतरच ऐक्याची प्रक्रिया पुढे जाईल, असे आजच्या बैठकीनंतर सांगण्यात आले. प्रकाश आंबेडकर यांना ऐक्यात सहभागी होण्यासाठी विनंती करण्यात येणार असून कवाडे आणि गवई यांच्यावर आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रामदास आठवले यांनी आजची बैठक बोलावली होती. प्रमुख गटांसह इतर छोटय़ा मोठय़ा ४५ गटांच्या नेत्यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. बैठकीत ऐक्य करण्याबाबत नेत्यांचे एकमत झाले असून निवडणुकीत कोणत्या पक्षाशी युती करायची आणि एकसंघ रिपब्लिकन पक्षाचा नेता कोण असेल यावरुन यावेळी ऐक्याला तडा जाणार नाही, असा दावा यावेळी करण्यात आला. देशाच्या राजकीय क्षितिजावर रिपब्लिकन पक्ष नव्या ताकदीने उभा राहील, सत्ता हे आमचे लक्ष्य नाही तर समाज परिवर्तन हे आमचे ध्येय आहे, त्यासाठी सत्ता आम्ही साधन मानतो, असेही यावेळी कवाडे यांनी जाहीर केले. याआधी रिपब्लिकन गटांचा महासंघ स्थापन करण्यात आला होता. मात्र त्यामुळे गटांचे अस्तित्व कायम राहते. त्यामुळे यावेळी महासंघाची स्थापना न करता एकसंध पक्ष बांधण्याचा निर्णय घेण्यात आला, असे रामदास आठवले यांनी सांगितले. सध्या फक्त ऐक्य करण्याचा निर्णय झाला आहे, मात्र पुम्ढील राजकीय धोरण ११ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत ठरविण्यात येईल, अशी माहिती टी. एम. कांबळे यांनी दिली.
पूर्वीप्रमाणे आताही ऐक्य करून काँग्रेस आघाडीला मदत करणार असाल तर आम्ही तुमच्यासोबत राहणार नाही, असे बैठकीतच आठवले यांना काही नेत्यांनी सुनावले. या पूर्वी १९७४, १९८९ आणि १९९५ मध्ये ऐक्य घडवण्यात आले होते. मात्र प्रत्येक वेळी निवडणुकीत कोणत्या पक्षासोबत जायचे आणि नेता कोण यावरून ऐक्याला तडा गेला. यावेळी तसे काही होणार नाही, असा दावा आठवले यांनी केला. मात्र सर्व गट विसर्जित करण्यात आले तर मग राज्य मंत्रिमंडळात असणाऱ्या आठवले गटाच्या मंत्र्यांचे काय, तसेच रा. सू. गवई यांना काँग्रेसने केरळचे राज्यपालपद दिले आहे त्यांचे काय? असे प्रश्नही विचारले जात आहेत.