Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

नरिमन हाऊसबद्दल पोलीस अनभिज्ञ
प्रणब धल सामंता
नवी दिल्ली, ६ ऑगस्ट

 

मुंबईमध्ये गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर अधिकारी स्तरावर दिसलेली कमालीची अनास्था तसेच पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत शासकीय लालफितीच्या कारभारामुळे निर्माण झालेले अडथळे यांचे सविस्तर विश्लेषण या हल्ल्याची चौकशी करणारे माजी राज्यपाल व माजी केंद्रीय गृह सचिव राम प्रधान यांच्या नेतृत्वाखालील समितीने आपल्या अहवालात केल्याचे कळते. दहशतवाद्यांनी नरिमन हाऊसवर हल्ला करेपर्यंत या इमारतीत ज्यू लोक राहातात हेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहीत नव्हते. तसेच मुंबईत आलेल्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी कफ परेड पोलिसांच्या अख्यत्यारित असलेल्या पाच गस्ती नौकांना त्वरित हालचाल करणे शक्य होते परंतु सागरी सेतूविरोधात वरळी येथे सुरू असलेल्या निदर्शनांच्या बंदोबस्तात या गस्तीनौका त्या दिवशी अडकून पडल्या होत्या. त्यामुळे या गस्तीनौका कारवाईसाठी तत्परतेने येऊ शकल्या नाहीत अशी धक्कादायक माहितीही या अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते.
राम प्रधान यांच्या नेतृत्वाखालील या समितीमध्ये निवृत्त आयपीएस अधिकारी व्ही. बालचंद्रन यांचा समावेश होता. हा अहवाल महाराष्ट्र सरकारने अद्याप उघड केलेला नाही. मात्र ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार ज्यू लोक हे नरिमन हाऊसमध्ये राहातात हीच माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नव्हती असे राम प्रधान समितीने आपल्या अहवालात नमूद केल्याचे कळते. दारुगोळ्याच्या तुटवडय़ामुळे पोलिसांच्या ५६ जणांच्या क्विक रिअ‍ॅक्शन टीमने सप्टेंबर २००७ सालापासून नेमबाजीचा सरावच केलेला नाही अशी धक्कादायक माहितीही या अहवालात असल्याचे समजते. पोलीस महासंचालकांकडून प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीची छाननी प्रथम डेस्क ऑफिसरकडून होते, मात्र हा अधिकारी गोपनीय माहिती फारच कमी वेळा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पाठवित असावा असेही चौकशीत आढळून आल्याचे कळते. त्यामुळे केंद्राकडून राज्याला वेळोवेळी देण्यात आलेल्या धोक्यासंदर्भातील गोपनीय इशाऱ्यांबाबत वरिष्ठ अधिकारी संपूर्णपणे अंधारात होते ही धक्कादायक बाबही उघडकीस आली.
भविष्यात २६/११ सारखे दहशतवादी हल्ले झाले व मुंबई पोलिस दलाची सध्याची अवस्था लक्षात घेतली तर अशा हल्ल्यांच्या मुकाबल्यासाठी मुंबई पोलीस परिणामकारक हालचाली करू शकणार नाहीत या न्यूयॉर्क पोलीस प्रमुखांनी व्यक्त केलेल्या मताशी राम प्रधान समितीने आपल्या अहवालात सहमती व्यक्त केली असल्याचे कळते. दहशतवाद्यांकडे पोलिसांपेक्षा अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असतात, त्यांनी घेतलेले प्रशिक्षणही अधिक प्रगत असते असेही अहवालात म्हटले आहे असे कळते.