Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

प्रादेशिक

शुभदा चौकर ,मुंबई,६ ऑगस्ट
तब्बल ४० दिवस चाललेली ऑनलाइन प्रक्रिया राज्य शासनाने गुंडाळली आहे. उरलेल्यांचे प्रवेश आता थेट, पूर्वीच्या प्रक्रियेने होतील. या प्रवेशपध्दतीचा यशापशाचे प्रगतिपुस्तक वेळीच मांडले गेले तर यंदा गिनी पिग बनलेल्या बॅचच्या वाटय़ाला जी अनिश्चिती, गोंधळ आणि मनस्ताप आला, तो प्रकार पुढच्या वर्षी टाळता येईल. हे निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे, एकंदर प्रोजेक्ट-स्टडीसाठीपूर्वीच ही प्रक्रिया सुरू करण्याची घाई मुख्यत: या गोंधळाच्या मुळाशी आहे.

प्रवेशासाठी ठाण्यात विद्यार्थी-पालकांचे दिवसभर ठिय्या आंदोलन!
ठाणे, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑफ लाईन केल्यानंतरही प्रवेशासापासून वंचित राहीलेल्या हजारो विदयार्थी व पालकांनी ज्ञानसाधना महाविद्यालयातील मुख्य ऑनलाईन केंद्रावर दिवसभर ठिय्या आंदोलन केले. दिवसभर वाट पाहूनही शिक्षण मंडळाचा एकही अधिकारी न फिरकल्याने संध्याकाळी पालकांचा संयम सुटला आणि तेथील वातावरण तंग झाले. अखेर पोलिसांनी व राजकीय नेत्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना विनंती केल्यावर सायंकाळी पाचनंतर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एस. ए. पाटील यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयात येऊन एकही विद्यार्थी प्रवेशावाचून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही दिल्यानंतर पालकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

दुग्धविकास विभागाचे कंपनीत रूपांतर करण्याचा प्रस्ताव शीतपेटीत!
संदीप आचार्य ,मुंबई, ६ ऑगस्ट

गेल्या दशकात शासकीय दुग्ध विकास योजना पद्धतशीरपणे नासविण्याचे काम सहकार क्षेत्राशी संबंधित नेत्यांकडून करण्यात येत होते. या पाश्र्वभूमीवर वीज महामंडळाच्या जशा तीन कंपन्या करण्यात आल्या त्याच धर्तीवर दुग्ध विकास विभागाला नवसंजीवनी देण्यासाठी कंपन्या करण्याचा प्रस्ताव वर्षभर बासनात पडून आहे बृहन्मुंबई दूध योजनेच्या माध्यमातून गेल्या दशकात मुंबईत जवळपास १३ लाख लिटर दुधाचे वितरण करण्यात येत होते. आज या योजनेच्या माध्यमातून मुंबईत केवळ पावणे दोन लाख लिटर दुधाचे वितरण करण्यात येते.

मंत्रालयात घुसले तर जबाबदार कोण?’
लोकसत्ता इफेक्ट
मुंबई, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा धोका तसूभरही कमी झालेला नसताना मंत्रालयाच्या दरवाजांवर होणारी सुरक्षा तपासणी कुणाच्या आदेशावरून बंद झाली, असा सवाल भारतीय जनता पार्टीने केला आहे. मंत्रालयात अतिरेकी घुसून लोकांना ओलीस धरले तर त्याची जबाबदारी कुणाची, असा जाबही भाजपने विचारला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना हजार ते चार हजारांची वाढ
मुंबई व ठाण्यातील कर्मचाऱ्यांना जास्त वाढ मिळणार
मुंबई, ६ ऑगस्ट / खास प्रतिनिधी
निवडणुकीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करताना त्यांच्या घरभाडेभत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी हजार ते चार हजार रुपयांची वाढ होणार आहे. मुंबई व ठाण्यातील कर्मचाऱ्यांना जास्त वाढ मिळणार आहे. त्यापाठोपाठ नागपूर व पुण्यातील कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ‘दिवास्वप्ना’ला आधार कशाचा?
मुंबई, ६ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

पुढील पाच वर्षांंमध्ये राज्यातील सर्व जनता लखपती व्हावी, असे स्वप्न मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पाहिले असले तरी उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांच्या खालोखाल दारिद्रय़ रेषेखालील लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राला हे उद्दिष्ट गाठण्यासाठी पाच वर्षांंमध्ये बराच मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. सेवा क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रांमध्ये गेल्या काही वर्षांंमध्ये महाराष्ट्राची फारशी प्रगती झालेली नाही. तसेच दरडोई उत्पन्न लाखापर्यंत गाठण्याचे मुख्यमंत्र्यांचे लक्ष्य असले तरी मुंबई व पुणे वगळता बाकीचे सर्व जिल्हे खूपच मागे आहेत.

‘एटीकेटी’चा निर्णय मनमानी व अविवेकी’
मुंबई, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

सरकारच्या या निर्णयास आव्हान देणारी जनहित याचिका अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, ठाण्याचे प्रा. नरेंद्र पाठक आणि ‘मुंबई युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन’चे अध्यक्ष प्रा. शेखर चंद्रात्रे यांनी केली होती. अर्जदारांतर्फे ज्येष्ठ वकील राम आपटे, सरकारच्या वतीने अ‍ॅडव्होकेट जनरल रवी कदम आणि शिक्षण मंडळासाठी अ‍ॅड. दीपा चव्हाण यांचा थोडा वेळ युक्तिवाद ऐकल्यानंतर मुख्य न्यायाधीश न्या. स्वतंत्र कुमार व न्या. अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने ही याचिता सुनावणीसाठी दाखल करून घेतली.

‘मराठवाडय़ातील खतांची टंचाई दूर करा अन्यथा शिवसेना देईल दणका’
मुंबई, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

मराठवाडय़ात खताची तीव्र टंचाई निर्माण झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. तातडीने ७५ हजार मे.ट. रासायनिक खते उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने दणका दिला जाईल, असा इशाराही खैरे यांनी दिला.

निवडणुकीच्या तोंडावर महागाईमुळे राज्य सरकारची पंचाईत
खते, साखरेच्या दरावर नियंत्रण ठेण्याकरिता केंद्राला साकडे
मुंबई, ६ ऑगस्ट / खास प्रतिनिधी
विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असतानाच डाळी, कडधान्ये, साखर आदींच्या दरात वाढ होत असल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चिंता व्यक्त करण्यात आली. खतांचा वाढीव साठा मिळावा तसेच साखरेच्या दरावर नियंत्रण ठेवण्याकरिता लेव्ही साखरेचे प्रमाण १० टक्क्यांवरून ३० टक्के करण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे.

कमी पाऊस झालेल्या जिल्ह्य़ांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर
मुंबई, ६ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

मराठवाडय़ातील सर्व आठ जिल्हे तसेच ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या जिल्ह्य़ांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पावसाने दडी मारल्याने मराठवाडय़ातील पीक तसेच पिण्याच्या पाण्याची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. यामुळे मराठवाडय़ातील आठ तसेच विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ अशा दहा जिल्ह्य़ांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला होता.

प्राध्यापकांचे आंदोलन चिघळले
मुंबई, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे तसेच या विभागाचे प्रधान सचिव जे. एस. सहारिया यांच्या बेजबाबदारपणामुळेच संपाबाबत तोडगा निघत नाही. त्यामुळे या दोघांच्या कोणत्याही आवाहनाला अथवा इशाऱ्याला आम्ही धूप घालणार नाही. त्यांच्याशी कोणतीही चर्चा आम्ही करणार नाही, असे स्पष्ट करीत ‘महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टिचर्स ऑर्गनायझेशन’ने (एमफुक्टो) मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्री यांनीच मध्यस्थी करून संपाबाबत तोडगा काढवा, असे आवाहन आज पत्रकार परिषदेत केले.

मुद्रांक शुल्कचोरी प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे संकेत
‘लोकसत्ता’च्या दणक्याने मुद्रांकशुल्क विभागात खळबळ
ठाणे, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी
बाजारमूल्यापेक्षा कमी किंमत लावून मुद्रांकशुल्क वसुलीत कोटय़वधी रुपयांचा घोटाळा झाल्याप्रकरणी संबंधित प्रकरणांची येत्या दोन दिवसात चौकशी करून दोषी अधिकारी व बिल्डर्सविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे संकेत पुणे येथील मुद्रांकशुल्क नोंदणी विभागाचे महानिरीक्षक रामराव शिंगाडे यांनी दिले आहेत.

कोकणासाठी वांद्रे टर्मिनसहून गणपती विशेष गाडय़ा
मुंबई, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी
गौरी-गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्या पश्चिम उपनगरवासियांच्या सोयीसाठी वांद्रे टर्मिनस येथून मडगावकरिता दोन गणपती विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. २१ आणि २८ ऑगस्ट रोजी सोडण्यात येणाऱ्या या गाडय़ांसाठी येत्या ८ ऑगस्टपासून आरक्षण सुरू होणार आहे. कोकण रेल्वेच्या मार्गाने जाणाऱ्या या गणपती विशेष रात्री ११.४५ वाजता वांद्रे टर्मिनसहून रवाना होतील. दुसऱ्या दिवशी ३.४५ वाजता त्या मडगावला पोहोचतील. या दोन्ही गणपती विशेष गाडय़ा २२ आणि २९ ऑगस्ट रोजी परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध असतील आणि त्यांचा प्रवास वांद्रे टर्मिनसऐवजी अंधेरी स्थानकात संपविण्यात येणार आहे. मडगावहून संध्याकाळी ६.४५ वाजता रवाना होणाऱ्या या गाडय़ा दुसऱ्या दिवशी सकाळी १०.१० वाजता अंधेरी स्थानकात पोहोचतील. दोन्ही दिशांच्या प्रवासात या गाडय़ांना बोरिवली, वसई रोड, भिवंडी, पनवेल, रोहा, खेड, चिपळून, संगमेश्वर, रत्नागिरी, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदूर्ग, कुडाळ, सांवतवाडी, थिवीम आणि करमाळी या स्थानकांत थांबे देण्यात आले आहे.

मुंबईतील ३० हजार ग्राहकांना टाटांची वीज हवी - रतन टाटा
मुंबई, ६ ऑगस्ट/ व्यापार प्रतिनिधी

वीज पुरवठादारात फेरबदलाच्या प्रक्रियेने मुंबई शहरात अलीकडच्या काळात वेग पकडला असून, तब्बल ३०,००० ग्राहकांनी पर्यायी पुरवठादार म्हणून टाटा पॉवरला पसंती दिली आहे, असा दावा खुद्द रतन टाटा यांनी आज झालेल्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केला. वीज पुरवठादारात बदली करून टाटा पॉवरकडे येत्या काळात अधिकाधिक नवे ग्राहक येतील, असे रतन टाटा यांनी सभेत बोलताना सांगितले. सध्याच्या घडीला टाटा पॉवर ही कंपनी विमानतळ व अन्य सरकारी आस्थापनांसह मुंबई शहरातील २८,६०० घरगुती ग्राहकांना वीज पुरवठा करीत आहे. लवकरच ही ग्राहक संख्या दुपटीने वाढू शकेल, असा रतन टाटा यांनी दावा केला. महाराष्ट्रातील विजेच्या टंचाईच्या स्थितीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, मुंबई शहराला कोणत्याही परिस्थिती विजेच्या तुटवडय़ाला सामोरे जावे लागणार नाही असा कंपनी पुरेपूर प्रयत्न करेल. येत्या तीन वर्षांत वीजनिर्मिती क्षमतेत विस्तारासाठी कंपनीकडून रु. २३,६०० कोटींची भांडवली गुंतवणूक केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सांगलीकरांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्रालयात खास बैठक
मुंबई, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

मुंबई व परिसरात असलेल्या सांगलीकरांच्या समस्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मंत्रालय स्तरावर सोडविण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन ११ ते १४ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे. ‘आम्ही सांगलीकर’ संघटनेतर्फे आयोजित या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, गृहमंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री पतंगराव कदम तसेच महिला व बालविकास मंत्री मदन पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या मंत्र्यांच्या दालनात या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची मोहीम हाती घेण्यात आल्याचे ‘आम्ही सांगलीकर’ संघटनेतर्फे सांगण्यात आले. शासनाच्या विविध विभागामध्ये ज्यांचे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत त्यांनी ते लेखी स्वरुपांत संघटनेच्या कार्यालयाकडे पाठवावेत, प्रश्नाचे स्वरूप व निकड लक्षात घेऊन समितीने छाननी केलेले प्रश्न या बैठकीमध्ये मांडण्यात येणार आहेत. सांगलीकर संघटनेतर्फे ऑक्टोबर महिन्यात स्नेहमेळाव्याचे आयोजन तसेच विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या गुणवंतांचा सांगली गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संघटनेचे अध्यक्ष पी.आर.पाटील-९८२१५३२६३१, संतोष पाटील-९८२०९२०२०९ किंवा साईराज पाटील-९८६९४०२३७६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

ठाण्यात आज दूध नाही
ठाणे, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

वारंवार मागणी करूनही दूध विक्रेत्यांचे कमीशन न वाढवल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील दूध विक्रेत्यांनी शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे.
दुधाचे भाव नुकतेच वाढविण्यात आले. याचा फायदा सहकारी दूध संघटनांना तसेच दूध उत्पादकांना होणार आहे. मात्र हे दूध घरोघरी पोहोचवणाऱ्या दूध विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. याच्या निषेधार्थ ठाणे शहर दूध विक्रेता कल्याणकारी संघटनेने शुक्रवारी दूध विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, शनिवार दोन दिवस ठाण्यात पाणी नसल्याने ठाणेकर आधीच त्रस्त झाले आहेत त्यात शुकवारी दूध नसल्याने त्यांच्या हालात भर पडणार आहे.