Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

लोकलचा वेग वाढविण्यासाठी
मुंबईतील पाच ब्रिटिशकालीन पुलांवर हातोडा
कैलास कोरडे

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सध्या वेगाने सुरू असलेल्या डीसी-एसी परिवर्तनाच्या कामानंतर मुंबईतील लोकल वेगवान होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अडथळा ठरणारे आणि मुंबईतील रेल्वे व रस्ते वाहतुकीतील स्थित्यंतरांचे शतकाहून जुने मूक साक्षीदार असलेले पाच ब्रिटिशकालीन पूल म्हणजेच आरओबी (रेल ओव्हर ब्रिज) पाडून या वेगाची किंमत चुकती

 

करावी लागणार आहे.
कर्नाक ब्रिज (सीएसटी-मस्जिद), हॅन्कॉक ब्रिज (सॅण्डहर्स्ट रोड-भायखळा), गार्डन किंवा एस-ब्रिज (भायखळा-चिंचपोकळी), करीरोड ब्रिज (करीरोड-परळ) आणि कॅरोल ब्रिज (करीरोड-परळ) हे डीसी-एसी परिवर्तनाच्या कामात अडथळा ठरणारे मुंबईतील पाच ब्रिटिशकालीन पूल पाडावे लागणार आहेत. याखेरीज मुंबईबाहेरील कल्याणचा पथरी पूलसुद्धा याच कारणास्तव पाडण्यात येणार आहे. हे सर्व पूल ब्रिटिशकालीन असून, ते शतकाहून जुने आहेत. याखेरीज सीएसटी-कल्याणदरम्यानचे रेल्वेमार्गावरील पाच पादचारी पूलदेखील (एफओबी) जमीनदोस्त करावे लागणार आहेत.
‘हे जुने ब्रिटिशकालीन पूल रेल्वेमार्गापासून साधारणत: ४.७ ते ४.९ मीटर उंचीवर आहेत. त्यामुळे हे पूल डीसी-एसी परिवर्तनाच्या कामात अडथळा ठरत असल्याने, त्यांची उंची सहा मीटपर्यंत वाढविणे क्रमप्रश्नप्त आहे’, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्रीनिवास मुडगेरीकर यांनी दिली. या पुलांचा रेल्वेमार्गावरील भाग पाडून, तो नव्याने उभारण्यासाठी प्रत्येकी सुमारे सहा कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
डीसी-एसी परिवर्तनामुळे मुंबईतील रेल्वे वाहतूक अधिक वेगवान होणार आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबईतील रेल्वेच्या १५०० व्होल्ट डीसी विद्युतभाराचे २५ हजार व्होल्ट एसी विद्युतभारात परिवर्तन करण्यात येणार आहे. परिणामी सध्या ताशी ८०-८५ कि.मी. वेगाने धावणाऱ्या लोकल ताशी १००-११० कि.मी. वेगाने धावू शकतील. याखेरीज एसी विद्युतभारासाठी काही मोजक्यात कर्षण उपकेंद्रांची गरज भासणार असून, वीजेच्या बचतीलाही हातभार लागेल, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
सध्या कल्याण-कसारादरम्यान डीसी-एसी परिवर्तनाचे काम पूर्ण झाले असून, या मार्गावर केवळ एसी लोकल धावत आहेत. कल्याण-कर्जतदरम्यान हे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या ऑक्टोबर ते डिसेंबपर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पुढील वर्षी कल्याण-ठाणेदरम्यान डीसी-एसी परिवर्तनाचे काम सुरू होईल. मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात ठाणे-सीएसटीदरम्यान डीसी-एसी परिवर्तनाचे काम हाती घेतले जाईल, असे मुडगेरीकर यांनी स्पष्ट केले.
डीसी-एसी परिवर्तनासाठी पाडण्यात येणारे हे सर्व पूल दगडी बांधकामाचे असून, त्यांचा रेल्वेमार्गावरील भाग लोखंडी आहे. हे पूल ब्रिटिशकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. अत्यंत कमी जागेवर बांधलेला भायखळा येथील वळणदार एस-ब्रिज पाहिल्यानंतर त्याची सहज प्रचीती येते. आज शतकानंतरही हे पूल समर्थपणे मुंबईतील वाहतुकीचा प्रचंड भार पेलत आहेत. त्यामुळे हे पूल पाडणार हे कळल्यानंतर मुंबईकरांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हे पूल पाडावे लागू नयेत, यादृष्टीने रेल्वेसुद्धा प्रयत्नशील आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने एका सल्लागार कंपनीची नेमणूक केली आहे. या पुलांच्या खालील बाजूस ‘इन्सुलेटर्स’ (वीजरोधक) अथवा न्यूट्रल झोन (वीजरहित भाग) तयार करण्याच्या पर्यायांचा अभ्यास करण्यात येणार आहे.
मसजिद बंदर रेल्वे स्थानकास लागून असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाच्या रेल्वेमार्गावरील भाग येत्या १५ व १६ ऑगस्ट रोजी जमीनदोस्त करण्यात येणार आहे. त्यासाठी हे दोन दिवस सॅण्डहर्स्ट रोड ते सीएसटीदरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे.
मसजिद रेल्वे स्थानकातील फलाटांचा विस्तार, सीएसटी रेल्वे यार्डाचे ‘रीमॉडेलिंग’, सॅण्डहर्स्ट रोड ते सीएसटी सातवा मार्ग आदी कामांखेरीज डीसी-एसी परिवर्तनाच्या कामात या पुलाची उंची अडथळा ठरत आहे.