Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

थरार आजही हवाहवासा वाटतो..
सुशांत शेलार

मी लहानपणापासून लोअर परळमध्ये राहत असल्यामुळे गोविंदा पथकामध्ये नेहमीच हिरिरीने भाग घेत आलो आहे. लोअर परळच्या जय भारत सेवा संघाच्या गोविंदा पथकात मी आणि माझे वडील

 

सक्रिय होतो. दहीहंडी फोडण्यासाठी थर रचण्यातला थरार अवर्णनीय असतो. या गोविंदा पथकातर्फे आठ थर रचून हंडी फोडली जाते. त्यात मी चौथ्या थरांवर असायचो. माझे वडीलच जय भारत सेवा संघाचे सल्लागार होते. तेही तरुणपणी गोविंदा पथकात असायचे. तीन वर्षापूर्वी त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या नावाने हंडी बांधली जाते. दरवर्षी या पथकातील गोविंदांसाठी मी ‘टी-शर्टस्’ देतो. अनेकदा चांगले ब्रॅण्डेड टीशर्टस् घेण्यासाठी गोविंदा पथकांना देणग्या मिळवाव्या लागतात. म्हणून गोविंदा पथकांना चांगले टी-शर्टस् मिळावेत यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. अभिनेता असल्यामुळे मला काळजी घ्यावी लागत असली तरी अजूनही थर रचण्याचे ‘थ्रील’ अनुभवणे मला खूप आवडते.
यंदा ‘समर्थ क्रिएशन्स’ या माझ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतर्फे ठाण्यातील ‘संघर्ष’ या संस्थेच्या दहीहंडीचा इव्हेंट करतोय. यावर्षी १० ऑगस्टला दहीहंडीनिमित्त विशेष फॅशन शो आयोजित केला आहे. गोकुळाष्टमी हा माझा आवडता सण तर आहेच पण गेल्या वर्षी याच दिवशी माझ्या मुलीचा जन्म झाला. त्यामुळे गोपाळकाला उत्सवाशी माझे अधिकच भावनिक नाते निर्माण झाले आहे. ‘संघर्ष’मध्ये सगळी इव्हेंट माझ्या कंपनीतर्फे आयोजित केली जाणार असून गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गोविंदांचे दहीहंडी फोडतानाचे चित्तथरारक क्षण लोकांना घरबसल्या टीव्हीवर दाखविण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी संघर्षच्या दहीहंडीत अभिनेता श्रेयस तळपदेला विशेष प्रशिक्षण दिले होते. आता यंदाही असाच एक खास सेलिब्रिटी लोकांसमोर आणणार आहे. यावर्षी मंदी असली तरी गोविंदा पथकांचा उत्साह कमी होईल असे मला अजिबात वाटत नाही. कारण गेल्या काही वर्षापासून गोविंदा पथकांना मोठमोठे प्रश्नयोजक मिळत असले तरी त्यापूर्वीही अनेक वर्षापासून गोविंदा पथके हिरीरीने सहभागी होत असत हे विसरून चालणार नाही. गोविंदा पथकांना ‘चिअर अप’ करण्यासाठी संघर्ष तसेच अनेक मंडळांतर्फे बांधण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सवांमध्ये गेल्या काही वर्षापासून मराठी सेलिब्रिटी सहभागी होतात. आपल्याबरोबर मराठमोळे अभिनेते-अभिनेत्री सहभागी होतात हे पाहून गोविंदांना नक्कीच आनंद होतो.
शब्दांकन : सुनील नांदगावकर