Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

निघणार पालखी ‘विश्वकोशा’ची!
शेखर जोशी

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती महामंडळाच्या विश्वकोश उपक्रमातील विश्वकोशाच्या १८ व्या खंडाचे प्रकाशन येत्या १५ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे आगळ्या पद्धतीने केले जाणार आहे. कोल्हापूरच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरापासून कार्यक्रम स्थळापर्यंत एका दिंडीद्वारे विश्वकोशाची

 

पालखी काढण्यात येणार आहे. या पालखीत प्रकाशित होणाऱ्या १८ व्या विश्वकोशाची प्रत ठेवण्यात येणार असून प्रकाशन समारंभात एक अंध मुलगी ब्रेल लिपीतून या विश्वकोशातील काही भागाचे वाचनही करणार आहे.
विश्वकोश निर्मिती महामंडळाने आजवर विश्वकोशाचे १७ खंड प्रकाशित केले असून १८ व्या खंडात ‘शाहीर अमर शेख ते सह्याद्री’ अशा नोंदी असणार आहेत. या खंडाचे प्रकाशन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कोल्हापूरच्या शाहू सभागृहात सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
विश्वकोश महामंडळाच्या विद्यमान अध्यक्षा आणि या विश्वकोशाच्या प्रमुख संपादिका डॉ. विजया वाड यांनी याबाबत ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, विश्वकोश जास्तीस्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा आणि विश्वकोशाच्या वाचनाबद्दल त्यांच्यामध्ये उत्सुकता निर्माण व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर येथे हा विश्वकोश पालखीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महालक्ष्मी मंदिर ते शाहू सभागृहादरम्यान ही पालखी निघेल. या िदडीत प्रश्नमुख्याने शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात असेल. ‘निघाली पालखी विश्वकोशा’ची असे गाणे म्हणत हे विद्यार्थी िदडीत सहभागी होणार आहेत. आजचे शालेय विद्यार्थी हेच भविष्यातील चांगले वाचक असणार आहेत. त्यामुळे शालेय वयातच विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार करण्यासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकेल.
विश्वकोशाच्या १८ व्या खंडात सुमारे ८०० नोंदी आणि ४० चित्रे असणार आहेत. विश्वकोशाचे प्रकाशन झाल्यानंतर लगेचच म्हणजे २३ ऑगस्ट रोजी विश्वकोश वाचन स्पर्धा घेण्यात येणार आहे. विश्वकोश हा ग्रंथालये किंवा कपाटांमध्ये बंदिस्त न राहता तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, त्यासाठी आम्ही विश्वकोशाच्या सतरांव्या खंडाची वाचन स्पर्धा संपूर्ण राज्यभरात घेतली होती. त्याला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता १८ व्या खंडावरही ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. २३ ऑगस्ट रोजी लोणावळा येथील मनशक्ती केंद्रात, तर त्यानंतर ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. वाड यांनी दिली.
डॉ. सु. र. देशपांडे, डॉ. गोविंद फडके हे या १८ व्या खंडाचे विभागीय संपादक असून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, तसेच कोल्हापूर येथील उदय कुलकर्णी, श्रीराम पचींद्र तसेच अन्य सर्वाचे मोलाचे सहकार्य या कार्यक्रमच्या आयोजनात असल्याचे डॉ. वाड म्हणाल्या.