Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

दस्तावेज डोंगरांचा
आजकाल इंटरनेटवर कोणत्याही किल्ल्याचे, ‘ट्रेकिंग रूट’चे नाव टाकले की ढिगाने लिंक समोर येतात. पण एक काळ असा होता की, महाराष्ट्रात किंबहुना भारतात डोंगर भटकंतीच्या या छंदात्मक खेळाचा मागमूसच नव्हता. मुख्यत: आदिवासींची, ठाकर, कातकरांची आणि एखादं

 

ग्रामदैवत असेल तर संबंधित परिसरातील ग्रामस्थांची डोंगरात भटकंती व्हायची. या काळात म्हणजेच १९५३ च्या दरम्यान रमेश देसाई यांची डोंगराशी आणि गिरिजनांशीदेखील ओळख झाली. त्याचदरम्यान कर्जतजवळील कोयळीगड, भीमाशंकर खोपोलीजवळील उंबरखिड-कुरवंडी घाट असे डोंगर त्यांनी त्या परिसरातील ठाकरांबरोबर धुंडाळले. पुढे मुंबईत सुरू झालेल्या ‘इंटर कॉलेजिएट हायकर्स क्लब’मुळे या डोंगरभटकंतीला नेटकं वळण मिळालं आणि मग सुरू झाला एक अनोखा सिलसिला! परिसराचे उपलब्ध नकाशे आणि प्रचंड भटकंती यामधून मग रमेश देसाई यांनी सखोल नोंदी सुरू केल्या. पायथ्याचे गाव, घाट रस्ते, त्यावरील किल्ले अशा वेगवेगळ्या माध्यमांतून डोंगरांचे वर्गीकरण होऊ लागले. १९६३ मध्ये युनिव्हर्सिटी हायकर्स अँड माऊंटेनिअरिंग सोसायटीची स्थापना झाली.
सोसायटीच्या स्थापनेत तर रमेश देसाई यांचा पुढाकार होताच पण पुढे पाच-सात वर्षे या माध्यमातून त्यांनी सह्याद्रीच्या डोंगररांगांचे विस्तृत नकाशे, माहितीपर तक्ते यांची माहिती पुस्तिकांद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवली. सह्याद्रीच्या महाराष्ट्रातील विस्ताराचा अतिशय माहितीपूर्ण नकाशाच रमेश देसाई यांनी त्या काळी तयार केला. इतकंच नव्हे तर आज त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील दुर्गवैभव एका दृष्टिक्षेपात दर्शविणारा नकाशादेखील तयार आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांचे इतके चिकित्सक अभ्यासू दस्तावेजीकरण करण्याचा पहिला मान देसाई यांचाच आहे.
सह्याद्रीबरोबरच त्यांनी हिमालयात केलेली भटकंतीसुद्धा महत्त्वाची आहे. १९६५ मध्ये गिरिविहारने आखलेल्या ‘हनुमान’ हिमशिखरावरील मोहिमेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. महाराष्ट्रातून संस्थात्मक पातळीवर आखण्यात आलेली ही पहिलीच नागरी मोहीम होती. तर १९७० साली बथरटोली या हिमशिखरावरील महत्त्वाकांक्षी मोहिमेचे नेतृत्व त्यांनी केले होते.
परंतु, रमेश देसाई यांचा मुख्य भर होता तो दस्तावेजीकरण, अभ्यास व्यासंग व लिखाणावर. त्यामुळेच एका इंग्रजी दैनिकात ७०-८० च्या दशकात त्यांनी देश-विदेशातील गिर्यारोहणविषयक पुस्तकांचं परीक्षणदेखील केलं आहे. त्यांच्या या व्यासंगाला अगदी युनेस्कोनेदेखील दाद दिली आहे. ७०-८० मध्ये युनेस्कोतर्फे ग्लेशिअरच्या अभ्यासासाठी सतलज परिसरात आखलेल्या एका विशेष प्रकल्पात त्यांचा सन्मानाने समावेश करण्यात आला होता.
१९७७ मध्ये ‘ट्रेक द सह्याद्रीज्’ या सह्याद्रीवरील अतिशय माहितीपूर्ण पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांनी काढलेले नकाशे व ‘सह्याद्री इनव्हाइट यू’सारख्या लेखांचा त्यात समावेश होता. देसाई यांनी डोंगर भटकंतीबरोबर पर्यावरणावरही भरपूर अभ्यास केला. त्या संदर्भातील विपुल लिखाण विविध वृत्तपत्रांमध्ये केले आहे. ‘वाघ आणि माणूस’ या पुस्तकाची निर्मिती ही या सर्वात महत्त्वाची आहे. निसर्गाचं व मानवाचं नातं उलगडणारं हे पुस्तक लोकप्रिय तर झालंच पण त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही लाभला. सांगलीनजीकच्या बळीराजा धरण चळवळीला त्यांनी वृत्तपत्रीय लिखाणातून पुढे आणलं. तर पश्चिम घाट बचाव आंदोलनाच्या आयोजनातही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. एवढेच नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ते गोवा मुक्ती संग्रामातदेखील सहभागी झाले होते.
गड-किल्ल्यांबद्दल एव्हाना मराठीतून बरंच लिहिलं गेलं होतं. पण इंग्रजीत याची वानवा होती. तेव्हा महाराष्ट्र परिचय केंद्राने दिलेल्या संधीमुळे ‘शिवाजी द लास्ट ग्रेट फोर्ट आर्किटेक्ट’ या पुस्तकाची निर्मिती करून रमेश देसाई यांनी एक अनोखा दस्तावेज अमराठी लोकांसाठी खुला केला.
त्यांचा हा अभ्यास आजदेखील अव्याहतपणे सुरू आहे. त्यामुळेच नुकतंच ‘तिसरा ध्रुव’ हे एव्हरेस्टवरील अभ्यासपूर्ण पुस्तक प्रकाशित झालं आहे. संपूर्ण हिमालयाची साद्यंत माहिती, नकाशे, रेखाटने, तुलनात्मक तक्ते या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. एव्हरेस्टवर तसेच हिमालयावरील इतकी परिपूर्ण माहिती असणारं मराठीतील हे एकमेव पुस्तक म्हणता येईल.
एकंदरीत पाहता देसाई यांची गिर्यारोहण कारकीर्द एक अभ्यासू गिर्यारोहक अशीच राहिलेली दिसते. गिर्यारोहणासारखा मुलखावेगळा खेळ तरुणांमध्ये रूजावा, त्याचा विस्तार व्हावा म्हणून महाराष्ट्रातून ज्या दिग्गजांनी कार्य केले त्यामध्ये रमेश देसाई अग्रणी म्हणावे लागतील. त्यांच्या या उत्तुंग कारकीर्दीचा महाराष्ट्रातील सर्व गिर्यारोहकांनी गिरिमित्र संमेलनात ‘गिरिमित्र जीवनगौरव सन्मान’ देऊन यथोचित गौरव केला आहे.
एका अर्थाने ‘डोंगर त्यांना कळले हो’ असंच म्हणावं लागेल.