Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

खगोलशास्त्रीय पुराणकथा आता पुस्तकरूपात!
प्रतिनिधी

ध्रुवाने कठोर तपश्चर्या करुन देवाकडून आपल्यासाठी अढळ स्थान निर्माण करून घेतले, व्याध या शिकाऱ्याच्या नावाने आकाशात असलेला तारा, भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र

 

पाहिला तर येणारा चोरीचा आळ या आणि अशा प्रकारच्या अनेक पौराणिक कथा आपल्या भारतीय संस्कृतीत गेल्या हजारो वर्षापासून चालत आल्या आहेत. या सर्व पौराणिक कथांना खगोलशास्त्रीय आधार आहे. भारताप्रमाणेच आशिया खंडातील अनेक देशांमध्ये अशा प्रकारच्या पौराणिक कथा प्रचलित आहेत. याच कथा आता लवकरच पुस्तक रूपाने प्रकाशित होणार आहेत.
भारतीय संस्कृतीमधील पिढय़ान पिढय़ा चालत आलेल्या या पौराणिक कथा केवळ पुराणातील वांगी पुराणतच अशा स्वरुपात न राहता, आता चक्क इंग्रजी भाषेतून दोन भागात पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध होणार आहेत.
नॅशनल अॅस्ट्रॉनॉमी ऑब्झव्र्हेटरी ऑफ जपान या संस्थतेर्फे दोन महिन्यांपूर्वी टोकियो येथे एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत भारतातर्फे लीना दामले सहभागी झाल्या होत्या. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या शिफारसीवरुन संस्थेने दामले यांना या कार्यशाळेसाठी निमंत्रित केले होते.
या कार्यशाळेत चीन, हॉंगकॉंग, तैवान, मंगोलिया, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया, बांगलादेश, नेपाळ, जपान आदी देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
खगोलशास्त्राशी संबंधित आशिया खंडात विविध देशांमध्ये प्रचलित असलेल्या पुराणकथा एकत्र करून त्याचे दोन खंडात प्रकाशन करण्याचा निर्णय या कार्यशाळेत घेण्यात आला.
खगोलशास्त्राशी संबंधित पुराणकथा या ग्रीक आणि रोमन देशांशीच संबधित आहेत, असा एक मतप्रवाह आतापर्यंत प्रचलित होता. मात्र केवळ हेच दोन देश नव्हे तर आशियाई खंडातील अनेक देशांनाही हा पुराणकथांचा वारसा लाभला असून त्यावर चर्चा आणि अधिक अभ्यास करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आशिया खंडातील विविध देशांशी संबंधित असलेल्या पुराणकथा प्रसिद्ध करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संपादक मंडळात लीना दामले यांचा समावेश आहे. येत्या वर्षभरात दोन भागांत इंग्रजी भाषेत ही पुस्तके प्रकाशित होणार आहेत. इंग्रजीनंतर त्या त्या देशांमधील प्रश्नदेशिक भाषांमध्येही हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे.