Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

नगरसेवक वाचत नसतील तर वाचनालयात पुस्तके ठेवू नका
पालिका आयुक्तांचा फतवा
प्रतिनिधी

पालिका मुख्यालयातील वाचनालयात एखाद्या पुस्तकाची नगरसेवक मागणी करीत नसतील तर हे पुस्तक वाचनालयात ठेवण्याची गरज नाही, असे आदेश पालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक

 

यांनी पालिका सचिव विभागाला दिले आहेत. विशेष म्हणजे वाचनाची आवड असणाऱ्या आयुक्तांनीच असे आदेश द्यावेत, याविषयी पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आयुक्तांच्या या भूमिकेच्या निषेधार्थ बुधवारी भारतीय जनता पक्षाचे गटनेते आशीष शेलार यांनी आयुक्तांना पुस्तक भेट दिले.
‘लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट’ हे पुस्तक पालिका वाचनालयात नसल्याची तक्रार शेलार यांनी केली होती. यावर या पुस्तकाची मागणी किती नगरसेवक करतात, अशी विचारणा आयुक्तांनी सचिव विभागाकडे केली. तेव्हा शेलार वगळता इतर कोणीही हे पुस्तक मागितले नसल्याचे सचिव विभागाने आयुक्तांना कळविले. तेव्हा २२७ पैकी २२६ नगरसेवक जर हे पुस्तक मागत नसतील तर ते पुस्तक वाचनालयात ठेवण्याची गरज नाही, असे आदेश आयुक्तांनी दिले.
आयुक्तांच्या या भूमिकेचा शेलार यांनी निषेध केला. पालिका कायद्यात या पुस्तकाचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचनालयात असणे आवश्यक आहे, असे शेलार यांचे म्हणणे आहे. १९ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या पालिकेच्या वाचनालयात हे महत्त्वाचे पुस्तक नसावे आणि ते ठेवण्याची गरज नाही, असे आदेश आयुक्तांनीच द्यावेत ही गंभीर बाब असल्याचे शेलार यांनी आयुक्तांना कळविले. एवढय़ावरच न थांबता शेलार यांनी हे पुस्तक वाचनालय आणि आयुक्तांना भेटही दिले.