Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

आजच्या काळात आधुनिक चाणक्यांची अधिक गरज - मुख्यमंत्री
प्रतिनिधी

आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा सक्षम होण्याची क्रयशक्ती युवकांमध्ये असून त्याचे परिणाम येत्या ३० वर्षांत दिसून येणार आहेत. त्यामुळेच देशात चाणक्यांप्रमाणे निरंकुश व्यवस्थापन कौशल्य असलेल्या तरुणांची आवश्यकता भासणार आहे. हल्लीच्या काळात अशा आधुनिक चाणक्यांची

 

अधिक गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अलीकडेच केले.
अंधेरी पश्चिम येथील चाणक्य इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज अँड रिसर्च संस्थेच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा दीक्षांत सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय उर्जा राज्यमंत्री भरतसिंह सोळंकी, अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष जतीन मोदी, महासंचालक रणजित चव्हाण, संचालिका स्नेहा पळणीटकर, सल्लागार हंसाबेन पटेल, चाणक्य इन्स्टिटय़ूटच्या कार्यकारी संचालिका रुपा संखे आदी मान्यवर उपस्थित होते. ६३ विद्यार्थ्यांना या प्रसंगी प्रमाणपत्रे देण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार सोमनाथ पाटील यांनी लिहिलेल्या ‘नऊ दशकांची कहाणी’ या पुस्तकाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या पुस्तकात सुरुवातीच्या कालखंडापासून ते आजपर्यंतचा संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, प्रगतीशील राज्याला किंवा राष्ट्राला उत्तम प्रशासक व व्यवस्थापकीय कौशल्य असलेल्यांची आवश्यकता असते. त्यामुळे आर्थिक विकासाचा वेग वाढून रोजगारनिर्मितीलाही चालना मिळत असते, असे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी, अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बडोदा येथील अग्निशम दल अकादमीतील प्रशिक्षणार्थींना मान्यता दिली जाईल, असे सांगितले. चाणक्य इन्स्टिटय़ूटच्या कार्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दहा लाख रुपयांची देणगीही जाहीर केली.उत्तम राजकीय नेता होण्यासाठी राजकीय अभ्यासक्रम शिकविणाऱ्या प्रशिक्षण संस्थांची गरज असल्याचे मत केंद्रीय उर्जर्ा राज्यमंत्री भरतसिंह सोळंकी यांनी व्यक्त केले तर जतीन मोदी यांनी, संपूर्ण रोजगार मिळवून देतील, असेच उपक्रम राबविण्याची व अभ्यासक्रम शिकविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. महासंचालक रणजित चव्हाण यांनी प्रश्नस्ताविकात, संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेताना आज २२ शहरांमध्ये संस्था कार्यरत असल्याचे सांगितले. या प्रसंगी टी. आर. डुंगरजी, डॉ. अनिल नाईक, के. सी. महापात्रा, एच. के. महापात्रा, एच. के. मोहन्ती. व्ही. पी. शर्मा यांचा सत्कार करण्यात आला.