Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांचे आंदोलन
प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस व पालिकेच्या मुख्यालयासमोर वाहतूक पूर्णत: खोळंबली. एक हजार शिक्षक-शिक्षिका या आंदोलनात सहभागी झाले होते. त्या सर्वाना

 

जबरदस्तीने पोलीस व्हॅनमधून आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यापैकी ४१ जणांवर कडक स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक सोनावणे यांनी सांगितले.
या आंदोलनात खंडेराव जगदाळे, नाना पाटील, शिंदे सर या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, असे मुंबई विभागीय अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकार मराठी आणि प्रश्नदेशिक भाषांमधील विद्यार्थ्यांवर, शिक्षकांवर व शाळांवर अन्याय करीत असून, गेली १२ वर्षे या शाळांतील विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक दिली जात आहे. खिचडी, मोफत पाठय़पुस्तके, शैक्षणिक सवलती या विद्यार्थ्यांना नाकारण्यात येतात. यासाठी शासनाने ४०० कोटी रुपयांची तरतूद करू, अशी घोषणा विधानसभेत १६ जून २००९ रोजी केली. मात्र ती फसवी ठरली आहे.
या शाळांना त्वरित सर्व शैक्षणिक सुविधा व शिक्षकांना वेतन देण्यात यावे कारण या शाळेतील शिक्षक अवघ्या ५०० ते १००० रुपये मानधनावर काम करीत आहेत, अशी मागणी मुंबई विभागीय अध्यक्ष मुख्याध्यापक प्रशांत रेडीज यांनी केली आहे.