Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

लोकलचा वेग वाढविण्यासाठी
मुंबईतील पाच ब्रिटिशकालीन पुलांवर हातोडा
कैलास कोरडे

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सध्या वेगाने सुरू असलेल्या डीसी-एसी परिवर्तनाच्या कामानंतर मुंबईतील लोकल वेगवान होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अडथळा ठरणारे आणि मुंबईतील रेल्वे व रस्ते वाहतुकीतील स्थित्यंतरांचे शतकाहून जुने मूक साक्षीदार असलेले पाच ब्रिटिशकालीन पूल म्हणजेच आरओबी (रेल ओव्हर ब्रिज) पाडून या वेगाची किंमत चुकती करावी लागणार आहे. कर्नाक ब्रिज (सीएसटी-मस्जिद), हॅन्कॉक ब्रिज (सॅण्डहर्स्ट रोड-भायखळा), गार्डन किंवा एस-ब्रिज (भायखळा-चिंचपोकळी), करीरोड ब्रिज (करीरोड-परळ) आणि कॅरोल ब्रिज (करीरोड-परळ) हे डीसी-एसी परिवर्तनाच्या कामात अडथळा ठरणारे मुंबईतील पाच ब्रिटिशकालीन पूल पाडावे लागणार आहेत.

थरार आजही हवाहवासा वाटतो..
सुशांत शेलार

मी लहानपणापासून लोअर परळमध्ये राहत असल्यामुळे गोविंदा पथकामध्ये नेहमीच हिरिरीने भाग घेत आलो आहे. लोअर परळच्या जय भारत सेवा संघाच्या गोविंदा पथकात मी आणि माझे वडील सक्रिय होतो. दहीहंडी फोडण्यासाठी थर रचण्यातला थरार अवर्णनीय असतो. या गोविंदा पथकातर्फे आठ थर रचून हंडी फोडली जाते. त्यात मी चौथ्या थरांवर असायचो. माझे वडीलच जय भारत सेवा संघाचे सल्लागार होते. तेही तरुणपणी गोविंदा पथकात असायचे.

‘माहिती अधिकारा’ने करावा पाठपुरावा
मुंबईकरांच्या दैनंदिनीतील असंख्य अडचणींना वाचा फोडण्यासाठी अद्ययावत तक्रार निवारण यंत्रणा मुंबई महानगरपालिकेकडे आहे. 1916 या दूरध्वनी क्रमांकावर केवळ एक फोन करून आपली तक्रार नोंदविण्याची सुविधा मुंबईकरांना अक्षरश ‘बारा महिने तेरा काळ’ उपलब्ध आहे. परंतु, या यंत्रणेबाबत प्रचार आणि प्रसार झाला तर महापालिकेची अकार्यक्षमता आणि कारभारातील त्रुटी उघड होतील, या भीतीपोटीच की काय या यंत्रणेला पालिकेने प्रसिद्धी दिलेली नाही. पालिकेच्या कारभारात ‘पारदर्शकता’ आणण्यासाठी ‘रामबाण’ ठरू शकेल अशा या यंत्रणेचे महत्त्व सुधीर बावकर यांनी ओळखले.

निघणार पालखी ‘विश्वकोशा’ची!
शेखर जोशी

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती महामंडळाच्या विश्वकोश उपक्रमातील विश्वकोशाच्या १८ व्या खंडाचे प्रकाशन येत्या १५ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे आगळ्या पद्धतीने केले जाणार आहे. कोल्हापूरच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरापासून कार्यक्रम स्थळापर्यंत एका दिंडीद्वारे विश्वकोशाची पालखी काढण्यात येणार आहे. या पालखीत प्रकाशित होणाऱ्या १८ व्या विश्वकोशाची प्रत ठेवण्यात येणार असून प्रकाशन समारंभात एक अंध मुलगी ब्रेल लिपीतून या विश्वकोशातील काही भागाचे वाचनही करणार आहे.

दस्तावेज डोंगरांचा
आजकाल इंटरनेटवर कोणत्याही किल्ल्याचे, ‘ट्रेकिंग रूट’चे नाव टाकले की ढिगाने लिंक समोर येतात. पण एक काळ असा होता की, महाराष्ट्रात किंबहुना भारतात डोंगर भटकंतीच्या या छंदात्मक खेळाचा मागमूसच नव्हता. मुख्यत: आदिवासींची, ठाकर, कातकरांची आणि एखादं ग्रामदैवत असेल तर संबंधित परिसरातील ग्रामस्थांची डोंगरात भटकंती व्हायची. या काळात म्हणजेच १९५३ च्या दरम्यान रमेश देसाई यांची डोंगराशी आणि गिरिजनांशीदेखील ओळख झाली. त्याचदरम्यान कर्जतजवळील कोयळीगड, भीमाशंकर खोपोलीजवळील उंबरखिड-कुरवंडी घाट असे डोंगर त्यांनी त्या परिसरातील ठाकरांबरोबर धुंडाळले.

दक्षिण मुंबईत आज रंगणार ‘सही रे सही’ स्पर्धा
प्रतिनिधी

शुक्रवारी ७ ऑगस्ट रोजी दक्षिण मुंबईतील १३ महाविद्यालयांत ‘सही रे सही’ ही अनोखी स्पर्धा आयोजिण्यात आली आहे. दक्षिण मुंबई शिवसेना आणि भाविसेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा संयोजक आणि दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी सांगितले की, स्पर्धा मराठी व इंग्रजीतील सहीची असून प्रत्येकी तीन सर्वोत्तम सह्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध गायक ‘इंडियन आयडॉल’ अभिजित सावंत याच्या हस्ते चौपाटी येथील भवन्स महाविद्यालयात होणार आहे. स्पर्धा सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणार असून चार वाजता पारितोषिक वितरण होईल. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेची घोषणा सकपाळ यांनी केली होती.

डॉ. डी. वाय. पाटील महाकरंडक स्पर्धा
प्रतिनिधी

डॉ. डी. वाय. पाटील महाकरंडक स्पर्धेला गेल्या काही वर्षापासून उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळेच आर. ए. इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी कलाराग, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई’तर्फे यंदा सप्टेंबरमध्ये डॉ. डी. वाय. पाटील महाकरंडक ही एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, रत्नागिरी, सोलापूर आणि नागपूर या आठ केंद्रांवर ऑगस्ट महिन्यात प्रश्नथमिक फेरी घेण्यात येणार आहे. अंतिम फेरी डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, नवी मुंबई येथे होणार आहे. त्याचबरोबर ‘नृत्याविष्कार’ ही राज्यस्तरीय समूह लोकनृत्य स्पर्धा तसेच नवोदित गीतकार, संगीतकार, गायक-गायिका यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी ‘गीतोत्सव’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. डी. वाय. पाटील महाकरंडक स्पर्धेतील प्रथम विजेत्यास १५,००० रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पारितोषिक ११,००० रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र आणि तृतीय पारितोषिक सात हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी मो. क्र. ९७७३५४७६५५, ९२२४८८०१०४, ९४२१८६७३२७ वर संपर्क साधावा.

माझगाव येथून शकीलच्या तीन गुंडांना अटक
दहशतवादविरोधी पथकाची कारवाई
प्रतिनिधी

राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने कुख्यात गुंड छोटा शकील आणि फईम मचमचच्या तीन गुंडांना आज दुपारी माझगाव येथून अटक केली असून त्यांच्याकडून काडतुसे असलेली तीन रिव्हॉल्व्हरही जप्त केली. दहशतवादविरोधी पथकात नव्याने दाखल झालेले उपायुक्त प्रदीप सांवत यांच्या पथकाने ही कारवाई केली. हाजी मोहम्मद इम्रान गुलाम, अफझल शेख ऊर्फ लाला आणि सुलेमान पटेल ऊर्फ सुलेमान कटेला अशी या गुंडांची नावे आहेत. नेपाळमधील शकीलचा हस्तक आरिफ मिर्जा बेग याच्या इशाऱ्यावरून इम्रान हा शेख आणि पटेल यांना शस्त्रे देण्यासाठी मुंबईत आला होता. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास माझगाव येथील सदानंद हॉटेलजवळ हे तिघे भेटणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सावंत यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने सापळा रचून तिघांना अटक केली. इम्रानविरुद्ध तीन गुन्हे दाखल असून शकील टोळीतील फिरोज कोकणी याच्या खुनाप्रकरणी इम्रान पोलिसांना हवाच होता. उद्या तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक अरूण खानविलकर आणि दुधगावकर यांचा कारवाई करणाऱ्या पथकात समावेश होता.

वसई-विरार महापालिकेविरोधात आज आंदोलन
प्रतिनिधी

वसई-विरार महानगरपालिकेत समाविष्ट केलेल्या ५३ गावांना वगळावे यासाठी वसईतील सर्व पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीने आज, शुक्रवारी गाव वाचवा जन आंदोलन पुकारण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता वसई फाटा येथे मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोको आंदोलन केले जाणार आहे. आम्ही विकासाच्या विरोधात नाही पण ‘हरित वसई’साठी आमचा हा संघर्ष आहे, असे स्वाभिमान वसईकर संघटनेचे अध्यक्ष विजय मचाडो यांनी पत्रकात म्हटले आहे.

‘मेघमल्हार’तर्फे किशोरकुमार यांच्या गाण्यांवर खास कार्यक्रम
प्रतिनिधी

‘मेघमल्हार’ या संस्थेने हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिवंगत गायक किशोरकुमार यांच्या गाजलेल्या गाण्यांवर आधारित ‘गाता रहे मेरा दिल’ हा खास कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात आयोजित केला आहे. या कार्यक्रमात स्व. किशोरकुमार यांची ‘गाता रहे मेरा दिल’, ‘इना मिना डिका’, ‘मैं बंगाली छोकरा’, ‘ये शाम कुछ अजीब हैं’, ‘ये शाम मस्तानी’, ‘खुश हैं जमाना, आज पहिली तारीख हैं’ ही अवीट चालींची गाणी सादर होणार आहेत. जितेंद्र भुरुक, युनुस, नेहा वर्मा आणि वृषाली पाटील हे गायक कलाकार ही गाणी सादर करतील. आनंद सहस्रबुध्दे हे कार्यक्रमाचे संगीत संयोजक असून संदीप पंचवटकर हे निवेदन करणार आहेत. या कार्यक्रमाचे खास वैशिष्टय़ म्हणजे ज्येष्ठ सेक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचे वादन ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. मनोरी दादांनी अनेक गाणी किशोरकुमार गात असताना वाजविलेली आहेत. संगीतकार सचिन देव बर्मन आणि राहुल देव बर्मन यांच्यासोबत मनोहारी सिंग यांनी अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे दादांनी सांगितलेल्या किशोरच्या आठवणी व वाजविलेली गाणी हे कार्यक्रमाचे अनन्यसाधारण वैशिष्टय़ आहे.

मखर प्रदर्शन
प्रतिनिधी

वसई तालुक्यातील एक कलावंत विलास मुरुडकर यांच्या थर्माकोलच्या सुबक मखरांचे प्रदर्शन विरारच्या विष्णू-प्रतिभा हॉलमध्ये भरले आहे. विरारचे उद्योजक जितुभाई शहा यांच्या हस्ते प्रदर्शकाचे रविवारी उद्घाटन झाले. विविध रंगांची मोठ-मोठी कलापूर्ण, मनोवेधक अशी मखरे पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत आहे. अशाच प्रकारचे प्रदर्शन, दादर (प.) येथील वनमाळी हॉल, तिसरा माळा येथे १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान स. ९ ते रात्रौ १०.०० या वेळात भरणार आहे.