Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

उड्डाणपुलाचे काम अखेर मार्गी
सागर वैद्य ,नगर, ६ ऑगस्ट

प्रस्तावापासूनच वादग्रस्त ठरलेल्या शहरातील पहिल्या उड्डाणपुलाच्या फाउंडेशन टेस्टिंगचे (माती परीक्षण) काम आज अखेर सुरू झाले. स्टेशन रस्त्यावरील सकर चौक ते कोठी चौक या सुमारे एक किलोमीटर अंतराच्या उड्डाणपुलावरून जाण्याची नगरकरांची इच्छा वर्षभरात पूर्ण होऊ शकेल. ऑक्टोबरमध्ये या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू होणार आहे.

पावसाने ताण दिल्याने पिके सुकू लागली
नगर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

जिल्ह्य़ात खरिपाच्या पेरणीने सरासरी ओलांडली असली, तरी पावसाचा ताण व जोरदार वारे यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होऊ लागल्याने काही भागातील पिके सुकू लागली आहेत. येत्या आठवडय़ात पाऊस न झाल्यास ही पिके हातून जातील. सततच्या ढगाळ हवामानामुळे सोयाबीनवर लष्करी अळीचा, कपाशीवर मावा व तुडतुडय़ाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोपरगाव परिसरात शंकी गोगलगायी दिसून आल्याने गंभीर परिस्थितीत आणखी भर पडली आहे.दुसरीकडे अकोले तालुक्यातील घाटघर, उडवणे, पांजरे, रतनवाडी, कुमशेत, आंबी परिसरात अतिवृष्टीने लागवड झालेल्या भाताचे व भात रोपांचे नुकसान झाले आहे.

सुधारित पाणी योजनेचे पैसे मनपाकडे तातडीने वर्ग करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
नगर, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

शहर पाणीपुरवठा सुधार योजनेसाठी केंद्र सरकारकडून मंजूर झालेले २९ कोटी रुपये राज्य सरकारच्या तीन कोटी ५० लाख रुपयांसह महापालिकेकडे तातडीने वर्ग करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महापौर संग्राम जगताप यांना दिले. मनपाच्या १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ही योजना मंजुरीसाठी, तसेच त्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नेमण्याबाबत निविदा प्रसिद्ध करण्यासाठी ठेवण्यात आली आहे. तत्पूर्वी त्यासाठीचे पैसे मनपाकडे वर्ग होणे गरजेचे असल्याने महापौरांनी मुख्यमंत्र्यांच्या कालच्या दौऱ्यात त्यांना याबाबतचे निवेदन दिले.

रावते यांच्या ‘त्या’ विधानामुळे भाजपत रोष
नगर, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या शहरातील कार्यकर्त्यांची ‘कपाळकरंटे’ अशी संभावना करणाऱ्या शिवसेनानेते दिवाकर रावते यांच्याविषयी पदाधिकारी व कार्यकर्त्यांत रोष निर्माण झाला आहे. भाजपचे नगरसेवक शिवाजी लोंढे यांनी एका निवेदनाद्वारे आपल्या भावनांना वाट करून दिली. गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याची तुलना सेनेच्या फक्त शहरापुरतीच मर्यादित असणाऱ्या नेतृत्वाशी केल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

खेडले परमानंदसह १० गावांच्या नळपाणी योजनेस अखेर मंजुरी
गडाख यांच्या प्रयत्नांना यश

नेवासे, ६ ऑगस्ट/वार्ताहर
अनेक वर्षांपासून रखडलेल्या खेडले परमानंद करज गावासह १० गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या नळयोजनेस मंजुरी तसेच मुळा धरणातून पाणी उचलण्यास परवानगी मिळण्यास जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांना यश आले. गडाख यांच्या नेतृत्वाखाली संबंधित गावातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जलसंपदामंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेऊन तातडीने जलसंपदा मंत्र्यांनी मंजुरी दिली. तसेच याबाबत कार्यवाहीचे आदेश दिले.

नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांबरोबरची चर्चा फिस्कटली
सोमवारपासून संप अधिक तीव्र करणार
नगर, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी
मुंबईत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबरोबर झालेली चर्चा फिस्कटल्याने राज्यातील सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांचा ३ ऑगस्टपासून सुरू असलेला बेमुदत संप सोमवारपासून (दि.१०) अधिक तीव्र करण्यात येणार आहे. राज्य महापालिका- नगरपालिका कामगार संघर्ष समितीचे निमंत्रक अनंत लोखंडे यांनी ही माहिती दिली.

शिर्डीचे रेल्वेस्थानक मल्टीप्लेक्स करणार -मुनीअप्पा
राहाता, ६ ऑगस्ट/वार्ताहर
शिर्डीचे रेल्वेस्थानक मल्टीप्लेक्स करण्यात येणार आहे. यासाठी ३० कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री के. मुनीअप्पा यांनी दिली. शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ३० कोटी रुपयांतून दोन नवीन प्लॅटफॉर्म, ओव्हरब्रीज, कव्हरशेड, रेल्वेगाडय़ांच्या सव्‍‌र्हिसिंगसाठी पीट लाईन, पिलग्रीम साईट्स इ. उभारण्यात येणार आहे. लवकरच शिर्डीसाठी दिल्ली, मुंबई व नागपूरला थेट रेल्वेगाडय़ा सुरू करण्यात येणार आहेत. रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाल्याच्या आरोपाचा मुनीअप्पा यांनी इन्कार केला. देवळाली, बेलापूर, लातूरसह राज्यातील २४ रेल्वेस्थानके आदर्श करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, संस्थानचे अध्यक्ष आमदार जयंत ससाणे, कार्यकारी अधिकारी किशोर मोरे, उपकार्यकारी अधिकारी डॉ. यशवंत माने व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. वाकचौरे यांनी ब्रिटिशकालीन सर्वेक्षण झालेल्या शिर्डी ते परळी रेल्वेलाईनची व नगर-मनमाड रेल्वेमार्ग दुहेरी करण्याची मागणी मुनीअप्पा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

साई मंदिरावरील ध्वनिक्षेपक बंद ठेवल्याने तीव्र संताप
राहाता, ६ ऑगस्ट/वार्ताहर
शिर्डीला मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सभेच्या वेळी आवाजाचा व्यत्यय येऊ नये म्हणून काल (बुधवारी) संध्याकाळी आरतीच्या वेळी मंदिरावरील ध्वनिक्षेपक बंद ठेवले होते. या प्रकरणाचे आज तीव्र पडसाद उमटले. आज सकाळी कमलाकर कोते, सचिन तांबे, संजय शिंदे, गजानन शेर्वेकर, राजेंद्र गोंदकर, सुनील परदेशी, विठ्ठल जाधव यांच्या नेतृत्वाखाली शंभर तरुणांनी संस्थानच्या प्रशासकीय इमारतीचा दरवाजा बंद केला. या संदर्भात संबंधितांनी माफी मागावी, अशी मागणी या तरुणांनी केली. मात्र, संस्थानचे अध्यक्ष आमदार जयंत ससाणे व कार्यकारी अधिकारी किशोर मोरे यांनी हा प्रकार अजाणतेपणी घडला, यामागे कोणाच्या भावना दुखविण्याचा हेतू नव्हता, असे सांगून यापुढे असा प्रकार घडणार नाही, अशी ग्वाही देऊन दिलगिरी व्यक्त केल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. शिर्डीतील शिवसेना, मनसे व बजरंग दल शाखेच्या वतीनेही या प्रकाराचा
निषेध करण्यात आला.

‘मुळा’चे आजपासून शेतीसाठी आवर्तन
राहुरी, ६ ऑगस्ट/वार्ताहर
मुळा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय विशेष कालवा समितीत घेण्यात आला. उद्यापासून (शुक्रवार) उजवा व डावा कालव्यांतून आवर्तन सुरू होईल.
पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने उभी पिके पाण्याअभावी सुकून चालली. या पाश्र्वभूमीवर धरणातून पाणी सोडण्याची मागणी वाढत चालली होती. पाणी सोडण्याबाबत विशेष कालवा समितीची बैठक आज पार पडली. सध्या धरणात १३ हजार ४०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. नवीन आवक पूर्ण बंद आहे. वर्षभरासाठी पिण्याच्या पाण्याचा व विद्यापीठाचा, तसेच बाष्पीभवन घट वगळून उजवा व डाव्या कालव्यांतून ४ टीएमसी पाणी शेतीसाठी देण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता (नाशिक) एम. व्ही. पाटील यांनी कार्यकारी अभियंता एन. एम. तपासे यांना पाणी सोडण्याची परवानगी दिली. जलसंपदा विभागाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. बैठकीस आमदार शिवाजी कर्डिले व चंद्रशेखर कदम, माजी आमदार पांडुरंग अभंग, कार्यकारी अभियंता तपासे, उपअभियंता बी. एम. बोडखे, बी. बी. रहाणे, धरणाचे शाखाधिकारी सुधाकर नागवडे उपस्थित होते.

श्रीरामपुरात पुन्हा मुलास पळविण्याचा प्रयत्न
श्रीरामपूर, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

शहरातील अचानकनगरमधून ७ महिन्यांपूर्वी पळविलेल्या मुलीचा शोध अजून लागलेला नसतानाच आज पुन्हा ५ वर्षांच्या मुलाला पळविण्याचा प्रयत्न झाला. सकाळी अचानकनगरमध्ये भाईजान हनिफभाई पठाण हा मुलगा खेळत असताना दुचाकीवरून दोन अनोळखे लोक व महिला आली. त्यांनी भाईजानला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. भाईजानने आरडाओरडा केला. त्याची चुलती शहेनाझ पठाण यांनी हा प्रकार पाहून आरडाओरडा करून लोकांना सतर्क केले. त्यानंतर मोटरसायकलवरील तिघे भाईजानला सोडून पळून गेले. अचानकनगरमधून ७ महिन्यांपूर्वी सायना अन्वर शेख या ४ वर्षांच्या मुलीस पळवून नेण्यात आले होते. पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होऊनही अद्याप तपास लागला नाही. आज हनिफभाई पठाण यांनी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा पळविण्याच्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली.

साळी समाजाने एकत्र यावे - सूळ
नगर, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी
समाजात एकी असल्याशिवाय काहीही मिळत नाही. त्यासाठी आता साळी समाजाने एकत्र यावे, असे आवाहन माजी उपमहापौर दीपक सूळ यांनी केले.दिल्ली दरवाजा येथील जिव्हेश्वर तरुण मंडळाने भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमित्त आयोजित साळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणप्रसंगी सूळ बोलत होते. अध्यक्षस्थानी संजय सागावकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे उपस्थित होते. कांबळे म्हणाले की, अत्यंत कलाकुसर असणारी पैठणी विणणारा व विणकर कला उपजत असलेला साळी समाज आहे. समाजातील युवक- युवतींनी शैक्षणिक अभ्यासाबरोबरच पारंपरिक वीणकाम व्यवसायाचेही ज्ञान प्राप्त केले पाहिजे.कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी ऋतुजा कांबळे, नेमानंद भागवत, सायली मते, अजिंक्य सांगळे, प्रणिती बागडे, वंदना दळवी यांचा सत्कार करण्यात आला. अन्नधान्य वितरण अधिकारी आरु, मत्स्यसंवर्धन विकास यंत्रणेचे आयुक्त राजेंद्र डोंगरे, उद्योजक काशीनाथ शिकरे, विजय सरोदे, गोपाळ पवार आदी या वेळी उपस्थित होते.

वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी १३९ प्राथमिक शिक्षक अपात्र
नगर, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी
जिल्ह्य़ातील प्रलंबित ८८९ प्राथमिक शिक्षकांपैकी ७५० जणांना वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी पात्र ठरविण्यात आले, तर १३९ जण अपात्र ठरले. शिक्षणाधिकारी दिनकर टेमकर यांनी हा निर्णय दिला. प्राथमिक शिक्षण समिती संघटनेचे नेते संजय कळमकर, अध्यक्ष रा. पा. औटी यांनी ही माहिती दिली. ३१ डिसेंबर ९६ ते ३१ डिसेंबर २००८ या कालावधीसाठी वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न विविध त्रुटींमुळे प्रलंबित होता. तो टेमकर यांनी मार्गी लावला. कोपरगाव तालुक्यातील ३४ शिक्षणसेवक त्यांचा तीन वर्षांचा कालावधी उलटून आणखी दीड वर्ष झाले तरी नियमित झाले नव्हते. त्यांना त्वरित नियमित सेवेत सामावून घेण्याचे आदेश देण्यात आले. आदर्श शाळांचे मूल्यांकन झाले. त्याचा निकाल व सध्या नियुक्त असलेल्या ५०० पैकी प्रस्ताव प्राप्त झालेल्या १५० शिक्षणसेवकांना आचारसंहितेपूर्वी नियमितचे आदेश देण्याचे टेमकर यांनी मान्य केले.

व्यापारी संघटनांनी बंद मागे घ्यावा
नगर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी
जकातीच्या विरोधात ९ ऑगस्टपासून पुकारलेला बंद व्यापारी संघटनांनी मागे घ्यावा, महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांचा अंत पाहू नये, असे आवाहन नगर ग्राहक संघाने केले आहे.
राज्य जकात हटाव समितीने ९ ऑगस्टपासून पुकारलेल्या बेमुदत बंदमध्ये नगर आडते बाजार मर्चंट असोसिएशनही सहभागी झाली आहे. या बंदमुळे सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल होतील, अशी भीती ग्राहक संघाचे अध्यक्ष शिरीष बापट यांनी व्यक्त केली.

निमगाव वाघा येथे आजपासून हरिनाम सप्ताह
नगर, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी
नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे उद्या (शुक्रवार) पासून श्रीकृष्ण जयंती निमित्ताने हरिनाम सप्ताह सुरू होत आहे. सप्ताहात विठ्ठल महाराज खळदकर, जयसिंग महाराज मडके, नारायण महाराज गायके, अजय महाराज बारस्कर, मंदा पवार, संजय महाराज म्हसे यांची कीर्तने होतील.

आजचा मोर्चा स्थगित
श्रीरामपूर, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी
भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी खरीप हंगाम, ऊस व अन्य पिकांना तातडीने ओव्हरफ्लोचे पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता मेढे यांनी माजी आमदारभानुदास मुरकुटे यांची भेट घेऊन दिले. त्यामुळे लोकसेवा मंडळाच्या वतीने उद्या (शुक्रवारी) आयोजित करण्यात आलेला मोर्चा स्थगित करण्यात आला.

बेमुदत संपात ३८५ कर्मचारी सहभागी
कोपरगाव, ६ ऑगस्ट/वार्ताहर

येथील पालिकेतील कायम रोजंदारीतील ३८५ कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. नगराध्यक्ष उज्ज्वला जाधव, उपनगराध्यक्ष मीनल खांबेकर यांच्यासह नगरसेवक व नागरिकांनी बेमुदत संपाला पाठिंबा व्यक्त केल्याचा दावा सोपान शिंदे, चंद्रकांत साठे, विश्वास धुमाळ यांनी केला. ‘बंद’ला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. ‘बंद’चा आज चौथा दिवस होता. सहावा वेतन आयोग, मूळ वेतनासह संपूर्ण पगारावर व पेन्शनवर शंभर टक्के अनुदान, कंत्राटी पद्धत बंद करून कायम नोकरी, सर्व सफाई कामगारांना मालकीची घरे, सर्व पदांवर बढती व भरती, जकात पूर्ववत चालू करणे, कर्मचाऱ्यांना सरकारी साप्ताहिक सुट्टय़ा किंवा ओव्हरटाईम, पेन्शन व उपदानासाठी रोजंदारीवरील संपूर्ण सेवा ग्राह्य़ धराव्यात, या मागण्यांसाठी महापालिका व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शहरातील पाणी, आरोग्य, साफसफाई आदींवर संपाचा विपरित परिणाम झाला. त्यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साठले असून, रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांनी या वेळी विरोधी घोषणा दिल्या. माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, राजेंद्र झावरे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला.

नोकरीसंदर्भात मार्गदर्शन मेळाव्यास राजूरमध्ये प्रतिसाद
राजूर, ६ ऑगस्ट/वार्ताहर
ग्रामीण भागातील तरुण व तरुणींनी जगाशी स्पर्धा करण्यासाठी उच्चशिक्षित होऊन विविध क्षेत्रात जावे, तरच खऱ्या अर्थाने कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावेल. त्यासाठी एकलव्य एज्युकेशन संस्थेचा प्रयत्न असून, त्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्याचे प्रतिपादन स्वामी गगनगिरीमहाराज भक्त प्रतिष्ठानच्या अध्यक्ष हेमलता पिचड यांनी केले. राजूर येथील सांस्कृतिक सभागृहात एकलव्य एज्युकेशनच्या वतीने नोकरभरतीसंदर्भात मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी दिवाण हाऊसिंगचे शिवकुमार मणी, राजेश इंगळे, आदिवासी उन्नतीचे अध्यक्ष भरत घाणे, श्रीस्वामी समर्थ शिक्षण संस्थेचे सचिव शांताराम काळे, प्राचार्य सदगीर आदी उपस्थित होते.श्री. मणी म्हणाले की, ग्रामीण विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळाल्यास ते शहरी विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धा करू शकतील. आपल्यातील गुण स्वतच हेरून विविध क्षेत्रात प्रवेश करा. इंगळे म्हणाले की, मीही खेडय़ातून आलो आहे. परंतु आज सिम्बॉयसिसमध्ये व्याख्याता आहे. कोणीही न्यूनगंड ठेवू नये.प्रास्ताविक शांताराम काळे यांनी केले. सूत्रसंचालन बी. के. खाडगीर यांनी केले. आभार अनिल इंगळे यांनी मानले.

राज्य शिक्षक संघाच्या परिषदेस तीन लाख शिक्षकांची उपस्थिती
राहाता, ६ ऑगस्ट / वार्ताहर
राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिर्डीला रविवारी (दि. ९) होणाऱ्या शिक्षण परिषदेस व मेळाव्यास राज्यातून ३ लाख शिक्षक उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय गमे व दिलीप महाले यांनी दिली.या परिषदेस केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अर्थमंत्री दिलीप वळसे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील, जलसंपदामंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.शिक्षण सेवकांचे मानधन १० हजार ८०० करण्यात यावे, इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत इंग्रजी विषयासाठी पदवीधर शिक्षकाची नेमणूक करावी, प्रत्येक जि.प. शाळेस लिपिक व शिपाई द्यावा आदी विषयांवर परिषदेत चर्चा करण्यात येईल.

रामवाडीचे कार्यकर्ते कोल्हे गटात दाखल
कोपरगाव, ६ ऑगस्ट/वार्ताहर
तालुक्याच्या संवत्सर-रामवाडी भागातील काळे-परजणे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हे गटाचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी आमदार शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबूराव वालझाडे होते. देवयानी बँकेचे संचालक प्रभाकर ससाणे यांनी प्रास्ताविकात संवत्सर भागातील प्रश्न २५-३० वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सांगितले. बाळासाहेब शेटे, फकिरराव व संभाजीराव बोरनारे, भरत ढमढेरे यांनी स्वागत केले. सोपानराव वालझाडे, नानासाहेब वालझाडे, भरत वालझाडे, कृष्णा वालझाडे, दादा नेहे, बाबासाहेब बोडखे, साहेबराव काळे, शिवाजी लोहकरे, अप्पासाहेब साबळे आदींनी ‘राष्ट्रवादी’त प्रवेश केला.

संजीवनी साखर कामगार पतपेढीची दि. १३ला सभा
कोपरगाव, ६ ऑगस्ट/वार्ताहर
शिंगणापूर येथील संजीवनी साखर कामगार पतपेढीची ४५वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १३ला संध्याकाळी साडेपाच वाजता कारखान्याच्या कामगार विश्रांतीगृहात अध्यक्ष जी. आर. दवंगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसेच माजी आमदार शंकरराव कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहनराव चव्हाण, अंबादास अंत्रे, कार्यकारी संचालक के. आर. पवार व पी. वाय. चांदगुडे यांच्या सहकार्याने संस्थेने नेत्रदीपक प्रगती केली. भागभांडवल ८१ लाख २९ हजार रुपये, फंड १ कोटी ३० लाख, ठेवी ४ कोटी ५२ लाख, गुंतवणूक १ कोटी ७८ लाख, सभासदांना कर्जवाटप ५ कोटी ८३ लाखांचे केले आहे. संस्थेस ३० लाख ८० हजारांचा अहवालसालात नफा झाला आहे.

तहसीलदार सोनवणे यांची धुळ्यास बदली
कोपरगाव, ६ ऑगस्ट/वार्ताहर
येथील तहसीलदार एस. एस. सोनवणे यांची धुळे येथे उपजिल्हाधिकारी (महसूल) म्हणून आज बदली झाली. तहसीलदार पदाचा पदभार तूर्त निवासी नायब तहसीलदार राजेंद्र नवले यांच्याकडे देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून काढलेल्या आदेशात म्हटले आहे. तहसीलदार सोनवणे यांनी ९ मार्च ते ३ ऑगस्ट या कालावधीत काकडी विमानतळ, महसूल विभागातील वाळूचोरीप्रकरणी कामाचा ठसा उमटविला.