Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

विदर्भात बँकांचे व्यवहार ठप्प
पहिल्याच दिवशी हजारो कोटींचा फटका
पेन्शनधारकांना सर्वाधिक त्रास
संपाचा परिणाम आज जाणवणार

नागपूर, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

राष्ट्रीयीकृत बँकांच्या देशव्यापी संपाच्या पहिल्याच दिवशी आज विदर्भात सुमारे दोन ते अडीच हजार कोटींचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. आजच्या संपाचा सर्वाधिक फटका पेन्शनधारकांना बसला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये गर्दी असते. मात्र, बँकांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपामुळे ग्राहकांना अडचणींना तोंड द्यावे लागले.

अखेर विमानतळाचे हस्तांतरण
मध्यरात्रीपासून विमानतळाची मालकी एमआयपीएलकडे
एटीसी आणि सुरक्षा यंत्रणा एएआयकडे कायम
नागपूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

‘मल्टी मॉडेल इंटरनॅशनल पॅसेंजर अ‍ॅण्ड कार्गो हब अ‍ॅट नागपूर’ अर्थात ‘मिहान’ प्रकल्पासाठी मिहान इंडिया प्रश्नयव्हेट लिमिटेडला (एमआयपीएल) आज अखेर विमानतळ हस्तांतरित करण्यात आले असून हा या प्रकल्पाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरला आहे. गेल्या पाच वर्षापासून असलेला तिढा एखादा चमत्कार झाल्याप्रमाणे अवघ्या चार दिवसात सोडवण्यात आला.
विशेष आर्थिक क्षेत्र आणि कार्गो हबचा समावेश असलेल्या मिहान प्रकल्पासाठी विमानतळ हस्तांतरण सर्वात महत्त्वाचे होते.

भारनियमनाचा फटका; मूर्तीकारांची कामे अर्धवटच!
नागपूर, ६ ऑगस्ट /प्रतिनिधी

शहरातील विविध भागात गणेशमूर्ती बनवण्याचे काम सुरू असतानाच भारनियमनाचा फटका मूर्तीकारांना बसला आहे. गेल्या आठवडय़ापासून दररोज पाच ते सहा तास भारनियमन होत असल्यामुळे वीजही पुरेशी नाही आणि जनरेटरसाठी पुरेसे डिझेलही मिळत नसल्यामुळे त्याचा मूर्ती तयार करण्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे मूर्तीच्या किमतीत २० टक्क्य़ांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव आता पंधरा-वीस दिवसांवर आला आहे. मूर्तीकारांनी मातीच्या मूर्ती तयार करून ठेवल्या आहेत पण भारनियमनामुळे रंग देण्याचे काम थांबले आहेत.

ऐक्य टिकले तरच आंबेडकरी समाजाला न्याय
रिपब्लिकन ऐक्यावर नेत्यांच्या प्रतिक्रिया
नागपूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

प्रकाश आंबेडकर यांचा गट वगळता झालेल्या रिपब्लिकन पक्षांच्या ऐक्याबाबत मुंबईत झालेल्या घोषणेचे शहरातील आंबेडकरी चळवळ व विविध गटातील नेत्यांनी स्वागत करून हे ऐक्य दीर्घकाळ टिकले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. असे झाले तरच हे ऐक्य आंबेडकरी समाजाला न्याय शकेल, अशी प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त करण्यात आली. रिपब्लिकन पक्षांचे ऐक्य हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिठाला जागणारे असेल तर त्याचे निश्चितच स्वागत केले पाहिजे, असे परखड मत ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांनी व्यक्त केले. ऐक्य झाले पण, त्यात आलेल्यांनी आधीचे संबंध तोडले पाहिजे.

डॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच बाळाचा गर्भातच
मृत्यू झाल्याचा आरोप
नागपूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) डॉक्टरांनी हलगर्जी केल्यामुळेच बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याचा आरोप एका दाम्पत्याने केल्याने मेडिकलमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, या आरोपाचे डॉक्टरांनी खंडन केले आहे. गणेशनगरातील जयश्री नितीन िहगणे (२२) या महिलेला बुधवारी दुपारी दीड वाजता प्रसूतीसाठी मेडिकलमधील वार्ड क्र. ३० मध्ये दाखल करण्यात आले. सोनोग्राफीनंतर बाळ जिवंत व सुस्थितीत असल्याचे प्रथम सांगण्यात आले. परंतु नंतर लगेच बाळ मृत असल्याचेही सांगण्यात आल्याने हिंगणे दाम्पत्यांचा डॉक्टरांवरील विश्वासच उडाला.

अंध-अपंग कर्मशाळेतील कर्मचाऱ्यांचे निदर्शने
सहावा वेतन आयोग लागू करण्याची मागणी
नागपूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

सहाव्या वेतन आयोग लागू करावा या व इतरही अनेक मागण्यांसाठी विदर्भ शिक्षक संघ संचालित अंध-अपंग कर्मशाळा कर्मचारी विभागातर्फे रिझर्व बँक चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे देऊन निर्दशने करण्यात आली. कर्मशाळेला निवृत्ती वेतन योजना लागू करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती योजना लागू करणे, भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या व्याजासह मिळणे, वैद्यकीय परिपूर्ततेची अंमलबजावणी करणे, नियमित पगार इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी धरणे आंदोलनात आमदार अशोक मानकर, समाज कल्याण अधिकारी माधव झोड यांनी भेट देऊन मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी राजाराम शुक्ल, पुरुषोत्तम पंचभाई, शोभा रंगारी, राजेश हाडके, किशोर लहाने, त्र्यंबक बागडे, आनंद मेश्राम, नागेश्वरी राव, उमेश वारजूरकर, रमेश मुळे, देवानंद निमजे, दिनेश भोंडे, सुधीर परदेशी आदी कर्मचारी उपस्थित होते.

‘मुलांचे मासिक’चा स्वातंत्र्य विशेषांक प्रकाशित
नागपूर, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

बालवाचकांची दीर्घ परंपरा लाभलेल्या ‘मुलांचे मासिक’चा ऑगस्टचा देखणा स्वातंत्र्य विशेषांक प्रकाशित झाला असून स्वातंत्र्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या क्रांतिकारकाच्या गाथांनी हा अंक सजलेला आहे. या ३२ पानांच्या विशेषांकात स्वातंत्र्यासाठी प्रश्नणाचे बलिदान देणारा बंगाली क्रांतिकारक वीरेन्द्रनाथ दासगुप्ता यांची शौर्यगाथा ‘वीरेन्द्रनाथ’, ‘हळदीघाटचे युद्ध’, ‘सावरकरांच्या शपथेचा शतकोत्सव’, ‘शूर राणी झाशीची’, लाल बहादूर शास्त्री यांच्यावरील ‘असिम साहस’, ‘गोपाळकृष्ण गोखले आणि भाषण’, ‘महती स्वातंत्र्याची’, ‘अजब युक्ती’, खुदीराम बोस यांच्या बलिदानाची कथा ‘नेम चुकला’, भाई कोतवाल यांच्यावरील ‘माथेरानचा महावीर’ ‘वीज राजकुमार जेरापूर नरेश’, ‘क्रांतिकारक बाबू गेनू’ यासारख्या स्फूर्तीप्रद कथांचा समावेश आहे. याशिवाय शूरवीरांना समर्पित कविता, प्रश्नमंजूषा ही नेहमीची सदरे अंकाची वाचनीयता वाढवणारी आहेत. संपादक- जयंत मोडक, संपर्क- मुलांचे मासिक कार्यालय, १६८, हनुमाननगर, नागपूर- ४४००९. दूरध्वनी- २७४६१८१.

डॉ. वासुदेव डहाके यांचा षष्टय़ब्दीपूर्तीनिमित्त उद्या सत्कार
नागपूर, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

वैदर्भीय साहित्यिक डॉ. वासुदेव डहाके यांचा षष्टय़ब्दीपूर्तीनिमित्त शनिवारी, ८ ऑगस्टला सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्या ‘सावित्रीच्या पोरी’ या काव्यनाटिकेचे प्रकाशन होणार आहे. नरखेड येथील पंढरीनाथ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे राहणार आहेत. ‘सावित्रीच्या पोरी’ या काव्यनाटिकेचे प्रकाशन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. सीमा साखरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी समीक्षक डॉ. रवीन्द्र शोभणे, प्रेरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश गुप्ता, प्रश्नचार्य डॉ. वसंत उमरकर, पंढरीनाथ महाविद्यालयाचे प्रश्नचार्य डॉ. जयंत जवंजाळ, नरखेड पंचायत समितीचे सभापती नरेश अरसडे, प्रश्न. अनिल नितनवरे, प्रश्न. पुरुषोत्तम माळोदे, पत्रकार प्रमोद काळबांडे हे उपस्थित राहणार आहेत. परिसरातील साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. वासुदेव डहाके सत्कार समिती, मध्यमा प्रकाशन, युगसंवाद वाङ्मयीन सांस्कृतिक चळवळीचे प्रश्न. अजय चिकाटे, प्रश्न. अशोक भक्ते, प्रश्न. विजय राऊत, दीपक वानखेडे, प्रमोद लेंडे आदींनी केले आहे.

आदिम एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे बहुजन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शिबीर
नागपूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

ऑल इंडिया आदिम एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे बहुजन समाजातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शिबीर मानेवाडय़ात आयोजित करण्यात आले होते. संघटनेचे अध्यक्ष चंद्रभान पराते प्रमुख वक्ते तर, आदिमच्या नेत्या अ‍ॅड. नंदा पराते अध्यक्षस्थानी होत्या. कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधीलकीतून समाजाच्या समस्या सोडवण्यास प्रश्नधान्य द्यावे आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी झटावे, असे आवाहन चंद्रभान पराते यांनी केले. आदिवासी, दलित, शोषितांना आरक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे. राज्यघटनेत ही तरतूद आहे. मात्र, आजही समाजातील अनेक घटकांना डावलण्यात येत असल्याने ते अजूनही उपेक्षित आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मागास समाजाचे कल्याण होईल यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे अ‍ॅड. नंदा पराते म्हणाल्या.
शिबिरास विठ्ठल बाकरे, अशोक डेकाटे, प्रवीण हेवलीकर, गोपाळ पौनीकर, हिरालाल मौंदेकर, रघुनंदन पराते, गणेश कोहाड, संजय टेंभेकर, हिराचंद सातपुते, प्रमोद निनावे, धनराज कुंभारे, कैलास निनावे, अरुण मौंदेकर, सुनील सोनकुसरे, ज्ञानेश्वर दाढे, हेमराज शिंदेकर, प्रमोद दंडारे, दशरथ गहाणे, दिलीप नंदनकर आदींचे सहकार्य लाभले.

स्टार बसमुळे ऑटोरिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ
नागपूर, ६ ऑगस्ट/ प्रतिनिधी

स्टार बसमुळे इतवारी रेल्वे स्थानकापासून ते कामठी मार्गावर चालणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप, अखिल भारतीय मानवाधिकार संरक्षण मंचातर्फे करण्यात आला आहे. यासंदर्भात रिक्षा चालकांच्या एका शिष्टमंडळाने महापालिकेतील उपायुक्तांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगितली. इतवारी शांतीनगरपासून कामठी मार्गावर चालणारी मिनी स्टार बस एका मागून एक चालत असल्याने या मार्गावर ऑटो रिक्षाचालकांना प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. ऑटो चालकांना दिवसभर उभे राहावे लागते. मात्र, प्रवासी मिळत नसल्याचे ऑटोचालकांचे म्हणणे आहे. काही रिक्षा चालक भाडय़ाने रिक्षा चालवतात तर काहींनी बँकेचे कर्ज काढून घेतले आहेत. मात्र, प्रवासी मिळत नसल्याने बँकेचा हप्ता फेडू शकत नाहीत, असे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. शिष्टमंडळात अरविंद बांबोर्डे, राजीव डोंगरे, बाळू मेश्राम, सोहेल खान, वसीम, रामदास धनविजय आदी उपस्थित होते.

‘बचतगटाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण व्हा’
नागपूर, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

बचतगटाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होऊन स्वत:ची ओळख तयार करा, असे आवाहन सिद्धकला राष्ट्रीय महिला बचतगट फेडरेशनच्या अध्यक्ष करुणा पेंडसे यांनी केले. सावनेर शहरात आरोग्य विभागाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर खादी ग्रामोद्योगचे बबन जामूनकर, सावनेरचे संवर्ग विकास अधिकारी यावले उपस्थित होते. एका व्यक्तीवर कुटुंब चालू शकत नाही, त्यासाठी महिलांना स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बबन जामूनकर यांनी केले. वेळ वाया जावू न देता प्रत्येक महिला बचतगटाच्या माध्यमातून संसाराला आधार देऊ शकतात, असे जामूनकर म्हणाले. व्यवसायासाठी कुठल्याही जातीचे, धर्माचे बंधन नाही. बचतगटांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्याची योजना सरकारकडून राबविण्यात येते, असे प्रतिपादन यावले यांनी केले. फेडरेशनमुळे चांगले कार्य करणाऱ्या बचतगटाच्या अनुभवाचा लाभ इतर बचतगटांना होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘प्रेरणा मिळण्यासाठी महापुरुषांचे स्मरण’
नागपूर, ६ ऑगस्ट/ प्रतिनिधी

इतिहासाची पाने सत्य सांगत असताना त्या सत्याची चर्चा व्हावी आणि त्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून महापुरुषांचे स्मरण करण्यात येते. त्याकरता पुण्यतिथी व जयंतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात, असे मत पोरवाल महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्रश्नध्यापक डॉ. कुमार शास्त्री यांनी येथे व्यक्त केले. सक्करदरा चौकातील कमला नेहरू महाविद्यालयात लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि कमला नेहरू यांची जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी अमर सेवा मंडळाच्या अध्यक्ष डॉ. सुहासिनी वंजारी होत्या. अध्यक्षीय भाषणातून त्यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, लोकमान्य टिळक हे केवळ ध्येयवेडेच नव्हते तर ध्येयनिष्ठ होते. स्वकर्म करीत असताना आपण केवळ कर्मच करायचे नसून ते कर्तव्य आहे. ही जाणीव हल्लीच्या पिढीने जोपासावी, असेही आवाहन त्यांनी केले. संचालन प्रश्न. वैजयंती पेशवे यांनी केले तर आभार सुनील आडगावकर यांनी मानले.

सेवानिवृत्त कुस्तीगीर उदय शहाणे यांना भावपूर्ण निरोप
नागपूर, ६ ऑगस्ट/ प्रतिनिधी

अग्निशमन विभागातील अग्रेसर आग्निक आणि कुस्तीगीर उदय खुशाल शहाणे हे सेवानिवृत्त झाले. त्यांना महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित कार्यक्रमात भावपूर्ण निरोप देण्यात आला. अग्निशमन विभागाचे प्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक फिरोज खान, सहाय्यक स्थानाधिकारी ए.एस. फुलसंगे, कार्यकारी स्थानाधिकारी बी.पी. चंदनखेडे, डी.एन. नाकोड, सी.के. इलमे, एस.व्ही. भेंडे, के.आर. कोठे, आर.एस. बरडे उपस्थित होते. कुस्तीगीर असल्याने पहेलवान म्हणून ओळखले जाणारे उदय शहाणे यांना १९७४ ला विदर्भ केसरी या बहुमानाचा किताब मिळाला होता. तसेच महापालिकेतर्फे पश्चिम विभागीय ऑल इंडिया म्युनसिपल टुर्नामेन्टमध्ये १९८५ ला गुजरात येथील भावनगर येथे कुस्ती स्पर्धेत सहभागी होऊन उपविजेता राहिले. १९८७ मध्ये नाशिक आणि १९९० मध्ये सोलापूर येथील कुस्ती स्पर्धेत ते उपविजेते होते. संचालन एस.एस. राऊत यांनी केले. आभार डी.एन. नाकोड यांनी मानले.

ग्रंथालय संघाचे १० ऑगस्टला धरणे आंदोलन
नागपूर ६ ऑगस्ट/ प्रतिनिधी

सार्वजनिक वाचनालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी व सेवा शर्तीच्या मागण्यांसाठी येत्या १० ऑगस्टला सर्व सार्वजनिक वाचनालये बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात येणार आहेत. नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य शासनाने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी दिली आहे, मात्र सार्वजनिक वाचनालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. २६ मे २००९ ला राज्य ग्रंथालय परिषदेत उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्रश्न. राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक भूमिका घेऊन दुप्पट अनुदान देण्याचे घोषित केले होते, पण अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे येत्या १० ऑगस्टला सर्व सार्वजनिक वाचनालये बंद ठेवून कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमावे, असे आवाहन ग्रंथालय संघातर्फे करण्यात आले आहे.

दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी द्या; सोनिया-राहुलला साकडे
नागपूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी स्थानिक महिला नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांची भेट घेऊन केली. तसेच, शहरातील गटबाजीमुळे पक्षाच्या होणाऱ्या नुकसानाकडेही त्यांचे लक्ष वेधले.
शहर सरचिटणीस आभा पांडे, सुजाता कोंबाडे, अ‍ॅड. रेखा बाराहाते आणि काकी गुजर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेतली. याशिवाय सरचिटणीस ए.के. अँटोनी, दिग्विजयसिंग, ऑस्कर फर्नाडिस, मोहनप्रकाश, तसेच केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदींची भेट घेऊन शहरातील राजकीय स्थितीकडे लक्ष वेधले. शहरातील प्रस्थापित नेतेच पक्षाचे नुकसान करत आहेत. पक्षशिस्तीचे वारंवार उल्लंघन करण्यात येते. ही बाब लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून यामुळे पक्षाला लाभ होईल, असे शिष्टमंडळाने निवेदनात म्हटले आहे. यात सरिता काबरा, अंजली व्यवहारे, श्रद्धा मेरखेडे, उषा बेले, सुजाता नितनवरे, जयश्री गिल्लरकर आणि लता पुरोहित यांचा समावेश होता.

८ ऑगस्टला ‘स्वरदुंदुभी’
नागपूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

संतकवी कमलासुत उपाख्य चंद्रशेखर वराडपांडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त श्रीरंग संगीत विद्या मंदिरातर्फे ८ ऑगस्टला क्रांतीदिनाच्या पूर्व संध्येला ‘स्वरदुंदुभी’ या देशभक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात दुपारी १ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला विंग कमांडर अशोक मोटे, आमदार देवेंद्र फडणवीस, मेजर हेमंत जकाते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना चंद्रशेखर वराडपांडे यांची असून गिरीश वराडपांडे यांनी संगीत नियोजन केले आहे. नृत्य दिग्दर्शन श्रीरंग व प्रश्नंजली वराडपांडे यांनी केले आहे. मनीषा देशकर, मृणाल बरडे व रेणुका खामणकर कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.
या कार्यक्रमात सागर राऊत, सागर साळुंके, कुशल ठवकर, शिवराज जाधव, जीवन सपकाळ, मंजिरी अटाळकर, हर्षदा कुळकर्णी, तृप्ती जोशी, स्नेहल बुटले, रश्मी अलोणी, तन्मय वराडपांडे, गणेश खानकर यांच्यासह शंभर कलावंत यात सहभागी होणार आहेत.

राष्ट्रपतींना कमला मोहता यांचे निवेदन
नागपूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची काँग्रेसच्या शहर सचिव आणि माहेश्वरी महिला संघटनेच्या माजी अध्यक्षा कमला मोहता यांनी अलीकडेच भेट घेऊन निवेदन दिले. समाजातील महिला आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. राजकारणातही महिलांना अशीच संधी मिळाल्यास पक्ष बळकट करण्यासोबतच सामाजिक विकासालाही वेग येईल, असे मोहता यांनी निवेदन म्हटले आहे. देशातील महिलांची स्थिती आणि त्यांच्या सहभागाबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. महिलांचा असाच सहभाग राहिल्यास २१ व्या शतकात देश सर्वाधिक बलशाली राष्ट्र राहील आणि साक्षरतेचे प्रमाणही सर्वाधिक राहील, असे राष्ट्रपती प्रतिभा पाटील यावेळी म्हणाल्या.

आमदार बावनकुळे लोकांची दिशाभूल करीत आहेत -दळवी
नागपूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

गेल्या साडेचार वर्षापासून नरसाळा हुडकेश्वर या भागात पाण्याची समस्या भेडसावत आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येथील पाणी पुरवठय़ाच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे. मात्र याचे श्रेय आमदार चंद्रशेखर बावनकुळे घेत असून ते लोकांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत दळवी यांनी पत्रकार परिषदेत केला.
महापालिकेने गेल्या साडेचार वर्षात नरसाळा हुडकेश्वर भागात पाणी पुरवठय़ाची सोय केली नाही. जीवन प्रश्नधिकरणामार्फत नरसाळा येथे पाण्याची टाकी मंजूर करण्यासाठी ग्रामीण काँग्रेसने प्रयत्न केले. टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेला विनंती करण्यात आली. महापालिकेत भाजपची सत्ता, शिवाय नरसाळा ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आहे, तरीही पाणी पुरवठा करण्यात आला नाही. ग्रामीण काँग्रेसने याबाबतीत मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा केला आणि पाणी पुरवठय़ाची योजना अंमलात आणली. मात्र या कामाचे श्रेय आमदार बावनकुळे घेत असल्याचे दळवी म्हणाले. पत्रकार परिषदेला दिवाकरराव जंगले, किशोर वानखेडे, महादेव भोयर, राजू वैद्य, विनोद चरडे, बंडू वैद्य आदी उपस्थित होते.

विज्युक्टाची विजय सभा
नागपूर, ६ ऑगस्ट/ प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ व विदर्भ ज्युनियर कॉलेज टिचर्स असोसिएशन यांच्या मागण्या मान्य झाल्याने धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये विजय सभा घेऊन संप मागे घेण्यात आला. विज्युक्टाचे अध्यक्ष प्रश्न. अरुण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना केंद्राप्रमाणे घरभाडे भत्ता दिला जाईल, १ एप्रिलपासून वाहन भत्ता दुप्पट केला जाईल, महिलांना मिळणारी प्रसुती रजा ९० दिवसांवरून १८० दिवस करण्यात आली असल्याची माहिती प्रश्न. चौधरी यांनी दिली. सभेचे प्रश्नस्ताविक प्रश्न. युगलु रायलू यांनी केले. यावेळी सुधीर शेकदार, प्रश्न. नामदेव घोळसे, प्रश्न. अशोक गव्हाणकर , प्रश्न. रमेशराव कोलते, प्रश्न. ज्ञानेश्वर डोंगरे, विनायक भुजाडे, प्रश्न. हरीश वासनिक आदी विविध महाविद्यालयातील प्रश्नध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

एम.बी.ए. विभागप्रमुखांच्या वर्तनावर प्र-कुलगुरूंचे ताशेरे
नागपूर, ६ ऑगस्ट/ प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवसाय व्यवस्थापन विभागाने (एम.बी.ए.) बहि:शाल विद्यार्थ्यांचे एम.कॉम. व इतर परीक्षांचे परीक्षा अर्ज स्वीकारण्यास नकार दिल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चातर्फे विद्यापीठाकडे तक्रार करण्यात आली. परीक्षांचे अर्ज एमबीए विभागातील केंद्रावर स्वीकारण्याची सुविधा विद्यापीठाने उपलब्ध केली आहे. मात्र विभागप्रमुख डॉ. विनायक देशपांडे यांनी सदर अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. शिवाय विद्यार्थ्यांना एका विभागातून दुसऱ्या विभागात चकरा मारण्यास भाग पाडले, असा आरोप करण्यात आला आहे. डॉ. देशपांडे यांच्या वर्तनावर प्रकुलगुरूंनी तीव्र आक्षेप घेतले असून त्यांना विद्यार्थ्यांची गैरसोय केल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे. एम.बी.ए. हा स्वायत्त विभाग नसून तो विद्यापीठाचाच एक भाग आहे. विद्यापीठाने परीक्षा अर्ज स्वीकारण्याचे केंद्र म्हणून एम.बी.ए. विभागात सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तर ती सुविधा केंद्रावर उपलब्ध करून देणे, हे विभाग प्रमुखाचे कर्तव्य असल्याचे प्रकुलगुरू म्हणाले.