Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

नवनीत

जी व न द र्श न
होमलँड

 

जागतिक मुस्लिम समाजात होमलँडची (आपली मायभूमी) संकल्पना नाही. एका राष्ट्राचे नागरिकत्व स्वीकारल्यानंतर किंवा ज्या देशात आपला जन्म झाला असेल म्हणजे ज्या देशात आपल्या पूर्वजांनी वास्तव्य करायचे स्वीकारले, येणाऱ्या पिढीला किंबहुना तोच देश ‘आपली मायभूमी’ म्हणून स्वीकारावा लागेल. मग तो देश कुठल्याही जाती किंवा धर्माच्या राज्यकर्त्यांच्या स्वाधीन का असेना. वंश, जात, भाषा, संस्कृती, भौगोलिक परिस्थिती किंवा धर्माला अनुसरून एखादा जनसमुदाय आपल्या वेगळय़ा मायदेशाची मागणी करीत असेल तर ही मागणी देशद्रोह नसली तरी देशप्रेमाच्या चौकटीतही बसत नाही. ‘मातृभूमी’ आणि ‘मायभूमी’ या दोन्ही संकल्पनांमध्ये अत्यंत नाजूक फरक आहे. कोणाला देशद्रोह्य़ाची उपाधी देण्यापूर्वी हे पाहण्यात यावे की, या इसमाने किंवा याच्या समाजाने आपल्या वेगळय़ा मायभूमीची मागणी तर केली नाही ना! आपल्या वेगळय़ा मायभूमीची मागणी करण्याचा किंवा मागणीद्वारे मायभूमी प्राप्त झाल्याचा अर्थ असा की, ज्या देशात तुम्ही स्थायिरूपी वास्तव्य करीत आहात, त्या देशाच्या यंत्रणेवर किंवा संविधानावर तुमचा विश्वास नाही. तुमची मने बाटलेली आहेत आणि जेव्हा तुम्हाला अवसर प्राप्त होईल तेव्हा तुम्ही आपल्या मायभूमीच्या हिताकरिता कार्यरत व्हाल आणि अशा प्रसंगी अगदी साहजिकच आहे की, तुमची एकनिष्ठता तुमच्या राहत्या देशाशी नसून तुमच्या मायभूमीशी निगडित होईल. इस्लाम धर्माने अशा विचारांवर आदेशपूर्वक आणि धोरणात्मक आळा घातला आहे. पैगंबरसाहेबांनी मक्केतील लोकांच्या छळाला कंटाळून जेव्हा मदिनेला स्थलांतर केले आणि आठ वर्षांनी मक्केवर स्वारी करून त्याला आपल्या अधिकारात घेतले, त्यावेळी मदिनावासीयांना असे वाटत होते की, आता पैगंबरसाहेब मक्का म्हणजे आपल्या मातृभूमीत स्थायी होतील. तेव्हा पैगंबर त्यांना आश्वासन देत म्हणाले की, ‘काळजी करू नका! माझं जगणं आणि माझं मरणं तुमच्याबरोबरच आहे.’
अनीस चिश्ती

कु तू ह ल
आईन्स्टाईनचा व्यापक सापेक्षतावाद
आईन्स्टाईनचा व्यापक सापेक्षतावाद हा काय आहे? त्याचे निष्कर्ष काय आहेत?
इ. स. १९१६ साली आईन्स्टाइनने व्यापक सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला. आईन्स्टाइनचा व्यापक सापेक्षतावाद म्हणजे एका अर्थी गुरुत्वाकर्षणाचाच सिद्धांत आहे.मात्र या सिद्धांतांचं स्वरूप न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतापेक्षा संपूर्णपणे वेगळं आहे. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार, एखाद्या वस्तूचा आजूबाजूंच्या वस्तूंवर होणारा परिणाम हा त्या वस्तूने निर्माण केलेल्या गुरुत्वाकर्षणीय बलामुळे घडून येतो. याउलट आईन्स्टाईनच्या व्यापक सापेक्षतावादानुसार प्रत्येक वस्तुमुळे तिच्या आजूबाजूच्या अवकाशाचा आकार बदलून त्याला वक्रता प्राप्त होते. वस्तू जितकी वजनदार तितकं तिच्या आजूबाजूचं अवकाश अधिक वक्र. वजनदार वस्तूच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली असलेली प्रत्येक वस्तू ही या वक्रावर अवकाशातून मुक्तपणे संचार करीत असते. या वस्तूने स्वीकारलेला मार्ग हा दोन बिंदूंमधला सर्वात जवळचा मार्ग असतो. फरक इतकाच की अवकाशाच्या वक्रतेमुळे हा मार्ग आपल्याला अभिप्रेत असलेल्या सरळ रेषेपासून ढळलेला असतो. ग्रहांची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा म्हणजे या ग्रहांचा अवकाशाच्या वक्रतेनुसार केला जात असलेला अशाच प्रकारचा अंतराळ प्रवास आहे. ग्रहांच्या बाबतीतली अवकाशाची ही वक्रता सूर्याच्या वस्तुमानामुळे निर्माण झाली आहे.
आईन्स्टाइनचा व्यापक सापेक्षतावादाचा सिद्धांत प्रकाश किरणांनाही लागू होत असल्यामुळे, प्रकाशाचा मार्गसुद्धा अवकाशाच्या वक्रतेनुसार ठरतो. प्रकाशकिरण जेव्हा एखाद्या अतिवजनदार वस्तूच्या जवळून जातो तेव्हा या प्रकाशकिरणांच्या मार्गात होणारा बदल लक्षणीय स्वरूपाचा असतो. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱ्या प्रकाशलहरींच्या ऊर्जेतही व्यापक सापेक्षतावादानुसार घट होऊन त्यांच्या तरंगलांबीत वाढ होते. गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली काळही हळू धावतो. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर आधारलेल्या बुधाच्या कक्षेच्या गणितात राहिलेली त्रुटी आईन्स्टाईनने आपल्या व्यापक सापेक्षतावादावर आधारित गणिताद्वारे दूर केली. आधुनिक विश्वरचनाशास्त्र हेसुद्धा या व्यापक सापेक्षतावादाच्या पायावरच उभं राहिलं आहे.
राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्म
देश स्वातंत्र झाल्यावर अन्नधान्यासाठी कटोरा हातात घेऊन फिरणारा देश अशी प्रतिमा असणाऱ्या भारताने अल्पावधीत आपली ही प्रतिमा सुधारली. याचे सर्व श्रेय जाते ते भारतीय हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना. डॉ. मोनकोंब सांबाशिवम स्वामीनाथन यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी तामिळनाडूमधील कुंभकोणम् येथे झाला. अणुवंशास्त्राच्या अभ्यासासाठी ते नेदरलँडला गेले. केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी पीएच. डी. ची पदवी संपादन केली. आपल्याकडील गव्हाची रोपे भारामुळे जमिनीवर लोळतात. परिणामी गव्हाची नासाडी होते. यावर उपाय योजना म्हणून जपानी आणि मेक्सिकन संकरित वाणाचं गव्हाचं बियाणं आणून त्यावर प्रयोग केला. त्यातून कणखर रोप असणारं सोनेरी दाणा असलेला कसदार गव्हाचा दावा त्यांनी तयार केला. हीच भारतीय हरितक्रांतीची नोंद ठरली. आणि एक कोटी टनावरून एकदम ७ कोटी टन गव्हाचे उत्पादन भारत घेऊ लागला. अनेक मान-सन्मानाची पदे त्यांनी भूषवली. ‘इंडियन कौन्सिल ऑफ द अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च’ या संस्थेचे महाव्यवस्थापक असताना प्राणी, वनस्पती, मासे यांच्या गुणसूत्रांवर संशोधन केले. एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेचे ते संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. शासनाच्या पद्मविभूषण, तसेच रॅमन मॅगसेसे या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
खार, साप आणि नाग
आफ्रिकेतल्या घनदाट जंगलात राहणाऱ्या बुशमनची ही लोककथा. दिवस खूप तापायला लागला. उन्हाच्या चटक्यांनी कासाविस झालेला एक छोटा हिरवा साप जेवूनखाऊन झाडाच्या सावलीला लुसलुशीत गवतात अंगाची गुंडाळी करून गाढ झोपला. त्या झाडावर गोंडेदार शेपटीची मण्यासारख्या डोळ्यांची खार राहात होती. सापाची चकाकती, चमचमती कातडी झाडांच्या पानांमधूनही तिला दिसली. खारींना काही वेगळे प्रकाशणारे दिसले की त्या विशिष्ठ आवाजात ओरडायला लागतात. ढिर्र्र.. मर्टर्र्र.. टिर्र्र असा खारीचा आवाज ऐकून शिकार करायला जवळूनच चालेलल्या बुशमनने विचार केला, काय पाहून खारूटली ओरडतीय बरं? सावधपणे तो झाडापाशी गेला. वेटोळे करून झोपलेला चकाकणारा साप त्याला दिसला. ‘हात्तेरी, गवती साप दिसतोय. याला मारण्यात अर्थ नाही. खायला काही उपयोगाचा नाही. जाऊ दे निरुपद्रवी आहे बापडा’ म्हणत बुशमन पुढे निघून गेला. काही काळाने दुसऱ्याने खारीचा तो आवाज ऐकला. खारीला नक्कीच काहीतरी दिसलंय. त्याने भाला सरसावला. आवाज न करता तो झाडापाशी आला. गवतीसाप पाहून तो फारच वैतागला. सकाळपासून काही मिळाले नाही. बायको रागावणार आता. बरं हा साप मारून न्यावा तर ती आणखी संतापेल. निरुपयोगी प्राणी का घेऊन आलात म्हणून आरडाओरड करेल. स्वत:शी पुटपुटत शिकार शोधत तोही पुढे निघून गेला. खार झाडावरून सारी गंमत पाहात होतीच पण तिच्यासारखंच आणखी कुणीतरी हे प्रसंग पहात होतं. विषाच्या पिचकाऱ्या टाकणारा एक नाग झाडीत लपून हे पाहाताना विचार करत होता. सकाळपासून या शिकाऱ्यांना घाबरून लपतोय. पण झाडाखालची ही जागा फारच सुरक्षित दिसतीय. जरा झोप घ्यावी. त्याने झाडीतून बाहेर येऊन गवतीसापावर हिस्स्स करून विषाची पिचकारी टाकली. तसा खडबडून जागा होऊन तो दूर पळाला. नाग त्याच्याजागी येऊन निश्चित झोपला. खार मात्र पूर्वीपेक्षा नागाला पाहून जोरातच ओरडू लागली. पण नागाला त्या आवाजाची सवय होती. त्याची झोपमोड झाली नाही. तेवढय़ात आणखी एक बुशमन खारीचा विशिष्ठ आवाज ऐकून शिकारीच्या आशेने आला. ज्याला तो नेहमी घाबरायचा तो नाग असा बेसावध आणि गाढ झोपलेला पाहून आपल्या तिरकामठय़ाने त्याने नागाला मारले. आपल्या पिशवीत त्याला घालून तो आनंदाने घराकडे निघाला. ते पाहून खार हळहळली ‘गवतीसापाला हुसकून हा आपणहून मरणाच्या जबडय़ात आला. कायम सावध असावे. एकासाठी सुरक्षित असणारी गोष्ट दुसऱ्यासाठी संकट ठरू शकते. हे लक्षात ठेवून कशावरही विश्वास ठेवण्याआधी विचार करावा.
आजचा संकल्प - मी विचाराने वागेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com