Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

जल्लोषात सुटली महिला स्पेशल लोकल
पनवेल/प्रतिनिधी

पनवेल प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ. भक्तीकुमार दवे यांनी सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलला हिरवा झेंडा दाखविला आणि महिला प्रवाशांनी एकच जल्लोष केला. गुरुवारी सकाळी ८ वाजून ४८ मिनिटांनी सुटलेल्या या महिला स्पेशल लोकलच्या अनौपचारिक शुभारंभामुळे उपस्थित महिलांचा आनंद ओसंडून वाहात होता. यावेळी महिला प्रवाशांच्या प्रतिनिधी मानसी लिमये, स्टेशन प्रबंधक एस. बी. वर्मा, प्रवासी संघाचे राममूर्ती कदम, विनायक नाझरे आदी मान्यवर, तसेच असंख्य महिला उपस्थित होत्या. महिलांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.

नवी मुंबई शिवसेनेची पुन्हा आंदोलनाची हाक
विजय चौगुले कोषातून बाहेर
नवी मुंबई, (प्रतिनिधी)

ठाणे लोकसभा मतदारसंघातून पराभवाचे तोंड पहावे लागल्यानंतर कोषात गेलेले शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले पुन्हा एकदा आक्रमक झाले असून येत्या १६ ऑगस्ट रोजी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करावीत, या प्रश्नावर शिवसेनेतर्फे जाहीर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यभर सध्या शिवसेनेने आंदोलनांचा धडाका लावला आहे. या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईत मात्र शिवसेनेत शुकशुकाट होता.

ज्येष्ठ नागरिक संघाला १.२१ लाखाची देणगी
पनवेल/वार्ताहर -
पनवेलचे माजी नगराध्यक्ष आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल ज्येष्ठ नागरिक संघाला एक लाख २१ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, तसेच विनामूल्य चष्मे व श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री प्रतीक पाटील, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री रवी पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, डॉ. भक्तीकुमार दवे आदी नेते, तसेच असंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

खाडीतील प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्यांवर कारवाईची मागणी
उरण/वार्ताहर -
उरण परिसरातील खाडीतील वाढत्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या रासायनिक कंपन्या आणि जेएनपीटीविरुद्ध कारवाईत केल्यास १५ ऑगस्ट रोजी जेएनपीटी बंदरातच निदर्शने करण्याचा इशारा हनुमान कोळीवाडा येथील मच्छिमार व ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिला आहे.
जूनच्या २९ तारखेपासून उरणच्या विविध खाडय़ा व समुद्रात मोठय़ा प्रमाणात रासायनिक प्रदूषण झाल्याने लाखो मृत मासे पाण्यावर तरंगू लागले होते. परिसरातील खाडय़ा व समुद्रच दूषित झाल्याने मासेमारी व मासे विक्री करू नये, असे आवाहन तहसीलदार सुषमा परब यांनी केले होते. यामुळे या काळात स्थानिक मच्छिमारांनी मासेमारी बंद ठेवली होती. यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने भरपाई मिळावी व प्रदूषण फैलावणाऱ्या जेएनपीटीसह परिसरातील कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी हनुमान कोळीवाडा सरपंच सुरेश कोळी, ग्रामस्थ व मच्छिमारांनी गुरुवारी तहसीलदारांची भेट घेतली. यावेळी तपासणीसाठी नेण्यात आलेले मृत मासे व दूषित पाण्याच्या नमुन्याबाबत अद्याप कोणताही अहवाल प्रश्नप्त झाला नसल्याची माहिती तहसीलदार परब यांनी दिली.

पीरवाडी बीचवर भाविकांचा महापूर
उरण/वार्ताहर -
नारळी पौर्णिमेनिमित्त येथील पीरवाडी बीचवर काल लाखो भाविक व पर्यटक एकत्र आले होते. त्यांच्या गर्दीला आवर घालताना सुरक्षारक्षक व पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. उरण शहराशेजारीच पीरवाडी बीच आहे. विस्तीर्ण किनारा, सभोवार अथांग पसरलेला समुद्र व निसर्गरम्य सौंदर्यामुळे या बीचने पर्यटकांना नेहमीच भुरळ घातली आहे. बुधवारीही नारळी पौर्णिमेनिमित्त या बीचवर लाखो भाविक व पर्यटकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी नागाव रोडवरच वाहने रोखून ठेवली होती. यामुळे पर्यटक व भाविकांच्या रांगा ओएनजीसीच्या शेवटच्या प्रवेशद्वारापर्यंत लागल्या होत्या. नारळीपौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी समुद्रात नारळ सोडून सागराची पूजा केली, तर हजारो पर्यटकांनी पीरवाडी बीचवर मनसोक्त आनंद लुटला. कालच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांनाही अवघड होऊन बसले होते.

जवानांना जायंटस् ग्रुपने राख्या बांधल्या
जायंटस् ग्रुप ऑफ उरणच्या महिलांनी बुधवारी नौदलाच्या ६० जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. कुटुंबियांपासून कोसो दूर राहून सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांना रक्षाबंधनाच्या दिवशी आठवण येणे साहजिक आहे. त्यांना त्याची उणीव भासू नये म्हणून जायंटस् ग्रुप ऑफ उरणतर्फे मागील तीन वर्षांपासून उरण येथील नौदलाच्या जवानांना राखी बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला जात आहे. या वर्षीही रक्षाबंधनाचे औचित्य साधून ६० जवानांना ग्रुपच्या महिला सदस्यांनी राख्या बांधल्या.

पावसाच्या दडीमुळे शेतकरी हवालदिल
उरण/वार्ताहर -
जुलै- ऑगस्ट महिन्यातही पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी शेतकरी तर उकाडय़ामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उरण परिसरात यंदा पाऊस बरसलाच नाही. जून महिन्यात मागील वर्षी ८३० तर जुलै महिन्यात ८१५ मि. मी. असा एकूण १६४५ मि. मी. पाऊस पडला होता. मात्र या वर्षी पावसाने पाठ फिरविलीच. शिवाय विलंबाने सुरू झाल्यावरही पावसात अद्याप मागील पाच वर्षांतील जून, जुलै महिन्यातील सरासरीही गाठलेली नाही. या वर्षी जून महिन्यात ५१ मि. मी. तर जुलै महिन्यात ५७५ मि. मी. इतक्याच पावसाची उरण परिसरात नोंद झाली आहे. १ जून ते २२ जूनपर्यंत (७ जून- ०.५ मि. मी. वगळता) पावसाचा एकही थेंब पडला नसल्याच्या नोंदी आहेत. त्यानंतर २९ जून रोजी २४ मि. मी. पाऊस पडला. त्यानंतर जुलै महिन्यात ५७५ मि. मी. पाऊस पडला. ३१ दिवसात फक्त १६ दिवसच पाऊस पडला आहे. मागील वर्षांच्या सरासरीपेक्षा निम्म्यांहून कमी पाऊस उरण परिसरात पडला आहे. ऑगस्ट महिन्याच्या ५ तारखेपर्यंतही सरकारदप्तरी पावसाची नोंद झाली आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्याचबरोबर पावसाअभावी वातावरणातही उष्मा जाणवू लागल्याने उकाडय़ामुळे नागरिकही हैराण झाले आहेत.

द्रोणागिरी स्पोर्टस्तर्फे मॅरेथॉन, फुटबॉल स्पर्धा
उरण/वार्ताहर -
येथील द्रोणागिरी स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने फुटबॉल व मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, ७ ऑगस्टपासून ९ ऑगस्ट अशा तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धा उरण महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात घेण्यात येणार आहे. द्रोणागिरी स्पोर्टस् असोसिएशनची ही नववी वर्षा मॅरेथॉन व फुटबॉल स्पर्धा आहे. यावेळी विशेष उरण अभिमान दौड- २००९ ही स्पर्धाही घेण्यात येणार आहे, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी विविध क्षेत्रातील खेळाडू व मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.