Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

नाशिक शहरातील बससेवा पालिकेने आपल्या हाती घ्यावी की घेऊ नये, या विषयावरून गेले काही दिवस बरीच भवती न् भवती सुरू आहे. जवळपास सर्वपक्षीय नगरसेवकांचा या निर्णयाला विरोध असताना आणि विविध संस्था-संघटनांसह सूज्ञ नागरिकांनी देखील ही बाब व्यवहार्य नसल्याचे सांगत त्याविरोधात वेळोवेळी जाहीर मत प्रदर्शन केले असताना काही पदाधिकारी मात्र त्यासाठी विशेष आग्रही होते. एकीकडे शहरातील कचरा उचलणाऱ्या घंटागाडय़ांचे व्यवस्थापन करणे महापालिकेला धड जमत नसताना दुसरीकडे शहर बससेवेसारखी वाहतुकीची मोठी जबाबदारी पालिकेने आपल्या हाती घेऊ नये, असा आक्षेप घेतला जात होता. सद्यस्थितीत पालिकेने शहर बस वाहतूक सेवा चालवायला घेणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे असल्याची सार्वत्रिक प्रतिक्रियाही व्यक्त होत होती. अर्थात, अशा गदारोळाशी काहीही देणे-घेणे नसल्यानेच कदाचित हे गाढवे शहरातील एका बसथांब्याच्या शेडमध्ये निवांतपणे विश्रांती घेत असावेत. मग, भले कुणी या दृश्याचा संबंध कचऱ्यात लोळण्याच्या अवगुणाशी लावो अथवा मुकाटय़ाने ओझी उचलण्याच्या अंगभूत गुणाशी लावो.. शेवटी काय, ‘कालचाच गोंधळ बरा होता’, असे म्हणायची वेळ भविष्यात या बाबतीत कधी येऊ नये, एवढीच काय ती सर्वसामान्यांची अपेक्षा.

..बससेवेबाबत अखेर पालिकेला उपरती
बससेवा चालविण्याचा विषय सर्वसाधारण सभेने फेटाळला
कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता

प्रतिनिधी / नाशिक

महापालिकेने स्वतची बस सेवा सुरू करण्यास सर्वपक्षीय नगरसेवकांचा प्रखर विरोध लक्षात घेता अखेर पालिकेच्या सर्वसाधारण सभेने हा विषय फेटाळून लावला. या विषयावरून होणाऱ्या संभाव्य टीकेचे धनी व्हावे लागू नये म्हणूनच कदाचित चर्चेविनाच तो फेटाळून लावताना ही सेवा एस. टी. महामंडळाच्या ताब्यात कायम ठेवण्यासाठी आता ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यासही महापौरांनी सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या या प्रश्नावर जनमानसाची भावना लक्षात घेऊन त्यानुसार सकारात्मक निर्णय झाल्यामुळे महापालिकेवरील संभाव्य दिवाळखोरीचे संकट टळल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

असा निर्णय.. अशा प्रतिक्रिया
नाशिक / प्रतिनिधी

शहर वाहतूक बससेवा आपल्या ताब्यात घेण्याचा घाट घालत पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी तसा प्रस्तावही गुरुवारच्या सर्वसाधारण सभेवर ठेवण्यात आला होता. त्यावरून गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच प्रतिक्रिया उमटत होत्या. अखेर ही बस सेवा आपल्या ताब्यात न घेता एस.टी. महामंडळानेच चालवावी यासाठी महामंडळाला ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. त्यावर व्यक्त झालेली ही मते..

शहर बससेवेला नवी झळाळी देण्यास महामंडळ सरसावले
प्रतिनिधी / नाशिक

शहर बस सेवा सध्याप्रमाणेच कायम ठेवण्यास महापालिकेकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर एस. टी. महामंडळाने या सेवेला नवी झळाळी देण्याची तयारी सुरू केली असून त्या अंतर्गत सध्या अपुरी पडणारी बसेसची संख्या वाढवून ती किमान ४५० पर्यंत नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील १०० बसेस जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान योजनेंतर्गत तातडीने मिळाव्यात याकरिताही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या शिवाय, शहर बस सेवेकरिता सातपूर व नाशिकरोड येथे स्वतंत्र आगार उभारण्याची योजना आहे.

जळगाव येथे आजपासून जलसाहित्य संमेलन
वार्ताहर / जळगाव

येथील जैन हिल्स परिसरात ७ व ८ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथील जल संस्कृती मंडळ, जैन इरिगेशन सिस्टीम लि. व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन बहुउद्देशीय संस्थेच्या विद्यमाने पाचवे अखिल भारतीय जलसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवसीय संमेलनात पाण्याशी संबंधित विविध विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचे जल संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष मोरवंचीवार व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष भवरलाल जैन यांनी सांगितले. पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ हे संमेलनानाचे अध्यक्षपद भूषविणार असून ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

हिरे कुटुंबियांतील वादाचे पर्यवसान हाणामारीत
वार्ताहर / मालेगाव

माजी मंत्री प्रशांत हिरे आणि त्यांचे जावई डॉ. जयदीप पवार यांच्यातील कौटुंबिक वाद पुन्हा उफाळून आला आहे. मुलाला भेटण्यासाठी बुधवारी सायंकाळी हिरेंच्या येथील निवासस्थानी आपण गेलो असता मारहाण करण्यात आल्याची तक्रार डॉ. पवार यांनी केली आहे. तर हिरेंचे मेहुणे उदय शिंदे यांनीही पवार गटाविरूध्द मारहाणीची फिर्याद दिली आहे. कॅम्प पोलिसांनी या प्रकरणी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

काजू प्रक्रिया व्यवसायामुळे समृध्दीकडे वाटचाल
महाराष्ट्राच्या एकूण विकास आराखडय़ात मुंबई, पुण्यानंतर समर्थ पर्याय म्हणून नजरेसमोर येते ते नाशिक शहर. औद्योगिक प्रगती झपाटय़ाने साधत असतानाच जिल्ह्य़ाचा ग्रामीण भागही विविध मार्गानी आपल्या प्रगतीच्या वाटा धुंडाळत आहे. जिल्ह्य़ात बचत गटांची चळवळ चांगलीच मूळ धरत आहे. उत्पादन साधनांवरील सामुदायिक मालकी, उत्पादित मालावरील नफ्यावरही सामुदायिक मालकी हे समाजवादाचे सूत्र खऱ्या अर्थाने प्रतिबिंबीत होत आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी अपघातात भावाचा मृत्यू
प्रतिनिधी / नाशिक

रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून आपल्या नवीन दुचाकीवर घरी परतत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक युवक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री वावी-सिन्नर रस्त्यावर घडली. गौरव बैरागी असे त्याचे नाव असून तो नाशिकरोड येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. रक्षाबंधनासाठी तो वावीजवळील निऱ्हाळे या गावी बहिणीकडे गेला होता. रात्री हा कार्यक्रम झाल्यावर दुचाकीने तो नाशिकरोडकडे येण्यास निघाला असताना हा अपघात झाला. रात्री साडे अकराच्या सुमारास सिन्नर-वावी रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गौरवचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर धडक देणारे वाहन लगेच गायब झाले. अपघाताचा आवाज घेऊन आसपासच्या ग्रामस्थांनी रस्त्यावर धाव घेतली आणि जखमी गौरवला रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. परंतु, तत्पूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औद्योगिक परिसरात चोरटय़ाचा गोळीबार; एक जखमी
वार्ताहर / जळगाव

शहरातील औद्योगिक परिसरात के. के. कॅन्स या फॅक्टरीत चोरटय़ाने केलेल्या गोळीबारात सुरक्षा रक्षक जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. चोरटा ३२ हजार रुपयांची रोकड घेऊन पसार झाला. पोलीस ठाण्याजवळच हा प्रकार घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहराच्या औद्योगिक परिसरात व जळगाव-औरंगाबाद मार्गाला लागून तसेच औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या के. के. कॅन्स या फॅक्टरीत पहाटे तीन ते चारच्या दरम्यान एका चोरटय़ाने मागील बाजूने प्रवेश केला व त्याने सरळ कार्यालयात जाऊन तिजोरी फोडण्यास सुरूवात केली. आवाजाने प्रद्युम्न पाठक हा सुरक्षा रक्षक तेथे धावला. आवाज ऐकून त्याने सुनीत पाठक या दुसऱ्या रक्षकाला बोलविले. चोर असावेत असे समजून सुनीतने सरळ कार्यालय उघडले व त्याने चोरटय़ास रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरटय़ाने तिजोरीसह पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रक्षकाने त्याला पुन्हा अडविताच चोरटय़ाने त्याच्यावर गोळी झाडली. ती छातीतच लागल्याने रक्षक खाली कोसळला. ही संधी साधत चोरटा पळाला. फॅक्टरीच्या आवारात राहणाऱ्या राम तिवारी या व्यक्तीने मालक कोठारी यांना या प्रकाराबाबत कळविले. त्याच बरोबर जखमी सुनीतला जिल्हा रुग्णालयात हलविले. चोरटा माहितगार असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या फॅक्टरीत चोरी व गोळीबाराची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलीस ठाण्याजवळचाच परिसर सुरक्षित नाही तर शहरातील वसाहतींची सुरक्षितता काय, हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेशासाठी मोर्चा
नांदगाव / वार्ताहर

नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी येथील शहर नाभिक संघटनेतर्फे शहरातून मोर्चा काढून तहसील कचेरीसमोर आंदोलन करण्यात आले. तहसीलदार सुनील गाढे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नाभिक समाजास आरोग्य सुविधा मोफत द्यावी, व्यवसायासाठी लोखंडी टपरी मिळावी, सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशी १०० टक्के लागू कराव्यात, ग्रामपंचायत, सोसायटी, बाजार समिती, बस स्थानक, शासकीय वसाहती, पंचायत समिती व जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या व्यावसायिक संकुलांमध्ये राखीव गाळे द्यावेत, प्रतापगडावर शूरवीर जिवा महाले यांचे स्मारक बांधावे, नाभिक व्यावसायिकांना निवृत्ती वेतन लागू करावे, समाजाच्या आर्थिक उन्नतीकरीता श्री संत सेना महाराज आर्थिक विकास महामंडळ गठित करावे, शिक्षण किंवा नोकरीत असलेली आर्थिक दुर्बल घटकाची अट रद्द करावी, ओबीसी जातीत (खलिपा) न्हावी जातीचा समावेश करावा, नांदगाव तालुक्यातील गंगाधरी गावातील क्रांतीकारक भुतेकरांचे स्मारक नियोजित जागेत बांधून मिळावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष अरूण पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष गुप्ता, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दत्तात्रय छाजेड, नाभिक संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश निकम, शहराध्यक्ष सतीश निकम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रवींद्र बिडवे, विजय निकम, ज्ञानेश्वर निकम, मोहन मगर, संतोष निकम आदींसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

आदर्श विद्यालयातील शैक्षणिक साहित्य प्रदर्शनास प्रतिसाद
नाशिक / प्रतिनिधी

बाल विद्या प्रसारक मंडळ संचलित येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त व्ही. एच. पाटील यांच्या हस्ते झाले. मुख्याध्यापिका एस. एस. कर्डिले यांनी प्रश्नस्ताविक केले. या प्रदर्शनातील वेगवेगळ्या विभागांना साहित्यिक तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञांची नावे देण्यात आली होती. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या तक्त्यांची पाहुण्यांनी पाहणी केली. दरम्यान आदर्श विद्यालय व आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमधील विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही दुसऱ्या एका कार्यक्रमात करण्यात आला. मुख्याध्यापिका एस. एस. कर्डिले यांनी प्रश्नस्ताविक केले. संस्थेच्या वतीने दहावीमध्ये विभागात प्रथम येणाऱ्यास पाच हजार रूपये, ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्यांना तीन हजार रूपये, ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्यास एक हजार रूपये अशी रोख पारितोषिके ठेवण्यात आली होती. एक हजार रूपयाचे पारितोषिक सतरा विद्यार्थ्यांनी मिळविले. पालक-शिक्षक संघ, पालक व शिक्षकांतर्फेही विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही गौरविण्यात आले.

ज्योती विद्यालयातर्फे माळरानावर बीजरोपण
नाशिक / प्रतिनिधी

शहराजवळील पिंपळगाव बहुला येथील ज्योती विद्यालय व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव बहुला गावठाण व शेजारील ऐतिहासिक फाशीचा डोंगर येथे विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या वेगवेगळ्या प्रजातीच्या बियाणांचे रोपण व उधळण माजी महापौर दशरथ पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. शिरसाठ, लागवड अधिकारी टी. वाय. निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी दशरथ पाटील यांनी पर्यावरण विषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनात आत्मियता व जागरूकता निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पूर्वी पशू, पक्षी हे रानातील फळे, फुले खाऊन भ्रमण करायचे. फळांच्या बियांचा प्रसार विष्ठेव्दारे डोंगर, दऱ्या, किंवा जातील तिथे टाकायचे. त्यामुळे आपोआप बियांचे रोपण होत असे. परंतु हल्ली पशू व पक्षी यांचे प्रमाण कमी झाल्याने अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सामाजिक वनीकरणाच्या उपसंचालकांनी वेगवेगळ्या प्रजातीच्या बीजरोपणातून पर्यावरण व वृक्षसंवर्धन यांचा कशाप्रकारे मानवी जीवनावर परिणाम होतो या विषयी माहिती दिली.