Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

जैन यांच्या पक्षबदलाच्या चर्चेचा सेनेच्या बाणाकडून वेध!
सुकदेव शिरसाळे / जळगाव

विधानसभेच्या आगामी निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी जळगाव मतदार संघातून शिवसेनेची अधिकृत उमेदवारी गृहित धरून माजी मंत्री सुरेश जैन यांनी आपले फलक झळकवित प्रचारास सुरूवात केली आहे. त्यांचे धनुष्यबाण चौकाचौकात झळकू लागल्याने आताच प्रचारात आघाडी घेण्याचा त्यांचा मनसुबा उघड झाला आहे. परिणामी विरोधकांत अस्वस्थता पसरली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पूर्वीच्या जळगावचे विभाजन करण्यात येऊन जळगाव महापालिका क्षेत्र आणि जळगाव ग्रामीण असे दोन मतदारसंघ अस्तित्वात आले आहेत. या संपूर्ण मतदार संघावरच जैन यांचा पगडा आहे. त्यामुळे पुनर्रचित जळगाव महापालिका क्षेत्र असो की ग्रामीण हा त्यांचा बालेकिल्लाच समजला जातो. त्यांनी या दोघांपैकी कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढविली तरी त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. तो त्यांनी लागोपाठ आठ निवडणुका जिंकल्यामुळेच.

व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे जकात ठेकेदारांची कोंडी
वार्ताहर / जळगाव

राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांसाठी जकात रद्द करावी या मागणीसाठी जिल्ह्य़ातील व्यापाऱ्यांनी मालाची आवक करणे बंद केल्यामुळे महापालिका मक्तेदारांचे दररोज लाखोंचे नुकसान होणार आहे. शहरात मोजकेच दिवस पुरेल इतका धान्यसाठा शिल्लक असून व्यापाऱ्यांच्या बंदमुळे काळाबाजार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्रातील ‘ड’ वर्ग महापालिकांना जकात करातून मुक्ती मिळावी या मागणीसाठी संघटितपणे व्यापाऱ्यांचा लढा अंतीम टप्प्यात पोहोचला आहे. व्यापारी संघटना व प्रतिनिधींनी ‘करो या मरो’ या भूमिकेतून आंदोलन सुरू केले असून आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे. व्यापाऱ्यांच्या या जकात विरोधी आंदोलनाचाच एक भाग म्हणून येथील व्यापाऱ्यांनी शहरात मालाची आयात करणे बेमुदत बंद केले आहे. महापालिका परिसरात दररोज तेल, तुप, गुळ, साखर, गहू, तांदूळ, डाळी आदी अन्नधान्याची शेकडो क्विंटल आवक होते. हा जीवनावश्यक माल फक्त शहरातच नव्हे तर राज्याच्या इतर शहरातील व्यापारीही घेण्यासाठी येतात. त्यामुळेच जळगाव शहरातील दाणा बाजार व कृषी उत्पन्न बाजार समितीत कोटय़वधीची दैनिक उलाढाल होत असते.

रस्त्याचे खड्डे अन् गोटे यांची टोलेबाजी
वार्ताहर / धुळे

पालिकेत केवळ बदल्यांचे आणि बदल्याचे राजकारण करणारे नेते मुख्यमंत्र्यांकडे आयुक्तांच्या बदलीसाठी साकडे घालून बसले आहेत. बदली आणि बदल्याच्या राजकारणामुळे धुळेकर जनतेच्या जीवनाचा मात्र खेळ होत आहे. महानगरपालिकेच्या कक्षेत येणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून रस्त्याला पडलेले खड्डे बुजवून खड्डा मुक्त शहर करण्याऐवजी रोज नवनवीन रस्त्यांच्या भूमिपूजनाचा केवळ धडाका सुरू आहे. पाच वर्ष एकाच वर्गात नापास झालेला विद्यार्थी ‘या वर्षी पहिला नंबर आणतो’ असे सांगत गल्लोगल्ली फिरत आहे, पण या वर्षीच्या परीक्षेत कॉपी करूनही उपयोग नाही. पास होणे तर सोडाच, वर्गात शेवटचा नंबर त्याने स्वत:च राखून ठेवला आहे, म्हणून निदान भूमिपूजनासाठी का होईना रस्त्यावर फोडलेल्या नारळाने पडलेले खड्डे तरी बुजवा, असे उपरोधिक टोलेबाजी करणारे पत्रक माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. शहराच्या लोकप्रतिनिधींना रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत. कष्टाळू रिक्षाचालक व मध्यमवर्गीय दुचाकी वाहन चालक खड्डय़ांमुळे त्रस्त झाले आहेत. शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे चुकवत प्रवासी वाहतूक करावी कशी, वयोवृद्ध नागरिकांना घरापर्यंत सुरक्षित पोहचवायचे कसे, या प्रश्नामुळे रिक्षाचालक व मालक त्रस्त झाले आहेत. अन्य वाहनधारकांनाही अडचणी येत असल्या तरी प्रशासन गप्प आहे. पालिका आयुक्तांचा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ सुरू आहे. पालिकेत केवळ बदल्यांचे आणि बदल्याचे राजकारण करणारे नेते मुख्यमंत्र्यांकडे आयुक्तांच्या बदलीसाठी साकडे घालून बसले आहेत. तर त्यांचे चेले -चपाटे महानगरपालिकेच्या आयुक्तांची बदली होता कामा नये यासाठी प्रयत्नशील आहेत. बदलीच्या आणि बदल्यांच्या राजकारणामुळे धुळेकर जनतेच्या जीवनाचा मात्र खेळ होत आहे. तीन महिन्यांपूर्वी केलेल्या मॉडेल रस्त्यासकट अनेक रस्त्यांचे डांबरीकरण वाहून गेले आहे. खडी उचकटून आलेली आहे. रस्त्यांचे काम काही दिवसांपूर्वीच झाल्याचा मागमूसही शिल्लक राहिलेला नाही, अशी टीकाही गोटे यांनी केली आहे.