Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

आंतरराष्ट्रीय महादुर्बिणी प्रकल्प सहभागासाठी ‘आयुका’चा प्रस्ताव
पुणे, ६ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

 

आंतरराष्ट्रीय पातळीवरील तीन महाकाय दुर्बिणी (रेडिओ टेलिस्कोप) उभारण्याच्या प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यास ‘आयुका’सह भारतातील काही खगोल संशोधन संस्था उत्सुक असून, याबाबतचा प्रस्ताव काही महिन्यांमध्ये केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे. या दुर्बिणी उभारण्याचा खर्च प्रचंड असल्याने त्यापैकी दहा टक्के वाटा उचलून या प्रकल्पात भाग घेण्याची या संस्थांची इच्छा आहे.
पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी काऊन्सिल ऑफ अ‍ॅस्ट्रॉनॉमी अ‍ॅन्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) या संस्थेला वीस वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल या संस्थेचे माजी विद्यार्थी व संस्थेशी संबंधित असलेल्या व्यक्तींचे संमेलन ११ ते १४ ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे. यानिमित्त आयुकाच्या विविध प्रकल्पांची माहिती देताना प्रो. अजित केंभवी यांनी हे सांगितले. या वेळी आयुकाचे विद्यमान संचालक नरेंद्र दधिच, ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, प्रो. तरुण सौरदीप यांच्यासह अनेक वरिष्ठ शास्त्रज्ञ उपस्थित होते. केंभवी हे या महिन्याच्या अखेरीस दधिच यांच्याकडून आयुकाची सूत्रे स्वीकारणार आहेत. ल्ल
जगातील काही संस्था एकत्र येऊन खगोल संशोधनासाठी तीन महाकाय दुर्बिणी उभारणार आहेत. जायंट मॅगलॉन टेलिस्कोप, थर्टी मीटर टेलिस्कोप आणि युरोपीयन एक्सट्रीमली लार्ज टेलिस्कोप अशा या तीन दुर्बिणी आहेत. त्यांच्या उभारणीसाठी प्रामुख्याने युरोप व अमेरिकेतील संस्था एकत्र येत आहेत. त्या मुख्यत: दक्षिण गोलार्धातचिली किंवा हवाई बेटांवर उभारण्यात येतील. अशा दुर्बिणी उभारण्यासाठी प्रत्येकी साधारणत: एक अब्ज डॉलर्सइतका प्रचंड खर्च येत असल्याने त्या स्वतंत्रपणे उभारणे अवघड आहे. त्यासाठीच आंतरराष्ट्रीय पातळीवरील या दुर्बिणींच्या उभारणीत भागीदार होण्याची भारतातील खगोल संशोधन संस्थांची इच्छा आहे. त्यासाठी आयुकासह बंगलोर येथील रमण रीसर्च इन्स्टिटय़ूट, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स आणि नैनिताल येथील आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूटऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या चार भारतीय संस्था एकत्र आल्या आहेत. त्या येत्या काही महिन्यांमध्ये केंद्र सरकारला एकत्र प्रस्ताव सादर करणार आहेत. यापैकी कोणत्याही एका दुर्बिणीच्या उभारणीत या भारतीय संस्थांचा वाटा दहा टक्के इतका असेल, असेही केंभवी यांनी सांगितले.
आयुकाच्या वीस वर्षांच्या वाटचालीबद्दल केंभवी, दधिच, नारळीकर यांच्यासह सर्वच उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. मात्र, देशातील विद्यापीठांशी अधिक चांगल्याप्रकारे समन्वय साधता आला नाही, याची खंतही दधिच यांनी बोलून दाखवली. आयुकामध्ये तयार होणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपयोग विविध विद्यापीठांनी करून घेणे आवश्यक आहे. मात्र, त्याबाबतही फारसे काही होत नसल्याचे ते म्हणाले.

आयुकाच्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन
आयुकाचे माजी विद्यार्थी व या संस्थेशी संबंधित असलेल्या व्यक्तींचे संमेलन येत्या ११ ते १४ ऑगस्टच्या दरम्यान होणार असून, त्यासाठी जगाच्या विविध भागात कार्यरत असलेल्या या व्यक्ती जमा होणार आहेत. या काळात हे दिग्गज खगोलशास्त्रातील विविध आव्हाने व संबंधित विषयांवर चर्चा करणार आहेत.