Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

मुख्यमंत्र्यांनी हिसकावली ७५ हजार कुटुंबांची घरे
पिंपरी, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील तब्बल पंधरा हजार अनधिकृत व दहा हजारांवर वाढीव अशा एकूण पंचवीस हजार बांधकामांना आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडूनच अभय मिळाले आहे. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. दरम्यान, ताबा क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांबाबतच्या निर्णयामुळे सुमारे तीनशे हेक्टर जमिनीवर प्राधिकरणाला पाणी सोडावे लागणार आहे. म्हणजेच ७५ हजार गरीब व मध्यमवर्गीयांचा घराचा हक्क मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे डावलला गेला आहे.

आणखी पंधरा रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूची तपासणी केंद्रे सुरू
पुणे, ६ ऑगस्ट / विशेष प्रतिनिधी

स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांच्या तपासणीचा एकटय़ा नायडू रुग्णालयावर पडणारा ताण हलका करण्यासाठी पुण्यात महापालिकेच्या आणखी पंधरा रुग्णालयांमध्ये तपासणी केंद्रे आजपासून सुरू करण्यात आली. या केंद्रांमध्ये तपासणी झाल्यानंतर रुग्णाला नायडूमध्ये हलवायचे का नाही, हे ठरविण्यात येईल.

नायडू रुग्णालयातील स्थिती सुधारली
पुणे, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

‘आता उन्हात थांबू नका.. तुम्हाला रांगेतही उभे राहण्याची गरज नाही.. कारण तुम्ही रुग्णालयात आले की तुमचे प्रथम नाव नोंदवा.. आणि सावलीत जाऊन बसा.. तुमचा क्रमांक आला की नाव पुकारले जाईल.. नंतर तुम्ही तपासणी करून जाऊ शकता..!’
.. ही स्थिती कोणत्याही अद्ययावत खासगी रुग्णालयाच्या बाह्य़विभागाची नाही. ती चक्क महापालिकेच्या नायडू रुग्णालयाची असेल यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

स्वाइन फ्लू नव्हे, नवा इन्फ्लुएंझा
स्वाइन फ्लूविषयीसर्व काही..

स्वाईन फ्लूच्या आजाराबद्दल सध्या लोकांमध्ये कमालीचं भीतीचं वातावरण आहे. स्वाईन फ्लू झाला तर काहीतरी महाभयंकर होईल असं प्रत्येकाला वाटतंय. या विषयाची शास्त्रीय माहिती मिळाली तर ही भीती कमी व्हायला हातभार लागेल. इन्फ्लुएंझा (फ्लू)च्या विषाणूचे ए, बी आणि सी असे तीन प्रकार आहेत. बहुतांश साथी पसरतात त्या ए प्रकारच्या विषाणूमुळे!

‘मास्क संपले.. घाबरू नका’
चार दिवसांत ७५ हजार मास्कची विक्री
पुणे, ६ ऑगस्ट/खास प्रतिनिधी
‘स्वाईन फ्लू’पासून बचाव करण्यासाठी अमेरिकन बनावटीचा ‘एन ९५’ मास्क वापरावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत असल्याने शहरातील बहुतेक सर्व औषध विक्रेत्यांकडील सर्व प्रकारचे मास्क संपलेले आहेत. तथापि, मास्क उपलब्ध नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, स्वच्छ स्कार्फ वा रुमाल बांधूनही स्वाईन फ्लूपासून स्वत:चे संरक्षण करणे शक्य आहे, असा निर्वाळा शहरातील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

आरोग्य खात्यालाच हवी मनुष्यबळाची ‘लस’!
पुणे, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

राज्यातील साथीचे आजार नियंत्रणाचे काम करणाऱ्या पुण्यातील आरोग्य सेवा कार्यालयात केवळ दोनच अधिकारी असल्याने त्यांच्यावरच कामाचा ताण पडला असून ‘स्वाइन फ्लू’ ची साथ नियंत्रित करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांकरिता मनुष्यबळाच्या अभावाचा चांगलाच फटका बसू लागला आहे.

भरपूर पाणी प्या, चौरस आहार घ्या..
महाविद्यालयांत जनजागृती कार्यक्रम
पुणे, ६ ऑगस्ट / खास प्रतिनिधी
भरपूर पाणी प्या, चौरस आहार घ्या, विश्रांती घ्या आणि हात स्वच्छ ठेवा.. ‘स्वाइन फ्लू’ चा संसर्ग टाळण्यासाठी अशा पद्धतीची जागृती ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये करण्यात येत आहे. या साथरोगाची लागण ग्रामीण मुलांमध्ये झाली का याची माहिती घेण्यासाठी महाविद्यालयांतील वार्षिक आरोग्य तपासणी सुरू करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षण विभागाने दिले आहेत.

डेंग्यूचे खापर आता बांधकाम व्यावसायिकांवर
तब्बल १३० बिल्डर्सना बांधकाम थांबविण्याचे स्थायी समितीचे आदेश
पिंपरी, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आर्थिक लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर खापर फोडून झाल्यानंतर आता आरोग्यविषयक बाबींची खबरदारी न घेतल्याचा ठपका ठेवून तब्बल १३० बिल्डर्सना आपली बांधकामे थांबविण्याचे आदेश स्थायी समितीच्या बैठकीत आज देण्यात आले.

बारावी आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा
जर्मनीच्या राजधानीत- बार्सिलोनामध्ये येत्या १५ ते २३ ऑगस्ट दरम्यान बारावी आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत जगभरातून १९० देशांतील सुमारे १८०० अ‍ॅथलिट सहभागी होणार आहेत. अनेक विक्रमवीर खेळाडूंच्या सहभागामुळे ही स्पर्धा रोमांचक ठरेल, अशी आशा क्रीडाप्रेमी व्यक्त करीत आहेत.अ‍ॅथलेटिक्समध्ये ४०० मी. पर्यंतच्या धावण्याच्या स्पर्धामध्ये अमेरिका, ब्रिटन, जमैका सारख्या देशांचे, तर त्यापेक्षा अधिक अंतराच्या स्पर्धामध्ये इथिओपिया, केनियासारख्या आफ्रिकन देशांचे कायमच वर्चस्व राहिलेले आहे. बाराव्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धामध्येही तेच चित्र कायम राहण्याची शक्यता आहे. या स्पर्धेसाठी इथियोपियाने आपले मजबूत पथक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडाच्या पथकात ३१ जणांचा सहभाग आहे. ब्रिटनच्या ६० अ‍ॅथलिट्सच्या पथकात ४०० मी.मधील विश्वविजेता ख्रिस्तीन ओहूरोंगू याचा समावेश आहे. त्यामुळे ब्रिटिश अ‍ॅथलेटिक्स रसिकांना बर्लिनमध्ये त्याच्याकडून सुवर्णपदकाचीच अपेक्षा आहे.

नेमबाज प्रिया अगरवाल
जि द्द, चिकाटी आणि कष्ट करायची तयारी ही यशाची गुरुकिल्ली आहे. नवे शिकण्यासाठी धडपड असणाऱ्यांची जिद्द, त्यांच्यातील कलागुण स्वस्थ बसू देत नाहीत, याची साक्ष अनेक खेळाडूंचे यश पाहिल्यानंतर सहज पटते. नेमबाजीमधील खेळाडूंच्या नामावलीतील एक प्रिया आगरवाल आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांघिक आणि वैयक्तिक १७ कांस्य, रौप्य आणि सुवर्णपदकांची ती मानकरी ठरली आहे. राज्य, राष्ट्रीय, तसेच जागतिक पातळीवर पदके मिळवणाऱ्या पुण्यातील खेळाडू अनिसा सय्यद यांच्याबरोबर आता प्रिया आगरवालची घोडदौड सुरू आहे.

कॉलेज कॅम्पसवरही पसरला ‘स्वाइन फ्लू’
पुणे, ६ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

पुण्यातील शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये झालेली ‘स्वाइन फ्लू’ ची लागण आता ‘कॉलेज कॅम्पस’ वरही पसरली आहे! एमआयटी व्यवस्थापन संस्थेत (मिटसॉम) बीबीए अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षांत शिकणारा एक विद्यार्थी आज ‘पॉझिटिव्ह’ आढळला असून त्याला नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बाधित विद्यार्थ्यांचा वर्ग सोमवापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. ‘एमआयटी’ मधील काही विद्यार्थी व प्राध्यापकांना ‘स्वाइन फ्लू’ची लागण झाल्याची चर्चा ‘कॅम्पस’ वर दुपारपासून होती. परंतु, प्रत्यक्षात मात्र चाचणीमध्ये एकच विद्यार्थी ‘पॉझिटिव्ह’ निघाल्याचे स्पष्ट झाले. ‘मिटसॉम’चे संचालक ब्रिगेडियर आर. के. भाटिया यांनी या संदर्भात सांगितले, की ‘संबंधित विद्यार्थी पुण्याबाहेरील असून त्याच्या पालकांना कळवण्यात आले आहे. त्याच्या उपचारासंदर्भात संस्थेने सर्वतोपरीने कार्यवाही केली असून नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची मित्रमंडळी वा प्राध्यापकवर्गापैकी कुणालाही लागण झाल्याचे सिद्ध झालेले नाही. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांचा संपूर्ण वर्ग येत्या सोमवापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. संस्थेतील अन्य कुणाही व्यक्तीला लागण झालेली नाही. तरी, सर्वच अभ्यासक्रम व वर्गामध्ये सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे,’ असेही ब्रिगेडियर भाटिया यांनी स्पष्ट केले.

जीवनव्रत पुरस्काराचे आज वितरण
पुणे, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी
श्री चतु:श्रृंगी सेवा समितीतर्फे देण्यात येणारा ‘जीवनव्रत पुरस्कार’ ज्येष्ठ संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांना आठ ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
श्री चतु:श्रृंगी सेवा समितीचे अध्यक्ष देवदत्त अनगळ यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी समितीचे कार्यवाहक रमेश वैद्य उपस्थित होते. हा पुरस्कार वितरण समारंभ पुण्याचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उल्हास पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि पंचवीस हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप असल्याचे अनगळ यांनी सांगितले.

प्रभारी कुलगुरू जेव्हा बाईकवर स्वार होतात!
पुणे, ६ ऑगस्ट/खास प्रतिनिधी
पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘टॉर्क इंडिया’ या बाईकला इंग्लंडमधील जागतिक पातळीवरील बाईक रेसिंग स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला. या विद्यार्थ्यांच्या यशाला दाद देण्यासाठी प्रभारी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ आज या बाईकवर स्वार झाले!
या बाईकची निर्मिती करणाऱ्या कपिल शेळके, केतन म्हसवडे, कुणाल नानावटी या विद्यार्थ्यांनी आज प्रभारी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांची भेट घेऊन बाईकचे प्रात्यक्षिक दाखवले. लंडनमधील स्पर्धेत १७ देशांमधील विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादर करण्यात आले. या बाईकच्या निर्मितीसाठी चिंचवड येथील तिरूपती इंजिनिअर्सच्या चंद्रकांत शेळके व भोसरी येथील सन सव्‍‌र्हिसेसचे सहकार्य मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.

‘ध्वनिनियमांच्या उल्लंघनाचा गुन्हा गणेश मंडळांविरुद्ध नोंदवा’
पुणे ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

मागणी तसा पुरवठा यानुसार आम्ही ध्वनियंत्रणा पुरवत असल्याने गणेशोत्सव काळात ध्वनिनियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा ही यंत्रणा पुरविणाऱ्यांविरोधात न नोंदविता मागणीदारांवर म्हणजेच गणेश मंडळांविरुद्ध नोंदवावा, अशी मागणी साऊंड अँड इलेक्ट्रिकल्स, जनरेटर असोसिएशनने केली आहे. तसेच याबाबत न्याय न मिळाल्यास गणेशोत्सवात सेवा न पुरविण्याचा इशाराही दिला आहे.ध्वनियंत्रणा पुरविणाऱ्यांच्या संघटनेची बैठक नुकतीच झाली. याबाबत माहिती सांगताना संघटनेचे अध्यक्ष सचिन नाईक म्हणाले की आमच्या संघटनेचे सभासद ध्वनिप्रदूषण कायद्याचे व वेळेच्या नियमांचे पालन करून पोलीस खात्याला वर्षांनुवर्षे सहकार्य देत आलो आहोत. आम्ही व्यावसायिक तत्त्वांचे पालन करूनही तसेच शासकीय नोंदणी केलेली असूनही आम्हाला अनैतिक व्यवसाय केल्यासारखी वागणूक मिळते. पोलिसांचा ध्वनिपरवाना पाहिल्यानंतरच आम्ही ध्वनिव्यवस्था पुरवतो. ध्वनिव्यवस्था पुरविणारे व्यावसायिक रात्री दहाला ध्वनिवर्धक बंद करण्यास तयार आहेत, मात्र त्यासाठी पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावे आणि संरक्षणही द्यावे, अशी मागणीही आम्ही केल्याचे नाईक यांनी सांगितले. या सभेस उदय शहा, गौतम कांबळे, मेहबूब पठाण, संजय टोळगे, श्रीरंग आबनावे, वहिद खान, रमेश कांबळे, अमृत पुरंदरे आदी उपस्थित होते.

बँक कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रतिसाद
पुणे, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी
केंद्र सरकारतर्फे बँक कर्मचाऱ्यांच्या विरोधात राबविण्यात येणाऱ्या धोरणांचा निषेध करण्यासाठी नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्सतर्फे पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला पहिल्या दिवशी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. देशभरातील एकूण १० लाखांपेक्षा अधिक बँक कर्मचारी या संपात सहभागी झाले.सरकार आणि बँक व्यवस्थापनाने जबाबदारीने निर्णय घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात; अन्यथा बेमुदत संप पुकारण्यात येईल असा इशारा संघटनेचे दिनेश कुलकर्णी यांनी दिला आहे.

परिचारकांचा संप
पुणे, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी
केंद्रीय परिचारकांप्रमाणे राज्य शासकीय परिचारकांनाही विविध भत्ते आणि इतर सुविधा देण्यात याव्यात या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनतर्फे पुकारण्यात आलेला एक दिवसीय संप शंभर टक्के यशस्वी झाला. संघटनेच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि सार्वजनिक आरोग्य सेवेच्या प्रधान सचिव शर्वरी गोखले यांची भेट घेऊन परिचारकांच्या समस्यांविषयी चर्चा केली. या वेळी परिचारकांच्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडविल्या जातील असे आश्वासन प्रधान सचिवांनी संघटनेच्या प्रतिनिधींना दिले. त्यामुळे हा संप मागे घेण्यात येत असल्याचे संघटनेतर्फे कळविण्यात आले आहे.

ज्ञानेश्वर विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात
आळंदी, ६ ऑगस्ट/वार्ताहर

ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर, महर्षी वाल्मीकी विद्यावर्धिनी, अंध युनिट, ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन उत्साहात साजरा केला. रामायणाचार्य अशोक महाराज हुंबे, सचिव अजित वडगावकर, मुख्याध्यापिका हेमलता गांधी, कमल भोसले, राजाभाऊ नहार आदी याप्रसंगी उपस्थित होते. शालेय शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या मुला-मुलींनी भाऊ-बहिणींचे स्नेहप्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सोहळा या कार्यक्रमानिमित्ताने अनुभवला. अंध मुलींनी ध्यास फाऊंडेशनमध्ये शिकणाऱ्या मुलांना राख्या बांधल्या. या निमित्त राजाभाऊ नहार यांनी ‘भाऊराया’ गीताने उपस्थितांची दाद मिळवली. कमल भोसले यांनी आभार मानले.

बोरघाटात कंटेनर उलटल्याने तीन तास वाहतूक कोंडी
लोणावळा, ६ ऑगस्ट/वार्ताहर

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बोरघाटात कंटेनर उलटल्याने सुमारे तीन तास द्रुतगती महामार्गावर तर काही काळ राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.बोरघाट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे दिशेकडून मुंबईकडे जाणारा कंटनेर (एच आर ३८ एस ०६७४) हा आडोशी बोगडय़ाजवळील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने सकाळी साडेसहा वाजता उलटला होता. अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी कंटेनर रस्त्यावर पडल्याने मुंबईकडे जाणाऱ्या मार्गाची एक लेन बंद झाली होती. सकाळी ९ वाजता क्रेनच्या साहाय्याने हा कंटेनर बाजूला सारत वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यानच्या काळात सुमारे तीन तास द्रुतगती महामार्गावर धिम्या गतीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. तर अनेक वाहने वरसोली येथून जुन्या मार्गावर वळाल्याने राष्ट्रीय महामार्गावर लोणावळा परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

‘घंटागाडी कामगारांचे ठिय्या आंदोलन’
पिंपरी, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या आडमुठय़ा धोरणाच्या निषेधार्थ संतप्त घंटागाडी कामगारांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आज एक तास ठिय्या आंदोलन करून तीव्र निदर्शने केली. महापालिकेच्या आरोग्य खात्यातील घंटागाडी कामगारांना महापालिका सेवेत कायम करावे व कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे सवलती मिळाव्यात या प्रमुख मागण्यांसाठी एक ऑगस्ट पासून कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. प्रशासन अद्यापही दखल न घेत नसल्याने संतप्त कामगारांनी प्रवेशद्वारासमोर एक तास ठिय्या आंदोलन केले.दरम्यान, घंटागाडी कामगारांच्या आंदोलनाला शहरातील राजकीय पक्ष, विविध संघटना व कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. अ‍ॅड. बी. के. कांबळे, एस. टी. कांबळे (भारिप बहुजन महासंघ),महेश डोंगरे, तुषार काशिद (राष्ट्रवादी युवा कॉंग्रेस), आझम पानसरे व गणेश भोसले (एकता कर्मचारी संघटना), श्यामराव जोशी, विश्वास टाकाळ (झोपडपट्टी मजूर असोसिएशन), मानव कांबळे, मारुती भापकर (नागरी हक्क सुरक्षा समिती) भाऊसाहेब भोईर, संतोष बारणे (पिंपरी-चिंचवड कॉंग्रेस ), अनिल गायकवाड, दत्ता सूर्यवंशी (बहुजन समाज पार्टी) आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पाठिंबा देणाऱ्यांत समावेश आहे.

दगडूशेठ ट्रस्ट सजावट स्पर्धेचा आज पारितोषिक वितरण
पिंपरी, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून िपपरी-चिंचवड शहरातील मंडळांसाठी घेण्यात आलेल्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजता ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृहात होणार आहे. भोसरीतील श्रीराम मित्रमंडळास प्रथम, पिंपरीगावातील आझाद मित्रमंडळास द्वितीय, रहाटणीतील तिरंगा मित्रमंडळास तृतीय क्रमांकासह विविध मंडळांना बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. उद्या सायंकाळी तटकरे तसेच महापौर अपर्णा डोके यांच्या हस्ते आणि दगडूशेठ ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस समारंभ होणार आहे.