Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

राज्य

एचएएल कर्मचाऱ्यांच्या भत्त्यावर अनधिकृतपणे कोटय़वधींची खैरात
अनिकेत साठे , नाशिक, ६ ऑगस्ट

‘सुखोई एमकेआय - ३०’ या अत्याधुनिक लढाऊ विमानांची बांधणी करणाऱ्या येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) संचालक मंडळाची परवानगी न घेता सलग तीन वर्ष कामगारांना प्रोत्साहन भत्त्यापोटी तब्बल ५२ कोटीहून अधिक रकमेचे अनधिकृतपणे वाटप केले असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. महत्वाची बाब म्हणजे, वार्षिक लक्ष्य गाठण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केल्याचे कारण त्याकरिता पुढे केले असले तरी त्याद्वारे उत्पादनात कितपत वाढ झाली याबद्दल विश्वासार्ह माहिती एचएएलकडून महालेखाकारांना प्राप्त झाली नाही.

‘प’ पाटलाचा, पैशाचा, पोलिसांचा आणि प्रश्नांचाही!
घंटागाडी घोटाळ्याचे मूळ दुर्लक्षित
नाशिक, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी
येथील महापालिकेच्या घंटागाडी उपक्रमाचा वादग्रस्त ठेकेदार रामराव पाटील याने आपल्यावरील आरोपांसदर्भात थेट केंद्रीय अनुसूचीत जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष बुटासिंग यांच्या पुत्राला लाच स्वीकारताना पकडून दिल्याने देशभर उठलेली वावटळ जसजशी खाली बसत आहे, तसतशी प्रश्नचिन्हांची मालिका गडद होत आहे. कथित लाच प्रकरणाच्या गदारोळात मूळ मुद्दाच हरवत असून त्यामुळे एकप्रकारे रामराव पाटील याचे कारनामे आणि नाशिक पोलिसांची प्रस्तुत प्रकरणातील संशयास्पद भूमिका नजरेआड होत असल्याचे दिसते.

पवारांच्या भाकिताची परिणती; साखर भडकली!
अशोक तुपे ,श्रीरामपूर, ६ ऑगस्ट

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी साखरेचे भाव ३० रुपये किलोवर जाण्याचे भाकित केल्यानंतर साठेबाजांना उत्तेजन मिळाले असून, आज भावात विक्रमी वाढ झाली. त्यामुळे सामान्य ग्राहकांना साखर ३० ते ३२ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावी लागणार आहे. साखरेची भाववाढ थांबविण्यास केंद्र सरकारने वायदेबाजारावर बंदी घातली. आयातीला परवानगी दिली. त्यामुळे भावपातळी स्थिर झाली होती. आयात साखरेला परवानगी दिल्यानंतर भाव आणखी खाली उतरण्याची शक्यता होती.

औष्णिक ऊर्जानिर्मितीआधी सरकारने अपारंपरिक ऊजानिर्मितीच्या शक्यता तपासाव्या
जागतिक तापमान वाढीच्या समस्येविषयी मुंबईकरांच्या जनमत चाचणीचा निष्कर्ष
जयंत धुळप , अलिबाग, ६ ऑगस्ट

अलिबाग तालुक्यातील सात हजार शेतकऱ्यांची जमीन कोळशावर आधारित औष्णिक ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी सरकारकडून मागण्यात आली आहे. तेथे उत्पादित होणारी वीज मुंबईसारख्या शहरांसाठीच वापरली जाणार आहे. अशा परिस्थितीत संबंधित शेतकऱ्यांनी त्यांची जमीन प्रकल्पासाठी द्यावी की पर्यायी ऊर्जा स्त्रोत व अपारंपरिक ऊर्जानिर्मितीच्या शक्यता सर्वप्रथम पडताळल्या जाव्यात, या प्रश्नाबाबतच्या जनमत चाचणीत सर्वप्रथम स्वच्छ ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचे पर्याय तपासले पाहिजेत असे मत ७० टक्के मुंबईकरांनी व्यक्त केले आहे तर २३ टक्के तरुणाईच्या मते मात्र मुंबईची वीज अलिबागच्या खेडूतांपेक्षा जास्त महत्त्वाची आह़े

सिंधुदुर्ग जिल्ह्याला परप्रांतीयांचा वेढा!
अभिमन्यू लोंढे , सावंतवाडी, ६ ऑगस्ट

मसाल्याच्या पदार्थांसाठी इंग्रज किंवा अन्य धर्मीय परप्रांतीय आल्याचा इतिहासात दाखला मिळतो. मात्र त्याचीच पुनरावृत्ती आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडत असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. केरळी मंडळींनी कृषी क्षेत्रात याठिकाणी येऊन प्रगती केली. त्यांनी इस्टेट एजंटचे दुकानही उघडल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत दिसून येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण वर्ग मुंबईत परप्रांतीयांच्या विरोधात आवाज देणाऱ्या शिवसेनेसोबत राहिला.

‘कोकण पॅकेज’च्या वर्षांवाला ठाण्यातही बांध घालण्याची तयारी!
सोमवारी पुन्हा डीपीसीची बैठक
राजीव कुळकर्णी ,ठाणे, ६ ऑगस्ट
उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या आग्रहामुळे ओरोस येथे गेल्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होऊन कोकणासाठी ५०३२ कोटींचे पॅकेज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर केले तरी ठाणे जिल्ह्यास त्यातून किती निधी मिळणार, याविषयी संभ्रम असल्याने सदस्यांच्या आग्रहावरून येत्या सोमवारी पुन्हा जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तब्बल नऊ महिन्यांनंतर गेल्या महिन्यात जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली.

शासनाला प्रतिज्ञापत्र सादर
उपोषणाच्या निर्णयावर विवेक पंडित ठाम

ठाणे, ६ ऑगस्ट/ प्रतिनिधी
वसई-विरार महापालिका क्षेत्रातून ५३ गावे वगळण्याच्या मागणीसाठी श्रमजिवी संघटनेचे नेते विवेक पंडित हे क्रांतीदिनापासून बेमुदत उपोषण सुरू करणार असून, त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी शासनाला लेखी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्राविरुद्ध सरकारने कोणतीही कारवाई केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पाऊस कमी होताच संगमेश्वर तालुक्यात भारनियमनाला सुरुवात
संगमेश्वर, ६ ऑगस्ट/वार्ताहर
पावसाने गेला आठवडाभर विश्रांती घेताच महावितरणने तालुक्यात वीज भारनियमनाला सुरुवात केली असून, सध्या एक तास केले जाणारे भारनियमन गरजेनुसार पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.गेला आठवडाभर पावसाने विश्रांती घेताच महावितरणने पावसाळ्याच्या कालावधीत बंद असलेल्या भारनियमनाची ग्राहकांना आठवण करून दिली असून, शनिवारपासून संगमेश्वर तालुक्यात भारनियमन करण्यास महावितरण कडून सुरुवात करण्यात आली आहे. ग्राहकांना प्रथम तासभर खंडित झालेला वीज पुरवठा बिघाडामुळे खंडित झाला असे वाटत असताना पुन्हा रविवारी हाच प्रकार घडल्याने महावितरणकडे चौकशी केल्यानंतर भारनियमनाला सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या केवळ एक तास सुरू झालेले भारनियमन गरजेनुसार वाढत जाणार असून ते पूर्वीच्याच वेळापत्रकाप्रमाणे कार्यान्वित होणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. गणेशोत्सव केवळ १७ दिवसांवर आलेला असताना तालुक्यात भारनियमनाला सुरुवात झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वीजेचे भारनियमन हे केवळ संगमेश्वर तालुक्यातच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र सुरू झाल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्ग तीन तास ठप्प
इगतपुरी, ६ ऑगस्ट / वार्ताहर
तालुक्यात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर जिंदाल कंपनीसमोरील रेल्वे पुलावर आज दुपारी एलपीजीचा रिकामा टँकर व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढल्यानंतर सायंकाळी वाहतूक सुरळीत होऊ शकली. नाशिकहून मुंबईकडे निघालेला एलपीजी टँकर मुंडेगाव शिवारातील रेल्वे पुलावर आला असताना समोरून भरधाव आलेल्या कंटेनरने त्याला धडक दिली. अपघातात कंटेनरचा चालक जागीच ठार झाला. अवाढव्य आकारमानाचा कंटेनर व टँकरच्या अपघाताने या मार्गावरील वाहतूक पूर्णत ठप्प झाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. साधारणत तीन तासानंतर क्रेनच्या सहाय्याने वाहने रस्त्यावरून बाजूला काढण्यात आली. तोपर्यंत दोन्ही बाजुंना दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

पायलट ट्रेनिंग स्कूलमधील दोघांचा नदीत बुडून मृत्यू
गोंदिया, ६ ऑगस्ट / वार्ताहर

कामठा येथील बिरसी पायलट ट्रेनिंग स्कूलमधील दोन प्रशिक्षणार्थीचा रजेगावजवळ नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.
बिरसी पायलट ट्रेनिंग स्कूलमधील पाच प्रशिक्षणार्थी युवक महाराष्ट्र -मध्यप्रदेश सीमेवरील रजेगाव येथे नदीवर सहलीसाठी गेले होते. हे युवक गुरुवारी दुपारी कोरणी घाटावर पोहत असताना विनय गप्पूलाल सिंह (१९) रा. मुंबई व जयेंद्र सिंग (२३) रा. अरुणाचल प्रदेश हे दोघे नदीत बुडाले तर तिघे काढावर आल्याने बचावले.सोबतच्या तिघांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. गोंदियाचे ग्रामीण पोलीस निरीक्षक संतोष कुंभारे तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी नदीत बुडालेल्या दोन युवकांचा शोध घेतला पण, रात्री उशिरापर्यंत ते सापडले नाहीत. युवकाच्या शोधासाठी कोळ्यांना बोलावण्यात आले आहे. या घटनेने पायलट ट्रेनिंग स्कूलमध्ये शोककळा पसरली.

सहावा वेतन आयोग लागू करण्याची मत्स्य महाविद्यालय प्राध्यापकांची मागणी
खास प्रतिनिधी , रत्नागिरी, ६ ऑगस्ट

राज्यातील शासकीय कर्मचारी आणि पारंपरिक विद्यापीठातील प्राध्यापकांना लागू करण्यात आलेल्या सहाव्या वेतन आयोगाची कृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक व अधिकाऱ्यांसाठीही अंमलबजावणी करावी, अशी मागणी येथील मत्स्य महाविद्यालयाच्या प्राध्यापक व तांत्रिक अधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी सर्वानी काल (४ ऑगस्ट) काळ्या फिती लावून काम केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात मागणीचे निवेदन सादर केले. मत्स्य महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. हुकुमसिंग धाकड, सरचिटणीस डॉ. मिलिंद सावंत, डॉ. आशिष मोहिते, प्रा. भरत यादव इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.