Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

क्रीडा

पंधरा हजार धावांचे सचिनचे लक्ष्य
२०११ मध्ये होणारी विश्वचषक स्पर्धा भारताने जिंकावी- सचिन
नवी दिल्ली, ६ ऑगस्ट/ वृत्तसंस्था
कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम करूनही विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचे अजून समाधान झालेले नाही. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकांचा विक्रम केलेल्या सचिनचे ध्येय कसोटी सामन्यात १५ हजार धावा करण्याचे आहे. त्याचबरोबर २०११ मध्ये होणारी विश्वचषक स्पर्धा भारताने जिंकावी हे त्याचे दुसरे स्वप्न आहे. विस्डेन क्रिकेटर या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सचिनने आपली महत्त्वाकांक्षा बोलून दाखविली आहे. आतापर्यंतच्या कारकीर्दीवर मी समाधानी नाही, असे त्याने या मुलाखतीत बोलून दाखविले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या अस्तित्वाची अग्निपरीक्षा
इंग्लंडची फ्लिन्टॉफच्या फिटनेसवर आणि ऑस्ट्रेलियाची ब्रेट लीच्या पुनरागमनावर नजर
लीड्स, ६ ऑगस्ट/ पीटीआय
अ‍ॅशेस मालिकेतील फक्त दोन सामने बाकी असून ही मालिका जिंकण्यासाठी अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाची या चौथ्या सामन्यात अग्निपरिक्षा पाहायला मिळेल. उद्या येथे होणारा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यास त्यांना मालिका विजयाची संधी असेल. त्याचबरोबर हा सामना गमावल्यावर त्यांचे आयसीसी क्रमवारीतील सिंहासन रीकामे होऊ शकते. त्यामुळे त्यांना हा सामना जिंकणे अर्निवार्यच असेल. सरावादरम्यान अष्टपैलू अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफची दुखापत आणखी गंभीर झाली असून त्याच्या फिटनेसवर संपूर्ण इंग्लंडचे लक्ष असेल. गेली काही वर्षे इंग्लंडला येथे एकही सामना जिंकता आलेला नाही, त्यामुळे ऑस्ट्रेलिया हा विक्रम अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील असेल.

हम होंगें कामयाब- पॉन्टिंग
लीड्स, ६ ऑगस्ट/ पीटीआय

अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या सामन्याबाबत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंग सकारात्मक असून या सामन्यात संघ विजय मिळवेल अशी त्याला आशा आहे. गेले काही वर्ष येथील कामगिरी पाहता ऑस्ट्रेलियाला हे मैदान चांगलेच लकी ठरलेले आहे. त्याचबरोबर खेळपट्टी आणि हवामानावरही पॉन्टिंग खूष असून संघातील मायकेल क्लार्क आणि ब्रेट ली यांच्याकडून त्याला भरपूर अपेक्षा आहे. या मैदानाचा इतिहास पाहता येथे निर्णय लागतो. त्यामुळे पॉन्टिंगला येथे सामना जिंकण्याची अपेक्षा आहे.

ठावठिकाणा जाणून घेण्याच्या मुद्यावर भारतीय खेळाडूंचा आक्षेप
मुंबई, ६ जुलै / क्री. प्र.

‘वाडा’च्या उत्तेजक चाचणीला भारतीय क्रिकेट बोर्डाचा आक्षेप नसून खेळाडूंचा ठावठिकाणा जाणून घेण्याच्या मुद्दय़ालाच हरकत आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले. शेट्टी यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले, भारतीय संघातील असे दोन खेळाडू आहेत, की ज्यांचा ठावठिकाणा जाहीर होतो हे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळेच भारतीय बोर्डाने केवळ या मुद्दय़ालाच आक्षेप घेतला आहे.

आयसीसीच्या विशेष समितीत अनिल कुंबळे
दिल्ली, ६ ऑगस्ट / वृत्तसंस्था

क्रिकेटपटूंचा तीन महिन्यांतील ठावठिकाणा देण्याच्या ‘वाडा’च्या कलमांविषयी भारतीय क्रिकेट बोर्डाला वाटणारी चिंता दूर करण्यासाठी आयसीसीने एक समिती नियुक्त केली आहे. इंटरनॅशनल रजिस्टर्ड टेस्टींग पूल या नावाने स्थापन केलेल्या या समितीचे चेअरमन म्हणून आयसीसीच्या अ‍ॅण्टी डोपिंग पॅनलचे अध्यक्ष टीम केर यांची नियुक्ती करण्यात आली असून, या समितीत आयसीसीचे प्रमुख कार्यवाह हरून लॉर्गट, भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव एन. श्रीनिवासन, आयसीसीचे प्रमुख सल्लागार आय. एस. बिंद्रा आणि ‘वाडा’च्या अ‍ॅथलीट्स समितीवर असलेला भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांचा समावेश करण्यात आला आहे.

ब्राझील,अर्जेटिना उपान्त्य फेरीत
जागतिक कनिष्ठ व्हॉलिबॉल
पुणे ६ ऑगस्ट / प्रतिनिधी
गतविजेत्या ब्राझीलने अपराजित्व राखून जागतिक कनिष्ठ गट व्हॉलिबॉल स्पर्धेत आज उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. अर्जेटिना व क्युबा यांनीही उपांत्य फेरी निश्चित केली.शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील अव्वल साखळीच्या जी गटात प्रथम स्थानासाठी ब्राझील व क्युबा यांच्यात चुरस होती. या दोन्ही तुल्यबळ संघामधील सामना ब्राझीलने २५-२२, २५-१४, २५-२२ असा सरळ सेट्समध्ये जिंकला. त्याचे श्रेय सिल्वा मॉरिसिओ व रिनॉन बुईटी यांच्या अष्टपैलू खेळास द्यावे लागेल. ब्राझीलने साखळी गटातील तीनही सामने जिंकून अव्वल स्थानास साजेशी कामगिरी केली.

हॉकी: भारताची बेल्जियमवर ४-३ अशी मात
ब्रॅक्सगाटा,, ६ ऑगस्ट / वृत्तसंस्था

कर्णधार संदीप सिंग याने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने आज बेल्जियमचा दुसऱ्या कसोटीत ४-३ असा पराभव केला. या विजयामुळे भारताने तीन हॉकी कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.पहिल्या कसोटीत बेल्जियमने भारताला ६-३ असे पराभूत केले होते. आजच्या सामन्यात गोलरक्षक आद्रीयन डीसूझा, सरदार सिंग, राजपाल, गुरविंदर चंडी यांना खेळविले. पहिल्या सामन्यात आजारी असल्याने कर्णधार संदीप सिंग खेळू शकला नव्हता. आजच्या सामन्यात भारताच्या खेळाडूंनी प्रारंभीपासूनच आक्रमक धोरण स्वीकारले होते. दुसऱ्या मिनिटालाच भारताच्या खेळाडूंना गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र गुरविंदर चंडी याचा फटका बेल्जियमचा गोलरक्षक व्हिन्सेंट याने अडविला. चौथ्या मिनिटाला बेल्जियमला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर बेल्जियमच्या बून याने गोल करीत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. हरिप्रसाद याने आठव्या मिनिटालाच गोल करून भारताला बरोबरी साधून दिली.अकराव्या मिनिटाला बेल्जियमच्या खेळाडूंनी आणखी एक गोल करीत २-१ अशी आघाडी मिळवून दिली. अठराव्या मिनिटाला बेल्जियमच्या जेफ थिस याने गोल करीत आपल्या संघाची आघाडी ३-१ अशी वाढविली.या पिछाडीनंतरही भारतीय खेळाडूंनी बेल्जियमवर बाजी पलटविली. ३२ व ६४ व्या मिनिटाला कर्णधार संदीप सिंग याने तर ५५ व्या मिनिटाला राजपाल सिंग याने गोल करीत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

बुद्धिबळ: अर्जुन तिवारी विजेता
मुंबई, ६ ऑगस्ट / क्री. प्र.
मुंबई बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने रोहिणी खाडिलकर चेस ट्रस्टतर्फे बी. एच. ई. एल. पुरस्कृत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय फिडे रेटिंग निवड बुद्धिबळ स्पर्धेत ९ व्या फेरीअखेर औरंगाबादच्या अर्जुन तिवारीने काळ्या मोहऱ्यानिशी कोणताही धोका न पत्करता जळगावच्या अतुल उहालेबरोबर बरोबरी स्वीकारली व आठ गुणांसह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
मुंबईच्या सागर शहाने जळगावच्या हार्दिक मेहताला चिवट झुंज देऊन ७० चालीत मात केली. व साडेसात गुणांवर उपविजेतेपद संपादन केले. परभणीच्या अतुल उहालेला साडेसात गुणांवर प्रगत गुणांच्या आधारे तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.मुंबईच्या अमरदिप बारटक्केने त्याचा प्रतिस्पर्धी मेघन गुप्तेला निकराची झुंज देऊन ६० चालींत पराभूत केले व साडेसात गुणांसह चौथा क्रमांक पटकाविला. पहिले ४ खेळाडू महाराष्ट्रातर्फे कलकत्ता येथे होणाऱ्या नॅशनल ‘ब’ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. बक्षीस समारंभप्रसंगी विश्वस्त रोहिणी खाडिलकर , गो. रा. खेरनार, माजी महापालिका आयुक्त, संजय पोतनीस यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

बूचीबाबू स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर
साईराज बहुतुले आणि अमोल मुजुमदारलाला वगळले
मुंबई, ६ जुलै / क्री. प्र.
चेन्नई येथे येत्या १६ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या बूचीबाबू क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला असून, या घातून अनुभवी साईराज बहुतुले व अमोल मुझुमदार या माजी कर्णधारांना वगळण्यात आले आहे. पद्माकर शिवलकर यांच्या अध्यक्षतेखाली शिशिर हट्टंगडी या अन्य सदस्याच्या साथीने मुंबईचा संघ निवडण्यात आला. अब्दुल इस्माईल व अ‍ॅबी कुरुविला हे दोन सदस्य अनुपस्थित होते. निवड समितीला नव्या रक्ताला वाव द्यायचा होता. म्हणून ज्येष्ठ खेळाडूंना संधी मिळावी नाही, असे समन्वयक हेमंत वायंगणकर यांनी सांगितले. सुनील गावसकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या क्रिकेट विकास समितीची अद्यापि एकही बैठक न झाल्याने आधीच्याच निवड समितीला संघ निवडावा लागला. त्याबाबत संयुक्त सचिव हेमंत वायंगणकर यांनी सांगितले, गैरहजर राहिलेले सदस्य मुंबईबाहेर असल्यामुळे उपस्थित नव्हते. समन्वयक हेमंत वायंगणकर आणि प्रशिक्षक प्रवीण अमरे यांच्या उपस्थितीत निवडण्यात आलेला मुंबईचा संघ असा आहे. वासिम जाफर (कर्णधार), रोहित
शर्मा (उपकर्णधार), साहिल कुकरेजा, अभिषेक नायर, अजित आगरकर, प्रशांत नाईक, सुशांत मराठे, प्रफुल्ल वाघेला, ओंकार गुरव, रमेश पवार,मूर्तझा हुसेन, विक्रांत एलिगट्टी, इक्बाल अब्दुल्ला, उस्मान माळवी, राहिल शेख, रोहन राजे. संयुक्त सचिव हेमंत वायंगणकर यांनी मुंबईचा संघ आज जाहीर केला.

लोकसत्ताचे वरिष्ठ उपसंपादक मिलिंद ढमढेरे यांना पुरस्कार
पुणे, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी
महाराष्ट्रीय मंडळातर्फे उत्कृष्ट क्रीडा वाङ्मय निर्मिती करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा उत्तेजनार्थ क्रीडा पत्रकार पुरस्कार दै. लोकसत्ताचे वरिष्ठ उपसंपादक मिलिंद ढमढेरे यांना जाहीर झाला आहे. एक हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कै. कॅ. शिवरामपंत दामले पुरस्कार वितरणाच्या दिवशीच १६ ऑगस्टला या पुरस्काराचेही वितरण होणार आहे. ढमढेरे यांनी वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. वृत्तपत्र विद्या पदवी अभ्यासक्रमात ते राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सध्या ‘ऑलिंपिकमध्ये भारताची कामगिरी’ या विषयावर त्यांचे संशोधन सुरू आहे. ते १९८० पासून क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.

आज पासून मुंबईत प्रथमच रंगणार सार्क कॅरम स्पर्धा
मुंबई, ६ ऑगस्ट/ क्री. प्र.
महाराष्ट्र कॅरम संघटना आणि एम.आय.जी. क्लबच्यावतीने उद्यापासून मुंबईत प्रथमच सार्क कॅरम स्पर्धा रंगणार आहे. ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान ही स्पधा४ खेळविण्यात येणार असून या स्पर्धेत भारत, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव हे संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेचे हे तेरावे वर्ष असून यापूर्वी २००४ साली दिल्ली आणि २००७ साली नागपूरमध्ये ही स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेत पुरूष एकेरी, महिला एकेरी, पुरूष दुहेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी अशा विविध स्पर्धा रंगतील. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेमध्ये भारतानेच बाजी मारली होती. त्यावेळी भारताने सहा सुवर्ण, तीन रौप्य आणि एका कांस्य पदकांची कमाई केली होती. तर यावर्षी ही स्पर्धा भारतातच असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीला झहीर मुकण्याची शक्यता
नवी दिल्ली, ६ ऑगस्ट/ पीटीआय
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खानच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीला तो मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या खांद्यावर जोहान्सबर्ग येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएलच्या दुसऱ्या पर्वात मुंबई इंडियन्सकडून खेळताना एका सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याचा डावा खांदा दुखावला गेला होता. त्यानंतर इंग्लंडमध्ये खेळविण्यात आलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकालाही त्याला दुखापतीमुळे मुकावे लागले होते. दहा दिवसांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या खेळाडूंना फिटनेस चाचणी द्यायची असून तो पर्यंत झहीर पूर्णपणे फिट होईल असे वाटत नसल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. झहीरच्या खांद्यावर जोहान्सबर्गमध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला साधरणत: एका महिन्याची विश्रांती घ्यावी लागेल, असे सुत्रांनी सांगितले आहे.

आशियाई कॅरम स्पर्धेतून जपान, कोरियाची माघार
पुणे ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रसाराचा धसका घेत जपान, दक्षिण कोरिया व मलेशिया यांनी आशियाई कॅरम स्पर्धेतून माघार घेतली असल्याचे येथे सांगण्यात आले.