Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

ठाण्यातील नौपाडा विभागातील जिजाऊ उद्यानात भरणाऱ्या आचार्य अत्रे कट्टय़ावर बुधवारी संध्याकाळी जिज्ञासाच्या वतीने दरवर्षी संपादित केल्या जाणाऱ्या ‘शालेय जिज्ञासा’ या विशेषांकाचे प्रकाशन ‘लोकसत्ता’चे उपनिवासी संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. गेली १६ वर्षे जिज्ञासा संस्था शालेय विद्यार्थ्यांकडून या विशेषांकाचे प्रकाशन करवून घेते. यंदा ‘सहल’ या विषयावरील लेखांचा अंकात समावेश आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांची आवड निर्माण व्हावी, म्हणून गेले दोन दशके कार्यरत असणाऱ्या जिज्ञासा संस्थेच्या कार्याची दखल यंदा राष्ट्रीयस्तरावर घेण्यात आली. संस्थेस एक लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला. त्यानिमित्ताने कट्टय़ावर अरविंद जोशी यांनी जिज्ञासाचे सुरेंद्र दिघे आणि सुमिता दिघे यांची प्रकट मुलाखत घेतली.

५० होर्डिग्जबाजांविरोधात गुन्हे दाखल
ठाणे/प्रतिनिधी

विविध ठिकाणी होर्डिग्ज लावून शहर विद्रूप केल्याप्रकरणी पालिकेने आतापर्यंत ५० जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मात्र काही पोलीस ठाण्यात गुन्हेच दाखल करून घेतले जात नसल्याची तक्रार काही अधिकाऱ्यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून विधिमंडळात पोहोचण्यास उत्सुक असलेल्या शहरातील नेत्यांच्या वाढदिवसाचा सिलसिला सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे होर्डिग्जचे साम्राज्य पसरले आहे. उच्च न्यायालयाच्या बडग्यानंतर पालिकेने आता होर्डिग्जविरोधात मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत विविध राजकीय पक्षांशी संबंधित होर्डिग्ज लावणाऱ्या ५० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच येत्या दोन दिवसात आणखी किमान डझनभर गुन्हे दाखल होतील, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त बी. जी. पवार यांनी दिली. दरम्यान होर्डिग्जबाबत गुन्हे दाखल करून घेण्यात पोलीस टाळाटाळ करीत आहेत. अनेक पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही राजकीय दबावापोटी पोलीस गुन्हेच दाखल करून घेत नाहीत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

स्वाईन फ्ल्यूच्या मुकाबल्यासाठी पालिकेचा विशेष कक्ष
ठाणे/प्रतिनिधी

स्वाईन फ्ल्यूचा प्रश्नदुर्भाव होऊ नये यासाठी पालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांना काही त्रास जाणवला, तर त्यांनी त्वरित पालिकेच्या विशेष कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर स्मिता इंदुलकर आणि आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी आज केले.
२२ जुलैच्या दरम्यान अमेरिकेतील व्हर्जिनिया प्रश्नंतातून अंकिता डोसाझ आणि नीना डोसाझ पोखरण रोड नं. २ वरील सिद्धांचल येथे आपल्या नातेवाईकांकडे आल्या होत्या. मात्र रात्रीच त्यांना त्रास जाणवू लागल्याने पालिकेच्या आरोग्य पथकाने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले.

कार्यकारी अभियंता रणदिवे यांची अखेर बदली
कल्याण/प्रतिनिधी -
महावितरण कंपनीमधील कल्याण ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता हरी कथळू रणदिवे यांची प्रशासनाने रत्नागिरी येथे तडकाफडकी बदली केली आहे. महावितरणच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या तीन वर्षांपासून कार्यकारी अभियंता रणदिवे यांनी कल्याण ग्रामीण विभागाच्या कामकाजात आर्थिक गैरप्रकार, अनियमितता आणली होती. हा प्रकार मार्च महिन्यात उघडकीला आल्यानंतर ग्रामीण विभागाच्या कामकाजाची स्वतंत्र चौकशी करण्यात आली होती.

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंबरनाथमधील प्रशासकीय कार्यालय इमारतीचे उद्घाटन
बदलापूर वृत्त, बदलापूर/वार्ताहर

अंबरनाथ तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये एकत्र असलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पुढील आठवडय़ात उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याशिवाय बदलापूरच्या मांजर्ली येथील महिला बचत गट भवनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते १९ ऑगस्ट रोजी करण्यात येईल, अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली. तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालये एकत्र असावीत, या हेतूने पंचायत समिती कार्यालयाजवळ सुमारे सहा कोटी रुपये खर्चाची इमारत बांधण्यात आली आहे.

देखण्या बालभवनचे काम साडे तीन कोटीच्या निधीसाठी रखडणार
डोंबिवली/प्रतिनिधी

जून १९९७ पासून रखडलेले आणि १६ ऑक्टोबर २००७ पासून उभारण्यात येत असलेल्या रामनगरमधील बालभवनचे काम साडे तीन कोटी रुपयांच्या निधीअभावी रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. फक्त बालभवनचे ‘रखडलेले नाटय़गृह’ होऊ नये अशीही चर्चा शहरात सुरू झाली आहे. रामनगरमधील ९३२ चौरस मीटरच्या जागेत तीन माळ्याच्या जागेत देखणे बालभवन आकाराला येत आहे.

‘कोकण पॅकेज’च्या वर्षावाला ठाण्यातही बांध घालण्याची तयारी!
सोमवारी पुन्हा डीपीसीची बैठक
राजीव कुळकर्णी

उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या आग्रहामुळे ओरोस येथे गेल्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होऊन कोकणासाठी ५०३२ कोटींचे पॅकेज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर केले तरी ठाणे जिल्ह्यास त्यातून किती निधी मिळणार, याविषयी संभ्रम असल्याने सदस्यांच्या आग्रहावरून येत्या सोमवारी पुन्हा जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तब्बल नऊ महिन्यांनंतर गेल्या महिन्यात जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली.

डोंबिवलीत जगजीतसिंग!
ठाणे/प्रतिनिधी -
गेल्या जमान्यातील तरुण तुर्काच्या हळुवार भावनांची कागज की कश्ती ते आताच्या तरुणाईच्या प्रेमभावना समर्थपणे प्रकट करणाऱ्या सरफरोशमधील ‘होशवालों को खबर क्या’सारख्या अनेक सदाबहार गझलांनी शब्दप्रधान गायकीच्या प्रेमात असणाऱ्या रसिकांच्या अंतर्मनात कायम रुणझुणत राहणारे जगजीतसिंग प्रथमच डोंबिवलीत आपली मैफल जमविणार आहेत. ‘अभंग प्रतिष्ठान’च्या वतीने हा योग जुळून आणण्यात आला असून रविवार, १६ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता सावित्रीबाई फुले रंगमंदिरात जगजीतसिंग त्यांचा लाइव्ह परफॉर्मन्स सादर करणार आहेत.

बसचालकाच्या बेफिकिरीने प्रवासी झाला पंगू
कल्याण/प्रतिनिधी -
कल्याण एस. टी. आगारात मंगळवारी संध्याकाळी एका बेदरकार बसचालकाने एका प्रवाशाच्या अंगावर बस घालून त्याचे दोन्ही पाय निकामी केले. त्या प्रवाशाचे नाव समजू शकले नाही. या घटनेनंतर बसचालक पळून गेला. मंगळवारी संध्याकाळी कल्याण एस. टी. आगारात गर्दीच्या वेळी ही दुर्दैवी घटना घडली. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सॅटिस प्रकल्पाचे काम सुरू आहे, त्यामुळे आगाराची भिंत फोडून महालक्ष्मी हॉटेलच्या रस्त्यावरून बस आगारात येतात. आगारात प्रवेश करताना एका वृक्षाला मोठा चौथरा आहे. तेथे काल संध्याकाळी काही प्रवासी चौथऱ्यावर बसले होते. एका बसचालकाने वेगाने बस आगारात नेताना बस त्या चौथऱ्याला घासून गेली, त्यामुळे तेथे बसलेल्या एका प्रवाशाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. चालकाचे बसवर नियंत्रण न राहिल्याने हा प्रकार घडला. तात्काळ घटनास्थळी पोलीस आले. प्रवाशांची गर्दी वाढल्याने बसचालक मार खाण्याची वेळ आल्याने पळून गेला. पोलीस नियंत्रण कक्षात चौकशी केली असता, अशी कोणतीही तक्रार महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल नसल्याचे सांगण्यात आले.

‘सांस्कृतिक इतिहास’ ई-बुकवर
कल्याण/प्रतिनिधी -
ग्रंथालय शास्त्रात नवनवीन उपक्रम राबविण्यात आघाडीवर असलेल्या कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाने ‘कल्याणचा सांस्कृतिक इतिहास’ हा दुर्मिळ ग्रंथ ई-बुकवर उपलब्ध करून दिला आहे. या ई-बुकवर सुभेदारवाडा गणेशोत्सवाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रकाशित केलेली ‘स्मृतिगंध’ ही अभ्यासपूर्ण पुस्तिका वाचकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ई-बुक (सीडी) सेवेचे उद्घाटन ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे. यावेळी इतिहासतज्ज्ञ डॉ. दाऊद दळवी, महापौर रमेश जाधव, सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदारवाडय़ाचे संचालक वसंतराव फडके,ई-बुक सेवेसाठी धडपडणारे वाचनालयाचे सरचिटणीस प्रशांत मुल्हेरकर, अध्यक्ष अ. ना. भार्गवे उपस्थित राहणार आहेत.

वासरांना वाचविणाऱ्या ‘पॉज’च्या कार्यकर्त्यांना कल्याणला मारहाण
कल्याण/प्रतिनिधी -
बाजारपेठ विभागातील पालिकेच्या कत्तलखान्यात चालविलेल्या दोन वासरांची सुटका करताना ‘प्लॅन्ट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर’ सोसायटीच्या दोन महिला कार्यकर्त्यांंवर मंगळवारी रात्री येथील जमावाने हल्ला केला. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजारपेठ भागातील कत्तलखान्यात गायी, वासरे आणण्यात येणार असल्याची माहिती ‘पॉज’च्या कार्यकर्त्यांना काल संध्याकाळी मिळाली होती. त्यांच्या सहा कार्यकर्त्यांनी या भागात सापळा लावला होता. त्यावेळी कत्तलखान्याजवळ दोन वासरे बसलेली आढळून आली. एक खूप जर्जर झाले होते. कार्यकर्त्यांनी त्या दोन्ही वासरांना उचलण्याचा प्रयत्न करताच, तेथील जमावाने मानसी भणगे आणि परिणिता जोशी यांच्यावर हल्ला केला. यावेळी दोन पोलीस तेथे उभे होते. त्यांनी ही आमची हद्द नाही, त्यामुळे आम्ही काही कारवाई करू शकत नाही, असे कार्यकर्त्यांना सांगून बघ्याची भूमिका घेतली. जमाव संतप्त झाल्याने ‘पॉज’ संस्थेच्या केदार मराठे, प्रसाद फडके, सौरभ चौगुले यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. अज्ञात जमावाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नांदिवली नाल्यावरील पूल पालिका उभारणार
कल्याण/प्रतिनिधी -
डोंबिवलीतील नांदिवली नाला येथील स्वामी समर्थ मठाकडे जाणारा पूल मोडकळीस आला आहे. हा पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असल्याने या पुलाची नव्याने उभारणी करण्याची मागणी नगरसेविका प्रतिभा कदम यांनी महासभेत केली. यावेळी शहर अभियंता पी. के. उगले यांनी हा पूल ग्रामीण भागाच्या हद्दीत आहे. त्याच्याशी पालिकेचा कोणताही संबंध नाही, असे उत्तर दिले. त्यामुळे संतोष केणे, रवि पाटील, नितीन पाटील, सचिन पोटे हे नगरसेवक यावेळी अधिकाऱ्यावर खवळले. या पुलाचा सर्वाधिक वापर डोंबिवलीतील रहिवासी करतात. या भागात शाळा, मंदिरे आहेत. भाविक, विद्यार्थ्यांची या भागात वर्दळ असते. या भागात नागरी वस्ती वाढल्याने या पुलाचा वापर वाढला आहे, परंतु मोडकळीस आलेल्या पुलाकडे कोणीही लक्ष देत नाही, असे कदम यांनी सांगितले. महापौर रमेश जाधव यांनी या पुलाचे काम पालिकेनेच करावे, असे आदेश दिले.

बियर शॉपीसाठी सरपंचाच्या सहीचा गैरवापर!
शहापूर/वार्ताहर:
तालुक्यातील वासिंद परिसरातील अंबर्जे ग्रामपंचायत हद्दीत सुभाष बियर शॉपीच्या परवान्यासाठी ना हरकत दाखला सरपंचाच्या सहीचा गैरवापर करून ग्रामसेवकाने परस्पर दिला आहे. याप्रकरणी अंबर्जे ग्रामपंचायतीचे सरपंच कमल म्हसकर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. अंबर्जे गावात सुभाष बियर शॉपीच्या परवान्यासाठी कोणत्याही प्रकारची तोंडी वा लेखी स्वरूपात, तसेच ग्रामपंचायतीत मासिक सभा व ग्रामसभेत ना हरकत दाखल्याबाबत लेखी अर्ज आला नव्हता, मात्र ग्रामसेवक एम.एम. पाटील यांनी चर्चा न करता व सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना विश्वासात न घेता सरपंचाच्या सहीचा गैरवापर करून सुभाष बियर शॉपीला ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला दिला आहे, असे सरपंच कमल म्हसकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. अंबर्जे गावातील सुभाष बियर शॉपीमुळे १३ ते १५ वयोगटातील तरुण मुले, तसेच तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी गेल्याचे सरपंचांनी म्हटले आहे.

प्रवाशांचे प्रश्नण वाचविणाऱ्या तरुणास रेल्वेने नोकरी देण्याची मागणी
बदलापूर/वार्ताहर -
प्रसंगावधान राखून संभाव्य रेल्वे अपघात रोखून प्रवाशांचे प्रश्नण वाचविणाऱ्या अफझल बुबेरे याला रेल्वेने नोकरी द्यावी, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघातर्फे रेल्वे प्रशासनाकडे केल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी दिली.
वांगणी आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान मुसळधार पावसामुळे लोहमार्गाखाली खड्डा पडला होता. १५ जुलै रोजी ही घटना घडली होती. अफझल बुबेरे याच्या नजरेस हा प्रकार येताच क्षणाचाही विलंब न लावता अपघात टाळण्यासाठी धावपळ केली होती. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मूळचंद चौहान आणि महाप्रबंधक भारतभूषण मोदगत यांना दिलेल्या निवेदनात अफझल याला रेल्वेत नोकरी, तसेच राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

ग्रंथाभिसरणतर्फे अंबरनाथमध्ये रविवारी बालमेळावा
बदलापूर/वार्ताहर -
अंबरनाथच्या ग्रंथाभिसरण मंडळाच्या वतीने बालवाचकांसाठी बालमेळावा आयोजित करण्यात आला आहे. कानसई विभागातील संस्थेच्या कै. श्रीराम देशमुख सभागृहामध्ये रविवार, ९ ऑगस्ट रोजी ३ ते ६ या वेळेमध्ये होणाऱ्या बालमेळाव्यास सारेगम फेम रोहन मेढी बालकांसाठी खास पाऊस गाणी सादर करणार आहे. बालवाचकांशी सुसंवाद साधून त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे संस्थेचे अध्यक्ष नितीन फडणीस यांनी सांगितले. मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी इच्छुक बालकांनी ग्रंथाभिसरण या ठिकाणी नावनोंदणी करावी, असे आवाहन फडणीस यांनी केले आहे.

विद्यापीठ सांस्कृतिक कार्यक्रमांचा नवा झोन
ठाणे/ प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवासाठी यंदापासून आदिवासी ग्रामीण भागासाठी स्वतंत्र झोन स्थापन करण्यात आला आहे. या झोनमध्ये मोखाडा, जव्हार, वाडा, विक्रमगड, भिवंडी, शहापूर, शिवळे, खर्डी, टोकावडे, येथील महाविद्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून कुलगुरू डॉ. विजय खोले आणि विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक मृदुल निळे यांनी या झोनची निर्मिती केली आहे. या विभागाच्या स्पर्धा शिवळे महाविद्यालयात होणार असून जिल्हा समन्वयक म्हणून या महाविद्यालयाचे प्रश्न. सुनील गवरे यांची निवड झाली आहे. या झोनमधील महाविद्यालयांनी स्पर्धेसाठी आपल्या प्रवेशिका त्वरित पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.