Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

व्यक्तिवेध

‘जगमोहन दालमिया यांच्यात मला देवही दिसत नाही आणि दरोडेखोरही नाही, मुख्यमंत्र्यांना मात्र ते दैत्य का वाटावेत हे मला कळत नाही,’ असे खणखणीत शब्दांत मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांना सुनावणारे सुभाष चक्रवर्ती हे त्यांच्याच मंत्रिमंडळात क्रीडा, वाहतूक आणि युवक कल्याण खात्याचे मंत्री होते. अलीकडेच सुभाषदांचे निधन झाले तेव्हा या नेत्याची लोकप्रियता किती अफाट होती, हे दिसून आले. कोलकात्याच्या दहनभूमीपर्यंत दुतर्फा अक्षरश: लक्षावधी नागरिकांनी त्यांना ‘लाल सलाम’ करायला गर्दी केली होती. सुभाष चक्रवर्ती यांच्या निधनाने मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपला एक निर्भीड आणि स्पष्टवक्ता नेता गमावला आहे.

 

आपल्याच मुख्यमंत्र्यांना त्यांच्या तोंडावर, तुमचे चुकते आहे आणि आपल्याला ज्या गोष्टीत कळत नाही, त्यात नाक खुपसू नये, असे स्वच्छ शब्दांत सांगायचे धाडस सुभाषदांकडे होते. त्यांच्या निधनानंतर सर्व बंगाली वृत्तपत्रांनी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाविषयी असणारी अढी दूर करून हा लोकनेता गमावल्याचे म्हटले. सुभाषदांच्या अंगी मॅरॅदोना आणि मिथुन चक्रवर्ती यांची सांगड होती, असे म्हणायलाही त्यांनी कमी केले नाही. सुभाष चक्रवर्ती यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात ढाक्यामध्ये झाला. डमडम मोतीझील महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’चे ते काही काळ सरचिटणीस होते. ‘सिटू’ या कामगार संघटनेच्या पश्चिम बंगाल शाखेचे ते काही काळ उपाध्यक्षही होते. १९७७ मध्ये ते पूर्व बेलगाच्छिया मतदारसंघातून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे विधानसभेवर सर्वप्रथम निवडून गेले. १९८२ मध्ये ते क्रीडा, युवक कल्याण आणि दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री बनले. १९८७ मध्ये ते क्रीडा, युवक कल्याण आणि पर्यटन खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर प्रत्येक मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला, कधी पर्यटन तर कधी वाहतूक अशी खाती सांभाळताना त्यांच्याकडून क्रीडा खाते कधीही काढून घेतले गेले नाही. क्रीडा विषय आणि विशेषत: क्रिकेटबद्दल त्यांना आत्मीयता होती. संपूर्ण राजकीय जीवनात त्यांचे व्यक्तिमत्त्व वादग्रस्त म्हणून ओळखले गेले. एखादी गोष्ट पटली नाही, तर समोर कुणीही असो, ते त्याचा मुलाहिजा ठेवत नसत. बंगालपुत्र म्हणून सौरव गांगुलीने बंगाल क्रिकेट संघटनेच्या कामात अधिक लक्ष घालावे, असे मत बुद्धदेव भट्टाचार्य यांनी व्यक्त केले, तेव्हा त्यांचा रोख दालमियांच्या विरोधात आहे, हे लक्षात घेऊन त्यावर भाष्य करायलाही सुभाषदांनी कमी केले नाही. एकदा तर दालमियांनी आता थांबावे आणि क्रिकेटचा खेळखंडोबा थांबवावा, असेही बुद्धदेव म्हणाले तेव्हा सुभाषदांनी त्यांचा उपहास करायला कमी केले नाही. कोलकात्याचे पोलीस आयुक्त प्रसून मुखर्जी यांना बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाच्या लढतीत दालमियांच्या विरोधात उभे करण्यात आले, तेव्हा त्यांना विरोध करायला सुभाषदा पुढे आले. साठी उलटून गेल्यानंतरही सुभाषदा तरुणवर्गात अतिशय लोकप्रिय राहिले. क्रीडा आणि युवकविषयक कोणत्याही घडामोडींमध्ये त्यांना नेहमीच रस वाटत असे. कॉम्रेड सुभाष चक्रवर्ती यांनी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य शाखेच्या राजकीय मंडळावर आपला ठसा नेहमीच उमटवला होता. पक्षाच्या कामात आणि कष्टकरी जनतेच्या लढय़ात ते नेहमीच अग्रभागी राहिले. त्यांचे निधन ३ ऑगस्ट रोजी झाले, पण त्या आधी काही दिवसांपर्यंत ते क्रियाशील होते. पश्चिम बंगालमध्ये वाहतूकदारांचा बेमुदत संप व्हायची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी संबंधित सर्व संघटनांची बैठक २३ जुलै रोजी बोलावली होती. एका अर्थाने ती त्यांची शेवटची सरकारी चर्चा ठरली. सुभाष चक्रवर्तीच्या निधनाने राजकारणातली नि:स्पृहताच निघून गेली आहे.