Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

सागवान तस्करी रोखण्यासाठी गोदावरी बचाव मोहीम
५० हजारांचे लाकूड जप्त
चंद्रपूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

सिरोंचाच्या सीमावर्ती भागात गेल्या एक दशकापासून सुरू असलेली सागवान तस्करी रोखण्यासाठी दक्षिण चंद्रपूर वनवृत्ताने गोदावरी बचाव मोहीम सुरू केली असून गेल्या दोन दिवसात ५० लाख रुपये किमतीचे लाकूड जप्त करण्यात आले आहे. या मोहिमेत सामील झालेले कर्मचारी व तस्करांमध्ये रोज संघर्ष होत असून मंगळवारी रात्री कर्मचाऱ्यांना स्वरक्षणार्थ गोळीबारसुद्धा करावा लागला.

विरोधी पक्षात राहूनही मतदारसंघाचा विकास
धर्मेद्र पाटील

आमदार राजकुमार पटेल यांनी विरोधी पक्षात राहून गेल्या दहा वर्षात आंदोलनाच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे केली. प्रशासनाकडून आदिवासींवर होणारा अन्याय ते कधीही खपवून घेत नाहीत. त्यांनी आदिवासी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले. तेंदूपाने संकलन करणाऱ्या मजुरांचे बोनसचे धनादेश वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाचे कुलूप तोडून आदिवासींना वितरित केले. आमदार निधीतून त्यांनी जागोजागी हातपंप, बस थांबे निर्माण केले आणि आदिवासींना सुविधा उपलब्ध करून दिल्या.

अप्पर वर्धाचे पाणी जाणार पांढुर्णाला
लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्याने वाद उफाळण्याची शक्यता
अमरावती, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाचे पाणी मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे पोहोचवण्यासाठी सुमारे ८५ कोटी रुपयांच्या ‘जल आवर्धन’ योजनेला केंद्र सरकारच्या नागरी विकास मंत्रालयाने मंजुरी दिली असून महाराष्ट्र सरकारनेही या योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. एकीकडे अमरावती जिल्ह्य़ात सिंचनाचा अनुशेष असताना लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आल्याने मोठा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डॉ. मधुसूदन काणे: वैद्यकक्षेत्रातील ‘हिरा’
न.मा. जोशी

वैद्यकीय व्यवसाय हा पवित्र व्यवसाय असून परमेश्वराने या व्यवसायासाठी माझी निवड केली हे माझे परमभाग्य आहे, असे मानून आयुष्यभर नि:स्वार्थ भावनेने ‘चार आणे’ (अलीकडे दोन रुपये) शुल्क आकारून रुग्णसेवा करणारे यवतमाळचे डॉ. मधुसूदन काणे हे गरिबांचे ‘धन्वंतरी’ म्हणूनच ख्यात होते. वैद्यकीय व्यवसायात त्यांनी जी मूल्ये जोपासली ती आज दुर्मिळ आहेत. पैसे नाहीत म्हणून रोग्याला न तपासणाऱ्या व औषधोपचार न करणाऱ्या डॉक्टरांच्या जातकुळीचे ते नव्हते.

सोयाबीनवर उंटअळीचा प्रश्नदुर्भाव
मूर्तीजापूर, ६ ऑगस्ट / वार्ताहर

गेल्या काही वर्षातील खरीप पिकांचा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ केली. मात्र, सोयाबीन पिकावर उंट अळींनी आक्रमण करून पिकांची चाळणी करणे सुरू केले आहे. गेल्या तीन आठवडय़ापासून पावसानेही दडी मारल्यामुळे तूर, कपाशी, ज्वारी यासारख्या पिकांना विविध किडींपासून नुकसान पोचण्याची शक्यता वाढली आहे. या परिस्थितीत हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या लोकप्रतिनिधींना विधानसभा निवडणुकीचे ‘डोहाळे’ लागल्याने लक्ष देण्यास वेळ नाही.

अमरावती उड्डाण पुलावरून तरुण पडला!
अमरावती, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

शहरातील राजापेठ ते इर्विन चौक या उड्डाण पुलावर पहिला अपघात गुरुवारी घडला. राजापेठ येथून वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो श्याम चौकात वळणावर उड्डाण पुलावरून खाली पडला. या घटनेत तो गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लखन ताराचंद मिराणी (१९) रा. रामपुरी कॅम्प असे या जखमी तरुणाचे नाव आहे. उड्डाण पुलाचे उद्घाटन दोन महिन्यापूर्वी झाले. उड्डाण पुलावरून वेगात जाणाऱ्या वाहना चालकांच्या संदर्भात भीती व्यक्त केली जात होती. ती आज खरी ठरली. लखन मिरणी हा त्याच्या जावयाला सोडून देण्यासाठी राजापेठ चौकात गेला. तेथून इर्विन चौकाकडे तो निघाला. एम.एच. २७, ए.ई. ५०९३ क्रमांकाच्या मोटरसायकलने जात असताना श्याम चौकातील वळणावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि उड्डाण पुलाच्या कठडय़ाला दुचाकी धडकली. त्याचवेळी तो वेगाने खाली फेकला गेला. श्याम चौकात सध्या जोशी मार्केटच्या जागी व्यापारी संकुल उभारले जात आहे. सध्या त्याचे काम सुरू आहे. कामासाठी उभारण्यात आलेल्या टीनच्या शेडवर तो आधी पडला आणि नंतर फुटपाथवर कोसळला. या अपघातात त्याच्या मणक्याला आणि डोक्याला जबर इजा झाली आहे. परिसरातील लोकांनी त्याला लगेच जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला यादगिरे रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांना दंड
चंद्रपूर, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणे या गुन्हय़ासाठी अन्न व औषध प्रशासनाने जुलैअखेर ३१ हजार २०० रुपये दंड वसूल केला.जिल्हय़ात सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मोहीम राबवण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अ. ता. निखाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेंतर्गत आतापर्यंत ३१ हजार दोनशे रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ च्या कलम पाचच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीत ही माहिती निखाडे यांनी दिली. सिगारेट किंवा तंबाखूजन्य उत्पादने यांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहिरात करण्यास बंदी आहे. वरील कायद्यानुसार जिल्हय़ात कार्यवाही सुरू असल्याची माहिती निखाडे यांनी दिली. या बैठकीला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. टी.जी. धोटे, पर्यवेक्षक म.प्र. हाडे, अन्न निरीक्षक एम.एस. देशपांडे हजर होते.

भंडारा जिल्हा एनएसयुआय मेळावा
भंडारा, ६ ऑगस्ट / वार्ताहर

भंडारा जिल्हा एन.एस.यु.आय. चा मेळावा नुकताच येथे पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयचे अध्यक्ष मनोज कांबळे यांनी केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश रणदिवे होते.प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यु.आय. च्या सचिव वर्षा काकडे, अजितसिंग, नीलेश खोरगडे, आशीष शेंडे, निखिल भोई उपस्थित होते.या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे व प्रदेश सचिव वर्षा काकडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ तथा स्मृतिचिन्ह देऊन प्यारेलाल वाघमारे यांनी सत्कार केला. भंडारा जिल्हा एन.एस.यु.आय.चे अध्यक्ष महेश रणदिवे हे भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार एन.एस.यु.आय. तर्फे करण्यात आला.संघटनेत प्रश्नमाणिकपणे काम करणाऱ्यासच पुढे संधी मिळणार आहे, असे कांबळे यांनी स्पष्ट केले. संघटनेत काम करतेवेळी प्रश्नमाणिकपणे काम करून एन.एस.यु.आय.च्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थी, कार्यकर्ते तयार केले पाहिजे. ज्यांनी एनएसयुआय मध्ये काम केले आहे. जे संघटनेशी प्रश्नमाणिकपणे आहेत, अशाच कार्यकर्त्यांचापुढे विचार होणार असेही प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले.

जादूटोण्याच्या संशयावरून खून;आरोपी निर्दोष
भंडारा, ६ ऑगस्ट / वार्ताहर

लाखांदूर तालुक्यातील किरमटी येथील जयगोपाल गोदरू मेश्राम यांच्या जादूटोण्याच्या संशयावरून झालेल्या खुनातील दोन्ही आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. किरमटी येथील जयगोपाल गोदरू मेश्राम याची गावात अडीच एकर जमीन व घर होते. मात्र, १० वर्षापासून ते आपल्या कुटुंबासह नागपूर येथे राहण्यास गेले होते. दरवर्षी शेती ठेक्याने देण्यासाठी ते गावी येत होते. १७ जून २००७ रोजी जयगोपाल मेश्राम किरमटी येथे आले असता गावातील हनुमान मंदिराजवळ त्यांचा खून करण्यात आला. खुनानंतर मृतदेह १ किमी अंतरावरील नहराच्या पाळीपर्यंत फरफटत नेऊन फेकल्या गेला. या प्रकरणात लाखांदूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून किरमटी येथील जयराज प्रेमदास शेंडे व शिवशंकर देवीदास शेंडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. जयगोपाल सोबत वाद केला म्हणून त्यांनीच खून केला असावा, या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविल्याने अखेर निकाल लागेपर्यंत दोन वर्षे दोघांनाही कारागृहात काढावे लागले.जिल्हा व सत्र न्यायालय येथे या प्रकरणाची सुनावणी झाली. आरोपींच्या बाजूने अ‍ॅड. कांचन कोतवाल यांनी तर सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. सुषमा सिंग यांनी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

आर्वीत शेतकरी प्रशिक्षण शिबीर
आर्वी, ६ ऑगस्ट / वार्ताहर

येथील कृषी विभागातर्फे कापूस व सोयाबीन पिकाचे सर्वेक्षण व सनियंत्रणाबाबत शेतकरी प्रशिक्षण नुकतेच पार पडले. सहकार मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय कृषी अधिकारी नरेंद्र काळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आर्वी पंचायत समितीचे सभापती भास्कर गांडोळ होते.या कार्यक्रमात कपाशी व सोयाबीन पिकाच्या रासायनिक व जैविक खताबाबत तसेच सेंद्रिय खताबाबत कृषी अधिकारी अरुण रोंघे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पिकांवरील मित्र व शत्रू किडीची चित्रफित दाखवण्यात आली. डॉ. पेशकर यांनी कीड व रोगाच्या सर्वेक्षणाबाबत माहिती दिली. महेंद्र डोफे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे संचालन बिरे यांनी केले. कार्यक्रमास मोठय़ा संख्येत शेतकरी उपस्थित होते.

अंजनगावसुर्जी पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; एकास अटक
अंजनगावसुर्जी, ६ ऑगस्ट / वार्ताहर

अंजनगावसुर्जी पंचायत समितीच्या कार्यालयात धुमाकूळ घालून कार्यालयातील साहित्याची तोडफोड केल्याच्या आरोपावरून बहुजन समाज पक्षाच्या एका कार्यकर्त्यांस पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास बसप कार्यकर्ते कैलास रामचंद्र आठवले यांनी कार्यालयात येऊन संवर्ग विकास अधिकारी कुठे आहे, अशी विचारणा करून गोंधळ घातला. त्यांनी कार्यालयातील टेबलावरील काच व इतर साहित्याची तोडफोड केली, अशी तक्रार पंचायत समितीचे कक्षाधिकारी नरेंद्रसिंह परिहार यांनी पोलिसात केल्यावरून कैलास आठवलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून कर्मचाऱ्यांनी सायंकाळी काही वेळ काम बंद आंदोलन केले. कक्षाधिकारी परिहार यांनी दिलेल्या तक्रारीवरून कैलास आठवले यास पोलिसांनी अटक केली. परिहार यांच्याशी माझा कोणताही वाद झाला नसून पंचायत समिती लगत राहणाऱ्या भटक्या लोकांना पाणी देण्याची विनंती करण्यासाठी कार्यालयात गेलो होतो, असे आठवले यांनी सांगितले.

बल्लारपूर तहसीलमध्ये विविध उपक्रम
बल्लारपूर, ६ ऑगस्ट / वार्ताहर

येथील तहसील कार्यालयात महसूल दिनानिमित्त विविध उपक्रम पार पडले. अध्यक्षस्थानी तहसीलदार फुलसुंगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार व विधान परिषद सदस्य जैनुद्दीन जव्हेरी, नगराध्यक्ष डॉ. मधुकर बावने, मुख्याधिकारी रवींद्र देवतळे, पंचायत समिती सभापती राजू बुद्धलवार व भाजप राष्ट्रीय परिषदेचे सदस्य चंदनसिंह चंदेल आदी उपस्थित होते.आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या स्थानिक विकास निधीतून तहसील कार्यालयात उभारण्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षाचे उद्घाटन आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महसूल कार्यालयातील उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचारी यांना विशेष प्रमाणपत्रे देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या व आपत्ती निवारण कार्यास अधिक निधी देण्याची घोषणा केली. आमदार जैनुद्दीन जव्हेरी यांनी शहरातील अनेक जागांवर कित्येकांनी केलेली अतिक्रमणे रद्द करून अशा जमिनी सरकार जमा कराव्यात, असे आवाहन तहसीलदारांना केले. तहसीलदार फुलसुंगे यांनी बल्लारपूर तालुक्यातील विविध विषयांवरील आकडेवारीसह तपशील सादर केला. लोकहिताच्या अनेक शासकीय योजना राबवण्याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. याचप्रसंगी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

बल्लारपूर तहसीलवर भाजपच्या महिला आघाडीचा मोर्चा
बल्लारपूर, ६ ऑगस्ट / वार्ताहर

महागाईला आळा घालण्याकरिता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर करून केली. महागाई विरोधात महाराष्ट्र सरकारचा निषेध करीत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन सादर केले. निवेदनात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांना संकटाचा सामना कसा करावा लागत असल्याचे म्हटले आहे. जीवनावश्यक वस्तू, धान्य, भाज्या यांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याने जनता त्रस्त झाली आहे. विशेषत: या बोकाळलेल्या महागाईचा फटका गृहिणींना बसला असून कुटुंबांच्या उदरनिर्वाहाची घडी कशी बसवताना नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली महिला रस्त्यावर उतरल्या असून असंतोषाचा उद्रेक होऊन त्याचे पर्यवसान तीव्र आंदोलनात होऊ शकते, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. हिंदू-मुस्लिमांचे सणासुदीचे दिवस असताना जीवनावश्यक वस्तू तसेच धान्य, गहू, तांदूळ, डाळी, साखर, तेल, रवा, मैदा स्वस्त धान्य दुकानातून एपीएल व बीपीएल कार्डावर पुरेशा प्रमाणात देण्यात याव्या, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. महागाईची भीषण परिस्थिती बदलवण्याकरिता व महागाईला आळा घालण्याकरिता त्वरेने उपाययोजना करणे गरजेचे आहे. याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

मेळघाटातील शेतकऱ्यांची फसवणूक
धारणी, ६ ऑगस्ट / वार्ताहर

मेळघाटातील सुमारे ५० शेतकऱ्यांची एका व्यापारी कुटुंबाने १२ लाखाने फसवणूक केली असून शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. शहरातील व्यापाऱ्याने गडगा मालुर, तातरा, झिलागपाटी आदी खेडय़ातील आदिवासी शेतकऱ्यांकडून मार्च महिन्यात सोयाबीन, चना, गहू आणि तूर उसणवारीवर खरेदी केली होती. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यावरही शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालाचे १२ लाख रुपये दिले गेले नाही.
याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल खाजगी व्यापारी मेळघाटात खरेदी करतात. मात्र, आयकर बुडविण्यासाठी व्यापारी वर्ग हा सारा व्यवहार साध्या कागदावर करीत असतात. ज्या व्यापाऱ्याकडे शेतमाल खरेदीचे परवाने नाहीत, अशा व्यापाऱ्याचा परिसरात सुळसुळाट झाला असून गुन्हा नोंदविलेल्या व्यापाऱ्यांकडे धान्य खरेदीचा परवाना नाही. फसवणूक झालेले आदिवासी शेतकरी सहा महिन्यांपासून पैसे मागण्यासाठी व्यापाऱ्याचे ओटे झिजवत आहेत. धारणी शहरात कोटय़वधी रुपयांची अवैध धान्य खरेदीचा व्यवहार चालतो. त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांवर विश्वास ठेवून व्यापाऱ्यांशी व्यवहार करतात.
या फसवणुकीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. पोलिसांनी गुन्हे दाखल केले असले तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही. आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

बिलासपूर-पुणे रेल्वे गाडीला तुमसरला थांबा देण्याची मागणी
तुमसर, ६ ऑगस्ट / वार्ताहर

बिलासपूर-पुणे बिलासपूर या साप्ताहिक रेल्वे गाडीला तुमसर रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी प्रवासी संघटनेने प्रशासनाकडे केली आहे. अनेक वर्षाच्या कालावधीनंतर ‘आझाद हिंद’ या हावडा-पुणे-हावडा या गाडीला भंडारा येथे थांबा मिळाला. या गाडीमुळे भंडारा व परिसरातील जनतेची सोय झाली. त्याचवेळी ही गाडी तुमसरला पण थांबेल, असे सूतोवाच करण्यात आले होते. तुमसर येथे झालेल्या विदर्भ एक्सप्रेसच्या स्वागत समारंभात तुमसर येथे आणखी गाडय़ांना थांबा मिळेल, अशी मागणी करण्यात आली होती. त्यांची ही घोषणा अजूनपर्यंत पूर्णत्वास गेली नाही. तुमसर येथे गोंडवाना एक्सप्रेसचा थांबा मिळावा म्हणून नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांना साकडे घालण्यात आले. परंतु, त्यांनी सुद्धा त्यात लक्ष घातले नाही.
अलीकडे पुण्याला शिक्षण घेणाऱ्यांची व नोकरी करणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. विद्यार्थी, नोकरदार, प्रवासी संघटना व व्यापारी वर्गाची वाढती संख्या लक्षात घेता बिलासपूर-पुणे-बिलासपूर या साप्ताहिक गाडीला तुमसर येथे थांबा मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. काही राजकीय नेते या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. तेव्हा केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी तुमसर रोड येथे पुणे साप्ताहिक गाडीला व गोंडवाना एक्सप्रेसला थांबा देऊन जनतेची रास्त मागणी पूर्ण करावी, अशी मागणी आहे.

सेंट्रल बँकेच्या शेतकरी ‘गोल्ड कार्ड’ योजनेचा शुभारंभ
अचलपूर, ६ ऑगस्ट / वार्ताहर

येथील नगरपालिकेच्या सभागृहात सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्यावतीने ‘सेंट किसान गोल्ड कार्ड’ योजनेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.व्ही. मेश्राम होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी जी.एन. वाघूरवाघ, एम.एस. राजू उपस्थित होते. या कार्यक्रमात २५१ लाभार्थीचे १ कोटी ६ लाख रुपयांकरिता ‘गोल्ड कार्ड’ स्वीकृत करण्यात आले. याप्रसंगी आर.व्ही. मेश्राम म्हणाले की, सर सोराबजी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी बँक कटिबद्ध आहे. सेंट किसान ‘गोल्ड कार्ड’ ही अनोखी योजना आहे. या कार्डवर वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज आदी शेतकऱ्यांना मिळू शकते. अमरावती जिल्ह्य़ात इयत्ता १० वीला तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली ऋचा पाटसकर व ऋचा सावरकर या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. प्रश्नस्ताविक अचलपूर शाखेचे शाखा प्रबंधक किशोर देहरी यांनी केले. संचालन चारुदत्त चौधरी यांनी केले. आभार पानबुडे यांनी मानले. याप्रसंगी श्रीकांत धामगावकर, निशिकांत वासनिक, रामचंद्र देशमुख, अरुण बिडवाईक, भास्कर कनोजे, विजय उईके, रमेश कर्टजा, ओझा उपस्थित होते.

मध्यमेश्वर मंदिरात गणपती अथर्वशीर्ष वर्ग
वाशीम, ६ ऑगस्ट / वार्ताहर

येथील अमृतानंदमयी सत्संग समितीच्यावतीने रविवार, ९ ऑगस्ट संकष्टी चतुर्थीपासून दररोज सकाळी व सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत गणपती अथर्वशीर्ष वर्गाचे आयोजन मध्यमेश्वर मंदिरात करण्यात आले आहे. धावपळीच्या जीवनात सर्व नागरिक मानसिक समाधान व शांती हरवून बसले आहेत. अनेक अडचणींना तोंड देऊन नागरिक जीवन जगत आहेत. अशावेळी विघ्नहर्त्यां गणेशाचे सामूहिक अथर्वशीर्ष म्हणावे या दृष्टीने येथील अमृतानंदमयी सत्संग समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.वाशीम शहरातील महिला, पुरुष, युवक-युवती, विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष आमदार अ‍ॅड. विजय जाधव, केरळ येथील एकनाथ ब्रह्मचारी प्रश्न. दिलीप जोशी, सुरेश गाढेकर, रवी मारशेटवार, प्रश्न. दादाराव देशमुख, डॉ. अर्चना मेहरकर, उत्तम गायकवाड यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

प्रश्नध्यापकांचे ११ ऑगस्टला ‘जेलभरो’
यवतमाळ, ६ ऑगस्ट / वार्ताहर

प्रश्नध्यापकांना केंद्राप्रमाणे सहावा वेतन आयोग लागू करण्याचे लेखी आश्वासन सरकारने दिले नाही म्हणून ११ ऑगस्टला राज्यातील १२ विद्यापीठात ३५ ते ४० हजार प्रश्नध्यापक ‘जेलभरो’ करणार आहेत, अशा आशयाचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रश्नध्यापक महासंघाने (एमफुक्टो) गुरुवारी मुंबईत झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर केला आहे. प्रश्नध्यापकांच्या मागण्यांबाबत उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे आणि शिक्षण सचिव सहारिया यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे प्रश्नध्यापकात संताप आहे. ५ वेळा चर्चा करूनही सरकार लेखी आश्वासन द्यायला तयार नाही, याबद्दलही महासंघाने संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक चव्हाण व उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणात मध्यस्थी करावी, अशी विनंती करणारे पत्रही महासंघाने दोन्ही मंत्र्यांना पाठवले आहे. एमफुक्टोचे अध्यक्ष प्रश्न. सी.आर. सदाशिवन, सरचिटणीस एकनाथ कठाळे, नुटाचे अध्यक्ष प्रश्न. बी.टी. देशमुख, उपाध्यक्ष प्रश्न. एस.टी. सांगळे, सचिव डॉ. प्रवीण रघुवंशी आदी बैठकीला उपस्थित होते.

सेवाग्राममध्ये आढळला ‘इंडियन एग्जईटर’
वर्धा, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

दुर्मिळ समजला जाणारा ‘इंडियन एग्जईटर’ साप सेवाग्राम परिसरात आढळून आल्यानंतर त्यास सर्पमित्रांनी पकडून जंगलात सोडले. सेवाग्रामच्या उगले ले-आऊट परिसरात येथील सर्पमित्र संजय आत्राम यांना ‘अंडेखाऊ’ (इंडियन एग्जईटर) साप आढळला. ८० सेंमी लांब, तपकिरी त्वचेवर पिवळे पट्टे, उभे निमुळते शरीर, निमुळते डोके असलेला हा साप प्रश्नमुख्याने उंच ठिकाणावर आढळतो. विदर्भात काही भागात तो यापूर्वी आढळून आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सापाची किंमत तीन कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. त्याला डिवचले गेल्यास तो तोंड फाडून हल्ला करतो, अशी माहिती सर्पमित्र मंडळाचे अध्यक्ष सुरकार यांनी दिली. सर्पमित्रांनी पकडलेल्या या सापास नंतर वनविभागाच्या हवाली केले.