Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

विविध

पोलिसांच्या कारवाईत दूरदर्शीपणा आणि योग्य नेतृत्वाचा अभाव
प्रणव धल सामंता , नवी दिल्ली, ६ ऑगस्ट

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रसंगावधान राखून ज्या हालचाली केल्या त्याचे राम प्रधान समितीने कौतुक केले असल्याचे समजते. मात्र बिघडलेली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती रुळावर आणण्यासाठी पोलीस नेहमी ज्या पद्धतीने हालचाली करतात त्याचपद्धतीने दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठीही पोलीसांनी हालचाली केल्या अशी टीका या अहवालात करण्यात आली असल्याचे कळते.

मुंबई हल्ल्यातील १३ संशयितांवर इंटरपोलचा रेड अ‍ॅलर्ट..
लंडन, ६ ऑगस्ट/पी.टी.आय.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई शहरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हवे असलेल्या १३ संशयितांवर इंटरपोलने जगभर रेड अ‍ॅलर्ट नोटिसा बजावल्या आहेत. पाकिस्तानमध्ये या हल्ल्याविषयी सुरू करण्यात आलेल्या खटल्यासाठी हे १३ संशयित गुन्हेगार तेथील सरकारला हवे आहेत. त्यामुळे इस्लामाबादने याबाबत अधिकृत विनंती इंटरपोलला केल्यानंतर तशा रेड अ‍ॅलर्ट नोटिसा बजावण्यात आल्या.

नेपाळच्या भूमीवरून चीनवर आक्रमण करण्याचा भारत व अमेरिकेचा प्रयत्न होता
प्रचंड यांचा भारतविरोधी प्रचार
काठमांडू, ६ ऑगस्ट/वृत्तसंस्था
नेपाळच्या भूमीचा वापर करून चीनविरुद्ध कारावाया करीत राहण्याचा आणि शक्य झाल्यास थेट आक्रमण करण्याचा भारत आणि अमेरिका युतीचा प्रयत्न होता. मात्र आपण पंतप्रधान असताना या गोष्टीला कडाडून विरोध केल्यामुळेच आपल्याला पदावरून जावे लागले, असा दावा नेपाळचे माजी पंतप्रधान प्रचंड यांनी केला. नेपाळमधील माओवादी कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना त्यांनी ही भारतविरोधी गरळ ओतल्याचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे.

देशमुख, आदिक, मोहिते -पाटील यांनी घेतली मराठीतून शपथ
नवी दिल्ली, ६ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

राज्यसभा पोटनिवडणुकांमध्ये बिनविरोध निवडून आलेले केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस गोविंदराव आदिक तसेच राष्ट्रवादीचे तरुण नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह १० सदस्यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली.
देशमुख, मोहिते पाटील आणि आदिक यांनी मराठीतून शपथ घेतली.

पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्यदिनासाठी ‘सब ग्रीन कर दो’ मोहीम..
इस्लामाबाद, ६ ऑगस्ट/पी.टी.आय.
पाकिस्तानमध्ये येत्या १४ ऑगस्टला येणाऱ्या ६२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सब ग्रीन कर दो ही मोहीम उघडण्यात आली असून फेसबुक, ट्वीटर आणि सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या वेबसाइट्सवर झाडे लावण्याचा संदेशही देण्यात येत आहे. लाहोरमधील एक तरुण नागरिक फरहान मसूद याच्या डोक्यातून निघालेली ही कल्पना असून या हरित चळलळीद्वारे पाकिस्तानी नागरिकाने आपल्या देशाप्रती प्रेम सर्वांना दाखवून द्यावे, असे आवाहनही मसूद याने केले आहे. पाकिस्तानचा राष्ट्रीय रंगही हिरवा असून सर्वांनी १४ ऑगस्टला हिरवा पोशाख परिधान करून वेगळा संदेश जगापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेव्हा पाकिस्ताने २०/२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली त्यावेळी पाकमधील प्रत्येक क्रिकेट प्रेमी हिरवा झाला होता. आता तोच मूड १४ ऑगस्टसाठी बाळगण्यात यावा असे आवाहन पाकमधील इंटरनेटवरील मॅगेझिनचे संपादक आदिल नजम यांनी केले आहे. अर्थात ही चळवळ चांगली असली तरी त्याचे परिवर्तन उथळ राष्ट्रवादामध्ये होता कामा नये. तसेच त्यातून श्रेष्ठत्वाची भावनाही निर्माण होता कामा नये, असेही आवाहन नजम यांनी केले आहे.

मुशर्रफ यांच्यावर पाकिस्तान ठेवणार देशद्रोहाचा आरोप..
इस्लामाबाद, ६ ऑगस्ट/ पी.टी.आय.
पाकिस्तानचे माजी अध्यक्ष व लष्करी राजवटीतील सत्ताधारी परवेझ मुशर्रफ यांनी २००७ मध्ये आणीबाणी लावली व त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी घटनेचे उल्लंघन करून मोठा राजद्रोह केला. याबद्दल पाकिस्तान सरकार मुशर्रफ यांच्यावर खटला भरणार असल्याचे पाकिस्तानचे कायदेराज्यमंत्री अफजल सिंधू यांनी सांगितले. लवकरच संसदेत ठरवाही संमत केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे कृत्य करण्यास केवळ परवेझ मुशर्रफ हेच केवळ एकटे जबाबदार आहेत की अन्य कोणी त्यांचे सहकारीही जबाबदार आहेत तेही ठरविण्यात येईल, असे सांगून सिंधू यांनी त्यानुसार पाकिस्तान सरकार कृती करील व संसदेत तशा सूचना मांडल्या जातील, असे सांगितले. अशा प्रकारची प्रकरणे सत्र न्यायालयात इस्लामाबाद येथे चालविण्यात येतात. मुशर्रफ यांचा आणीबाणी लादण्याचा निर्णय हा घटनेचे उल्लंघन करणारा व बेकायदेशीर होता, असा निर्णय पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिला आहे. फक्त यात राजद्रोहाचा आरोप लावण्याची शक्यता आहे की नाही ते सांगण्यात आलेले नाही. सध्या परिस्थितीत केवळ फेडरल गव्हर्नमेंटच अशा प्रकारची प्रकरणे चालविण्याबाबत निर्णय घेऊ शकते.

बुटासिंग आणखी एका प्रकरणात अडकले जाण्याची शक्यता
पाटणा, ६ ऑगस्ट / पीटीआय

मुलाच्या लाचखोरीप्रकरणामुळे अडचणीत आलेले राष्ट्रीय अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे अध्यक्ष बुटासिंग हे आता एका नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये राष्ट्रपती राजवटीच्या काळात बागमती नदीवर बंधारा बांधण्यासाठीच्या ९०० कोटी रुपयांच्या प्रकल्पास त्यांनी मंजुरी दिली होती. बिहार सरकारने त्यांच्या या निर्णयाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जलसंसाधन मंत्री वीरेंद्र यादव यांनी सांगितले की, बागमती नदीवर पूरनियंत्रणासाठी बंधारा बांधण्याचे काम हिंदुस्थान स्टील वर्क्‍स कन्स्ट्रक्शन लिमिटेड या कंपनीला २००५ मध्ये देण्यात आले होते. हे काम देण्यात आले तेव्हा बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट होती आणि बुटासिंग हे राज्यपाल होते.