Leading International Marathi News Daily
शनिवार, ८ ऑगस्ट २००९
  महिलांच्या मुठीत मोबाइल!
  मोबाइल न वापरणाऱ्या काही मान्यवरांची ही भूमिका-
  मोबाइल एन्फोटेन्मेंट
  पण बोलणार आहे!
एकमेव.. अद्वितीय!
  व्हय़ू पॉइंट : वैर
  विज्ञानमयी
  मोबाइल वापरताना जरा जपून..
  कुठे गेले हे पदार्थ?
  स्वातंत्र्याचा लढा व भारतीय मुस्लिम महिला
  चिकन सूप... :
दुर्लक्षित थडगं
  'ति'चं मनोगत : कृतार्थ मी
  कवितेच्य़ा वाटेवर :
उशिराचा पाऊस
  ललित : मैत्र
  सक्षम मी : ‘सत्ताकारणासाठी आम्ही तय्यार आहोत!’
  ‘स्टार्स ऑफ एशिया’
  ललित - भिशी

 

मोबाइल न वापरणाऱ्या काही मान्यवरांची ही भूमिका-
डॉ. पी. आर. जोशी (अर्थतज्ज्ञ)
मोबाइलशिवाय आपलं काही अडतं, असं मला वाटत नाही. लँडलाइन फोन मी वापरतो. त्या फोनला आन्सरिंग मशीन जोडलेलं असल्यामुळे मी नसताना ज्यांचे फोन आले, त्यांना मी कामाच्या अग्रक्रमानुसार, सोयीने संपर्क साधू शकतो. मोबाइलमुळे २४ तास संपर्कात राहू शकण्याची जी शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे तुम्ही कधीही उपलब्ध होऊ शकता, हे जे गृहीत धरले जाते, ते चुकीचे आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात व्यत्यय येऊ शकतो असं मला वाटतं. गालब्रेथ नावाच्या अर्थतज्ज्ञाने ‘अ‍ॅफ्ल्युएन्ट सोसायटी’ या पुस्तकात म्हटलंय की, चंगळवादामध्ये ज्या गोष्टींची तितकीशी निकड नसते, त्याला बाजारपेठ निर्माण केली जाते. मोबाइलचे तऱ्हेतऱ्हेचे अत्याधुनिक हँडसेट्स पाहिले की हेच लक्षात येतं. जीवन धकाधकीचं झालंय, हे मान्य; पण ते इतकंही होणं योग्य नाही, की मोबाइलशिवाय जगताच येऊ नये. हा केवळ सवयीचा भाग असतो, हे लक्षात घ्यायला हवं.
प्रदीप कुलकर्णी (प्राचार्य, रुपारेल महाविद्यालय, माटुंगा)
घर आणि कॉलेज जवळ असल्यामुळे मला मोबाइलची फारशी आवश्यकता वाटत नाही आणि ज्यांच्याकडे मोबाइल असतो,

 

त्यांचा फोन आवश्यक असेल, तेव्हा लागतोच, असंही नाही. आपत्कालीन परिस्थिती उद्भवली की मोबाइल नेटवर्क जॅम होणं हेही नित्याचंच आहे. म्हणजे त्यावेळेसही मोबाइल उपयुक्त ठरतो असं नाही. आणि जर मी आऊटिंगला जात असेन तेव्हा मोबाइल सोबत असणं हे मला व्यत्यय आणणारं वाटतं. जे काही स्वतचे खासगी असा वेळ आहे, त्यावर मोबाइल कुरघोडी करतो, असं माझं मत आहे.
मोहन वाघ (निर्माते- चंद्रलेखा नाटय़संस्था)
मोबाइल ही आपली गरज आहे की प्रतिष्ठेचा सिम्बॉल, याचा विचार माणसानं करायला हवा. बरेच लोक हाती मोबाइल आहे म्हणून तासन् तास त्यावर अनावश्यक बडबड करत राहतात. अशी मंडळी मोबाइलची भलतीच अ‍ॅडिक्ट झालेली असतात. मोबाइलने अनेक गोष्टी सहज-सोप्या केल्यात, हे मान्य; परंतु त्याचबरोबर त्याच्या वापराचं तारतम्य नसलेल्यांच्या हाती ते एक खेळणं बनलेलं आहे, हेही आपण पाहतोच. मोबाइलच्या अतिरेकी वापरातून आरोग्यविषयक जे काही प्रश्न निर्माण होतील ते वेगळे, परंतु माणसांची आपल्या कामातील एकाग्रता मोबाइलपायी ढळते, हे आजचं वास्तव आहे. नाटकाच्या तालमीला येणारे कलावंत तालमीत तन-मनानं एकाग्र होण्याऐवजी सतत कानाला मोबाइल लावून, आपल्या कुठल्यातरी सीरियलचं वा चित्रपटाचं शूटिंग कधी होणार आहे, आपल्या व्यग्र दिनक्रमात ते कसं काय अ‍ॅडजस्ट करता येईल, वगैरे गोष्टी मोबाइलवरून ठरविण्यातच जास्त गुंतलेले दिसतात. याची मला जबरदस्त चीड आहे. त्यामुळे माझ्या नाटकांच्या तालमीच्या वेळी मी कलाकारांना मोबाइल वापरण्यास सक्त मनाई करतो.
दत्तात्रय पाडेकर (चित्रकार)
ज्यांना तुमच्याकडून काम करून घ्यायचं असतं, ते तुम्हाला कसंही करून गाठतातच, असा माझा अनुभव आहे. माझ्या घरी फोन असल्यानं माझ्याशी संपर्क साधणं कुणालाही अशक्य नसतं. पण सतत कानाला मोबाइल लावण्यानं कामं मिळतात, या गोष्टीवर माझा तरी अजिबातच विश्वास नाही. ज्यांना खरोखरीच तुमच्याकडून काम करून हवंय, ते या ना त्या प्रकारे तुमच्याशी संपर्क साधतातच. आणि तुमच्याशिवाय इतर कुणाहीकडून जर ते काम करून घेता येत असेल तर ते काम न मिळाल्याचं मला बिलकूल दु:ख होत नाही अथवा त्याची खंतही वाटत नाही! माणसानं मोबाइलच्या सर्वस्वी अधीन होणं मला मान्य नाही. मोबाइल नसल्यानं मला कामं मिळत नाहीत असं कधीच झालेलं नाही. उलट, तो नसल्यानं मी निवांतपणे माझ्या तब्येतीनं चांगलं आणि दर्जेदार काम करू शकतो असं मला वाटतं.
प्रदीप पालव (फॅशन डिझायनर)
मोबाइल न वापरल्यामुळे मी माझं स्वातंत्र्य अबाधित ठेवलंय. मी रोज सकाळी ठराविक वेळी अर्धा तास लँडलाइनवर उपलब्ध असतो. ज्यांना माझ्याशी बोलायचंय, ते त्या वेळात माझ्याशी संपर्क साधू शकतात. एरवी दिवसभर मात्र माझ्याशी संपर्क होणं ही त्यांच्यासाठी लॉटरी असते. मला वाटतं, कोणाशी, केव्हा, कोणाला बोलायला मिळेल, ही नशिबाची बाब असते. इट इज डेस्टिन्ड! म्हणजे बघा- एखाद्याशी बोलण्यासाठी त्याचा मोबाइल क्रमांक फिरवावा, तर ती व्यक्ती तेव्हा नेमकी अनरीचेबल असते. म्हणजे संवाद साधला जाण्याची शाश्वती नसतेच. कारण तेव्हा ती व्यक्ती आपल्या नशिबात नसते. ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ म्हणत या यंत्रज्ञानाने दुनियेला मुठीत घेतलं, पण हृदयं मात्र दुरावली. दोन प्रेमिक हातात हात घालून बसलेत, परंतु तो एका फोनवर आणि ती दुसऱ्या फोनवर आणखी तिसऱ्याच कुणाशीतरी बोलताना आढळतात.. असं चित्र अनेकदा दिसतं. मग यात दोन हृदयं जोडणारा संवाद उरलायच कुठे? आणि काय उपयोग अशा तांत्रिक संवादाचा? कधीही संपर्क साधण्याचं उपकरण हाती आलंय, पण आंतरिक संवादाचा मात्र पार खेळखंडोबा झालाय.