Leading International Marathi News Daily
शनिवार, ८ ऑगस्ट २००९
  महिलांच्या मुठीत मोबाइल!
  मोबाइल न वापरणाऱ्या काही मान्यवरांची ही भूमिका-
  मोबाइल एन्फोटेन्मेंट
  पण बोलणार आहे!
एकमेव.. अद्वितीय!
  व्हय़ू पॉइंट : वैर
  विज्ञानमयी
  मोबाइल वापरताना जरा जपून..
  कुठे गेले हे पदार्थ?
  स्वातंत्र्याचा लढा व भारतीय मुस्लिम महिला
  चिकन सूप... :
दुर्लक्षित थडगं
  'ति'चं मनोगत : कृतार्थ मी
  कवितेच्य़ा वाटेवर :
उशिराचा पाऊस
  ललित : मैत्र
  सक्षम मी : ‘सत्ताकारणासाठी आम्ही तय्यार आहोत!’
  ‘स्टार्स ऑफ एशिया’
  ललित - भिशी

 

मोबाइल एन्फोटेन्मेंट
खाद् दिवस मोबाइल घरी विसरला तर काय पंचाईत होते, हे ज्याचं त्यालाच ठाऊक. किती शांत शांत वाटतं तेव्हा, हेही तेव्हा कळतं. पण एकूणच त्या दिवशी अनेक कामांचा खोळंबा होतो नि आपण सतत काहीतरी मिस करीत राहतो.
मोबाइल एंटरटेन्मेन्टच्या या जमान्यात नव्या अत्याधुनिक सेवेच्या नवनव्या वावटळी येऊ घातल्यात. म्हणजे काय, तर एखादी टीव्ही सीरिअल, बँकेचे व्यवहार, बॉलिवूड ते हॉलिवूड एंटरटेन्मेन्ट, ट्रॅव्हल बुकिंग, राशीभविष्य अशा अनेक माहितींचा अ‍ॅक्सेस आता आपल्या मुठीत मावू शकणाऱ्या मोबाइलवरून मिळणं शक्य झाले आहे. तथापि या अव्वाच्या सव्वा वाढलेल्या मोबाइल वापराचे अनिष्ट पैलूही आता सामोरे येऊ लागले आहेत.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातर्फे अलीकडेच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की,

 

मोबाइलच्या अतिरिक्त वापराचे आरोग्यावर गंभीर परिणाम संभवतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही या सर्वेक्षणाची दखल घेत मोबाइलच्या वापरामुळे आरोग्यावर होणाऱ्या विपरित परिणामांचा सविस्तर अभ्यास करण्याचे निश्चित केले आहे. विद्यापीठाने मोबाइलसंदर्भात केलेल्या या चाचणी पाहणीत असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, मोबाइल फोनमधील किरणोत्सर्गामुळे जनुकांवर विपरित परिणाम होतो आणि शुक्राणूंची संख्याही घटते. त्यामुळे व्यक्तीची प्रजननक्षमता कमी होते. यादृष्टीने मोबाइलच्या वापरामुळे सजीवांवर होणारा ‘आरएफआर’ (रेशो फ्रिक्वेन्सी रेडिएशन)चा विशेष अभ्यास करण्यात येणार आहे. या विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ एन्व्हायरन्मेन्टल स्टडीज आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या न्यूरोलॉजी, बायोकेमिस्ट्री तसेच स्त्रीरोगशास्त्र या विभागांतर्फे एकत्रितपणे हे संशोधन हाती घेण्यात येणार आहे.
भारतात वापरात असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेलफोनच्या लहरी आणि त्यांची वारंवारता याचा अभ्यास करून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत का, याचा निर्वाळाही या अभ्यास चाचणीद्वारे देण्यात येणार आहे. निद्रानाश, नैराश्य तसेच मेंदूतील पेशींवर होणारा परिणाम, पुरुषांची प्रजननक्षमता तसेच महिलांमध्ये मासिक पाळीची अनियमितता आणि हार्मोनल बदल अशा आरोग्यविषयक बाबींवरही या अभ्यास पाहणीत भर देण्यात येणार आहे.
अलीकडेच चंदिगढमध्ये मोबाइलच्या वापरासंदर्भात तयार करण्यात आलेल्या ‘पीजीआय’ अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, दोन वर्षांहून अधिक काळ दिवसाला दोन तासांहून अधिक वेळ मोबाइल फोनवर बोलणाऱ्या ३० टक्के व्यक्तींना बहिरेपण, कान वाजल्यासारखे वाटणे असे विकार जडू शकतात. मोबाइलवर बोलताना ‘हँड्स फ्री’चा वापर केल्यामुळे संभवणाऱ्या आरोग्यविषयक तक्रारींना काही अंशी लगाम घालता येतो.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे हाती घेण्यात येणारी ही चाचणी चार हजार व्यक्तींवर करण्यात येणार असून, त्यात पाच वेगवेगळे गट करण्यात येणार आहेत. त्यात दिवसाला चार तासांहून अधिक वेळ बोलणारे, दिवसा दोन तासांहून अधिक वेळ बोलणारे आणि सेलफोन न वापरणारे असे प्रत्येकी एक हजार पुरुष, सेलफोनचा भरपूर वापर करणाऱ्या तसेच न वापरणाऱ्या वा कमी वापर करणाऱ्या प्रत्येकी पाचशे स्त्रिया अशांच्या सर्वेक्षणावर हा अभ्यास अहवाल बेतणार आहे. त्यासाठी काटेकोर प्रश्नावली तयार करण्यात आली आहे.
आज आपल्या दैनंदिन वापरात मोबाइलचा वापर कमालीचा वाढला आहे. मोबाइलच्या बाबतीत ‘कनेक्टिव्हिटी’ हा निकष केवळ संवाद साधण्याकरता होतो, असं नाही तर त्यापलीकडे मनोरंजन आणि माहितीचा खजिना तुमच्या मोबाइल हँडसेटवर उपलब्ध होणे आता सहजशक्य बनले आहे. यात उपलब्ध होणे शक्य असलेली माहिती डाऊनलोड करण्यासाठी पैसे मोजण्याआधी ग्राहकांना त्या गोष्टींचा प्रीव्ह्यू बघण्याची सुविधाही उपलब्ध असते.
वेगवेगळ्या पद्धतीच्या कनेक्टिव्हिटीजमुळे आज आपल्याला एसेमेसद्वारे मैदानावरच्या खेळांच्या घडामोडींचे अपडेट मिळू शकतात. एऑडिओ एंटरटेन्मेन्ट सेवेद्वारे आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धामध्ये सहभागी होता येते. प्रवासाच्या तिकिटाचं आरक्षण, लेटेस्ट म्युझिक व्हिडिओ क्लिप डाऊनलोड करणे, टीव्ही सीरिअल्सचे आधीचे भाग पाहणे हेही यामुळे शक्य होते. एका प्रकारे यामुळे ‘एन्फोटेन्मेन्ट’चे एक नवे द्वार खुले झाले आहे. सेवा पुरविणाऱ्या कंपनीने बँक, दूरचित्रवाणी वाहिन्या, पर्यटन संस्था, म्युझिक हाऊस अशा वेगवेगळ्या कंपन्यांशी केलेल्या करारानुसार या ठराविक सेवा उपलब्ध होतात. यात उपयुक्त दूरध्वनी क्रमांक, छायाचित्रण, कम्प्युटिंग, इंटिरिअरविषयीचे सल्ले आदी माहितीही उपलब्ध असते. त्याखेरीज रिंगटोन्स, वॉलपेपर्स, गेम्स डाऊनलोड करण्याआधी प्रीव्ह्यू बघता येतो. त्याचबरोबर ग्राहकांना ब्लॉग, चॅट, शॉपिंग सेवा आदींचाही लाभ घेता येतो.
रिमाइंडर, कॅल्क्युलेटर, अलार्म यासारख्या हँडसेटमधल्या सुविधा किती उपयुक्त असतात, हे धकाधकीच्या आयुष्यात घडय़ाळाच्या काटय़ावर आयुष्य जगणाऱ्यांनाच ठाऊक! गाणी, गेम्स, फोटो आदी अधिकतम सुविधा युवावर्गाला भुरळ पाडत असतात. अत्याधुनिक हँडसेट मॉडेल खरेदी करण्यामागचा जनरेशनेक्स्टचा कल यासाठीच तर असतो!
मोबाइलची दैनंदिन जीवनातील वाढलेली व्याप्ती लक्षात घेता हंगामा या मोबाइल कंटेन्ट प्रोव्हायडरने खास मोबाइलचा पडदा डोळ्यांपुढे ठेवून १०-१५ मिनिटांच्या लहान फिल्म्स तयार केल्या होत्या. स्वतचा मोबाइल असणे हे ‘स्टेटस सिम्बॉल’ मानण्याचे दिवस आज राहिलेले नाहीत. पण तुमचा मोबाइल हटके कसा दिसेल, याची काळजी घेत मोबाइल नटवण्या-सजवण्याकडे अनेकजण जातीने लक्ष पुरवताना दिसतात. त्यातूनच आकर्षक मोबाइल ज्वेलरी, कव्हर्स बाजारात दिसू लागली आहेत.
आज अद्ययावत सोयीसुविधा नि बजेट लक्षात घेत हँडसेट आणि सव्‍‌र्हिस प्रोव्हायडर निवडला म्हणजे फोन-खरेदी पूर्ण होत नाही. त्या फोनला नटवण्यासाठी वेगळी खरेदी केली जाते. लेदर, रबर, प्लास्टिक, कापड वगैरेची मोबाइल कव्हर्स आणि ते अडकवण्यासाठीचे गळ्यातले पट्टे यांतही वैविध्य आढळून येतं. वेगवेगळ्या हस्तकला प्रदर्शनांमध्येही कलात्मक मोबाइल कव्हर्स विक्रीसाठी उपलब्ध असतात. कारमध्ये मोबाइल ठेवण्यासाठी स्वतंत्र स्टॅण्ड खरेदी केला जातो. आरामखुर्ची, बैलगाडी, सॅण्डल अशा वेगवेगळ्या आकारांत हे स्टॅण्ड्स उपलब्ध असतात. मोबाइल फोन्सच्या पॅनल्सनाही विशेष मागणी असते. मोबाइल सजवण्यासाठी त्याला रेशमाच्या लडी, रेडियमचे चमकदार स्टिकर्स, मोत्या-खडय़ांचे देखणे दागिने जडवले जातात. मोबाइलला क्रिस्टल किंवा खऱ्याखुऱ्या हिऱ्यांचे दागिने जडवणाराही वर्ग आहे.
अशा तऱ्हेने मोबाइलला एखाद्या दागिन्यापेक्षाही आलेले अधिकचे मोल लक्षात घेत असतानाच त्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य घातक परिणामांचीही चर्चा सुरू झाली आहे. मोबाइलचा अनिर्बंध वापर त्यामुळे आटोक्यात आणण्याचा विचार सुजाण ग्राहक करू लागेल, हेही नसे थोडके.
सुचिता देशपांडे
suchitaadeshpande@gmail.com