Leading International Marathi News Daily
शनिवार, ८ ऑगस्ट २००९
  महिलांच्या मुठीत मोबाइल!
  मोबाइल न वापरणाऱ्या काही मान्यवरांची ही भूमिका-
  मोबाइल एन्फोटेन्मेंट
  पण बोलणार आहे!
एकमेव.. अद्वितीय!
  व्हय़ू पॉइंट : वैर
  विज्ञानमयी
  मोबाइल वापरताना जरा जपून..
  कुठे गेले हे पदार्थ?
  स्वातंत्र्याचा लढा व भारतीय मुस्लिम महिला
  चिकन सूप... :
दुर्लक्षित थडगं
  'ति'चं मनोगत : कृतार्थ मी
  कवितेच्य़ा वाटेवर :
उशिराचा पाऊस
  ललित : मैत्र
  सक्षम मी : ‘सत्ताकारणासाठी आम्ही तय्यार आहोत!’
  ‘स्टार्स ऑफ एशिया’
  ललित - भिशी

 

पण बोलणार आहे! : एकमेव.. अद्वितीय!
‘‘आजी, माझी ऑफिसला जायची वेळ झाली गं.. सोनाचे कपडे पलंगावर ठेवले आहेत.. डबा भरून ठेवलाय.’’
‘‘जा तू. मी बघेन तिच्याकडे..’’
‘‘नुसतं बघू नकोस. तिला जाण्यापूर्वी तो पौष्टिक लाडू खायला लाव. गोड खायला नको असतं कार्टीला.’’
‘‘सांगते.’’
‘‘नुसते कार्बस खात बसते नाहीतर. सगळी प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स जातच नाहीत पोटात. संध्याकाळी तिचा गाण्याचा क्लास आहे. तिथे वेळेवर जा म्हणावं, नाहीतर टाळाटाळ करते ती. ’’
‘‘बघते.’’
‘‘आणि हो. परीक्षेच्या पेपरमध्ये दोन मार्कस् कुठे कट झाले ते विचारणार होती ती तिच्या टीचरना. आज तीन दिवस तिच्या

 

कानीकपाळी ओरडत्येय, पण ती पट्ठी काही दाद लागू देत नाही. उद्या रँक गेली, क्लास बदलला की हीच कटकटी करणार.’’
‘‘विसरली असेल.’’
‘‘मुद्दय़ाच्या गोष्टी बऱ्या विसरतात! टी.व्ही.वरची आवडती सीरियल एक दिवसही मिस होत नाही ती..’’
‘‘लहान आहे. असं व्हायचंच.’’
‘‘लहान कसली तुझ्या भाषेत नववं सरून दहावं लागलंय. आता याच्यापुढे तर खरी जबाबदारीची र्वष येणार तिची. आधी दहावी, मग बारावी, मग करियरचे चॅलेंजेस..’’
‘‘सगळ्यांवरच येतात हे टप्पे. सगळे आपापल्या कुवतीने पार करतात.’’
‘‘मला इतरांचं माहीत नाही. माझ्या मुलीनं सगळं हायेस्ट लेव्हलवर, सर्वोत्तम पातळीवर पूर्ण करायला पाहिजे. तिच्या प्रगतीशिवाय दुसरं आहेच काय माझ्यासमोर? एकुलती एक पोरगी माझी..
नातीनं थोडय़ा दिवसांसाठी पाहुण्या आलेल्या आजीला म्हटलं. त्याच्या आगेमागे आपल्या कन्येसाठी डझनभर सूचना- निरोप, सल्ले इ. द्यायला ती विसरली नाही. नंतर ऑफिसमध्ये गेल्यानंतरही मध्ये मोबाईलवरून संपर्क होताच. सारखी मुलीची काळजी करणं, व्यवस्था लावणं, लावलेल्या व्यवस्थेत कुठे काही कमी पडत नाही ना, हे तपासणं याचा सपाटा होता. सोबत पुढच्या कित्येक महिन्यांचं नियोजनही! अमुक काळात मुलीची अमुक परीक्षा आहे, त्यावेळी मी घरूनच काम करेन, अमुक वेळी कंपनीचा नवा प्रोजेक्ट लाँच होतोय, पण अगदी सुरुवातीला मला त्यात भाग घेता येणार नाही. कारण मुलीला फलाण्या कॅम्पला सोडायला जायचंय, तिथून आले की मात्र.. एक दाढ कधीची दुखत्येय. मुलीच्या वार्षिक सुट्टीत दंतवैद्याकडून सगळ्या दातांची मरम्मत करावी का? पण सुट्टीमध्ये तर मुलीवर जास्तच वेळ खर्च होतो. इथे पोचवा. तिथून आणा. किती तंत्रं!
आजी नातीची सगळी धडपड जवळून बघत होती. तिचं असंख्य आघाडय़ा सांभाळणं, त्यामुळे ‘दमले.. दमले..’ असं म्हणणं आणि मुख्यत्वे वेगवेगळ्या प्रकारे सतत मुलींमध्ये अडकून राहणं. आजीला पाच मुलं झाली होती. त्यातलं एक लहानपणीच दगावलं. पण बाकी चौघं आजीनं वाढवली. एका वेळी चार वाढीच्या मुलांकडे बघणं हे लहानसहान काम नव्हतं. नसतं. तरीही आजीची नातीएवढी फरफट चाललेली नव्हती असंच काहीसं तिला वाटत होतं. आजी नोकरी करत नव्हती हे याचं एक ठळक कारण. पण नातीपेक्षा फार जास्त घरकाम तरी ती करत होतीच. घरात एवढी यंत्रं नव्हती. कोपऱ्याकोपऱ्यावर आयते पदार्थ मिळत नव्हते. पाव-बिस्किटं आताएवढी बोकाळली नव्हती. देवधर्म- आला- गेला, वर्षांच्या साठवणीची कामं याच्यात बायकांचा भरपूर वेळ जात होता. त्यात दर दोन वर्षांआड बाळंतपण.. शारीरिक तक्रारी.. तरीही बायका आरामात होत्या. स्वत:चे कला-छंद- मित्र यांच्याकडे मनात आल्यावर वळू शकत होत्या. इकडे नातीला कधीच कोणताच विसावा नव्हता. हे कसं? कशामुळे?
रात्री उशिरापर्यंत नातीचा पोरीशी होमवर्कवरून सुसंवाद सुरू होता. त्यातली चिडचिड, रागवारागवी वगैरे सारं संपवून आणि पोरीला निजायला पाठवून नात आजीजवळ येऊन बसली, तेव्हा आजीला तिची दया आली. मायेनं तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली,
‘‘आल्यापासून बघत्येय, किती बडबड करतेस गं तू.. दिवसभरात क्षणभरही चैन नसते तुझ्या जिवाला. सारखा त्या कार्टीचा धोशा लावलेला असतो..’’
‘‘करावंच लागतं आजी.’’
‘‘कोणाला लागतं? तिला की तुला?’’
‘‘तिला कशाचीही फिकीर पडलेली नसते. बहुतेक कल्पना माझ्याच असतात. आणि त्या राबवण्याची धडपडही मलाच करावी लागते. नकोसं होतं कधीकधी. पुन्हा वाटतं, आपण नाही केलं तर कोण करेल तिचं? पुढे तिला असं वाटू नये की आपल्याला संधीच दिली नाही म्हणून.’’
‘‘म्हणून तू जिवाचं रान करतेस.’’
‘‘तसं म्हण.’’
‘‘नुसता म्हणण्याचा मुद्दा नाहीये. विचार करण्याचा आहे. खूप र्वष मी आपली समजून चालत होते की वारंवार आणि बरीच मुलं झाली म्हणून आम्ही आमच्या पिढीतल्या बायका अडकत गेलो. आम्हाला आमचं स्वत:चं आयुष्य असं काही मिळालंच नाही. त्यावेळी वाटायचं, कमी मुलं झाली की बायका निवांत होतील. पण प्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही. एकेक पोर जन्माला घालूनही तुम्हा बायकांचं अडकणं तेवढंच राहिलं. उलटं वाढलं. हे कसं काय?’’
‘‘आम्हाला आमच्या मुलांबाबत कुठेही काही कमी राहावंसं वाटत नाही आजी.’’
‘‘आम्हाला तसं वाटत असावं असं तुम्ही कशावरून ठरवलंत? मूल एक होवो किंवा दहा होवोत, त्यांचं भलं व्हावं, त्यांनी नावारूपाला यावं असं आईबापांना वाटणारच. परत तुमच्या सगळ्या अपेक्षा- इच्छा- स्वप्नं वगैरे एकाच मुलावर लादण्याची तुमची धडपड चालली आहे. म्हणून तुम्हाला एवढं रक्त आटवावं लागतं. आम्ही म्हणायचो, एकजण यांच्यासारखा वकील होईल तर दुसऱ्यात माझ्यामधलं गाण्याचं प्रेम येईल. कोणी मैदानावर खेळेल. कोणी यंत्रांशी खेळेल. या सगळ्या गोष्टी कोणा एकाकडून पुऱ्या व्हाव्यात ही अपेक्षा जरा अती नाही का होत?’’ आजीनं अंमळ टोकदार प्रश्न विचारला तो साहजिकच नातीला आवडला नाही. तशीही दिवसभराच्या व्याप-तापांनी ती थकली होतीच. जराशाने म्हणाली, ‘‘ओ. के. सो यू थिंक, वुई आर ओव्हरडुइंग इट. बाकी काही नाही तरी या एकेकटय़ा पोरांना करमवावं तर लागतंच..’’
‘‘तेही मला जाणवतं. घरात तीन-चार पोरं असली की त्यांचा आपापसात खेळण्यात, भांडण्यात झक्कास वेळ जायचा. अलगदपणे मोठी भावंडं व्हायची धाकटय़ांचे पालक! मुलं एकमेकांच्या नादाने कशी वाढून गेली हे कळलंही नाही मला. शिवाय धाकटं मूल मार्गी लागेपर्यंत पहिलं नातवंडं झालं त्याची मजा वेगळीच! आता वाटतं, शारीरिक कष्टात का होईना, पण आम्ही कुठेतरी आमच्या सुखाच्या जागा शोधू शकलो. अधूनमधूनही उपभोगू शकलो. तुमची फरपट मात्र बघवत नाही.’’ आजी तळमळीने म्हणाली. नातीनं वेगळाच अर्थ घेऊन फणा काढला, ‘‘तू कितीही काहीही सांगितलंस तरी आम्ही दुसरं मूल होऊ देणार नाही. वुई जस्ट काण्ट अफोर्ड. कोणत्याच अर्थानं आम्हाला ते परवडणार नाही. एक बस!’’
‘‘मान्य आहे. तुला तुझं ‘एकमेव’ अपत्य पुरेसं आहे. फक्त त्याला वेगळ्या अर्थाने ‘अद्वितीय’ मानलं नाहीस म्हणजे झालं..’’ आजी समजुतीनं सांगायला गेली. नातीचे डोळे झोपेनं मिटायला लागले होते. तिच्यापर्यंत ते पोचलं की नाही हे कळायला मार्ग नव्हता.
मंगला गोडबोले
mangalagodbole@gmail.com