Leading International Marathi News Daily
शनिवार, ८ ऑगस्ट २००९
  महिलांच्या मुठीत मोबाइल!
  मोबाइल न वापरणाऱ्या काही मान्यवरांची ही भूमिका-
  मोबाइल एन्फोटेन्मेंट
  पण बोलणार आहे!
एकमेव.. अद्वितीय!
  व्हय़ू पॉइंट : वैर
  विज्ञानमयी
  मोबाइल वापरताना जरा जपून..
  कुठे गेले हे पदार्थ?
  स्वातंत्र्याचा लढा व भारतीय मुस्लिम महिला
  चिकन सूप... :
दुर्लक्षित थडगं
  'ति'चं मनोगत : कृतार्थ मी
  कवितेच्य़ा वाटेवर :
उशिराचा पाऊस
  ललित : मैत्र
  सक्षम मी : ‘सत्ताकारणासाठी आम्ही तय्यार आहोत!’
  ‘स्टार्स ऑफ एशिया’
  ललित - भिशी

 

व्हय़ू पॉइंट : वैर
एखादी गोष्ट गरज बनून बसेपर्यंत आपला प्रवास कोणत्या दिशेने चाललाय, याकडे आपलं लक्षच नसतं. पण मागे वळून पाहिल्यावर मात्र वाटतं की, हे अपरिहार्य होतं कदाचित. तोपर्यंत महत्त्व देण्याच्या लायक न समजलेल्या गोष्टी हळूहळू आपल्या दिशेने सरकताना दिसतात. आपण त्यांच्यापेक्षा जास्त वेगाने मागे मागे होण्याचा प्रयत्न करतो; पण आत हे माहीत असतं, की एका बेसावध क्षणी आपला वेग कमी होणार आणि त्या आपल्याला गाठणार. थोडक्यात- त्यांना टाळणं शक्य नाही!
इथे राहायला आलो तेव्हा सुरुवातीला गर्दी, गजबजाटात घुसमटायला व्हायचं. आपण न ठरवता काहीबाही करतोय असं वाटायचं. हे शहर आपल्याकडून करून घेतंय. सकाळपासून रात्रीपर्यंतच्या धावपळीला पर्याय नव्हता. मर मर मेहनत करावी लागे. (अजूनही लागते.) सतत सगळं अंदाज घेत करायला लागायचं. श्वास सतत रोखलेला. शरीरात, मनात सतत एक ताण. नजर फिरत राहायची. कुठेही टिकतच नसे. प्रत्येक वासात, प्रत्येक रंगात, प्रत्येक स्पर्शात अनोळखीपणा होता. या शहराचा स्वभाव मला रुचत नव्हता.
माझा या शहरावर राग होता. एक तर माझा इलाज नव्हता म्हणून इथे यावं लागलं होतं. माझं काम मी राहत होतो तिथे

 

होण्यासारखं नव्हतं. हक्काचे सगळे मागे टाकून इथे यावं लागलं. आणि हे शहर माझ्यासाठी काही सोपं करायला मागत नव्हतं. ते स्वत:च्या गुंगीत होतं. व्यस्त होतं. मी आलो काय, नाही काय, याला काही फरक पडत नव्हता. त्याला एकूणच माझी पडलेलीच नव्हती. घरी मला खूप वेळ असायचा. माझ्या वेगाने दिवस सरकायचा. इथे ‘माझं’ असं काही स्थानच नव्हतं. मला खूप दुर्लक्षित असल्यासारखं वाटायचं. आणि राग राग व्हायचा. कारण मला या शहराकडून काय हवंय, ते नीट कळायचं नाही. फक्त आपलं जग आपल्याला नव्याने बांधायला लागतंय, कळत होतं. पूर्वीचं जग आपसूक घडत गेलं होतं. ते माझ्याभोवती तयारच मला सापडलं. मी क्वचित काही निवडलं. जे मिळालं ते शोषत गेलो. त्यामुळेच ते मला ‘झालं’. एखादा चांगल्या फिटिंगचा टी-शर्ट होतो तसं इथे नव्हतं. मी इथे गर्दीतला एक होतो. मलाही मी घोळक्यातच दिसायचो. त्यामुळे प्रचंड एकटेपणा मला गिळून टाकायचा. गडबड-गोंधळ आपल्या डोक्यात शांत होत नाही तोपर्यंत आपली काही खैर नाही असं वाटायचं. विचार करायला जागा तयार होणार कशी? आणि काही निवडण्याची, बांधण्याची, घडवण्याची सवड मिळणार कशी?
आई-बाबांची आठवण यायची. घरी असताना त्यांचा कधी केला नाही इतका विचार करायला व्हायचं. त्यांना वारंवार माझ्याकडून झालेला ताप आठवायचा. मी त्यांची गरज असताना हा इथे येऊन बसलोय वाटायचं. (गरज माझी होती; त्यांनी मला कधीच मोकळा केला होता.) या शहरापायी मी कशा-कशाचा त्याग करून आलो, वाटायचं! हे शहर माझी परीक्षा घेत होतं. शहराचं आणि माझं वैर होतं.
तसा मी पूर्ण एकटा नव्हतो. माझा रूममेट होता. पण आमच्यात चांगलं-वाईट असं काहीच नातं नव्हतं. तो त्याच्या कामात बुडालेला असायचा. मी माझ्या. आमच्या यायच्या- जायच्या वेळाही ठरलेल्या नव्हत्या. आपापली चावी वापरून आम्ही येत-जात असू. त्यामुळे एकमेकांवर अवलंबून नव्हतो. तो मला कधी कधी कळवत असे की, त्याला उशीर होतोय, किंवा तो एखाद्या मित्राकडे/ नातेवाईकाकडे राहतोय. आणि मग सकाळी येताना फोन करून विचारत असे की, घरात काही संपलंय का? त्याने येता येता घेऊन यावं असं काही आहे का? स्वत:साठी नाश्ता करून घेताना तो मला आवर्जून विचारीत असे. पण मलाच हे सगळं नको होतं. वाटायचं, तू तुझं बघ, मी माझं बघतो. उगाच कशाला पायात पाय!
मी पटकन् कुणात मिसळत नाही. त्यामुळे कदाचित मित्र तयार व्हायला वेळ लागला. पण नवीन माणसं भेटली, त्यांच्यात गुंतायला लागलो आणि थोडा सैल झालो. संध्याकाळ भरून निघाली. रिकाम्या वेळाची सोय झाली. पण माझ्या आतला रिकामेपणा जात नव्हता. कधी कधी उलटच व्हायचं, की जणू आत काहीतरी साठत चाललंय आणि आपण ते बाहेर काढलं नाही तर एक दिवस आपण फुटू. पण बाहेरून सगळं शांत होतं. मी रुटीनमध्ये अडकण्याचा प्रयत्न करीत होतो, हे मान्य करायला लागलो होतो की कदाचित तेच ते आपण शोधत असलेलं स्थान.
एक दिवस सकाळी उठलो तर त्याच्या बेडवर रूममेट नव्हता. मी म्हटलं, लवकरचं काम असेल, गेला असेल बाहेर. चादरीची घडी घालायला उभा राहिलो आणि एकदम दचकलोच. भिंत आणि बेडमध्ये तयार झालेल्या कोपऱ्यात त्याचं मुटकुळं दिसलं. मी त्याला जाऊन हलवलं. तो थरथरत होता. त्याच्या अंगात प्रचंड ताप होता. मी विचारपूस केल्यावर कळलं की, त्याला पहाटे साडेतीनपासूनच उलटय़ा होत होत्या. पण माझी झोपमोड होईल म्हणून त्याने मला सांगितलं नाही! मला स्वत:हून जाग येईल याची वाट बघत राहिला. मी त्याला धरून बेडवर बसवायचा प्रयत्न केला तर तो कोलमडला. मला धडकीच भरली. मी भराभर आवरलं आणि त्याला रिक्षात बसवून जवळच्या हॉस्पिटलच्या दिशेने निघालो. तो आता जेमतेम शुद्धीवर होता. रस्त्यात बेशुद्ध पडला तर मला काहीच करता आलं नसतं. तो माझी भीती ऐकल्यासारखा सरळ बसायचा प्रयत्न करीत होता; पण त्याच्या अंगात त्राणच नव्हते. प्रत्येक खड्डा, प्रत्येक गचका माझं टेन्शन वाढवत होता. हॉस्पिटलमध्ये खूप धावपळ झाली. डॉक्टरांनी तातडीने काही टेस्ट करायला सांगितल्या. मी पळापळ करून इतर डॉक्टरांना गाठलं. रूममेटला जागोजागी नेलं. सगळं आटपेपर्यंत तीन तास गेले. रूममेट आता जेमतेम डोळे उघडू शकत होता. मला हेल्पलेस वाटत होतं. मी काय केल्याने मदत होईल, तेच कळत नव्हतं. मी त्याला समजावलं की, ‘जरा कळ काढ, डॉक्टर येताहेत. त्यांनी इंजेक्शन दिलं की बरं वाटेल.’
तो तक्रार न करता गुमान पडून होता. मीच अस्वस्थ होत होतो. थोडय़ा वेळाने डॉक्टर आले आणि इंजेक्शनची तयारी करू लागले. त्यांच्यासोबत इतरही मेडिकल स्टुडण्टस् होते. त्यामुळे खोलीतली गर्दी वाढली. मी बाहेर जाऊन वाट बघतो, सांगायला रूममेटच्या कानाजवळ वाकलो तर त्याने हलकेच त्याच्या हाताजवळ असलेला माझा हात धरला. त्याची पकड अत्यंत सैल होती. घट्ट हात धरून ठेवण्याइतकी त्याच्यात शक्ती नव्हती. पण मला कळत होतं की, त्याला मी तिथे थांबायची गरज होती. त्याला शक्य झालं असतं तर त्याने आरडाओरडा करून मला तिथे थांबवून घेतलं असतं. इंजेक्शन देऊन होईपर्यंत तो तसाच होता. जसजशी गुंगी आली तसा त्याचा हात आपोआप उघडा पडला. मी डॉक्टरांनी सांगितलेली औषधं आणून दिली आणि निरोपही देऊन ठेवला की, मी घरी जाऊन नीट आवरून परत येतो. आणि बाहेर पडलो.
बिल्डिंगच्या खाली पोहोचेपर्यंत माझं मन बधीर होतं. जिने चढायला लागलो आणि अचानक सुकटाचा वास नाकात शिरला. तेव्हा लक्षात आलं की, अरे! आज रविवार! प्रत्येक घरात आज गजबजाट होता. आवाज येत होते. प्रत्येक घरात चमचमीत जेवण शिजत होतं. कुठे भांडणं, कुठे गप्पा. पण घरं भरलेली होती. मी चावीने दार उघडून आत शिरलो आणि शांतता एकदम खायला धावून आली. रूममेट नव्हता. त्याची कमी जाणवली. लक्षात आलं, की आज मी त्याच्या जागी असतो तर त्याने हेच सगळं माझ्यासाठी केलं असतं. मी कदाचित त्याला पहाटेच उठवला असता किंवा बहुतेक त्याला आपोआप लवकर जाग आली असती. मग त्याने हॉस्पिटलमध्ये हातात घेतलेला हात आठवला. त्या हात धरण्यात हक्क सांगणं नव्हतं किंवा मदत मागणंही! त्या हात धरण्यात नेहमीचं सवयीचं कोणतंही कारण नव्हतं. आणि तरी सगळं काही होतं. मी मटकन् खाली बसलो. आजूबाजूला नजर टाकली.
ती रूम नव्हती. घर होतं आमचं. हे कधी झालं? उत्तर नव्हतं. पण हे दिसत होतं की, माझ्याशिवाय हे अस्तित्वात असू शकत नाही आणि याच्याशिवाय मी. हे आम्हा दोघांचं जग आहे. आम्ही तयार केलेलं. मला त्याच्यासोबत रिकामं वाटत नाही. तो मला कोणत्याही प्रकारे वागण्याकडे ढकलत नाही. त्याच्या भोवती मी आपोआप असतो.. सहज.
मघाशी त्याने हात धरला तेव्हा त्या स्टुडण्टस्ची आपसात झालेली नजरानजर आठवली. आता हे सर्रास होणार होतं. खूप त्रास वाटय़ाला येणार होता. हे मुळीच सोपं नव्हतं. पण जाणीव इतकी पक्की होती, की तिच्यातून धीर मिळत होता. कसलीतरी खात्री वाटत होती. मी उठलो आणि रूममेटसाठी डबा करायच्या तयारीला लागलो. आता त्याला पुन्हा भेटण्याची मी वाट पाहत होतो.
खिडकीतून बाहेर बघितलं तर इडलीवाला सायकलवरून चालला होता. त्याचा तो ओळखीचा हॉर्न वाजला. वाटलं, सगळं सुरळीत चाललंय आता. या शहराने मला एकटं पाडलेलं नाही. एकटं सोडलं. श्वास घ्यायला जागा दिली. मोठे निर्णय घ्यायला तयार केलं. कठीण निर्णय पत्करण्याची हिंमत दिली. माझं माणूस दिलं. माझं घर दिलं. मग मी आमच्यातलं वैर संपवून टाकलं.
इरावती कर्णिक
irawati_karnik@yahoo.in