Leading International Marathi News Daily
शनिवार, ८ ऑगस्ट २००९
  महिलांच्या मुठीत मोबाइल!
  मोबाइल न वापरणाऱ्या काही मान्यवरांची ही भूमिका-
  मोबाइल एन्फोटेन्मेंट
  पण बोलणार आहे!
एकमेव.. अद्वितीय!
  व्हय़ू पॉइंट : वैर
  विज्ञानमयी
  मोबाइल वापरताना जरा जपून..
  कुठे गेले हे पदार्थ?
  स्वातंत्र्याचा लढा व भारतीय मुस्लिम महिला
  चिकन सूप... :
दुर्लक्षित थडगं
  'ति'चं मनोगत : कृतार्थ मी
  कवितेच्य़ा वाटेवर :
उशिराचा पाऊस
  ललित : मैत्र
  सक्षम मी : ‘सत्ताकारणासाठी आम्ही तय्यार आहोत!’
  ‘स्टार्स ऑफ एशिया’
  ललित - भिशी

 

मोबाइल वापरताना जरा जपून..
गाडीत एका महिलेच्या हातात तीन मोबाइल पाहून एकीने कुतूहलानं विचारलं, ‘का हो, तुम्ही तीन मोबाइल वापरता?’ त्यावर ती बाई म्हणाली, ‘हो. एक माझा पर्सनल. एक खास मुलीशी बोलण्यासाठी आणि तिसरा ऑफिसच्या कामासाठी!’ त्या बाईच्या या उत्तरावर डब्यातील अनेकींच्या भुवया उंचावल्या खऱ्या, पण मोबाइलच्या अतिरेकी वापराचं हे उत्तम उदाहरण असावं. अलीकडे दोन मोबाइल बाळगणं हे तर स्टेटस सिम्बॉल झालंय.
मोबाइलशिवाय आपलं पानही हलत नाही. पण मोबाइलचा अतिवापर घातक ठरू शकतो याबद्दल मात्र बहुतेकजण अनभिज्ञ

 

असतात. मोबाइलच्या अतिवापराने होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याचे काम डोंबिवलीचे प्रा. उदयकुमार पाध्ये करीत आहेत. पर्यावरण, वन्यजीव संरक्षण व निसर्गविज्ञानप्रेमींची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रस्तावित ‘कॉस्मिक सोसायटी- इंडिया’च्या माध्यमातून ते गेले वर्षभर हे काम करत आहेत. या संस्थेत प्राध्यापक, आयटी तज्ज्ञ, ज्योतिषी, बांधकाम व्यावसायिक यांचा समावेश आहे.
मोबाइलच्या अतिरेकी वापराबाबत बोलताना उदयकुमार पाध्ये म्हणाले की, आज मोबाइल ही आपली गरजच होऊन बसली आहे. इतकी, की त्याच्या दुष्परिणामांचीही आपल्याला तमा नाही. मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळे आपलं सांस्कृतिक, सामाजिक आणि शारीरिक नुकसान होतं. आणि ते सहजासहजी भरून निघणारं नसतं. म्हणूनच मोबाइलच्या दुष्परिणामांबद्दलची माहिती आजच्या तरुण पिढीसमोर मांडणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आम्ही शाळा-कॉलेजांमध्ये जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. कार्यशाळा, पॅम्प्लेट्स यांद्वारे मुलांना मोबाइलच्या वापराबाबत आम्ही सजग करतो. मोबाइलच्या अतिवापराने होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली जाते. मोबाइलचा वापर हा केवळ माणूसच नव्हे, तर पशू-पक्षी, कीटक यांच्यावरही विपरित परिणाम करतो. मोबाइलच्या अतिवापराचा रक्ताभिसरण, मज्जासंस्था, पचनसंस्था व प्रजननक्षमता यांच्यावर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे नपुंसकत्व, निद्रानाश, विस्मरण, डोकेदुखी, कॅन्सर, ब्रेन टय़ुमरसारखे आजार होऊ शकतात, असे संशोधनाअंती सिद्ध झालं आहे. मोबाइलच्या वापरामुळे सामाजिक जीवनातही खूप मोठे बदल झाले आहेत. माणूस एकलकोंडा होत चालला आहे, मुलांमधील वक्तृत्वगुण कमी होत चालले आहेत, समूहाने चर्चा करणंही बंद झालंय, मुलांमध्ये वाचनाची गोडी कमी होत चालली आहे, असंही ते म्हणाले.
इमारतीवर लावलेल्या मोबाइल टॉवरमुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी सांगताना ते म्हणाले की, अशा टॉवरच्या भोवतालच्या ४०० मीटरच्या परिसरात राहणाऱ्या व काम करणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण गेल्या दहा वर्षांत तिपटीने वाढलं आहे. २० वर्षांखालील मुलांनी मोबाइलचा वापर केल्यास कर्करोगाची शक्यता कित्येक पटींनी वाढली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
मोबाइलचे उपयोगही आहेत, हे मान्य करतानाच आमच्या संस्थेचा मोबाइल वापराला विरोध नाही; परंतु त्याचा कमीत कमी वापर करावा, असं ते सांगतात. मोबाइलचा वापर दररोज एक तासापेक्षा कमी- म्हणजे अगदी आवश्यक तेव्हाच करावा. वायरलेस फोन किंवा रिमोट कंट्रोल यांचा कमीत कमी वापर करावा. हॅंड्स-फ्रीपेक्षा वायरलेस फोन जास्त धोकादायक आहे, असं उदयकुमार पाध्ये यांचं म्हणणं आहे. पर्यावरणासाठी हानिकारक ठरणाऱ्या मोबाइलमुळे प्रत्येक मोबाइलधारकाने एक तरी झाड लावावं, असं आवाहन पाध्ये करतात. मोबाइलच्या अधीन झालेल्या लोकांना पटकन् त्याचा वापर टाळणं कठीण असलं तरी मोबाइलच्या कमी वापराबाबत लोकांमध्ये मानसिक परिवर्तन घडवून आणणं गरजेचं आहे. समाजाचं आरोग्य अबाधित राखण्यासाठी ते करण्याशिवाय मात्र पर्याय नाही.
लता दाभोळकर
latadabholkar@gmail.com