Leading International Marathi News Daily
शनिवार, ८ ऑगस्ट २००९
  महिलांच्या मुठीत मोबाइल!
  मोबाइल न वापरणाऱ्या काही मान्यवरांची ही भूमिका-
  मोबाइल एन्फोटेन्मेंट
  पण बोलणार आहे!
एकमेव.. अद्वितीय!
  व्हय़ू पॉइंट : वैर
  विज्ञानमयी
  मोबाइल वापरताना जरा जपून..
  कुठे गेले हे पदार्थ?
  स्वातंत्र्याचा लढा व भारतीय मुस्लिम महिला
  चिकन सूप... :
दुर्लक्षित थडगं
  'ति'चं मनोगत : कृतार्थ मी
  कवितेच्य़ा वाटेवर :
उशिराचा पाऊस
  ललित : मैत्र
  सक्षम मी : ‘सत्ताकारणासाठी आम्ही तय्यार आहोत!’
  ‘स्टार्स ऑफ एशिया’
  ललित - भिशी

 

कुठे गेले हे पदार्थ?
श्रावणात सणासुदीला आवर्जून करण्यात येणारे पदार्थ काळाच्या ओघात विस्मृतीत जात आहेत की काय, अशी स्थिती आजच्या व्यस्त जीवनशैलीत निर्माण झाली आहे. ‘कुठे गेले हे पदार्थ?’ या शीर्षकाखाली असे पदार्थ आम्हाला लिहून पाठवण्याचे आवाहन आम्ही वाचकांना केले नि त्याला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे पदार्थ मागवण्यामागे केवळ या

 

पदार्थांची रेसिपी शेअर करणे हा एकमेव उद्देश नव्हता, तर घरोघरी केल्या जाणाऱ्या पदार्थांसोबत प्रत्येकाची कुठली ना कुठली आठवण जडलेली असते. कुणाला आजीच्या हातच्या पुरणपोळ्यांची चव आठवत असते, तर कुणाला शेजारच्या काकूने आवर्जून पाठवलेल्या पातोळ्या आठवत असतात.. हे पदार्थ आम्हाला लिहून पाठवताना नि ते वाचताना वाचकांच्या या साऱ्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळाला असेल!
केनीची भजी
साहित्य : पावसाळ्यात मिळणारी केनीची १०-१२ पाने, अर्धी वाटी डाळीचे पीठ, चिमूटभर ओवा, लाल तिखट, चवीनुसार मीठ, तेल
कृती : केनीची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत. डाळीच्या पिठात तेल कडकडीत तापवून (मोहन) घालावे. मीठ, तिखट, ओवा घालून सरसरीत भिजवावे. पिठात एकेक पान बुडवून तापत्या तेलात भजी काढावी. ही भजी छान फुगते. पाने एकदम पातळ असल्याने छान कुरकुरीत होतात. कांदेनवमीनंतर कांद्याच्या वापरावर पूर्वी पूर्ण बंदी असे. अशा वेळी कोणत्याही तयारीशिवाय (कारण पावसाळ्यात अगदी कुठेही केनी उगवलेली असते.) कुरकुरीत, खमंग केनीची भजी पावसाचा आनंद द्विगुणित करते. पाऊस आणि केनीची भजी हे मनात कोरलेले समीकरण आज फक्त आठवणीत शिल्लक आहे.
उसाच्या रसातल्या पोळ्या
साहित्य : एक वाटी कणीक, अर्धी वाटी उसाचा ताजा रस, मोहनासाठी दोन चमचे तेल, चवीपुरते मीठ, चार चमचे साजूक तूप , तांदळाची पिठी
कृती : तेल गरम करून त्यात कणीक घालावी. मग रस घालून कणीक चांगली मळावी. कणीक मळतानाच त्यात मीठसुद्धा घालावे. ही कणिक थोडी मुरायला लागते. म्हणून अर्धा तास भिजवलेली कणीक झाकून ठेवावी. पोळ्या करताना परत कणीक चांगली मळावी. नेहमीसारख्या घडीच्या पोळ्या कराव्यात. फक्त घडीमध्ये पातळ केलेले साजूक तूप लावून त्यावर तांदळाची पिठी भुरभुरावी आणि तव्यावर शेकतानाही दोन्ही बाजूंनी थोडे साजूक तूप लावावे.
पूर्वी रस (उसाचा) पिण्यापेक्षा उसाचे कर्वे मुलांना खायला देत असत. त्यामुळे दातांना व्यायाम मिळून दातांची बळकटी वाढेल, असा पालकांचा दृष्टिकोन असे. त्यामुळे उसाचा रस पोळ्या करण्यासाठीच घरी आणला जाई. आजोळी गेल्यावर हमखास होणाऱ्या या पोळ्या नातवंडांना खाऊ घालत असत आणि ‘मला-मला’ म्हणत आम्ही आजीला भंडावत सोडायचो. हसत-खिदळत खाल्लेल्या या पोळ्यांची सर आजच्या कंटेनरमध्ये मिळणाऱ्या कोणत्याच पंचपक्वान्नामध्ये नाही! मिट्ट गोड खाणाऱ्यांसाठी यात गूळ घातला जाई.
उकरपेंडी
साहित्य : भरडसर दळलेली कणीक एक वाटी, अर्धी वाटी चिंचेचे पाणी अर्धी वाटी, चिरलेली कोथिंबीर, ओले खोबरे, जिरे, लाल तिखट, मीठ, एक मोठा डाव तेलाची हिंग- मोहरी- हळद घालून केलेली फोडणी.
कृती : कणीक कढईत खमंग भाजून घ्यावी. फोडणी करून त्यात कणीक घालून चांगले परतावे. मीठ-तिखट, जिरे घालून पुन्हा एकदा परतावे. चिंचेचे पाणी थोडे-थोडे घालत कणीक सारखी परतत राहावी. पाणी घालताना एकाच ठिकाणी जास्त पडता कामा नय,अन्यथा गुठळ्या होतात अथवा. दोन दणदणीत वाफा आल्यावर झाकण काढून खोबरे-कोथिंबीर घालून गरम-गरम खावे.
सुनीता पिंपळे, नाशिक

रूचिरा वडी
बेगमीचा हा पदार्थ टिकाऊ तसेच पटकन तोंडात टाकता येण्याजोगा आहे तसेच पाहुण्यांच्या सरबराईत गोड पदार्थ म्हणून निश्चितच होऊ शकेल.
साहित्य - गाजर, बीट, दुधी भोपळा, लाल भोपळा (प्रत्येकी अर्धा वाटी किस), दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, दोन टोमॅटोच्या फोडी, नारळाचा एक वाटी चव, साखर, दोन मोठे चमचे मलई आणि चार टी स्पून वेलची
कृती - प्रथम सर्व प्रकारचे किसलेले जिन्नस व नारळ मिक्सरमधून काढावे. नंतर त्यात किसलेले बटाटे व मिक्सरमध्ये वाटलेले टोमॅटो तसेच साखर व मलई एकत्र करून मध्यम गॅसवर ठेवून आटवावे. घट्ट झाल्यावर मिश्रण वेलची पावडर घालून ढवळून ओतावे व प्लास्टिक पिशवीवर थापून वडय़ा पाडाव्यात.
टाकळ्याच्या बियांची कॉफी
पूर्वी घरगुती समारंभात कॉफी पावडर टाकळ्याच्या बियांपासून घरी बनवत असत. त्याची लज्जतही काही वेगळीच असते, तसेच ती टिकाऊही असते.
साहित्य- २ वाटय़ा टाकळ्याच्या सुकलेल्या शेंगांमधील दाणे व अर्धा चमचा साजूक तूप
कृती- टाकळ्याच्या बिया तुपावर परतून घ्याव्यात. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पावडर करावी व डब्यात भरून ठेवावी. पाहिजे तेव्हा कॉफीसाठी वापरावी.
घारकुटाचे वडे
श्रावणात शनिवारी मारुतीला व शनीला ह्या वडय़ांची माळ करून घालण्याची प्रथा आहे, तसेच श्रावण सोमवारी शंकराच्या नैवेद्यावर दही व हे वडे आणि घारगे करण्याची पद्धत आहे.
साहित्य- पाव किलो तांदुळ, १५० ग्रॅम हरभऱ्याची डाळ, १५० ग्रॅम उडीद डाळ, ५० ग्रॅम ज्वारी, ५० ग्रॅम मेथीचे दाणे, अर्धी वाटी तीळ, १०० ग्रॅम धणे, मीठ, तिखट, हळद, तळण्यासाठी तेल.
कृती- सुरुवातीला तांदुळ, डाळी, मेथी, धणे व ज्वारी सर्व एकत्र करून किंचित जाडसर दळून आणावेत. पुरेसे पीठ परातीत घेऊन त्यात हळद, चवीनुसार तीळ, मीठ, तिखट घालावे व हाताने सारखे करावे. नंतर त्यावर गरम तेलाचे मोहन घालावे. (या सर्व मिश्रणासाठी एक वाटी तेल) व सारखे करून गरम पाण्याने पुरीच्या पीठाइतपत भिजवून १५ मिनिटे ठेवावे. नंतर तेल गरम करून पाण्याच्या हाताने पीठ मळून घेऊन वडे थापून मध्ये भोक पाडून तळावे. दही किंवा लोण्याबरोबर खाण्यास द्यावे. हे सर्व जिन्नस कच्चेच दळून आणावेत.
विद्या फडके, गोरेगाव (प.)

मुलीचे लग्न झाले व त्यानंतर ती प्रथम नवऱ्यासोबत माहेरी येते तेव्हा कोकणात त्या नव्या जावयाला ‘सात काप्यांचा घावन’ खायला घालतात. ‘खापरोळी’ हा प्रकार खास बाळंतिणीसाठी करतात, कारण त्यातील सर्व घटक पौष्टिक व उष्ण आहेत त्यामुळे ते सर्वानाच उपयुक्त आहेत.
कोकणातील काही घराण्यात ‘श्रीखलनाय’ या देवाला खापरोळीचा नैवेद्य दाखवतात. देवाला दाखवल्याशिवाय हा खायचा नसतो, खाल्ला तर पोटात दुखते, अशी श्रद्धा आजही बाळगली जाते.
शिरवळ्या हा खास पाहुणचाराचा पदार्थ आहे. मुंबईचा पाहुणा कोकणात गेला की, शिरवळ्या खाऊ घातल्याच पाहिजेत. काहीजणांकडे श्रावणात सोमवार - शनिवारी शिरवळ्या करण्याची प्रथा आहे. हे सर्व पदार्थ करायला सोपे. त्यातील साहित्य सहजपणे घरात असणारे, तेलकट नसलेले, पचायला हलके आणि तरीही चवदार आहेत.
सात कप्प्यांचे घावन
साहित्य- एक वाटी धुतलेल्या तांदळाचे पीठ, चवीपुरते मीठ, दोन वाटय़ा ओले खोबरे, एक वाटी गूळ, आवश्यक वाटल्यास वेलची पावडर, पाणी व थोडेसे तेल, बीडावर किंवा कावितावरच हे घावन घालावेत.
कृती- तांदळाचे पीठ दुधासारखे पातळ करावे (थोडे मीठ घालावे). गूळ, खोबरे, वेलची सर्व एकत्र करून शिजवावे, कोरडे करावे. काहीजण न शिजवता गूळ-खोबरे नुसते एकत्र करूनही सारण ऐनवेळी करतात. पण तसे करताना गुळाचा खडा राहिला तर घावन बीडाला चिकटू शकतो. बीडाला जरासे तेल लावून घावन घालावा म्हणजे पीठ ओतावे- शिजत आले की, अध्र्या भागात म्हणजे उजवीकडे सारण घातले की, डावीकडचा घावनाचा भाग त्यावर झाकण म्हणून घालावा व डावीकडचा रिकाम्या भागात पीठ ओतावे. आता डावीकडच्या भागात सारण घालून उजवीकडचा कप्पा डाव्या भागावर दाबावा असे डावी व उजवी बाजू करत सात कप्प्याचा घावन करावा. हे करणे म्हणजे कौशल्याचे काम आहे. आपल्याला एरवी खायला एक किंवा दोन कप्प्यांचे सहज करता येतात.
खापरोळी
साहित्य- एक वाटी तांदूळ, एक वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी उडीद, एक-दोन चमचे मेथी दाणे, जिरे पावडर (वाटलेल्या मिश्रणात घालावी), एका नारळाचे ओले खोबरे, चवीनुसार गूळ, वेलची पावडर.
कृती- तांदूळ व डाळी वेगवेगळ्या भिजत घालाव्यात. चण्याच्या डाळीत मेथी भिजत घालावी. ज्या दिवशी खापरोळी खायची असेल त्याच्या आदल्या दिवशी दुपारी डाळी भिजत घालाव्यात. रात्री वेगवेगळे वाटून एकत्र करावे व रात्रभर तसेच झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी ओल्या खोबऱ्याचा थोडे गरम पाणी घालून रस काढावा. त्यात चवीनुसार गूळ घालावा. वाटलेले मिश्रण फुगून वर आलेले असेल त्यात चवीपुरते मीठ घालून ढवळावे. बीडावर थोडेसे तेल लावून इडलीच्या आकाराएवढे पीठ ओतून एकावेळी तीन-चार खापरोळी काढाव्यात. या खापरोळ्या नारळाच्या रसात बुडवून ठेवाव्यात व नंतर त्या रस्सासकट घेऊन खाव्या. पूर्वी या मातीच्या खापरात म्हणजे तव्यात करीत. त्यामुळे त्याला खापरोळी हे नाव पडले आहे.
शिरवळ्या
साहित्य- एक ते दोन वाटय़ा तांदळाचे पीठ, चवीनुसारे मीठ, शेवेचा सोऱ्या, नारळाचा वरीलप्रमाणे रस
कृती- गरम पाणी व मीठ घालून तांदळाचे पीठ मळावे व त्याचे मुटकुळे वळावे. पाणी उकळत ठेवून त्यात हे मुटकुळे टाकावे. प्रथम ते पाण्यात तळाशी जातात व नंतर पाण्यात तरंगले की ते शिजले असे समजावे. ते मुटकुळे काढून सोऱ्याला जाड शेवेची चकती लावून शेवया पाडतात. खापरोळीप्रमाणे नारळाच्या रसात बुडवून खाव्यात. मैद्याच्या दुकानातून महाग विकत आणलेल्या नूडल्सला हा किती छान पर्याय आहे. गोड नको असल्यास मिरची बारीक चिरून, कोथिंबीर चिरून व खोबरे घालून मिसळून खावी.
जयबाला परुळेकर, दादर.

पाच खिरी
मला आठतात त्या पूर्वी होत असलेल्या खिरी. प्रत्येक सणवाराला नैवेद्याच्या पानावर डावीकडे वरण-भाताच्या मुदीजवळ एक चमचाभर गव्हल्याची खीर वाढलेली असे. जेवणाची सुरुवात या चमचाभर खिरीनेच करून प्रथम तोंड गोड करायचं, मगच वरण-भात कालवून जेवणास सुरुवात करायची असा नेम असे. अशा या पाच खिरींचे सांस्कृतिक संदर्भ असे- पाच खिरी म्हणजे गव्हले, मालत्या, नखुल्या, पोहे व शेवया. मुंजा मुलाला मातृभोजनात पानात पाच खिरी वाढल्या जायच्या. नवरदेवाला रूखवताच्या जेवणातही याच पाच खिरींनी सुरुवात करण्याची सासुबाईची प्रथा असे. रात्री मुलगी सासरी जाताना तिची आई मालत्यांनी ओटी भरून पाठवणी करीत असे. घरात मंगलकार्य ठरले की, घरच्या वधू-वराची आई पाच सासू-सासऱ्याच्या सुनांना बोलावून प्रथम पाच खिरींचे प्रकार करून घेऊन मगच पुढील तयारीलालागत असे. तर अशा या पाच खिरी.
(१) कणीक व बारीक रवा दुधात भिजवून गोळा करून थोडा वेळ ठेवून द्यावा. करण्याच्या वेळी ताटात गव्हले करावेत. थोडे थोडे पीठ चिमटीत घेऊन बारीक सुरळ्या करून शेवटचे टोक चिमटीत धरून दुसऱ्या चिमटीने हळूहळू लांबट तुकडे ताटात पाडून मग वाळवावेत.
(२) मालत्यावरील पिठाचे जरा मोठय़ा आकाराचे गव्हले पाडून पीठ पसरून पोळपाटावर लांबट सुरळ्या कराव्यात. सुरळीच्या डाव्या टोकाला सुरुवात करून अंगठय़ाने हळूच तिरके फिरवून सुरळीच्या दुसऱ्या टोकापर्यंत गेले की, स्प्रिंग रोल बनतो, तीच मालती. अशा मालत्या करून ताटात वाळवणे.
(३) वरील पिठाचे हरबऱ्याएवढे गोळे करून नंतर जरा चपटे करून अंगठय़ाच्या नखाने जरा टोचावे. मध्यभागी असे टोचल्याने जो आकार येतो त्या नखुल्या होत. ताटात वाळवून तयार.
(४) याच पिठाचे मोठ्ठे लांब गव्हले करून अंगठय़ाजवळच्या पहिल्या बोटाने जरा दाबावे. पोह्याचा आकार येतो, असे पोहे करून वाळवावेत.
(५) शेवया : मैदा (सपीठ) भिजवून ठेवून हातानेच लांब लांब शेवया वळून अलगद ताटात ठेवून वाळवाव्यात. शेवयाच्या स्पेशल पारावरही शेवया जलद आणि चांगल्या होतात. या सर्व खिरींचे प्रकार लहानपणी पाहिले व केले आहेत.
- शकुंतला नानिवडेकर, ठाणे (प.)

सातूचे पीठ
साहित्य - अर्धा किलो गहू, अर्धा किलो भाजके डाळे, ५० ग्रॅम जिरे. गहू चांगले भाजून घ्यावयाचे. डाळे गरम करून घ्यायचे. जिरे भाजून घ्यायचे व तिन्ही एकत्र करून गिरणीतून पीठ दळून आणायचे. पातळ पीठ व (पिठाचे गोळे तिखट-मिठाचे) असे दोन प्रकार करता येतात.
१) पातळ पीठ : एक वाटी चिंचेचे पाणी, अर्धी वाटी गूळ असे मिश्रण करून मावेल एवढे पीठ हळूहळू मिसळावे. साधारण चमच्याने खाता येईल एवढे पीठ घालावे. गहू, हरबरा, गूळ पौष्टिक आहेत व जिरे पाचकही. हा पदार्थ चवदार असून पीठ भाजलेले असल्याने पचनाला सोपे असते.
२) पिठाचे गोळे : चिंच-गुळाच्या पाण्यात पीठ भिजवून घट्ट पीठ तयार करायचे. त्यात थोडे मोहन घालायचे. पिठाचे पातळ रोल तयार करून तेलावर पॅटिस परततो तसे परतायचे. जरूरीनुसार तिखट-मीठ घातले तरी चालते अथवा चिंच-गुळाची, तिखट-मीठ फोडणी दिलेल्या चटणीबरोबर अथवा मॅगी-सॉसबरोबरही छान लागतात. उन्हाळ्यात पातळ सातूचे पीठ व पावसाळ्यात सातूच्या पिठाचे रोल खाण्यातली मजा खाल्ल्याशिवाय कळणार नाही. हे दोनही पदार्थ करण्यास सोपे तसेच पौष्टिकही आहेत.
तिखटा-मिठाचे मोदक- आमटी
उकडीचे मोदक हे जरा कौशल्याचे काम. तळलेले मोदक आपण नेहमी करतो. सारण घातलेल्या तिखटा-मिठाच्या मोदकाची आमटी आमच्या घरातच नेमाने व्हायची.
सारणासाठी एका नारळाचा कीस, पाच चमचे तीळ, चार चमचे दाण्याचा कूट, तिखट-मीठ, चवीपुरता मसाला. तीळ आणि दाण्याचा कूट वेगवेगळा भाजून घ्यावा. ओल्या नारळाचा अथवा सुक्या नारळाचा कीस भाजून घेणे. सगळे मिश्रण एकत्र कोथिंबीर चिरून मिक्स करून टाकणे. त्यावर लिंबू पिळून घट्ट सारण बनवणे.
एक वाटी कणीक, एक वाटी चण्याचे पीठ, चवीप्रमाणे तिखट-मीठ, हळद, मोहन घालून घट्ट पीठ भिजवायचे. वरील सारणातील थोडय़ा सारणाला फोडणी देऊन चार-पाच वाटय़ा पाणी घालून पातेल्यात गरम करणे. पिठाच्या लाटय़ा लाटून त्यात सारण भरून मोदकाचा आकार देणे व वरील उकळत्या सारणाच्या पाण्यात टाकून चांगली उकळी आल्यानंतर बाऊलमधून मोदक व सारणाचे पाणी वाढणे.
मोदकात सारण असल्याने व मोदक शिजल्याने पोळ्या चावण्याचा त्रास नाही. पोळ्या लाटण्याचा, भाजण्याचा त्रास नाही व चवदार पदार्थ मिळाल्याने सगळेच खूश. भातावर हे सारणाचे पाणी घेतले तरी रोज साधे वरण-भात खाण्याचा आलेला कंटाळा घालवता येतो. मग काय करणार ना तिखटा-मिठाचे मोदक अन् सातूचे रोल.
पुष्पा जामखेडकर, गोरेगाव (पूर्व)

खांतोळी
साहित्य - एक वाटी गव्हाचा रवा (कोकणात तांदळाचा रवा वापरतात.) पाव वाटी तूप, पाऊण वाटी खवलेला नारळ, एक वाटी किसलेला गूळ, वेलचीची बोंडं, चवीनुसार चिमूटभर मीठ
कृती - खवलेल्या खोबऱ्यापैकी पाव वाटी खोबरे बाजूला ठेवून बाकीच्या खवलेल्या खोबऱ्याचा पातळ व जाड रस काढावा. रवा तुपावर खमंग भाजून त्यात पातळ रस घालून शिजवून घेणे. नंतर त्यात गूळ आणि जाड रस घालून चांगली वाफ आणणे. हा शिरा जरा मऊ असावा. कुटलेली वेलची घालून व्यवस्थित तूप लावलेल्या थाळीत नीट थापून वर बाजूला थोबरे चेपणे. थंड झाल्यावर वडय़ा पाडाव्यात.
अनसा फणसाची भाजी
साहित्य- सहा रायवड आंब्याची घोटं, अर्धा अननस, १२ कापा फणसाचे गरे, अर्धी वाटी खवलेला ओला नारळ, अर्धा चमचा मोहरी, एक चमचा तिखट, चवीसाठी गुळाचा खडा, मीठ, एक टेबलस्पून खोबरेल तेल, फोडणीसाठी िहग, मोहरी, कढिपत्ता
कृती - घोटांची साल काढून बाठे वेगळे ठेवणे. साल जरा पिळून घेऊन रस काढावा. पाऊण इंचाचे अननसाच तुकडे, दोन गऱ्यांचे तुकडे, खोबरे, मोहरी व तिखट यांचे जरा जाडसर वाटण तयार ठेवावे. फोडणी करून त्यात प्रथम आंब्याची घोटं रसासहित व अननसाचे तुकडे घालून शिजवावेत. चांगली वाफ आल्यावर तिखट, मोहरी घालून केलेले खोबऱ्याचे वाटण, गरे, गुळाचा खडा व मीठ घालून चांगले शिजवणे. वरून खोबरेल तेल घालून विस्तवावरून बाजूला करून ठेवणे. चवदार अनसा फणसाची भाजी तयार.
गौरी बोरकर, वांद्रे

कोळाचे पोहे
पूर्ण कोकणपट्टीत माडाच्या बागांना तोटा नाही. नुकत्याच माडावरून उतरवलेल्या नारळाची चव आगळीच असते. अशा ताज्या नारळातील पाणी किंवा त्यातून खवून काढलेल्या मऊ मऊ, पांढऱ्याशुभ्र खोबऱ्याच्या आठवणीनेसुद्धा तोंडात मधूर चव निर्माण करते. असं मऊशार मलईसारखं खोबरं पाटय़ावर वाटून नंतर त्याचं हाताने घट्ट पिळून काढलेलं दूध पुरणपोळी आणि फणसाच्या सांदणाबरोबर खाताना त्या पदार्थाची चव नि गुणवत्ता लखपटीने वाढवते. हे नारळाचे दूध कोकमाची सोलकढी करायला वापरतात, तसेच कोकणाची खासियत असलेल्या ‘कोळाचे पोहे’ या पदार्थातही नारळाचे दूध महत्त्वाची भूमिका बजावते. कोळाचे पोहे करायला गॅस, ओव्हन, मिक्सर ग्राइंडर अजिबात आवश्यक नाही हेसुद्धा एक विशेष आहे. ‘कोळाचे पोहे’ करायला लागणारे पदार्थ (दोन व्यक्तींसाठी)
साहित्य - दोन वाटय़ा जाड पोहे, लिंबाएवढय़ा चिंचेचा कोळ , बारीक चिरलेल्या दोन-तीन मिरच्या, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, मोठय़ा लिंबाएवढा गूळ, दीड ते दोन वाटय़ा खवलेल्या ओल्या नारळाचे दूध, एक पोह्याचा भाजलेला पापड
कृती : चिरलेल्या मिरच्या, चिंचेचा कोळ, गूळ आणि नारळाचे दूध एकत्र करून हाताने एकजीव करून घ्यावे. वरील मिश्रणात पोहे मिसळा व एक-दोनदा हातानेच ढवळून वीस ते पंचवीस मिनिटे ते तसेच मुरू द्या. वरील मिश्रण घट्टसर झाले, की खायला द्यायच्या बशीत काढा. त्यावर भाजलेल्या पोहे पापडाचा चुरा भुरभुरवा आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी. झाले कोळाचे पोहे.
सोजी
साहित्य : एक वाटी लापशीचा रवा, एक वाटी गूळ, एक वाटी खोवलेले खोबरे (नारळ) एक चमचा जिरे, एक चमचा हळद, सहा ते आठ वाटय़ा पाणी, दीड ते एक चमचा जिरे.
कृती : प्रथम रवा चांगला भाजून त्यावर गरम पाणी घालून ढवळत राहावे. थोडेसे शिजत आल्यावर त्यात किसलेला गूळ घालावा. खोबरे, हळद, जिरे एकत्र बारीक वाटून त्यात घालावे. चवीपुरते मीठ घालावे. खिरीसारखे होईपर्यंत शिजवावे. वरून तूप व वेलची पावडर घालावी.
सोजी हा खिरीसारखा पदार्थ कोकणात खास लग्नसमारंभात किंवा धार्मिक कार्यात (गणपती उत्सवाच्या वेळी) करण्याची प्रथा आहे. पूर्वी माझ्या लहानपणी लग्नसमारंभ घरीच अंगणात केले जात. त्या वेळी प्रमुख पदार्थ म्हणजे भात, वाटाण्याचे सांबार (काळे वाटाणे) आणि सोजी हे खास मालवणी पारंपरिक पदार्थ आहेत. आजही ज्यांच्या घरी पाच दिवस गणपती असतो, त्यांच्याकडे मोदक, सोजी, घावने- रस असे पदार्थ रोज नैवेद्यासाठी केले जातात.
उषा रेवणकर, बोरिवली (प.)
(उर्वरित काही निवडक पाककृतींना पुढील अंकात प्रसिद्धी दिली जाईल.)