Leading International Marathi News Daily
शनिवार, ८ ऑगस्ट २००९
  महिलांच्या मुठीत मोबाइल!
  मोबाइल न वापरणाऱ्या काही मान्यवरांची ही भूमिका-
  मोबाइल एन्फोटेन्मेंट
  पण बोलणार आहे!
एकमेव.. अद्वितीय!
  व्हय़ू पॉइंट : वैर
  विज्ञानमयी
  मोबाइल वापरताना जरा जपून..
  कुठे गेले हे पदार्थ?
  स्वातंत्र्याचा लढा व भारतीय मुस्लिम महिला
  चिकन सूप... :
दुर्लक्षित थडगं
  'ति'चं मनोगत : कृतार्थ मी
  कवितेच्य़ा वाटेवर :
उशिराचा पाऊस
  ललित : मैत्र
  सक्षम मी : ‘सत्ताकारणासाठी आम्ही तय्यार आहोत!’
  ‘स्टार्स ऑफ एशिया’
  ललित - भिशी

 

स्वातंत्र्याचा लढा व भारतीय मुस्लिम महिला
देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात स्त्रियांनी कशा प्रकारे भाग घेतला, याचा सांगोपांग अभ्यास अजून झालेला नाही. हा लेख म्हणजे १८५७ ते १९४७ या काळातील मुस्लिम भगिनींनी भारताच्या स्वातंत्र्याकरिता केलेल्या योगदानाचा संक्षिप्त आढावा आहे.
स. १८५७ मध्ये भारतीयांनी इंग्रजांविरुद्ध मोठा उठाव केला. हा उठाव संघटित नव्हता. तरीही या उठावात भारतातील स्त्री-पुरुषांनी भाग घेतला. सर्वाचे एकच ध्येय होते. भारतातून इंग्रजांची सत्ता उलथून लावायची. त्यांना त्यांच्या देशात पाठवायचे. पुढे हा वणवा मोठय़ा प्रमाणात भारतभर पेटला. वर्ष-दीड वर्ष तो विझला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटले, ‘हा उठाव नव्हता. इंग्रजांविरुद्ध पुकारलेले हे पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते.’ या लढय़ापासून १९४७ पर्यंत स्वातंत्र्याकरिता अनेक लढे झाले. यात

 

स्त्रियांचाही विशेषत्वाने सहभाग होता. १९७५ साली आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभर साजरा झाला. त्या वेळेपासून आजपर्यंत निरनिराळ्या क्षेत्रांत स्त्रियांनी जी कामगिरी केली त्याकडे जगाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न अभ्यासक करू लागले. परंतु भारतीय स्वातंत्र्यलढय़ात ग्रामीण, दलित, आदिवासी, पारसी, ख्रिस्ती व मुस्लिम स्त्रियांच्या योगदानाबद्दल सांगोपांग अभ्यास अजून झालेला नाही. हा लेख म्हणजे १८५७ ते १९४७ या काळातील मुस्लिम भगिनींनी भारताच्या स्वातंत्र्याकरिता केलेल्या योगदानाचा एक संक्षिप्त आढावा.
१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील अवधची बेगम हसरत महल हिचे नाव गेल्या पन्नास वर्षांत पुढे आले. अवधचा नबाब वाजिदअली शहा याला पदच्युत करून इंग्रजांनी त्याला कलकत्त्याला पाठवले. त्याची बेगम हसरत महल हिने या अन्यायाचा बदला घेण्यासाठी स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतली. नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांच्याशी संपर्क ठेवला. फौज उभी केली व इंग्रजांशी टक्कर देण्याचा जिवापाड प्रयत्न केला. १८५८ साली व्हिक्टोरिया राणीने आपला जाहीरनामा (राणीचा जाहीरनामा) प्रसिद्ध केला. राणीच्या नावाने हा जाहीरनामा केला गेला असला, तरी ब्रिटिश पार्लमेंट, पंतप्रधान व त्यांचे राजकीय सल्लागार यांनी बनविला होता. या जाहीरनाम्याचा पडदा फाडण्याचे काम भारतात फक्त हसरत महलने केले. ना तिच्याकडे होते पार्लमेंट ना मुत्सद्दय़ांची भलीमोठी फलटण. पण बेगमने या जाहीरनाम्याला तोडीस तोड उत्तर देऊन त्या जाहीरनाम्याचा पोकळपणा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. हसरत महलच्याच आश्रयाला पुढे नानासाहेब पेशवेही गेले होते. बेगमचे सर्व प्रयत्न संघटित प्रतिकाराअभावी अयशस्वी ठरले हे आपले दुर्दैव. अवधच्या बेगमप्रमाणे दुसरे नाव घेतले जाते ते म्हणजे दिल्लीचा बादशहा जफर याची बेगम ‘झीनत महल’ हिचे. तिने जनानखान्यातील सर्व जडजवाहर या युद्धाच्या कामी आणले. तिच्यापासून धोका आहे हे इंग्रजांनी ओळखले व बहादूरशहा जफरबरोबरच तिलाही कैद करून ब्रह्मदेशात पाठविले. ती मरेपर्यंततुरुंगात होती. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले त्या वेळी बहादूरशहाचा मुलगा फिरोज शहा व सून तुकलाई सुलताना जमानी बेगम हे मक्केहून भारतात परत येता येता त्यांना दिल्लीतील विद्रोहाची बातमी समजली. फिरोजशहा येता येता रस्त्यातच फौज एकत्र करीत चालला. जमानी बेगमने सुरक्षित स्थळी जाण्यास नकार दिला. तिने सैनिकांची सेवाशुश्रूषा व रसदीची व्यवस्था आपल्या हातात घेतली. या वेळेपर्यंत बहुतेक स्वातंत्र्यसैनिक मारले व कैद केले गेले असतानाही फिरोज शहा व जमानी बेगम मात्र लढत राहिले. त्यांचा मुक्काम असलेल्या जंगलाला इंग्रजांनी आग लावली. जंगल जळून भस्म झाले, पण त्यातून हे दाम्पत्य आपले उरलेसुरले सैन्य घेऊन उलटय़ा दिशेने निघून गेले होते. इंग्रजांनी फिरोज शहा व जमानी बेगमला दिल्ली शहरात न येण्याचा बंदी हुकूम काढला. आपल्या पत्नीला पकडून इंग्रजांनी तिची विटंबना करू नये म्हणून फिरोज शहाने तिला तलाक दिला. फिरोज शहा पुढे निराश होऊन मक्केला गेला. जमानी बेगमही मक्केला गेली. १८५७ मध्ये त्या दोघांनी परत निकाह केला. १७ डिसेंबर १८७७ मध्ये फिरोजशहा मरण पावला. जमानी बेगमला इंग्रजांनी हिंदुस्थानात येण्याची मनाई केली. १८ व्या वर्षी शहाजाद्याची बेगम झालेली जमानी म्हणजे वीरता, हाल व रहस्य यांची एक कहाणी आहे. शेवटपर्यंत ती दिल्लीत जाऊ शकली नाही.
राजघराण्यातल्या स्त्रिया या देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच आपल्या हक्काच्या गादीसाठीही लढल्या. पण याच युद्धात सामान्य मुस्लिम महिलांनीही आपले बुद्धिचातुर्य व क्षात्रतेज दाखवले आहे. बेगम हसरत महलने काही स्त्रियांना युद्ध प्रशिक्षण दिले होते. १८५७ साली या स्त्रिया बेगमबरोबर युद्धभूमीत उतरल्या होत्या. त्या बहुतेक जनानखान्यातील दासी व इतर काम करणाऱ्या स्त्रिया असाव्यात. ‘अजीजन’ नावाची नर्तिका आपले विलासी जीवन सोडून हसरतमलच्या प्रेरणेने क्रांतिकार्यात उतरली. ही नर्तिका इंग्रजी सैनिकांच्या छावणीत जाऊन संगीत व नृत्याद्वारे सैनिकांचे मनोरंजन करी व गुप्तहेराचे काम करी. दिवसा ती पुरुषी वेषात युद्धभूमीवर असे. उठाव दडपून टाकण्यात इंग्रजांना यश येऊ लागले. त्याच वेळी ती पकडली गेली. इंग्रज अधिकारी ‘हॅवलॉक’ तिचे सौंदर्य पाहून थक्क झाला. ती माफीची साक्षीदार झाली तर तिला जीवदान दिले जाईल, असे तिला म्हणाला. पण तिने जीवदान नाकारले. अजीजन ही शांत चित्ताने व हसतमुखाने फायरिंग स्क्वाडसमोर उभी राहिली. क्षणार्धात तिच्या सुंदर शरीराच्या चिंधडय़ा उडाल्या. अजीजन हुतात्मा झाली. त्याशिवाय इंग्रजांनी फाशी दिलेल्या उत्तर प्रदेशातील महिलांमध्ये हबीबा, जमाली व मेहरी अशा तिघींची नावे आढळतात. दिल्लीच्या मोहसिना नावाच्या क्रांतिकारी महिलेला ८ डिसेंबर १८५७ला फाशी दिली होती. मुजफ्फरनगरचा नेता काजी अब्दुल रहिम खांची आई असगरी बेगमला इंग्रजांनी जिवंत जाळले व बख्तावरीला फाशी दिले होते.
विसाव्या शतकात बेगम हसरत मोहानी यांचे नाव घेतले जाते. जनाब हसरत मोहानी यांना अटक झाल्यावर त्यांचा प्रेस चालविण्याचे काम तिने केले. हसरत मोहानी सुटून आल्यावर त्यांच्याबरोबर प्रत्येक राजकीय चळवळीत भाग घेतला. बेगम मोहमद अली याही आपल्या पतीबरोबर काँग्रेसच्या कामात उतरल्या होत्या. महात्मा गांधींचे मत त्यांच्याबद्दल फार चांगले होते. आपल्या पतीपेक्षाही तिचे वक्र्तृत्व फर्डे व हृदयस्पर्शी असते असे गांधीजींचे म्हणत. मुसलमान स्त्रियांच्या सभा त्या घेतच, पण अन्य समाजातील स्त्री-पुरुषांच्याही सभा घेत. मात्र सभेत त्या बुरखाधारी असत. बेगम हसरत मोहानी व बेगम मोहमद अली यांनी सामाजिक-राजकीय कार्य करायला पडदा आड येत नाही हे सिद्ध केले. त्यांनी इतरांना आदर्श घालून दिला. याच काळात त्या दोघींनीही खादीचा प्रचार केला. त्या स्वत: खादीधारी होत्या. बेगम इ.हसरत मोहानी यांचा काँग्रेसमधील जहाल गटाशी संबंध होता. त्यामुळे त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर त्यांनी बुरखा वापरणे बंद केले. समाजापुढे बिनबुरखा येणारी व खुल्लम खुल्ला राजकीय कार्य करणारी ती पहिली मुसलमान स्त्री होती, असे मत इतिहास तज्ज्ञ आशाराणी व्होरा यांनी व्यक्त केले आहे. स्त्रियांना मताधिकार असावा या मागणीसाठी १९१७ मध्ये लॉर्ड माँटेग्यू यांना भेटलेल्या महिला समितीच्या त्या सदस्य होत्या. अरुणा असफअलीच्या सासूबाई अकबरी बेगम यांनी असहकाराच्या चळवळीत भाग घेतला होता. खिलाफत व असहकाराच्या चळवळीत मुस्लिम स्त्रियांनी भाग घ्यावा, याबाबत त्यांची आग्रही भूमिका होती. महमद अली व शौकत अली या खिलाफत नेत्यांची आई ‘बी अमन’ हिने खिलाफत व असहकाराच्या चळवळीत काम केले. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे दफन खादीच्या कपडय़ात झाले.
बद्द्रुद्दीन तय्यबजी हे मुंबई उच्चन्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश. त्यांची मोठी मुलगी अमीना तय्यबजीने काँग्रेसच्या अधिवेशनात विषय नियामक समितीवरही काम केले. बडोदा व अहमदाबाद येथील परदेशी मालाच्या होळीत त्यांचा पुढाकार होता. बद्द्रुद्दीनची दुसरी मुलगी सकीना लुकमानीला सविनय कायदेभंगाच्या चळवळीत चार महिने सक्तमजुरी व १०० रुपये दंड झाला. सकीना त्यावेळी ६५ वर्षांच्या होत्या. होत्या. धाकटी बहीण सफिया जबीरअली, वहिनी अख्तर तय्यबजी यांचाही या आंदोलनात सहभाग होता. अब्बास तय्यबजी यांची मुलगी रेहना तय्यबजी यांनी आजन्म देशसेवेला वाहून घेतले होते. त्या कडव्या गांधीवादी होत्या. रेहना तय्यबजींना गांधीजी आपल्या मुलीप्रमाणे मानीत. त्या दोघांचा पत्रव्यवहार प्रसिद्ध आहे. कुराणाबरोबरच त्यांची कृष्णावरही भक्ती होती. येरवडा जेलमध्ये त्या भजने गात. त्यांचे सर्व आयुष्य साबरमती व दिल्लीच्या गांधी आश्रमात गेले. तय्यबजी कुटुंबातील फातिमा तय्यबजी, हमीदा तय्यबजी यांनीही स्वातंत्र्याच्या लढय़ात भाग घेऊन शिक्षा भोगली. अस्पृश्यता निर्मूलन व शिक्षणविषयक कामात तय्यबजी कुटुंबातील सर्वच स्त्रियांचा पुढाकार दिसतो.
सोफिया सोमजी ही मुंबईतील विद्यार्थिनी. तिला १९३०च्या सविनय कायदेभंगाच्या लढय़ात ४ महिन्यांची शिक्षा झाली. त्यानंतर काँग्रेस सेवा-दलाच्या कामाला त्यांनी वाहून घेतले. त्या काँग्रेस सेवा-दल प्रमुख होत्या. १९४२च्या काँग्रेस अधिवेशनाची संपूर्ण जबाबदारी सोफिया खानवर होती. ८ ऑगस्ट १९४२ला गवालिया टँकवरच त्यांना अटक झाली. एक मुलगा जेमतेम २ वर्षांचा व दुसरा ६ महिन्यांचा होता. मुलाचे आजारपणा वाढल्याने त्यांना सोडून देण्यात आले. त्या दोन वर्षे जेलमध्ये होत्या. खान कुटुंब स्वातंत्र्यानंतर सरहद प्रांतात गेले. पती व मुलेही तिकडेच गेली. सोफियाने जाण्यास बराच विरोध केला. पण आईला मुलाशिवाय व मुलांना आईशिवाय राहणे कठीण होते. नाइलाजाने त्या पाकिस्तानात गेल्या. दोन-तीन वर्षांतच त्या मुंबईला परत आल्या, त्या परत न जाण्याच्या निश्चयाने. मुंबईत जन्मले व मुंबईतच मरणार हा त्यांचा निर्धार त्यांनी खरा केला. १९६२ साली त्या पैगंबरवासी झाल्या.
म. गांधींच्या चळवळीत ज्याप्रमाणे स्त्रियांचा मोठा सहभाग होता, त्याप्रमाणेच सुभाषबाबूंच्या आझाद हिंद फौजेत स्त्रियांचा मोठा सहभाग होता. आझाद हिंद फौजेच्या झांशी रेजिमेंटमध्ये नसिफा नावाची १५ वर्षांची मुलगी घरातून पळून जाऊन राणी झाशी रेजिमेंटमध्ये भरती होण्यासाठी आली. घरची परवानगी असल्याशिवाय रेजिमेंटमध्ये भरती होता येत नसे. तिला घरी परत नेण्यासाठी आलेल्या आईबापांनी तिला ती आपल्यासाठीही मेली असे समजू, असे सांगितले. नसिफाने आपल्याकडील सर्व वस्तू बहिणीकडे दिल्या आणि म्हटले, ‘हे सर्व दफन करा. मी खरेच मेले आहे. आज माझा देशाच्या स्वातंत्र्यासाठी पुनर्जन्म झाला आहे.’
भारतीय स्वातंत्र्य युद्धात १८५७ पासून १९४७ पर्यंत अनेक मुस्लिम महिला सहभागी झाल्या. त्यांचे घराबाहेर पडणे व लढय़ात सहभागी होणे, हे फार मोठे दिव्य होते. सामाजिक बंधने, अंधश्रद्धा व अतिरेकी धार्मिक भावना यांची बंधने तोडून स्वातंत्र्य लढय़ात भाग घेणाऱ्या या स्त्रियांचे देशप्रेम व काम हे इतरांपेक्षा जराही कमी नव्हते. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या ज्ञात व अज्ञात मुस्लिम भगिनींना येत्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी हा लेख-प्रपंच.
रोहिणी गवाणकर