Leading International Marathi News Daily
शनिवार, ८ ऑगस्ट २००९
  महिलांच्या मुठीत मोबाइल!
  मोबाइल न वापरणाऱ्या काही मान्यवरांची ही भूमिका-
  मोबाइल एन्फोटेन्मेंट
  पण बोलणार आहे!
एकमेव.. अद्वितीय!
  व्हय़ू पॉइंट : वैर
  विज्ञानमयी
  मोबाइल वापरताना जरा जपून..
  कुठे गेले हे पदार्थ?
  स्वातंत्र्याचा लढा व भारतीय मुस्लिम महिला
  चिकन सूप... :
दुर्लक्षित थडगं
  'ति'चं मनोगत : कृतार्थ मी
  कवितेच्य़ा वाटेवर :
उशिराचा पाऊस
  ललित : मैत्र
  सक्षम मी : ‘सत्ताकारणासाठी आम्ही तय्यार आहोत!’
  ‘स्टार्स ऑफ एशिया’
  ललित - भिशी

 

'ति'चं मनोगत : कृतार्थ मी
सिनेसृष्टी आणि त्यातले तारेतारका ही तर मराठी मनावर अधिराज्य करणारी त्यांच्या ‘मर्मबंधातली ठेव’ म्हणूनच या कलावंतांच्या पडद्याबाहेरील जीवनाबद्दलही तमाम रसिकांच्या मनात उत्सुकता असते. आणि त्यामुळेच त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रांना उदंड प्रसिद्धीही मिळते. आज अशाच दोन ख्यातनाम चित्रतारकांच्या आत्मचरित्रांविषयी जाणून घेऊ. नानाविध भूमिकांमध्ये आपल्या आत्म्याचे रंग भरणाऱ्या व नुकत्याच काळाच्या पडद्याआड गेलेल्या जयश्री गडकर यांचे ‘अशी मी जयश्री’ आणि सोज्वळ चेहऱ्याच्या गुणवान अभिनेत्री सीमा देव यांचे ‘सुवासिनी.’
१९४२ साली कारवार जिल्ह्यातल्या सदाशिवगड या गावी एका सामान्य कुटुंबात जयश्रीबाईंचा जन्म झाला. मूळच्या मीना, नंतर जया, जयश्री या नावाने त्या ओळखल्या जाऊ लागल्या. त्या पाच वर्षांच्या असतानाच हे कुटुंब मुंबईला आल्यामुळे त्यांचं पुढचं सगळं शिक्षण मुंबईला झालं. कॉलेज शिक्षण मात्र त्यांच्या नशिबात नव्हतं, पण लहानपणापासून आपल्या भविष्याविषयीची स्वप्नं रंगवणं त्यांना खूप आवडायचं. नृत्य-गायनाची आवड असल्यामुळे कलाक्षेत्राकडे त्यांचा विशेष ओढा होता. लहान असताना चोरून सिनेमा पाहिल्याच्या आठवणीही जयश्रीबाई सांगतात. खाऊच्या पैशातून आठ-दहा दिवसांतून एक तरी चित्रपट पाहिला जात असे, पण एकदा आईच्या पर्समधून पैसे घेऊन चित्रपट पाहण्याचं धाडस मात्र चांगलंच अंगाशी आलं. कारण आईनं तापत्या पलित्यानं डागलं आणि तेव्हापासून चोरून सिनेमा पाहणं बंद झालं, पण त्यानंतर नृत्याचं शिक्षण सुरू झालं. जयश्रीबाई गोपीकृष्णांकडून कथ्थक शिकल्या. पुढे त्यांनी गाण्याचेही धडे घेतले. गणेशोत्सवात नाटकं करता करताच जयश्रीबाई हौशी रंगभूमीवर सहजपणे वावरू लागल्या. पण पुढे मात्र सिनेमा आणि नाटक

 

अशी कसरत न करता केवळ चित्रपटांवर त्यांनी आपलं सारं लक्ष केंद्रित केलं. सर्वात प्रथम ‘झनक झनक पायल बाजे’ चित्रपटातल्या समूह नृत्यासाठी त्यांनी आपल्या चेहऱ्याला रंग लावला. आणि मग त्या या रंगात रंगूनच गेल्या.
वयाच्या चौदाव्या वर्षी ही शाळकरी मुलगी एका चित्रपटाची नायिका झाली. ‘गाठ पडली ठका ठका’ हा त्यांचा पहिला चित्रपट. या चित्रपटानंतर मात्र वेगवेगळ्या भूमिकांची त्यांच्याकडे रीघच लागली. ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटानं त्यांचं चित्रपटसृष्टीतलं स्थान पक्क केलं आणि ‘मानिनी’नं त्यावर कळस चढवला. तीक्ष्ण निरीक्षण आणि अफाट ग्रहणशक्ती यांचा त्यांना निरनिराळ्या भूमिका वठवताना चांगलाच उपयोग झाला. एकांतप्रिय स्वभावामुळे भूमिकांवर चिंतन करणे सहजसाध्य झाले. चित्रपटसृष्टीत कोणीच ‘गॉडफादर’ नसल्यामुळे त्यांना स्वत:च स्वत:ला घडवावं लागलं. तमाशाप्रधान चित्रपटातल्या मादक, नखरेल कलावंतिणीपासून घरंदाज, कुलवंत ब्राह्मण कन्येपर्यंत अनेक भूमिकांमधून आपले सर्वस्व ओतणारी ही कलावती, तिला कुणी हिणवलं, डिवचलं की पेटून उठत असे. एके ठिकाणी त्या म्हणतात- ‘‘त्यांनी माझ्यावर फार मोठा विश्वास टाकून ही एवढी अवघड भूमिका मला दिली होती. तेव्हा मला त्यांच्या नि माझ्या चाहत्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आणि माझ्या हितशत्रूंचा नक्षा उतरविण्यासाठी ही मानिनी मालती अत्यंत प्रभावीपणे वठविणं आवश्यकच होतं. आता माझ्या ती प्रतिष्ठेची बाब बनली. मला कोणी डिवचलं, माझ्या अस्मितेला धक्का दिला की मला ते कदापि सहन होत नाही. माझा अहंकार जागा होतो आणि एकदा मी पेटून उठले की, कोणतंही आव्हान स्वीकारायला सिद्ध होते. माझा हा स्वभावधर्मच आहे.’’
आपण स्वीकारलेल्या अनेकविध भूमिकांबद्दल बोलताना जयश्रीबाई त्या व्यक्तिरेखांचे वेगवेगळे पदर ज्या तऱ्हेने उलगडतात, त्यावरून कोणतीही भूमिका साकारताना त्या व्यक्तिरेखेच्या आत शिरण्याचा आणि ती व्यक्तिरेखा आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न त्या कशा करीत असाव्यात, हे लक्षात येतं. भूमिकेत समरस होण्याचं कसब तर त्यांनी साध्य केलं होतंच, पण त्याचबरोबर ती भूमिका जिवंत वाटावी, अस्सल वाटावी म्हणून विशेष परिश्रम घेण्याचीही त्यांची तयारी असे. भक्तिभावाने ओथंबलेली व्यक्तिरेखा साकार करताना प्राणप्रिय असलेली मासळी आपल्या आहारातून सहा-सहा महिने वज्र्य करीत शुचिर्भूत अंत:करणाने त्या कॅमेऱ्यासमोर जात. श्रद्धापूर्वक अभिनयाची साधना करणारी शब्दांशिवाय केवळ हावभावातूनच सारे काही सांगून टाकणारी ही समर्थ अभिनेत्री पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतही ताठ मानेनं आणि ताठ कण्यानं वावरली.
शूटिंगदरम्यान आपल्याला झालेल्या अनेक अपघातांचे किस्सेही जयश्रीबाईंनी आपल्या आत्मचरित्रात कथन केले आहेत, असे अपघात होणे स्वाभाविक असले तरी दृश्य जिवंत करण्यासाठी घेतलेला धोका, साहसी वृत्तीतून डमी वापरायला दिलेला नकार आणि मुख्य म्हणजे आपल्या व्यवसायाशी असलेल्या निष्ठेतून, समर्पण वृत्तीतून त्यांच्या जीवनात घडलेल्या अशा काही प्रसंगांनी तर त्यांचे शरीर कायमचे खिळखिळे केले होते.
स्वत:च्या ताकदीचा अंदाज असलेली ही नायिका आपल्यातला कलाकार घडवणाऱ्या सर्व दिग्दर्शकांबद्दल अखेरीस कृतज्ञतेची भावना व्यक्त करते. चित्रपटसृष्टीतल्या बऱ्या-वाईट अनुभवांनी पोळलेल्या जयश्रीबाईंनी आपल्या या प्रवासात अनुभवलेलं, काळजात साठलेलं भडभडून बोलण्यासाठी हा आत्मचरित्राचा प्रपंच केला. या वलयांकित क्षेत्रात प्रसिद्धी पचवणंही कठीण आणि वलयातून बाहेर फेकलं जाण्याचा काळोख सोसणं तर त्याहूनही कठीण. अशा झगमगाटात इतकी र्वष वावरत, वेगवेगळ्या माणसांचा अनुभव गाठीशी बांधत व बाळ धुरी या कलावंत जोडीदाराबरोबर, एका अपत्यासह संसारसुख व परमोच्च मातृत्वसुख अनुभवत ‘याचसाठी केला होता सारा अट्टहास’ या कृतकृत्यतेच्या जाणिवेतून या अभिनेत्रीने अखेर जगाचा निरोप घेतला.
चित्रतारकांच्या दालनात आपल्या वेगळ्याच रंगानं खुलून दिसणारं सीमा देव यांचं ‘सुवासिनी’ हे आत्मचरित्र. केवळ आर्थिक कारणांसाठी त्यांचा चित्रपटसृष्टीत झाला. पण मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर सिनेसृष्टीत घट्ट पाय रोवून आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या सीमा देव यांचं हे साध्या, सरळ भाषेतलं पण अत्यंत रसाळ निवेदन आणि सिनेसृष्टीतल्या त्यांच्या ‘जिवाचा सखा’ रमेश देव या जोडीदाराबरोबरच्या सहजीवनाची मनोवेधक कहाणी.
दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडावी इतक्या हलाखीत सीमा देव यांचं बालपण गेलं. गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडून चित्रपट व्यवसाय जवळ करावा लागला. अभिनयाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नसल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांना नामुष्की पत्करावी लागली, पण त्यातूनच ईर्षेने पेटून त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. आणि एका असामान्य जिद्दीतून आपल्यातला कलाकार घडवला. राजा परांजपे यांना त्या गुरुस्थानी मानत. त्यांनी या हिऱ्याला पैलू पाडले आणि ‘जगाच्या पाठीवर’ चित्रपटातल्या अंध भिकारणीसारख्या अनेक व्यक्तिरेखांमधून त्यांच्यातला कलावंत चमकू लागला.
बालपणातील दारिद्रय़ाच्या हकिकतींनी आत्मचरित्राला सुरुवात करीत फिल्मिस्तान स्टुडिओत प्रवेश केल्यानंतर झालेल्या पहिल्या कराराची घटनाही सीमा देव सांगतात. चित्रपटासाठी ‘सीमा’ हे नामकरण झाल्याची घटनाही त्यांना महत्त्वाची वाटते. त्यानंतर रमेश देव प्रथमच आपले प्रेम व्यक्त करतात, त्या घटनेचे वर्णन करून त्यांच्याबरोबरच्या रुसव्या-फुगव्यांचे अनेक प्रसंग सांगत अखेरीस अनेक दिवस चालू असलेले भांडण रमेश देव कसे मिटवतात या घटनेचाही उल्लेख सीमाताई आवर्जून करतात. पुढे त्यांच्या लग्नसोहळ्याच्या त्यांनी केलेल्या सविस्तर वर्णनातून त्या घटनेचे त्यांच्या जीवनात असलेले महत्त्व अधोरेखित होते. सीमाताईंनी रमेश देवांशी नाते जोडले. ज्याच्यावर मनापासून प्रेम केले, त्यालाच वरले, सावरले आणि त्याच्याबरोबरच कुटुंब थाटून संसारसौख्यही अनुभवले.
आत्मचरित्राच्या दुसऱ्या टप्प्यात, अजिंक्य आणि अभिनयच्या जन्मानंतर चित्रपट- नाटकातील तसेच हिंदी चित्रपटांमधील चरित्र भूमिकांच्या व्यस्ततेबरोबरच मुलांसमवेत वेळ घालवण्यासाठी केलेल्या अनेक कसरतींचीही माहिती सीमाताई पुरवतात. वेळी-अवेळी घराबाहेर राहावे लागले तरी त्यांचे आपल्या मुलांवर चोख लक्ष होते. त्यांच्या सर्वागीण विकासासाठी आणि उत्तम भविष्यासाठीही या कलावतीने अविरत धडपड केल्याचेही आपल्या लक्षात येते. व्यक्तिगत जीवनात घडलेल्या अनेक प्रसंगांमध्येही अजिंक्यच्या पहिल्या प्रीमियरची आणि रमेश देव यांच्या बायपास सर्जरीची घटना त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाची असल्याचेही आपल्याला जाणवते. रमेश देव यांच्या सर्जरीचे हेलावून टाकणारे वर्णन व त्यांना धीर देतानाचे ‘ऑपरेशन तर माझ्या हृदयाचे आहे. तुमचे हृदय तर माझ्याकडे सुरक्षित आहे’ हे सीमा देव यांचे अप्रतिम उद्गार म्हणजे त्यांच्या जोडीदारावरच्या उत्कट प्रेमाची साक्ष पटवणारा त्यांच्या सहजीवनाचा चरमबिंदू!
चित्रपटसृष्टीतल्या निसरडय़ा वाटेवरूनही तोल सावरून स्वत:चा आब राखणाऱ्या, स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या सीमा देव यांची आत्मचरित्रातून प्रकट होणारी सुसंस्कारित प्रतिमा वाचकांच्याही मनात त्यांच्याविषयी आदर निर्माण करते. एकूणच, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला सौम्य मृदूपणा, ऋजुता, जीवनाविषयीची अपार समज, वाजवी आकांक्षा, संयमित वर्तन आणि समाधानी वृत्तीही या आत्मचरित्रातून वारंवार प्रकट होत राहते. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात जीवघेण्या तडजोडी नाहीत की इतरांशी असलेल्या संबंधातले ताणेबाणे नाहीत. आहे ती संतुष्ट, सफल जीवनाविषयीची कृतार्थ जाणीव! अर्थात त्यांच्या या तृप्त, समाधानी जीवनाचे रहस्य त्यांच्या समंजस, सुजाण व्यक्तिमत्त्वात आणि मूल्याधिष्ठित जीवनप्रणालीत असल्याचे जाणवते. आपण काय करू शकतो याचं उत्तम भान तर त्यांना होतंच, पण शांत, सौख्यप्रू्ण जीवन जगण्यासाठी आपल्या अग्रक्रमांमध्ये बदल करण्याचं चातुर्यही त्यांच्याकडे होतं. वस्तुत: गरिबीमुळे सीमा देव चित्रपटातून कामे करू लागल्या, पण आर्थिक स्थैर्य आल्यानंतर मात्र आपली मुलं हीच त्यांच्या आयुष्याचा प्राधान्यक्रम बनली. अर्थात यामुळे त्यांच्या मनातले पेच काही अंशी कमी झाले असतील, कौटुंबिक सौख्य अबाधित राहिले असेल; परंतु यामुळे त्यांच्यातला कलाकार मात्र पूर्ण रूपात फुलू शकला नसल्याचे कुठेतरी सतत जाणवत राहते. तसे पाहता रमेश देव- सीमा देव या जोडीने अनेक चित्रपटांमधून बरोबर कामे केली, परंतु सीमा देव यांची मुलांसाठी जी घालमेल होत असे, तशी घालमेल रमेश देव यांची झाल्याचे त्यांच्या ‘या सुखांनो या’ या आत्मचरित्रातून व्यक्त झाल्याचे कुठेच दिसत नाही. कलाप्रांतात मनमुराद मुशाफिरी करणाऱ्या रमेश देव यांना कोणत्याही कारणाने आपल्या आकांक्षांना चाप लावावे लागले नाहीत. सीमा देव यांनी आपल्या महत्त्वाकांक्षेला स्वखुशीने लगाम लावले असले, तरी आपल्यातल्या कलाकाराला असे अकाली मारून टाकावे लागत असल्याचे दु:ख काही स्त्रियांना निश्चितच सोसावे लागत असणार. मुळात एखाद्या कलेला आपले जीवन सर्वस्व मानून उन्मुक्तपणे कलानिर्मितीची झिंग अनुभवणे, त्यातील नवनवीन आव्हाने अंगावर घेत स्वत:ला शोधणे, फुलवणे पुरुषांना सहज शक्य होते, म्हणजे पुरुषांसाठी सारे आकाश खुले, पण स्त्रीला मात्र पुरुषाप्रमाणे आकाशात मुक्तपणे विहार करतानाचा आनंद मिळू नये अशी स्थिती!
डॉ. उज्ज्वला करंडे
ujwala.karande@yahoo.com