Leading International Marathi News Daily
शनिवार, ८ ऑगस्ट २००९
  महिलांच्या मुठीत मोबाइल!
  मोबाइल न वापरणाऱ्या काही मान्यवरांची ही भूमिका-
  मोबाइल एन्फोटेन्मेंट
  पण बोलणार आहे!
एकमेव.. अद्वितीय!
  व्हय़ू पॉइंट : वैर
  विज्ञानमयी
  मोबाइल वापरताना जरा जपून..
  कुठे गेले हे पदार्थ?
  स्वातंत्र्याचा लढा व भारतीय मुस्लिम महिला
  चिकन सूप... :
दुर्लक्षित थडगं
  'ति'चं मनोगत : कृतार्थ मी
  कवितेच्य़ा वाटेवर :
उशिराचा पाऊस
  ललित : मैत्र
  सक्षम मी : ‘सत्ताकारणासाठी आम्ही तय्यार आहोत!’
  ‘स्टार्स ऑफ एशिया’
  ललित - भिशी

 

कवितेच्य़ा वाटेवर : उशिराचा पाऊस
असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा
टिपून ल्यावा पापण्यांवरती, कपाळीच्या घामामध्ये मिळवावा
- उशिरा आला आहे पाऊस. उशिरा म्हणजे यायची वेळ निघून गेल्यावर. ठरल्या वेळी आलाच नाही तो. त्याच्या येण्याची वेळ माहीत असतेच ना आपल्याला. म्हणून तर आपली तलखी आपण सहन करत राहतो. सहन करतो उन्हाच्या बेफाम झळा. गरम धुळीचे लोट अंगावर घेत राहतो. भेगाळ जमिनीचे तडे पाहतो कोरडय़ा डोळ्यांनी. पाण्यावाचून करपणाऱ्या पिकांना मरताना पाहून हताश होतो.
आपली तहान, आपली वणवण, आपली कासाविशी.. ‘तो येईल’ या एका आशेपाशी सगळं तगमगत थांबलेलं असतं. तो येईल आणि हे सोसणं थांबेल, असं माहिती असतं आपल्याला. मग त्या पावसाला सुख म्हणा की माणूस म्हणा- त्याच्या येण्यानं आयुष्याचा उन्हाळा होणं थांबणार आहे. जीव शीतळ होतजाणार आहे. आपल्यासाठी तोच एक असा आहे, की जो आपला मरणशोष मिटवणार आहे. नवे फुटवे आणणार आहे आपल्याला.
आणि हे त्याला माहीत आहेच. त्याच्या येण्याशी गुंतलेली आपली आशा त्याला माहीत आहे. म्हणून तर तो येणार आहे! पण असं असूनही उशिरा आला आहे तो. सगळं असह्य़ झाल्यावर. सगळ्याचा कडेलोट झाल्यावर. कवी अनिलांच्या कवितेला

 

सगळं ठाऊक आहे. तरीही ती सांगते आहे की, त्या पावसाला, त्या सुखाला नाकारायचं नाही. पाठ फिरवायची नाही त्याच्याकडे रागावून. उलट हात पसरायचे. तळव्यांवर ते थेंब झेलून घ्यायचे. डोळे मिटून घेत पापण्यांवर त्याचे नाजूक तुषार ल्यायचे.
या कवितेला आपल्या आधीच्या अवस्थेची कल्पना आहे. पुरी पुरी आहे. तिला जाणीव आहे त्या सगळ्या सोसण्याची. आपल्या शरीर-मनाची तडफड माहीत आहे तिला. म्हणून तर ती सांगते आहे- ‘टिपून ल्यावा पापण्यांवरती, कपाळीच्या घामामध्ये मिळवावा..’ आपल्या तापल्या शरीराची, कपाळीच्या घामाची जाणीव आहे तिला; तरी पाऊस भोगायला सांगते आहे ती आपल्याला. ती परिणामांबद्दल बोलत नाही, कृती करायला सांगते आहे.
पण परिणाम आपल्याला जाणवताहेत. तळहातावर ते ओले थेंब झरू लागले की काय होतं, मिटल्या पापण्यांवर तुषार पडू लागले की काय होतं, हे आपल्याला आतून कळतंच आहे. सोसण्याने सुन्न, बधिर झालेल्या ज्ञानेंद्रियांना येणारी जाग आणि होणारी सुखाची संवेदना अनुभवतो आहोत आपण. हळूहळू तो पाऊस आपल्यात उतरू देतो आहोत.
डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा
कोरडे पडले ओठ उघडून, वरच्यावरती चुंबून घ्यावा
कशी शब्दांची निवड करत जातेय ही कविता. कोरडे पडलेले आपले ओठ आणि त्याचा निथळता ओलावा. आधी पाऊस झेलायचा, मग ल्यायचा, मग घामात मिळवायचा, मग पेरायचा, नंतर चुंबून घ्यायचा आणि मग त्याला उराशी घट्ट धरून त्याच्याशी कोडकौतुकाचा खेळ खेळायचा. आणि आपलं शरीर? डोकं, पाठ- सर्वागी भिजणं. ओठ सुकलेले, त्यावर ते ओले थेंब. धारेने झरणारे. सगळीकडे एकच एक पाऊस माखून घ्यावा. सगळ्या त्वचेवर झिरपू द्यावा तो. त्याला सगळ्या शरीरानं आत घ्यावा. शांत व्हावं.
पण मनाचं काय? त्यानं वेळ पाळली नाही म्हणून उठलेल्या आकांताचं काय? तोपर्यंत तग धरून राहिलेल्या आणि नंतर सगळं असह्य़ होऊन कोलमडलेल्या आपल्या आशेचं काय? आणि सहनशक्तीचा अंत झाल्यावर वाळून गेलेल्या आपल्या संवेदनांचं काय?
किती अधिर होतो आपण! मन किती हताश झाले! किती कोमेजलो, किती नाराज झालो, किती किती रागावलो! तो आपला राग, तो क्षोभ नाही सांगायचा त्याला? त्याला नाही शरमिंदं करायचं? नाही दुखवायचं?
का नाही? येतो, येतो म्हणत त्यानं कितीदा तरी हूल दाखवली. खोटी आश्वासनं दिली. लबाडी केली. त्यानं केलेली टाळाटाळ, न येण्याची त्यानं दिलेली नसती कारणं, त्याच्या लंगडय़ा सबबी.. त्याचं वागणं कसं होतं, हे माहीत नाही का आपल्याला? कितीदा काळे ढग येऊन गेले क्षितिजावर. कितीदा वारा सुटला थोडा. वाटलं, ‘येणारच तो; आलाच.’ पण खोटाच भरवसा होता तो. सुखाचा क्षण आत्ता येईल म्हणता म्हणता हूलच दाखवली नुसती त्यानं. पण खरं तर हेही सगळं माहीत आहेच की या कवितेला. तरी ती समजुतीनं म्हणते आहे-
त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे
खोटे भरवसे देत रहाणे, बहाणे सांगणे, वेळा चुकवणे
त्याला बोलायचं नाही काही. त्याच्या अशा-तशा वागण्याची त्याला ओळख मुळी द्यायचीच नाही. आणि आपल्याबद्दल? आपल्या मनाच्या अवस्थेबद्दल? तेही काही सांगायचं नाही. तक्रार करायची नाही. दु:ख बोलायचं नाही. कदाचित आपण सगळं मागे ठेवून त्याला समजून घेतलं, त्याला जवळ घेतलं, हे त्याला जाणवेल आणि तोच आपलं वागणं बदलेल. आपलं प्रेम, आपली काळजी त्याच्यापर्यंत आपोआप, न बोलता पोचेल आणि आपण केलेल्या कौतुकानं तोही शहाणा होईल. असं होईलही कदाचित. म्हणून मग आपण त्याची किती वाट पाहिली! तो आला नाही तेव्हा त्याच्या काळजीनं आपण कसे सैरभैर झालो! नाना पापशंका मनात येऊन आपला जीव कसा उडून गेला! काही म्हणता काही बोलायचंच नाही.
सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, वाट पाहणे, अधिर होणे
पाप शंका मनी उभ्या ठाकणे, पोटी धस्स होणे, धुसफुसणे
त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा
पाटघडय़ांवर बसवून त्याशी कोडकौतुकाचा खेळ खेळावा
पुष्कळदा आयुष्यात असं होतं. जे मिळणार मिळणार म्हणून वाटत असतं, ते हवं तेव्हा मिळत नाही. मिळतं ते खूप उशिरा. ज्याची वाट पाहतो आपण- ते लाभतं, पण तेव्हा त्यातली चव निघून गेलेली असते. उमेद संपलेली असते.
जी. ए. कुलकर्णीनी एके ठिकाणी लिहिलं आहे की, ‘काही गोष्टी योग्य वेळी झाल्या की माहेरवाशिणीसारख्या सुखानं भरतात.’ गोष्टी योग्य वेळी घडणं हे आपल्या हाती असत नाही. आपल्या हाती असतं ते सहन करणं, वाट पाहणं, धीर धरणं. कधी कधी या सगळ्यामधून जाताना माणूस इतकं थकतं, की मग ज्याची वाट पाहिली, त्याचं उशिरानं स्वागत करण्याची ताकदही उरत नाही. ओठावर कधी रागाची किंवा दु:खाची कडवट चव राहते. शब्दांमध्ये कधी हताशा, कधी विखार भरतो. बोरकरांसारखा एखादा कवी त्या उशिरा आलेल्या सुखाच्या क्षणाला सखीच्या रूपात पाहतो आणि विचारतो-
मंदावता सगळी उन्हे, आलीस का उशिरा अशी?
थंडावता झळुनी वने, झडलीस का सर गारशी?
अर्थात शेवटी बोरकरही अनिलांसारखाच तिचा समजूतदार स्वीकार करतात; पण त्यांची तिला प्रश्न विचारण्याची आणि तिचा स्वीकार करण्याची रीत अनिलांसारखी विचूक, रेखीव नाही. ती उसळत्या भावनेची, शब्दांनी उमडून जाणारी आहे. बोलताना काही मागे ठेवणं तिला जमणारं नाही. ‘जे जे मिळले जीवनी, उशिराच ते आले असे’ हा अनुभवही त्यांच्या भावनेच्या लाटेबरोबर सहज वाहात पुढे आला आहे.
अनिलांची ही पावसाची कविता मात्र अगदी सौम्य आणि समंजस कविता आहे. तिची दशपदी रेखणी जशी नेमकी, तशीच अनुभवाची मांडणीही नेमकी आहे. एकेका शब्दाला त्याची स्वाभाविक जागा देत देत, त्यांच्या अर्थाची सगळी अंगं सांभाळत हलकेच पुढच्या शब्दावर उतरण्याची त्यांची रीत फार मनोज्ञ आहे. शब्दाच्या अलिकडचं आणि पलीकडचं पुष्कळ काही त्यांना वेचता येतं. नादाची आणि तालाची एकमेकांशी सूक्ष्म जोडणी करता येते. कवितेतला अनुभव काळजीनं सांभाळावा तो अनिलांच्या कवितेनं!
या कवितेतही ते सगळं आपल्याला जाणवतंच ना! तिच्यामागे असणारं अनिलांचं प्रगल्भ आणि परिणत असं व्यक्तिमत्त्वही जाणवतं. आपल्याला शांत करणारं. समजावणारं. आयुष्याला सामोरं जाण्याची एक शहाणी रीत ते शिकवतात. त्रागा, संताप, निराशा, दु:ख या नकारांकडून ते आपल्याला होकारांकडे घेऊन जातात. ‘हो’ म्हणायला सांगतात. त्या होकाराचे परिणाम थांबून, शांतवून अनुभवायला सांगतात.
जगणं भिजू द्यावं. ते तसं भिजलं तरच मग ओल आतपर्यंत झिरपते. नवीनपणाच्या बिया रुजतात. पाणथळी निर्माण होतात. टिकतात. हिरवे आणि निळे रंग तुम्हाला दिलासा आणि शांतता देत राहतात. हे सगळं अनिलांनी थेट शब्दांत नाही मांडलं. त्यांच्या शब्दांनी ते जागवलं आणि बरोबर आणलं. अशा समजूतदार आणि शहाण्या कविता काही नेहमी भेटत नाहीत.
अरुणा ढेरे