Leading International Marathi News Daily
शनिवार, ८ ऑगस्ट २००९
  महिलांच्या मुठीत मोबाइल!
  मोबाइल न वापरणाऱ्या काही मान्यवरांची ही भूमिका-
  मोबाइल एन्फोटेन्मेंट
  पण बोलणार आहे!
एकमेव.. अद्वितीय!
  व्हय़ू पॉइंट : वैर
  विज्ञानमयी
  मोबाइल वापरताना जरा जपून..
  कुठे गेले हे पदार्थ?
  स्वातंत्र्याचा लढा व भारतीय मुस्लिम महिला
  चिकन सूप... :
दुर्लक्षित थडगं
  'ति'चं मनोगत : कृतार्थ मी
  कवितेच्य़ा वाटेवर :
उशिराचा पाऊस
  ललित : मैत्र
  सक्षम मी : ‘सत्ताकारणासाठी आम्ही तय्यार आहोत!’
  ‘स्टार्स ऑफ एशिया’
  ललित - भिशी

 

ललित : मैत्र
मैत्री म्हणजे माणसाच्या जीवनवेलीवर फुलणारं नाजूक, सदाबहार आणि मनाला प्रसन्नता देणारं एक सुंदर फूल! असं म्हणतात की, रक्ताची नाती ही माणसाला जन्मापासूनच चिकटलेली असतात, पण माणूस मात्र आपलं मैत्र आपल्या आवडीनुसार निवडत असतो. कदाचित त्याचमुळे मैत्रीचं हे नातं दीर्घकाळ टिकणारं असतं.
मैत्री कधीही, कोणाशीही होऊ शकते. मैत्रीला लिंगभेद, स्थळ, काळ, वेळेचं बंधन नसतं. शिवाय तीत वयाचाही अडसर नसतो. दोन व्यक्तींच्या विचार-आचाराच्या तारा जुळल्या की सहजगत्या मैत्रीचे बंध जुळतात. गरिबी-श्रीमंतीचा भेदभाव मैत्रीत नसतो. त्यामुळेच कदाचित शेजारपाजार, शाळा-कॉलेज, नोकरी- व्यवसाय, आपल्या मुलांच्या मित्र-मैत्रिणींच्या आई-वडिलांशी, देश-परदेशातील व्यक्तींशी आपली चांगली मैत्री होऊ शकते.
मैत्रीवर कितीतरी कथा, कविता, सिनेमे, गाणी आहेत. शिवाय हे सगळं कमी की काय म्हणून नवीन मैत्री करण्यासाठी अथवा

 

असलेली मैत्री जपण्यासाठी एक खास दिवसही राखलेला असतो. त्या दिवशी आपण आपले सगळे कामधाम बाजूला ठेवून किंवा त्या दिवसातील काही क्षण तरी आपल्या परममित्राबरोबर आनंदाने घालवायचे आणि त्या आठवणींचा सुगंध आयुष्यभर जपून ठेवायचा. मैत्री म्हटली की मला माझ्या एका आगळ्या- वेगळ्या मैत्रिणीची- म्हणजे अर्चनाच्या सासूची आठवण येते.
आता तुम्ही म्हणाल, ‘ही अर्चना कोण? तुझी मैत्रीण अर्चना की तिची सासू?’ तर दोघीही माझ्या मैत्रिणीच! माझी अन् अर्चनाची मैत्री जमली ती माझ्या मुलामुळे. माझ्या मुलाच्या मित्राची ती आई. शाळेच्या मीटिंगला, शाळेतून आणायला- न्यायला, कधी आपला मुलगा शाळेत गैरहजर असला तर अभ्यासासाठी वह्य़ा घ्यायला म्हणून, तर कधी हळदी-कुंकवासाठी म्हणून आम्ही एकमेकींकडे जायचो. मी तिच्या घरी गेले की थोडय़ाफार गप्पा मारून ती खाणं-पिणं आणण्यासाठी किचनमध्ये जायची आणि साहजिकच तोपर्यंत तिच्या सासूबाई माझ्याशी गप्पा मारायला सुरुवात करायच्या. तिच्या सासूबाईंचं व्यक्तिमत्त्व अगदी प्रसन्न! सून नोकरी करते म्हणून ती येईपर्यंत मुलांना काळजीपूर्वक सांभाळायचं आणि ती आली की तिच्या हवाली मुलं करून आपण घराजवळील बागेत फिरायला, मैत्रिणींना भेटायला जायचं, हा त्यांचा शिरस्ता. त्यांचा स्वभावही अगदी बोलघेवडा. देश-विदेशात त्यांची भटकंती झालेली. त्यामुळे बोलण्यासारखं जवळ बरंच काही. त्यांचं वाचनही दांडगं होतं. आठवडय़ातून एकदा त्या वाचन मंडळातही जायच्या. मी त्यांच्या घरी गेले की त्या मला माझ्या वर्तमानपत्रं व मासिकांत प्रसिद्ध झालेल्या आणि त्यांनी वाचलेल्या कथा-कवितांबद्दल आवर्जून अभिप्राय देत.
२००५ मध्ये माझा कवितासंग्रह प्रकाशित झाला तेव्हा प्रकाशन सोहळ्याला मी त्यांना बोलावलं होतं. पण प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. काही अपरिहार्य कारणांमुळे अर्चनाही आली नाही. परंतु काही दिवसांनी पेपरमध्ये प्रकाशनाची बातमी वाचून आजींनी स्वत:हून फोन केला. ‘ज्योती- अगं, मी आज बातमी वाचली. कार्यक्रमाला येऊ शकले नाही, पण पुस्तक पाठवून दे. नाहीतर असं कर- तू स्वत:च घेऊन ये..’ त्यांनी मला सांगितलं.
मी मला वेळ मिळाला तेव्हा त्यांच्या घरी गेले. त्यांच्या पाया पडून हातात पुस्तक दिलं. ‘छान काढलंय हो पुस्तक. किती पैसे द्यायचे तुझ्या पुस्तकाचे?’ ‘आजी, मी तुमच्याकडून पैसे घेईन का? मी तुम्हाला पुस्तक सप्रेम भेट दिलंय. आत तसं लिहिलेलं आहे.’
‘प्रिय ठोंबरे आजीस.. आदरपूर्वक भेट..’ हे शब्द वाचताच त्या म्हणाल्या, ‘अगं, मी तुला माझी मैत्रीण मानते. अगदी तुझ्या पुस्तकाच्या नावाप्रमाणे ‘प्रिय सखी’. आणि तू चक्क आजी लिहितेय? माझं नाव छान ‘सुधा’ आहे बरं! आता पुढचं पुस्तक देशील तेव्हा चूक दुरूस्त कर. नाही तरी आताशा ही अर्चना म्हणतच असते की, मी तिची मैत्रीण पळवली म्हणून.’
आजींचं बोलणं ऐकून मी हसू लागले. अरे हो, खरंच की! आजकाल आपण अर्चनाऐवजी आजींशीच जास्त बोलू लागलोय! मला आठवलं. अर्चना मला म्हणाली होती, ‘अगं, एवढय़ा मैत्रिणी आहेत त्यांना- तरीही त्यांनी तुला पळवलीच की!’ ‘म्हणजे?’ मी न कळून तिला विचारलं. तेव्हा अर्चनाने खुलासा केला- ‘अगं, माझ्या सासूबाई मुंबईच्याच. शिवाजी पार्कला त्यांचं बालपण गेलंय. अ‍ॅशलेन ही शाळा. कॉलेज रुईया आणि सासर बांद्रा! त्यामुळे त्यांची शाळेपासून असलेली मैत्री अजून टिकून आहे. आता त्यांच्या काही मैत्रिणी गिरगाव, डोंबिवली, दादर, ठाणे अशा ठिकाणी राहायला आहेत, पण महिन्यातून एकदा भिशीचे निमित्त करून सगळ्या एकमेकींना भेटतातच. मलाही त्या मैत्रिणीप्रमाणेच वागवतात.’
‘हो, ते माहिती आहे गं. म्हणूनच सासू-सुना सारख्या कुठे न् कुठे खरेदीला दिसतच असतात. हे सगळं मी आठवत असतानाच माझा काव्यसंग्रह चाळता चाळता त्या मला म्हणाल्या, ‘छान आहेत हो तुझ्या कविता. पण कविता वाचण्यापेक्षा मला त्या म्हणायला किंवा ऐकायला जास्त आवडतात.’ आता हे ऐकताच मी मनातल्या मनात कुठली कविता म्हणावी बरं, याचा विचार करू लागले. तशा त्या मला म्हणाल्या, ‘मी म्हणू का तुझी ही कविता?’ मी कसंबसं आश्चर्याच्या धक्क्यातून स्वत:ला सावरत म्हणाले, ‘हो- हो, म्हणा की!’
मग काय- एक म्हणता म्हणता त्यांनी चक्क चार कविता म्हटल्या! जगण्याची आसक्ती त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होती. डोळ्यांतून आनंद ओसंडून वाहत होता. आणि मी तो आनंद माझ्या डोळ्यांत साठवून घेत होते. त्यांची जगण्यातील छोटय़ा-छोटय़ा गोष्टींचा आनंद घेण्याची वृत्ती मला खूप भावली. माझ्या कवितांचं मनसोक्त वाचन झाल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘आता थोडय़ा वेळाने मी बाहेर जाईन तेव्हा माझ्या मैत्रिणींनाही दाखवेन हो तुझं पुस्तक. आणि म्हणूनही दाखवेन काही कविता!’ मी हसून ‘बरं’ म्हणाले.
असंच एकदा काही कामानिमित्त मी अर्चनाला फोन केला. पण ती घरात नसल्याने फोन आजींनीच उचलला. त्यांनी माझ्या कवितांचं परत कौतुक केलं. त्या म्हणाल्या, ‘आवडल्या हो तुझ्या कविता. पण तू आता इथेच थांबू नकोस. तुझं वाचन अजून वाढव. केशवसुत, कुसुमाग्रजांसारख्या जुन्या कवींच्या कविता वाच. आशा बगे, रवींद्र भट, जोस्त्ना देवधर, सुमती क्षेत्रमाडे यांची पुस्तकं वाच. अगदी रोजच्या जीवनातील गोष्टी ही मंडळी कशा फुलवतात, हे लक्षात घे आणि तसंच लिही. हो- आणि परत मला भेटायला कधी येतेस? मी वाट बघतेय.’ मला त्यांच्या बोलण्याचं, वाचनप्रेमाचं, मला समजावून सांगण्याच्या पद्धतीचं अप्रूप वाटलं.
पुढच्याच महिन्यात त्यांचा वाढदिवस होता. त्यामुळे त्या दिवशी जाऊन त्यांना आश्चर्यचकित करावं असं मी ठरवलं. त्याप्रमाणे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी आइस्क्रीम आणि ढोकळा घेऊन त्यांच्या घरी गेले. तेव्हा त्या त्यांच्या दोन-चार मैत्रिणींना घेऊन मंदिरात चालल्या होत्या. मी त्यांचा वाढदिवस लक्षात ठेवून आल्याने त्या खूश झाल्या. नेहमीप्रमाणे माझं कौतुक करून त्या मला म्हणाल्या, ‘तू एवढं मला खायला आणलंस, पण मला पथ्य आहे हो, काय करणार! गेले १५ दिवस झाले पोटात दुखत होतं. दवाखान्यात होते. आता बरं आहे. पण असू दे.. पोरं खातील खाऊ!’ असं म्हणत मग त्यांनी त्यांच्या मैत्रिणींशी माझी ओळख करून दिली. मी लिहिते, कवयित्री आहे, हेही त्यांना सांगितलं आणि माझ्या हातात एक गिफ्ट पॅक दिला. मी नको, नको म्हणताच मला त्या म्हणाल्या, ‘तू मला तुझं पुस्तक दिलंस, म्हणून माझ्याकडून तुला ही छोटीशी भेट.’ नंतर मी मंदिरात चाललेय, हे कळल्यावर त्या मलाही आग्रहाने त्यांच्याबरोबर मंदिरात घेऊन गेल्या.
मी घरी येताच पटकन् ते गिफ्ट उघडून बघितलं. बघते तर काय? एका काचेच्या शो-पीसवर सिल्व्हर कोटेशनने 'Faithful Friend is a True & crue Treasure.' असं सुंदर अक्षरांत लिहिलेलं होतं. अर्चनाने मला सांगितलं की, ते गिफ्ट त्यांनी स्वत: जाऊन आणलंय. ठोंबरे आजीच्या माझ्यावरील या अकृत्रिम प्रेमाने माझे डोळे भरून आले. मी फोन करून त्यांना गिफ्ट आवडल्याचे कळवलं. आमच्या आगळ्यावेगळ्या मैत्रीचं प्रतीक माझ्या सतत डोळ्यासमोर राहावं म्हणून ती फ्रेम मी किचनमध्ये ठेवली.
नंतर बरेच दिवस आमची गाठभेट झाली नाही की फोनाफोनीही झाली नाही. एक दिवस माझा मुलगा शाळेतून घरी आला. इकडचं तिकडचं सांगता सांगता मध्येच काही आठवून म्हणाला, ‘आई, ठोंबरे आजी वारल्या.’ मी पटकन् त्याला म्हटलं, ‘चूप बस. काहीही बोलू नकोस.’ ‘अगं आई, हो. चार दिवस झाले. ईशानने सांगितलं मला. तू त्याच्या आईला फोन करून विचार.’ मला ईशानच्या आईलाच काय, पण अर्चनालाही फोन करायचं धाडस झालं नाही. एक चैतन्य निमालं- या गोष्टीवर माझा विश्वासच बसेना. आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगणाऱ्या, मनानं तरुण असणाऱ्या, देश-विदेशात फिरलेल्या, कलात्मकतेची आवड असणाऱ्या, वाचनाचा छंद जोपासणाऱ्या, माणसं जोडणाऱ्या, मैत्र जोडणाऱ्या ठोंबरे आजी आज आपल्यात नाहीत.. परत कधी भेटणार नाहीत, हे ध्यानी येऊन मी त्यांनी दिलेल्या फ्रेमसमोर माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. नंतर भेटल्यावर अर्चना मला म्हणाली, ‘त्यांच्या मैत्रिणी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना भेटायला दवाखान्यात येत. आजी बऱ्या झाल्या की त्यांना सगळ्यांना केसरीच्या लेडीज स्पेशल टूरवर जायचं होतं. आजही त्या मला फोन करून माझी विचारपूस करतात. अजूनही त्या सगळ्यांनी आपली मैत्री जपलेली आहे.’
मैत्रीला सर्वस्व मानणाऱ्या, मैत्र हाच आपला धर्म मानणाऱ्या ठोंबरे आजींचा प्रसन्न चेहरा मला आजही त्या फ्रेममधल्या अक्षरांतून आमच्या आगळ्यावेगळ्या मैत्रीची आठवण करून देत असतो.
ज्योती कपिले