Leading International Marathi News Daily
शनिवार, ८ ऑगस्ट २००९
  महिलांच्या मुठीत मोबाइल!
  मोबाइल न वापरणाऱ्या काही मान्यवरांची ही भूमिका-
  मोबाइल एन्फोटेन्मेंट
  पण बोलणार आहे!
एकमेव.. अद्वितीय!
  व्हय़ू पॉइंट : वैर
  विज्ञानमयी
  मोबाइल वापरताना जरा जपून..
  कुठे गेले हे पदार्थ?
  स्वातंत्र्याचा लढा व भारतीय मुस्लिम महिला
  चिकन सूप... :
दुर्लक्षित थडगं
  'ति'चं मनोगत : कृतार्थ मी
  कवितेच्य़ा वाटेवर :
उशिराचा पाऊस
  ललित : मैत्र
  सक्षम मी : ‘सत्ताकारणासाठी आम्ही तय्यार आहोत!’
  ‘स्टार्स ऑफ एशिया’
  ललित - भिशी

 

‘स्टार्स ऑफ एशिया’
‘नॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्झव्‍‌र्हेटरी ऑफ जपान’तर्फे ‘स्टार्स ऑफ एशिया’ या प्रकल्पांतर्गत एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सर्व आशियाई राष्ट्रांच्या ‘खगोलशास्त्रीय पुराणकथां’चे संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला. ११ ते १३ मे २००९ दरम्यान झालेल्या या कार्यशाळेसाठी ११ आशियाई राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारतातर्फे मी पुण्याहून गेले होते. या कार्यशाळेत व नंतर झालेल्या संपादकीय मंडळाच्या सभेमध्ये या प्रकल्पाची रूपरेषा आखण्यात आली. त्यामध्ये प्रत्येक राष्ट्राच्या दोन ते चार पुराणकथांचा समावेश पुस्तकाच्या पहिल्या भागात करण्यात येईल, असे ठरले. दुसऱ्या भागात १० वेगवेगळ्या शीर्षकांखाली प्रत्येक राष्ट्राची एक कथा समाविष्ट करण्याचे ठरले. या १० वेगवेगळ्या शीर्षकांपैकी एक भाग स्वतंत्रपणे भारतासाठी ‘युनिव्हर्स ऑफ एंशियंट इंडिया’ या नावाने राखून ठेवण्यात आला आहे. तसेच एक स्वतंत्र भाग ‘युनिव्हर्स ऑफ एन्शियन्ट चायना’ या नावाने राखून ठेवण्यात आला आहे.
खगोलशास्त्रीय पुराणकथा म्हटले की फक्त ग्रीक व रोमन कथाच जगाला माहिती असतात. ‘अपोलो’ पासून ते आताच्या

 

‘ओरॅकल’ या अत्याधुनिक वाटणाऱ्या नावांचे मूळ ग्रीक व रोमन पुराणकथांमध्ये आहे आणि हीच नावं सर्वत्र प्रचलित आहेत. मात्र आशिया खंडातील अनेक देशांमध्ये विशेषत भारताकडे खगोलशास्त्राशी संबंधित पुराणकथांचा केवढा तरी मोठा खजिना आहे, हे जगाला माहितीच नाही. त्यामुळे आशियाई राष्ट्रांच्या खगोलशास्त्रीय पुराणकथा जगासमोर आणण्यासाठी जपानच्या श्री. नोरिओ कैफू, श्रीमती फुमी योशिदा व त्यांचे सहकारी यांनी पुढाकार घेतला आणि या कार्यशाळेचे आयोजन केले.
यंदाचे वर्ष हे ‘इंटरनॅशनल इयर ऑफ अ‍ॅस्ट्रॉलॉजी’ म्हणून साजरे होत आहे. त्यानिमित्ताने आयोजित या कार्यशाळेत भारत, चीन, हाँगकाँग, तैवान, मंगोलिया, पॅसिफिक बेटे, व्हिएतनाम, द.कोरिया, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया, नेपाळ, बांगलादेश आणि जपान या आशियाई राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. काही आशियाई राष्ट्रांच्या पुराणकथांवर भारतीय संस्कृतीचा पगडा बसलेला आहे, तर काहींवर चिनी संस्कृतीचा पगडा जाणवतो.
उदाहरण घ्यायचे झाले तर बांगलादेशचे घेता येईल. बांगलादेशातील खगोलशास्त्रविषयक पुराणकथांवर भारतीय पुराणकथांची छाप पडली आहे, असे म्हणण्यापेक्षा भारतीय पुराणकथाच थोडय़ाफार फरकाने बांगलादेशच्या म्हणून सांगितल्या आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय पुराणातील विश्वाच्या उत्पत्तीसंबंधीचे विवेचन खूपसे आधुनिक कॉस्मॉगॉनीशी (विश्वोत्पत्तीशास्त्र) मिळतेजुळते आहे. बांगलादेशातील पुराणकथांमध्ये हिरण्यगर्व (हिरण्यगर्भ), बिंदू, ब्रह्मा, प्रिथिबी (पृथ्वी), स्वर्गो (स्वर्ग), ध्रुबो (ध्रुव) असे खास हिंदू पुराणातील शब्द येतात.
ध्रुवाची कथा, राहू-केतूची चंद्र-सूर्य ग्रहणासंबंधीची कथा, चंद्राच्या २७ बायका, म्हणजे २७ नक्षत्रांची कथा इ. सर्व कथा हिंदू पुराणकथांसारख्याच आहेत. तसेही बांगलादेश हा पूर्वी भारताचाच एक भाग होता.
नेपाळ हे तर जगातील एकमेव हिंदू राष्ट्र! त्यांच्या कथा म्हणजे अर्थातच आपल्या हिंदू पुराणातल्या कथा आहेत. ध्रुवाची गोष्ट, अगस्तीची (दक्षिणेला उगवठणारा तारा- कॅनॉपसची) गोष्ट, ब्रह्मदेव, रोहिणी (इथे रोहिणीच्या जागी संध्या म्हटलेले आहे) आणि शिवाची गोष्ट (मृगशीर्ष नक्षत्राची- ओरायनची गोष्ट) या गोष्टी सारख्याच आहेत. मात्र मंगळाच्या उत्पत्तीसंबंधीची गोष्ट जरा वेगळी आहे. दक्षप्रजापतीच्या यज्ञाच्या वेळी सतीने यज्ञकुंडात आत्मसमर्पण केल्याचे कळल्यावर शिवाला राग आला. त्यामुळे त्याला खूप घाम आला आमि तो वाहात पृथ्वीवर गेला. त्यातून एक लाल लाल रंगाचा, हजारो हात आणि तोंडे असणारा मुलगा उत्पन्न झाला. त्याने शिवाच्या आज्ञेप्रमाणे दक्ष यज्ञाचा नाश केला. त्यानंतर तो पृथ्वीच्या पोटात शिरून पृथ्वीचा नाश करायला निघाला. तेव्हा त्याला थांबवून शिवाने अंतराळात पाठवून दिले. तो म्हणजे मंगळ.
भारतीय संस्कृतीचा पगडा पार मंगोलियापर्यंत बसल्याचे जाणवते. मूळ भारतीय असलेला व भारतात उदय पावलेला बुद्ध धर्म सुदूर पूर्वेपर्यंत पोहोचल्यामुळे भारतीय संस्कृती सगळ्या पूर्वेकडच्या राष्ट्रांपर्यंत पोहोचली, यात नवल नाही. परंतु बुद्ध काळाच्या आधीच्या रामायण, महाभारत यांचाही जबरदस्त प्रभाव इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, बाली इ. राष्ट्रांवर पडला आहे.
चीनच्या आसपासच्या काही राष्ट्रांवर चिनी संस्कृतीचा प्रभाव असल्याने त्यांच्या पुराणकथांचे मूळ चिनी संस्कृतीत आहे.
चिनी खगोलशास्त्रात एकंदर २८३ तारकासमूहांचा उल्लेख आहे. आकाशातून भ्रमण करताना चंद्र ज्या नक्षत्रातून जातो, त्यांची संख्या आपण २७ आहे अशी मानतो. चीनमध्ये ती २८ आहे, असे मानतात.
हाँगकाँगच्या कथांवर अर्थातच चिनी संस्कृतीचा आणि पुराणकथा व लोककथांचा प्रभाव आहे. हाँगकाँगच्या प्राचीन वाङ्मयात अल्टेर व व्हेगा (म्हणजे आपल्याकडील श्रवण व अभिजित नक्षत्र) यांची गोष्ट येते. व्हेगा म्हणजे त्यांची झीनू ही स्वर्गातली विणकाम करणारी मुलगी (परी) असते आणि निऊलांग हा पृथ्वीवरील गुराखी मुलगा. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडून लग्न करतात. त्यांच्या दुर्दैवाने स्वर्गातल्या देवांना हे आवडत नाही. ते पश्चिमेकडील स्वर्गातील राणी मातेला त्या विणकर परीला परत स्वर्गात आणण्याची आज्ञा देतात. ती आज्ञेचे पालन करून झीनूला घेऊन जात असताना निऊलांग त्यांचा पाठलाग करतो. तो त्यांच्याजवळ पोहोचणार, इतक्यात राणी माता आपल्या केसातल्या सोनेरी हेअरपिनने दोघांच्यामध्ये एक रेषा ओढते. त्यातून एक नदी उत्पन्न होते. ती नदी झीनू व निऊलांग यांना कायमचे अलग करते. त्यांचे एकमेकांवरील प्रेम व त्यांचे दुख बघून लाखो नीलकंठ पक्षी तिथे येतात व त्यांच्यासाठी नदीवर पूल बांधायला सुरुवात करतात. अखेर राणी मातेलाही दया येते आणि ती या दोघांना वर्षांतून एकदा म्हणजे सातव्या चांद्रमासाच्या सातव्या दिवशी भेटायची परवानगी देते. असे हे प्रेमी निऊलांग व झिनू म्हणजे अल्टेर व व्हेगा आणि त्यांच्यामधून वाहणारी नदी म्हणजे आकाशगंगा.
हीच गोष्ट जपानमध्ये ‘तानाबाता’ची गोष्ट म्हणून येते. तसेच कोरियात चिलसिओकची गोष्ट म्हणून, तर व्हिएतनाममध्ये ‘टिच’ ची गोष्ट म्हणून येते. झिनू आणि निऊलांग यांचा भेटण्याचा दिवस म्हणजे सातव्या चांद्रमासाचा सातवा दिवस, म्हणजेच ७ जुलै हा ‘क्वी शी’ नावाचा चिनी उत्सवाचा दिवस आहे. हाच दिवस चीनचा ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून प्रसिद्ध आहे.
ज्या इंडोनेशियन कथा या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यासाठी निवडल्या गेल्या आहेत, त्या मूळच्या इंडोनेशियाच्या असाव्यात. इंडोनेशियन खगोलशास्त्रीय पुराणकथांमध्ये बहुतेक करून चंद्र व सूर्याबद्दलच्या कथा आहेत. त्यांच्यात मृग नक्षत्राला ड्रॅगन समजतात. त्यांच्या कथांमध्ये चंद्राविषयीची एक अतिशय सुंदर अशी कथा येते, ती बोर्निओ बेटातील लोककथा आहे.
किलिप नावाचा एक तरुण छान गायचा व साम्पे नावाचे त्यांचे पारंपरिक वाद्य सुंदर वाजवायचा. एका रात्री तो घराबाहेर साम्पे वाजवत गात बसला होता. पण त्याला कल्पना नव्हती की ती पौर्णिमेची रात्र होती. तो थोडय़ा वेळाने उठून घरात गेला व झोपायची तयारी करू लागला. तेव्हा चंद्राच्या किरणांचे रूपांतर एका सुंदर तरुणीत होताना त्याने पाहिले. ती चंद्राची राजकन्या होती. ती किलिपला म्हणाली की, त्याच्या गायनाने व वादनाने तिची ‘रुहा’ नावाच्या राक्षसापासून सुटका केली. नाहीतर त्याने तिचा प्रकाश पिऊन टाकला असता आणि चंद्राला ग्रहण लागले असते. किलिपने त्यापासून वाचवले होते, म्हणून ती त्याचे आभार मानायला आली होती. जाताना तिने त्याला त्याच्या इच्छा पूर्ण करण्याचे वरदान दिले. इथेही चंद्राला ग्रहण लावणारा राक्षस आहे ‘रुहा.’ राहूच्या ऐवजी रुहा! रुकार व मात्रांची अदलाबदल, एवढंच!
मलेशियामध्ये खगोलशास्त्रीय पुराणकथा त्या मानाने कमी आहेत. ज्या आहेत त्या फक्त चंद्र आणि सूर्याच्या संदर्भात आहेत. मलेशियन कथांमध्ये चंद्राची राजकन्या आणि चंद्राचा राजपुत्र यांची एक कथा येते. हे दोघे चंद्रावरच राहणारे. ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. एक दिवस राजकन्येला राजपुत्राबरोबर फिरत असताना पृथ्वीवरील पांढऱ्या शुभ्र फुलांचा गुच्छ दिसतो. अर्थातच मग तो आणण्यासाठी राजपुत्र जीवावर उदार होऊन निघतो. त्याच्या पित्याने त्याला सांगितलेले असते की, आपल्यापैकी जर कोणी खाली पृथ्वीवर गेला तर त्याचे पक्ष्यात रुपांतर होईल आणि तसेच झाले. त्याचे रूपांतर घुबडात (किंवा नाईटिंगेल पक्ष्यात) झाले व तो परत चंद्रावर कधीच जाऊ शकला नाही. मलेशियन कथांमध्ये कल्पनाविलास बराच आहे, असे वाटते.
मंगोलियन कथा जरा वेगळ्या आहेत. त्यांच्यावर हिंदू पुराणकथांचा प्रभाव आहे, असे म्हणायला निश्चित जागा आहे. मंगोलियन कथांमध्ये एके ठिकाणी प्राचिन सुक्तांमध्ये अशी कथा सांगितलीय, असा उल्लेख आढळतो. सूक्त हा शब्द मृगनक्षत्राच्या कथेच्या संदर्भात आला आहे, तसेच ‘सेज’ म्हणजे ऋषी हाही शब्द. फार प्राचिन काळापासून, म्हणजे ६००० वर्षांपूर्वीपासून मंगोलियन संस्कृती अस्तित्वात आहे. सूर्यग्रहणात व चंद्रग्रहणात राहू व केतू, सूर्य वा चंद्राला गिळतात, अशी हिंदू पुराणकथा आहे. त्यासारखीच कथा मंगोलियन पुराणात आढळते. फक्त राहूच्या जागी ‘राख’ असा शब्द येतो. मंगोलियनांचा असा दावा आहे की, त्यांच्याकडे चेंगीझखानाच्या काळापासून किंवा त्याही आधीपासून कालगणनेची विशिष्ट पद्धत प्रचारात होती. कालगणना व त्यासाठी लागणारी आकडेमोड अचूकपणे करता येत असल्यामुळे मोठमोठाली सैन्ये घेऊन त्यांचे सेनाधिकारी ठरल्यावेळी ठरल्या ठिकाणी पोहोचू शकत आणि त्यामुळेच युद्धात त्यांचाच विजय होत असे. अचूक कालगणनेचा वापर अपत्य जन्माची अचूक वेळ नोंदविण्यासाठीही होत असे.
बऱ्याच राष्ट्रांमध्ये ‘कृत्तिका’विषयी विशेष गोष्टी आहेत. आपल्या पुराणातही कृत्तिकाविषयी अनेक गोष्टी आहेत. वेदकाळात कृत्तिकांमध्ये सात तारे दिसत होते. नंतर त्यातील एक तारका नाहिशी झाली असा उल्लेख आहे. त्या सातही तारकांची अतिशय सुंदर अशी मेघयंती, वर्षयंती, अभ्रयंती, चुपुणिका, अंबा, दुला व नितत्नी ही नावं आपल्या पुराणात दिलेली आहेत. त्यातील चुपुणिका पुढे दिसेनाशी झाली, असेही लिहिले आहे. यावरून वेदकाळापासूनच भारतात किती बारकाईने आकाश निरीक्षण केले जात होते, हे लक्षात येते.
कृत्तिकाविषयी पॅसिफिक आयलंड्सच्या खगोलशास्त्रीय पुराणकथात एक छान गोष्ट आहे. प्राचीन काळी आकाशात एक अतिशयच तेजस्वी तारा चमकत होता. इतर सर्व ताऱ्यांपेक्षा तो खूप जास्त तेजस्वी होता. म्हणून ताने नावाच्या प्रकाशाच्या देवाला त्याचा हेवा वाटू लागला. म्हणून त्याने अल्डेबरान (रोहिणी) व सिरियस (व्याध) या दोन ताऱ्यांची मदत घेऊन त्या तेजस्वी ताऱ्याचा नाश करायचे ठरविले. त्यांच्या मदतीने ‘ताने’ याने त्या ताऱ्याचे तुकडे करून टाकले. त्या ताऱ्याचे सहा तुकडे झाले. ते म्हणजेच कृत्तिका नक्षत्र. त्यांना ‘मातारिकी’ किंवा लिट्ल आईज म्हणतात. ‘रंगी’ नावाच्या आकाशाच्या देवाने कृत्तिकांना अभय दिले. सर्व कमी तेजस्वी ताऱ्यांमध्ये कृत्तिकांचा मान वरचा असेल, असा वर दिला. सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावरती कृत्तिका दिसल्या की नवं वर्ष सुरू झालं, असं हे लोक मानतात.
तैवानचे मूळ रहिवासी म्हणजे ‘अटायाल’ जमातीचे लोक. त्या लोकांच्या लोककथा बहुतेककरून जपानी भाषेत लिहिल्या आहेत. सूर्य आणि चंद्राच्या उगमासंबंधीची ही अतिशय प्रसिद्ध अशी तैवानी कथा आहे. असे म्हणतात की, फार फार पूर्वीच्या काळी आकाशात दोन सूर्य होते. एक सूर्य पश्चिमेला मावळला की दुसरा तिकडे पूर्वेला उगवायचा. त्यामुळे दिवस व रात्रीत फरकच नव्हता. किंबहुना रात्र होतच नव्हती. पृथ्वीवरील सर्व पाणी आटलेले होते. झाडे उगवत नव्हती. तेव्हा काही लोकांनी असे ठरविले की त्यातल्या एका सूर्याला मारून खाली पाडायचं. त्यासाठी तीन तरुण मोहिमेवर निघाले. पूर्व दिशेला जिथून सूर्य उगवतो, त्या दिशेने ते निघाले, पण ते अंतर इतके जास्त होते की ते तिथे पोहोचू शकले नाहीत. त्यांच्यातला एक परत फिरला व त्याने मदत मागवली. पुन्हा त्यांच्यातून तीन तरुण मोहिमेवर निघाले. जाताना त्यांनी सर्व सामानसुमान, बी-बियाणे इ. बरोबर आपापली बाळं घेतली. २० वर्षे ते प्रवास करीत राहिले. त्या दरम्यान हे तीन तरुण म्हातारे झाले. पण एव्हाना त्यांची मुलं तरुण झाली होती. आता ती मोहिमेवर निघाली आणि अखेर ते सूर्य उगवतो त्या ठिकाणी पोहोचले. त्यांच्यातल्या सगळ्यात बलवान तरुणाने सूर्यावर नेम धरून बाण सोडला. त्यामुळे जखमी सूर्याचे अतितप्त असे रक्त अंगावर पडून तो तरुण तत्काळ मरण पावला. सूर्याचे बाकीचे रक्त आकाशभर पसरले आणि त्याचे तारे तयार झाले. या सूर्याचे सर्व रक्त सांडल्यामुळे तो पांढराफटक पडला. तो म्हणजेच आता आपण बघतो तो चंद्र. सूर्यावर मारलेल्या बाणाने ज्या जखमा झाल्या त्याच आता चंद्राच्या पृष्ठभागावरील खुणांच्या रूपाने दिसतात. इकडे त्या तीन तरुणांमधील उरलेले दोघे आपल्या देशात परत गेले. तिथे त्यांचे जंगी स्वागत झाले. तेव्हापासून पृथ्वीवासीय सुखद वातावरणाचा आनंद उपभोगत आहेत. मात्र यासाठी अतायल जमातीच्या लोकांच्या तीन पिढय़ा खर्ची पडल्या.
थाई वाङ्मयावर बुद्धिस्ट विचारसरणीचा बराच प्रभाव आहे. उदाहरणार्थ- जो जसे कर्म करेल तसे त्याचे फळ त्याला चाखावे लागेल, हा संदेश बुद्धिस्ट शिकवणीतून आल्याचे सांगितले आहे. शिवाय माणसाच्या या जन्मातील कर्माप्रमाणे त्याचा पुढील जन्म ठरतो, हे तत्वही त्यांच्या एका कथेत सांगितले आहे. थाई खगोलशास्त्रीय कथांमध्ये मृग नक्षत्रासंबंधी, कृत्तिकेसंबंधी कथा आहेत.
व्हिएतनामी लोक त्यांच्या खगोलशास्त्रीय कथा म्हणजे त्यांचा अमूल्य ठेवा समजतात. त्यांच्या कथांमध्ये परत तीच व्हेगा व अल्टेर यांची प्रेम व विरह कथा येते. यातही आकाशात त्या दोघांना दूर ठेवण्याचे काम आकाशगंगा करते. चंद्राविषयीच्या एका कथेत ‘क्युओई’ व त्याचे संजिवनी ठरणारे झाड यांची गोष्ट येते. व्हिएतनामी गोष्टीतही सूर्य वा चंद्राच्या ग्रहणकाळात त्यांना गिळणाऱ्या राक्षसाचे नाव ‘रिआहू’ असे दिले आहे.
जपानी लोककथा पुराणकथांवर चीनचा प्रभाव आहे. जपानची तानाबाता व मेलन फिल्ड- जपानची ७ जुलैबद्दलची कथा, ही कथा हाँगकाँगच्या झीनू व निऊलांग (व्हेगा व अल्टेरची गोष्ट) या गोष्टीची जपानी आवृत्ती आहे. चीनमधील ‘टान डायनॅस्टी’ मध्ये म्हणजे साधारण १३०० वर्षांपूर्वी ही गोष्ट जपानमध्ये पोहोचली. ही कथा जपानमध्ये दोन वेगळ्या तऱ्हेने सांगितली जाते. एका कथेत ओरीहाईम (व्हेगा) व केन्ग्यू (अल्टेर) ही जोडी आहे. ओरीहाईम ही तेन्ताईची विणकर मुलगी आहे, तर केन्ग्यू हा गुराखी आहे.
‘आयनू’ ही जमात जपानच्या उत्तरेकडच्या टोकास असलेल्या होकाईडो बेटावर फार प्राचीन काळापासून वास्तव्य करून आहे. हे लोक अस्वलाला देव मानून त्याची पूजा करतात. त्यांच्यात सप्तर्षीबद्दलची कथा प्रसिद्ध आहे. सामाएन हा आयनूंचा देव. ‘हाफ गॉड’. म्हणजे कदाचित आपल्याकडचा यक्ष किन्नरांसारखा. सामाएन हा एका वाईट अस्वलाचा पाठलाग करीत असतो. ते अस्वलही आयनूंचा देवच आहे. सामाएन अस्वलाचा खूप दूर दूरपर्यंत पाठलाग करतो. त्याच्याशी लढतो, पण अस्वल जास्त ताकदवान असते. शेवटी त्या अस्वलाचा पाठलाग करत सामाएन एका एल्मच्या झाडावर चढतो. तिथूनही आकाशात जात ते एकमेकांचा गरुडासारखा पाठलाग करतात. मात्र सामाएन शेवटपर्यंत अस्वलाला पकडू शकत नाही व शेवटी तो उत्तर आकाशातील सात ताऱ्यांचा तारकासमूह बनून जातो.
जपानमध्ये नॉर्थ स्टार आणि कृत्तिकेसंबंधी गोष्टी प्रचलित आहेत. विशेषत कृत्तिकांना बरेच महत्त्व आहे, असे वाटते. कृत्तिकांची वेगवेगळ्या भागांत वेगवेगळी नावं ऐकायला मिळाली. ओकिनावा भागात कृत्तिकांना मूरिकाबुशी हे नाव आहे. तेथील शेतकरी कृत्तिकांना बघून कापणी कधी करायची हे ठरवतात. फूजीच्या वाटेवर सुबारू हे नाव दिसले. सुबारू म्हणजे ही कृत्तिकाच.
सर्व आशियाई राष्ट्रांच्या खगोलशास्त्रीय पुराणकथांचा आढावा घेताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते ती म्हणजे आपल्याकडच्या हिंदू खगोलशास्त्रीय पुराणकथांचा संग्रह अतिशय समृद्ध आहे. त्यातील अनेक कथांचा शास्त्रीय दृष्टिकोनातूनही विचार व्हायला हवा, असे वाटते. विशेषत ध्रुवाची गोष्ट. ध्रुव तारा अढळपदी स्थिरावला असे सांगणारी गोष्ट हेच निर्देशित करते की पूर्वीच्या अभ्यासकांना, निरीक्षकांना म्हणजेच आपल्या ऋषीमुनींना ध्रुवाच्या स्थानी असलेला तारा हलत नाही, ही गोष्ट खात्रीने माहिती होती.
तसेच राजा ककुद्मीची गोष्ट. राजा ककुद्मीची कन्या रेवती. तिचे लग्न होईना म्हणून राजा तिला घेऊन ब्रह्मलोकी गेला. तेथे तो क्षणभरच थांबला. ब्रह्मदेवाचे लक्ष त्याच्याकडे गेल्यावर त्याने विचारले की हिचा नवरा कोण ते सांगावे. ब्रह्मदेव हसला व म्हणाला की, तू मनात योजलेले वर तर केव्हाच मेले, एवढंच नाही तर त्यांच्या अनेक पिढय़ा, म्हणजे त्यांचे प्रपौत्रही मरून गेलेले आहेत. कारण तू पृथ्वीवरून निघून ब्रह्मलोकी पोहोचलास व आता ब्रह्मलोकातून पृथ्वीवर पोहोचशील तोपर्यंत पृथ्वीची २७ चतुर्युगे उलटलेली असतील. तू आता परत जा. पृथ्वीवर आता बलरामाचा जन्म झाला असेल. त्याला आपली कन्या रेवती दे. राजा ककुद्मी जेव्हा पृथ्वीवर परतला, तेव्हा खरंच त्याचे वंशजही उरले नव्हते. अंतराळ प्रवास करून आल्यावर पृथ्वीवर २७ चतुर्युगे उलटल्यावरही रेवती मात्र विवाहयोग्य तरुणीच राहते हे कसे? ही सगळीच कथा काल्पनिक समजली तरी एक गोष्ट यातून नक्कीच सिद्ध होते की जर मानव अंतराळ प्रवासाला गेला तर त्याचे स्वतचे वय वाढत नाही. मात्र पृथ्वीवरील त्याच्याच वयाची माणसे यांच्या वयात पृथ्वीवरील नियमाप्रमाणे वाढ होते. म्हणजेच अंतराळात माणसाचे आयुष्य वाढते, काळ लांबतो, ही गोष्ट आपल्या व्यास महर्षीना माहिती होती का?
तात्पर्य, आपल्या पुराणकथांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास व्हावा, पुराणातली वानगी पुराणातच राहू द्या, असे म्हणून त्यांच्याकडे तुच्छतेने दुर्लक्ष होऊ नये.
या कार्यशाळेच्या निमित्ताने सर्व आशियाई देशांच्या खगोलशास्त्रीय पुराणकथांचे संकलन होऊन ते लवकरच जगासमोर पुस्तकरूपाने येईल. रोमन आणि ग्रीक पुराणकथांच्या बरोबरीने याही कथा जगप्रसिद्ध होतील.
लीना दामले