Leading International Marathi News Daily
शनिवार, ८ ऑगस्ट २००९
  महिलांच्या मुठीत मोबाइल!
  मोबाइल न वापरणाऱ्या काही मान्यवरांची ही भूमिका-
  मोबाइल एन्फोटेन्मेंट
  पण बोलणार आहे!
एकमेव.. अद्वितीय!
  व्हय़ू पॉइंट : वैर
  विज्ञानमयी
  मोबाइल वापरताना जरा जपून..
  कुठे गेले हे पदार्थ?
  स्वातंत्र्याचा लढा व भारतीय मुस्लिम महिला
  चिकन सूप... :
दुर्लक्षित थडगं
  'ति'चं मनोगत : कृतार्थ मी
  कवितेच्य़ा वाटेवर :
उशिराचा पाऊस
  ललित : मैत्र
  सक्षम मी : ‘सत्ताकारणासाठी आम्ही तय्यार आहोत!’
  ‘स्टार्स ऑफ एशिया’
  ललित - भिशी

 

लिलाव भिशी
नवनिर्मितीचे असंख्य आविष्कार आपण आपल्या अवतीभोवती पाहात असतो. आपल्यातली सामाजिक बांधीलकीची जाणीव जागी करून ही निर्मितीक्षमता अप्रत्यक्षपणे समाजोपयोगी कार्यासाठी वापरता आली तर? पन्नाशीच्या आसपासच्या सुखवस्तू घरातल्या अमेरिकन स्त्रियांच्या लोकोपयोगी ठरणाऱ्या नवनिर्मितीच्या अजब आविष्काराविषयी ‘लिलाव-भिशी’विषयी तुम्हाला सांगावंसं वाटलं, म्हणून हा लेखप्रपंच!
वीसेक अमेरिकन बायकांचा हा गट महिन्यातून एकदा एकीच्या घरी भेटतो. समाजासाठी काही तरी करावं असं त्यांच्यातल्या प्रत्येकीला वाटतं. ते करत असताना त्या सगळ्या गप्पा, खाणं-पिणं, एकत्र येणं हेही साधतात. आपल्याकडे असतो तसा भिशीचा हलकाफुलका कार्यक्रम इथं होतोच, पण वैशिष्टय़पूर्ण गोष्ट म्हणजे इथे लिलाव होतो. त्या लिलावातून उभी राहणारी

 

रक्कम एखाद्या संस्थेला नाही तर गरजू व्यक्तीला दान दिली जाते. लिलावातून उभी राहणारी रक्कम काही खूप मोठी नसते- कुणालाच त्याचा भार वाटत नाही. उलट हौशीपरी हौस होते आणि हातून दानही घडतं. आता तुम्हाला उत्सुकता वाटतीय ना, लिलाव होतो तरी कसला? भिशीला येताना प्रत्येकजण भिशीची रक्कम आणत नाही, तर आणते एक ‘थीमपॅक’. त्या थीमपॅकमधल्या सगळ्या वस्तूंची किंमत मिळून १५ डॉलरपेक्षा जास्त असू नये, असा एक अलिखित नियम इथे पाळला जातो. पॅकवरती किमतीची चिट्ठी लावलेली असते. लिलावात किमतीची बोली लावताना ती किंमत पायाभूत धरली जाते आणि त्यानंतर १० सेंटनीच बोली वाढवली जाते. त्यामुळे फार मोठय़ा किमतीचा खेळ इथे होतच नाही.
सगळ्याजणी जमल्यावर (सगळ्या बायाच असल्याने आवरून सावरून येईपर्यंत आपल्याकडे होतो, तसा उशीर यांनाही होतो!) हास्यविनोद, गप्पा, हलकंफुलकं खाणं झाल्यावर लिलावाला सुरुवात होते. त्यामध्ये स्वत:हून पुढाकार घेणाऱ्या दोघी एकेक थीमपॅक हातात घेऊन यातल्या वस्तूंचं छानसं चटपटीत वर्णन करतात. पॅकची अपेक्षित किंमत सांगतात आणि गोलाकार बसलेल्या सर्वापुढून ती वस्तू हातात घेऊन सगळ्यांना जवळून दाखवतात. मग हळूहळू एकेकजण बोली लावायला लागते. कधी कधी चढाओढ अगदी रंगात येते. आपल्या कलात्मकतेला मिळणारी दाद पाहून आपल्या थीमपॅकची वाढणारी किंमत आणि मागणी पाहून आणणारी सुखावते आणि आपण हव्या त्या किमतीला वस्तू घेतली म्हणून घेणारी सुखावते.
‘थीमपॅक’मध्ये काय असतं नेमकं? कल्पकता आणि निर्मितीक्षमता पणाला लावून ज्या काही गोष्टी तुम्ही एकत्र गुंफू शकाल अशा कशाचाही थीमपॅक बनवता येईल. मी पाहिलेले काही थीमपॅक असे होते-
* कॉफी नावाची एक थीम होती. त्यात दोन सुंदर कॉफी मग्ज, कॉफी कलरचे भरतकाम केलेले दोन नॅपकिन्स, टेबलमॅटस, कॅपेचीनोचे सॅशे, कॉफीबीन्सचं प्रिंट असणारा ट्रे आणि कॉफीच्या एकदोन वेगळ्या पद्धती सांगणारे काही हस्तलिखित कागद- असं त्यात होतं.
* स्ट्रॉबेरी नावाच्या थीममध्ये स्ट्रॉबेरीचा जॅम, स्ट्रॉबेरी फ्लेवरचं क्रीम असणाऱ्या बिस्किटांचा पुडा, स्ट्रॉबेरीचं चित्रं असणारा चिनी मातीचा बाऊल, मंद गुलाबी रंगावर स्ट्रॉबेरीचं प्रिंट असणाऱ्या कागदी हातरुमालांचा गट्ठा आणि काही ताज्या स्ट्रॉबेरीज असं एका वेताच्या परडीत एकत्र ठेवलं होतं.
* वाढदिवस नावाच्या एका थीममध्ये पार्टी डेकोरेशनच्या वस्तूंपासून, पार्टीसाठीच्या गाण्यांची सीडी, फुगे असं सगळं एकत्रं होतं. हे पाहून एका बाईला एक कल्पना सुचली- तिच्या नवऱ्याचा वाढदिवस जवळच होता. त्याला सरप्राईज पार्टी द्यायची कल्पना सुचली आणि तिने त्या थीमपॅकवर झडप घातली. खरं तर गाण्याच्या सीडीपासून सगळ्या गोष्टी कुठेही मिळू शकतात. पण दुकानातही न जाता त्या अशा एकत्र हाती लागणं हीसुद्धा गरज असते कधी कधी.
* स्नोमॅन नावाच्या थीममध्ये स्नोमॅनच्या चित्राची बशी, बाऊल, मग, त्याच्या चित्राची डायरी, मेणबत्ती स्टॅण्ड, दिवा, ग्लास अशा छोटय़ा छोटय़ा १०-१२ वस्तू होत्या.
* कोंबडीच्या थीममध्ये कोंबडीच्या आकाराची रंगीत, चिनीमातीची डिश, सहा अंडी आणि अंडय़ाच्या पदार्थाचं पुस्तक होतं.
* एक फुलाचं झाड, कुंडी आणि फुलदाणी असा एक वेगळा थीमपॅक होता.
* बागकामाच्या थीममध्ये बागकामाची हत्यारं, बागेत काम करताना कमरेला बांधायला छोटा खूप कप्प्यांचा अ‍ॅप्रन, बागकामाचं पुस्तक आणि दोन रोपं असं एकत्र आणलं होतं.
एकाच धाग्याने बांधल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करणं आणि त्या आकर्षक पद्धतीने मांडणं यांत प्रत्येकीने आपलं कौशल्य पणाला लावलं होतं.
* मेपल नावाच्या थीममध्ये मेपलच्या झाडाचं मधासारखं सिरप, त्याबरोबर खायच्या पॅनकेकचं मिश्रण (धिरडय़ाच्या कोरडय़ा पिठासारखं), मेपलच्या पानाचं चित्रं असणाऱ्या चार बशा असा पॅक मेपलच्या पानाचं चित्रं असणाऱ्या पिशवीत भरला होता.
* एका लोकप्रिय लेखिकेचं पुस्तक-त्यावरच्या सिनेमाची सीडी आणि तिच्या एका कार्यक्रमाची प्रवेशिका असं थीमपॅक लेखिकेच्या चाहतीने अगदी चढाओढीत जिंकून मिळवलं.
* पत्रं लिहायला कागद, मॅचिंग पाकिटं, पेन आणि पोस्टाची तिकीटं असं एका प्लास्टिकच्या पाकिटात घातलेल्या थीमपॅकमध्ये होतं.
लिलावात किमतींची चढाओढ होते आणि शेवटी सर्वाधिक किंमत बोललेली व्यक्ती वस्तू विकत घेते. शेवटी कार्यक्रम संपताना न विकल्या गेलेल्या वस्तू ज्यांनी आणल्या, ते परत नेतात. विकल्या गेलेल्या वस्तूंची किंमत दानपात्रात पडते. आपली वस्तू विकली जावी असं प्रत्येकीलाच वाटत असल्याने वेगवेगळ्या आकर्षक थीमपॅक बनवायचा प्रयत्न सगळ्यांनीच केला होता. अमुक एक कल्पना चांगली आणि अमुक एक कल्पना वाईट असं यात काही नसतं. तुमच्याशी सूर जुळणारं, तुमच्या कल्पनेचं रसग्रहण करणारं कुणी तरी असतंच की. उपलब्धता आणि गरज एकत्र आलं की थीमपॅक पटकन उचललं जातं आणि समजा विकलं गेलं नाही तरी पुढच्या वेळेसाठी सगळे त्याच उत्साहाने आपापले थीमपॅक घेऊन येतात. पुढच्या भिशीसाठीच्या नव्या थीमचा विचार तिथेच मनात सुरू होतो.
‘समाजकार्य’ असं जडबोजड नाव देऊन काही करणं प्रत्येकाला जमतंच असं नाही, पण गरजूंना शक्य तेवढी मदत करावी असं वाटण्याइतकी माणुसकी प्रत्येकात असतेच की! मजा करताना सहज कोणाला मदत होत असेल तर आपली कल्पकता जागवायला काय हरकत आहे? या अमेरिकन कल्पनेचं आपल्या समाजासाठी उपयुक्त असं रूपांतर कसं करता येईल, हे तुमच्या मनात यायला सुरुवातही झालीए. होय ना?
डॉ. प्रज्ञा कुलकर्णी
pradnya_kulkarni@hotmail.com