Leading International Marathi News Daily
शनिवार, ८ ऑगस्ट २००९
  महिलांच्या मुठीत मोबाइल!
  मोबाइल न वापरणाऱ्या काही मान्यवरांची ही भूमिका-
  मोबाइल एन्फोटेन्मेंट
  पण बोलणार आहे!
एकमेव.. अद्वितीय!
  व्हय़ू पॉइंट : वैर
  विज्ञानमयी
  मोबाइल वापरताना जरा जपून..
  कुठे गेले हे पदार्थ?
  स्वातंत्र्याचा लढा व भारतीय मुस्लिम महिला
  चिकन सूप... :
दुर्लक्षित थडगं
  'ति'चं मनोगत : कृतार्थ मी
  कवितेच्य़ा वाटेवर :
उशिराचा पाऊस
  ललित : मैत्र
  सक्षम मी : ‘सत्ताकारणासाठी आम्ही तय्यार आहोत!’
  ‘स्टार्स ऑफ एशिया’
  ललित - भिशी

 

महिलांच्या मुठीत मोबाइल!
मोबाइलमुळे संपर्क माध्यमांत आज जी क्रांती झालेली आहे, तिचा सर्वाधिक लाभ महिलांनी करून घेतला आहे. एकाच वेळी अनेक कामं पार पाडण्यासाठी त्यांना मोबाइल हे छोटेखानी यंत्र जादूच्या कांडीसारखं उपयोगी पडतं. मोबाइलच्या सर्वव्यापीत्वानं आज अनेक क्षेत्रं काबीज केली आहेत. माणसाच्या सामाजिक, सांस्कृतिक तसंच आरोग्यजीवनावरही त्यानं आक्रमण केलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद यांनी मोबाईलचा अतिवापर करणाऱ्यांना अलीकडेच इशारा दिला आहे. त्यानिमित्त-
महिला मोबाइल फोनवर फार बोलतात, हे पुरुषांचं एक सार्वत्रिक एकमान्यता असलेलं निरीक्षण. नुसत्या बोलतात असं नाही, तर मोबाइल फोनचा सर्वागाने वापर करण्यात त्या माहीर असतात, हा आणखी एक लाडका निष्कर्ष.
वाद कशाला घाला? मान्य करूया की- होय, आम्ही मोबाइल फोन पुष्कळ वापरतो. आम्ही फोन करतो आणि आम्हाला खूप फोन येतातही. आणि केलेल्या, आलेल्या सर्व फोनवर आम्ही यथेच्छ बोलतो. फोनवर sms करण्यात तर महिला इतक्या तरबेज, की ट्रेन-बसच्या गर्दीत प्रवास करतानाही स्क्रीनवर नजर न खिळवताही बरोब्बर स्पर्शज्ञानाने sms करू शकतात. एकीकडे प्रवाशांचा कल्ला चालू असताना तो कलकलाट, गर्दीतला घामट चिकचिकाट यातही कानाला इअरफोन लावून म्युझिक ऐकत किंवा गेम खेळत आपली स्पेस आणि मूड अबाधित राखतात. प्रसंगी याच मोबाइलवर रेल्वेच्या डब्यातल्या अस्वच्छतेची तक्रार रेल्वे हेल्पलाइनला करून मोबाइलचा परिणामकारक वापरही करतात.
प्रवासात जरा टेकण्यापुरती जागा मिळाली की महिला कितीतरी कामं या चिमुकल्या उपकरणाच्या साह्याने करून टाकतात.

 

मुलांना फोन करून त्यांची खबरबात घेतात. कामाचे उरलेले फोन करून ती मार्गी लावतात. काही महत्त्वाची कामं ‘टू डू’च्या कप्प्यात टाकतात. काही नोंदी सेव्ह करून ठेवतात. काही sms सेंड करतात, काहींचे राहिलेले रिप्लाय.. बघता बघता कितीतरी कामं काही मिनिटांत पार पडतात. घर आणि कामाचे वेगळे कप्पे करा, असं टाइम मॅनेजमेंटवाले सांगत असतात. मोबाइलच्या कृपेने ते अनेकींना जमू लागलंय. तमाम नोकरदार, व्यावसायिक महिला आज मोबाइलच्या ऋणी आहेत!
महिलांच्या सबलीकरणात मोबाइलचा मोठा वाटा आहे. सबलीकरण म्हणजे काय नेमकं? बळ वाढवणं, स्वत:च्या बळावर विश्वास ठेवणं, आत्मविश्वासाने प्रगतीची वाट चालू लागणं.
आधीच्या पिढीच्या नोकरदार व व्यावसायिक महिला एक प्रकारचा अपराधभाव मनात बाळगायच्या. आपण घरच्यांवर, मुलांवर अन्याय करतोय, या भावनेची काजळी त्यांच्या व्यावसायिक जीवनाला होती. आज मोबाइलने तो अपराधभाव कमी केलाय. आकाशी हिंडणाऱ्या घारींना मुठीतल्या उपकरणाद्वारे पिलांवर नजर ठेवणं शक्य झालंय. सततची कनेक्टिव्हिटी तिला आणि तिच्या पिल्लांना निर्धास्त करतेय.
बाईला मल्टिटास्किंग करावं लागतंच, ते करणं आता सहजशक्य झालंय. एकाच वेळी एकात एक अनेक कामं उरकणं सोपं झालंय. गेल्या पिढीतल्या महिलांना किचन गॅजेट्सनी दिलासा दिला होता. कूकर, मिक्सर, मायक्रोवेव्ह यांनी त्यांचा स्वयंपाकाचा वेळ वाचवला. आज मोबाइलने त्यांचा शॉपिंग टाइम वाचवलाय. मध्यंतरी एका पाहणीत असं आढळलंय की, प्रगत देशांतील महिलांचं फोन-शॉपिंगचं प्रमाण वाढलंय तसंच स्वयंपाकिणीला किंवा जवळच्या फूड सेंटरला सूचना देऊन स्वयंपाक मॅनेज करणाऱ्या महिलांचं प्रमाणही वाढलंय.
एकंदरीत संवाद क्षेत्रात जी प्रगती झालीय, तिची रसाळ फळं चाखण्यातही महिला अग्रेसर आहेत, असं एक पाहणी अहवाल सांगतो. पूर्वी असा एक सार्वत्रिक समज होता की, महिला तंत्रज्ञानाच्या वापरात शामळू असतात! आज असं म्हणण्याची कोणाची टाप नाही. जगभरातल्या महिला मोठय़ा प्रमाणावर ऑर्कुट, फेसबुक आणि आता ट्विटरही वापरण्यात अग्रेसर आहेत. अनेक मुलं आणि त्यांच्या आया एकमेकांच्या फ्रेंडलिस्टवरही असतात. मोबाइलवर गेम खेळण्यातही महिलावर्ग आघाडीवर आहे आणि मोबाइल गेमिंग उद्योगाची भिस्त महिलांवर आहे, असं खुद्द अमेरिकन गेम मेकिंग उद्योगाने जाहीर केलंय. आणि मजा म्हणजे मोबाइल गेम खेळण्याची चटक आम्हाला आमच्या मुलांनी लावली, असंही काही तरुण आयांनी म्हटलंय. ‘बच्चा भी खेलें, मॉं भी खेलें’ असा हा मामला. जाणीवपूर्वक आधुनिक झालेल्या या आया जनरेशन गॅप बुजविण्याचा यशस्वी प्रयत्न करताना दिसताहेत. आजच्या मुलांचं तांत्रिक ज्ञान अफाट आहे. पालक पिढी त्यापासून अलिप्त राहिली तर जनरेशन गॅप वाढेल, या सार्थ भीतीची चाहूल त्यांना वेळीच लागलीय. आणि त्यामुळेच त्या जाणीवपूर्वक टेक्नोसॅवी होताना दिसताहेत.
sms या नव्या संवादमाध्यमाची ताकद इतकी मोठी आहे की त्यावर आता छोटे संवाद-तुकडेच नाही, तर साहित्यही प्रसारीत होऊ लागलंय. चुटके, कविता करून पाठवण्यापलीकडे आता कथा, कादंबऱ्या या नव्या माध्यमात प्रकाशित होताहेत. चायना मोबाइल कंपनीने तर ‘ओरिजिनल मोबाइल लिटरेचर कॉन्टेस्ट’ही जाहीर केली आहे.
‘अरुणाज् स्टोरी’ या गाजलेल्या हृदयद्रावक कादंबरीची लेखिका पिंकी विराणी हिची नवी कादंबरी- ‘डेफ हेवन’ नावाची. ही कादंबरी म्हणजे ९० sms चा पॅक आहे. अख्खी कादंबरी sms वर!
जपानमध्ये तर सेलफोन फिक्शनचं मोठंच मार्केट निर्माण झालंय. बहुतांश तरुण जपानी साहित्यिक त्यांच्या अभिव्यक्तीसाठी सेलफोन मेसेज आणि ई-मेल हीच माध्यमं स्वीकारताहेत. जपानी भाषेचा तरुण बाज त्यातून पुढे येतोय. सोप्या, चुरचुरीत जपानी भाषेतलं हे नवसाहित्य पुस्तकांच्या बरोबरीने खपतंय.
प्राथमिक गरज ते अभिरुची संपन्नतेची आस असा मोठा पट आज मोबाइलने व्यापलाय. त्यामुळेच हे मल्टिफंक्शनल उपकरण प्रत्येकाला वरदान ठरतंय.
मोबाइलचा व्याप फक्त शहरांतच पसरला आहे असं नाही, तर ग्रामीण भारतातही तो पसरलाय. गावोगावच्या महिलांचं जीवनमानही मोबाइलने उंचावलंय. आज गावातली माथाडी कामगार बाई मोबाइलच्या कृपेने रोजच्या रोज रोजंदारी मिळवतेय. सकाळी तिला फोन येतो, त्यानुसार ती ठराविक ठिकाणी, ठरलेल्या वेळी पोहोचते. दुपारी ते काम संपेपर्यंत तिला दुसरीकडचा कामाचा कॉल येतो. काही वर्षांपूर्वी महिन्यातले फक्त काही दिवस रोजंदारी मिळवणाऱ्या तिची, आज केवळ एका संपर्क क्रमांकाच्या बळावर रोजगार मिळण्याची वारंवारता चांगलीच वाढलीय. भाजीवाली, सफाईवाली, स्वयंपाकीण, किरकोळ वस्तू-विक्रेती अशा अनेक कष्टकरी महिलांसाठी (अर्थात पुरुषांसाठीही!) मोबाइल हे वरदान ठरलंय. त्यांना कामं मिळण्याचं प्रमाण वाढलंय आणि पर्यायाने मोबदलासुद्धा चांगला आणि नियमित मिळू लागलाय.
शेतकरी तसेच बागायती व्यावसायिक आज या मोबाइलच्या टायमरवर पाणीसिंचनाचं टाइमटेबल सेट करताहेत. एका इरिगेशन कंपनीची मजेशीर रेडिओ जाहिरात आहे- ‘ऊठ, मोरू ऊठ, झोपलास काय? शेताला पाणी शिंपायचं नाही काय?’ ..त्यावर स्मार्ट मोरू निवांतपणे सांगतो की, त्याने झोपल्या अवस्थेतही ती व्यवस्था केलीय! या जाहिरातीप्रमाणे आज मोबाइलच्या साह्याने शिंपणाची व्यवस्था ग्रामीण शेतकरी करू लागला आहे.
बचतगटांतल्या महिलांचे उद्योग मध्यंतरी बराच काळ पापड-लोणच्यांतच अडकले होते आणि कंत्राटदारांच्या कृपादृष्टीवर त्यांची भिस्त होती. आज त्या अधिक मोबाइल झाल्या आहेत. त्यांच्या उत्पादनांचा संचार आणि विस्तार वाढलाय. ग्रामीण राजकारणी महिलाही तंत्रज्ञानाला आपलंसं करत स्वत:ची कार्यतत्परता वाढवताना दिसताहेत. त्यांचं नेटवर्किंग ते वाढवत आहेत. त्यातून मिळणारा आत्मविश्वास त्यांना अधिक कार्यक्षम करतोय.
ग्रामीण भागातल्या नोकरदार व व्यावसायिक स्त्रियाही त्यांच्या कार्यकक्षा विस्तारताना दिसताहेत. मुख्य म्हणजे कनेक्टिव्हिटीने त्यांना शहरांच्या समीप आणलंय. शहरी-ग्रामीण दरी कमी होताना जाणवतेय आणि त्यातून त्यांचा न्यूनगंडही. अजूनही ग्रामीण भागांत संगणक घरा-घरांत आहे असं नाही. शिवाय लोड-शेडिंगचा शाप. पण मोबाइलचे टॉवर गावोगावच्या डोंगरांच्या स्कायलाइनवर दिसू लागलेत, तशी गावात ई-युगाची पावलं उमटत आहेत. या पावलांवर चालणारा समाज शहरी जीवनाची चव चाखू लागलाय. न्यूनगंडापासून डिस्कनेक्ट झालाय.
बदलांच्या प्रक्रियेत महिलांचा वाटा मोठा असतो, हे समाजशास्त्राने केव्हाच सांगितलंय आणि इतिहासानेही हे सिद्ध केलंय. प्रत्येक बारीकसारीक सामाजिक बदलात महिलांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरते. उद्योगजगताला तर हे फारच मान्य असावं. पुढील आठवडय़ात १७ ऑगस्टला अ‍ॅमस्टरडॅम येथे एक आंतरराष्ट्रीय परिषद भरतेय. तिचा विषय आहे- ‘व्हॉट वूमेन वॉंट इन मोबाइल.’ त्या परिषदकर्त्यांनी चक्क म्हटलंय की, महिलांचं र्अध जगत मोबाइल-विश्वावर अधिक प्रभाव टाकतंय. नव्या मोबाइल उपकरणामध्ये त्यांना नेमकी कोणती फीचर्स हवी आहेत, मोबाइल कंपन्यांकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेण्यासाठी ही परिषद भरवली जात आहे. जगभरातील मोबाइल कंपन्यांच्या अधिकारपदांवर महिला मोठय़ा प्रमाणात आहेत. आणि त्यांनी त्यांच्या बिझनेस प्रमोशनची मेख चांगलीच ओळखली आहे.
आता इतके स्पष्ट दाखले असताना कोणती महिला अमान्य करेल की, मोबाइलचा वापर महिला खूप करतात! नुसतं मान्य करणंच कशाला, अभिमान बाळगावा अशीच ही बाब आहे ना!
शुभदा चौकर