Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

अग्रलेख

ऐक्य की फार्स?

 

रिपब्लिकन ऐक्याची घोषणा आतापर्यंत एकूण १०० वेळा झालेली असली तरीही गुरुवारी झालेल्या १०१ व्या एकजुटीच्या घोषणेचे आम्ही मन:पूर्वक स्वागत करीत आहोत. रामदास आठवले यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीला प्रकाश आंबेडकर हजर नसले तरी मंगळवारी, ११ ऑगस्टला होणाऱ्या बैठकीला, त्यांनी हजर राहावे म्हणून बाकी सर्व नेते प्रयत्न करणार आहेत. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी या बैठकीच्या निमित्ताने म्हटले आहे की, ‘या ऐक्यवादी पक्षाचे सत्ता हे साध्य नाही. सत्तेकडे आम्ही परिवर्तनाचे साधन म्हणून पाहतो.. आमची संघटित ताकद लक्षात घेता कोणताही पक्ष आम्हाला विचारात घेतल्याशिवाय सत्तेवर येऊ शकणार नाही.’ प्रा. कवाडे यांचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा आहे. गुरुवारच्या बैठकीत कांशीराम- मायावतींच्या बहुजन समाज पक्षाची भागीदारी नव्हती, कारण महाराष्ट्राच्या रिपब्लिकन परंपरेत व प्रवाहात वाढलेला तो पक्ष नव्हे. परंतु ‘मायावतींच्या पक्षाने, नव्याने एकवटलेल्या रिपब्लिकन पक्षात विलीन व्हावे,’ असे आवाहन रामदास आठवले यांनी केलेले आहे. मायावतींना या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदही देता येईल असे आठवले यांनी सूचित केले आहे. मायावती या आवाहनाला फारशी किंमत देणार नाहीत. त्या स्वत:लाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा स्वतंत्र आविष्कार आणि अवतार मानतात. शिवाय कोणत्याही पक्षाच्या मदतीशिवाय आणि काँग्रेसच्या विरोधात राहून त्यांनी उत्तर प्रदेशात सत्ता काबीज केली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार ही ‘मागासलेली राज्ये’ आहेत असे तमाम महाराष्ट्राला वाटते. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर यांच्या वैचारिक मुशीत वाढलेल्या पुरोगामी महाराष्ट्राला र्सवकष सामाजिक क्रांतीचे नेतृत्व आपल्याकडेच असले पाहिजे असे वाटते. फक्त रिपब्लिकनवाद्यांनाच नव्हे तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी, शेकाप अशा सर्वानाच महाराष्ट्राच्या या पुरोगामी परंपरेचा गर्व आहे. हा गर्व किती अवास्तव आहे आणि महाराष्ट्रात जातीयवाद आणि धर्मवाद किती खोलवर पसरलेला आहे, हे आपण रोज अनुभवीत आहोत. स्वत:ला पुरोगामी समजणाऱ्या वरील सर्व पक्षांमध्येच किती जातीय विद्वेष आहे, हे त्यांनी चुकून कधी आत्मपरीक्षण केले तर त्यांना सहज लक्षात येईल. ऐक्यवादी रिपब्लिकनांनी असे म्हटले आहे की, भाजप, शिवसेना व मनसे हे पक्ष जातीयवादी असल्याने त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. भाजप हा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि त्यांच्यात गोडसेवादी व मनुवादी प्रवृत्ती आहेत हे खरे असले तरी त्यांनीही अलीकडे डॉ. आंबेडकरांना ‘प्रात:स्मरणीय’ ठरविले आहे. ‘प्रात:स्मरणीय’ यादीत आता महात्मा गांधीही आहेत. भाजपने मायावतींबरोबरही आघाडी केली आहे आणि महाराष्ट्रातील काही दलित गट, पक्ष व लेखक-विचारवंतही भाजपच्या मांदियाळीत (सोयीनुसार) गेले आहेत. त्यामुळे भाजपवरील ही टीका आता व्यवहारात किती लागू पडते हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवसेना हा पक्ष स्वत:ला उग्र हिंदुत्ववादी मानत असला आणि बाळासाहेब ठाकरे हे ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणून संबोधले जात असले तरी त्यांचा खरा धर्म ‘महाराष्ट्रधर्म’ आहे! शिवाय स्वत: बाळासाहेब आणि शिवसेना जात-पात पाळत नाही, ओळखतही नाही. स्वयंभू पुरोगामी पक्षांमध्ये जितका जातीय/ उपजातीय/ पोटजातीय भेदाभेद आहे, तितका शिवसेनेत नाही. म्हणूनच शिवसेनेत कुणीही दलित, ओबीसी वा ब्राह्मण म्हणून ओळखले जात नाही. याउलट खुद्द रिपब्लिकन पक्षांनी स्वत:च्या इतिहासाकडे अंतर्मुख होऊन पाहिले, तर त्यांना स्वतच्या संघटनेत घट्ट रुजलेला ‘नवबौद्ध-महारवाद’ आढळून येईल. डॉ. आंबेडकरांना समाजातील तमाम उपेक्षित जाती-जमाती व कष्टकरी- कामगार- शेतकऱ्यांची एकजूट अभिप्रेत होती. तशी एकजूट झाल्याशिवाय मूलगामी सामाजिक परिवर्तन अशक्य आहे, असे ते म्हणत असत. गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर प्रा. कवाडे-आठवले प्रभृतींनी अशीच आमूलाग्र सामाजिक परिवर्तनाची भाषा केली आहे. परंतु गेल्या कित्येक वर्षांमध्ये या बहुविध रिपब्लिकन पुढाऱ्यांना मातंग-मांग, ढोर इत्यादी अनेक जातींना (इतकेच काय, नवबौद्ध न झालेल्यांनाही) स्वत:च्या संघटनेत व आंदोलनात सामील करून घेता आलेले नाही. त्यामुळे प्रत्येक (उपेक्षित) जाती-उपजातीच्या स्वतंत्र संघटना फोफावल्या आहेत. भटके-विमुक्त-रामोशी-पारधी असे अनेक जण सामाजिक न्यायासाठी स्वतंत्रपणे संघर्ष करीत आहेत. जवळजवळ अशा सर्व संघटना वा पक्षांना काँग्रेसच्या (वा गेली १० वर्षे राष्ट्रवादीच्या) वळचणीला राहून आपल्या मागण्या पुढे न्याव्या लागल्या आहेत. त्यापैकी कुणालाही रिपब्लिकन पक्षाचा आधार घ्यावासा वाटलेला नाही. त्यामुळे विविध रिपब्लिकन गटांना काँग्रेस-राष्ट्रवादींनी बहाल केलेल्या राजकीय वतनांवर समाधान मानावे लागले आहे. इतकेच नव्हे तर तशी वतने मिळावीत म्हणून काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसची लाचारी करावी लागली आहे. यापुढे अशी लाचारी वा वळचणीचे राजकारण करणार नाही, अशी गर्जना गुरुवारच्या बैठकीत करण्यात आली. पण आपण पुरोगामी महाराष्ट्रात, खुद्द डॉ. आंबेडकर यांच्या जन्मभूमीत, स्वत:ची स्वतंत्र ताकद का उभी करू शकलो नाही, याचे उत्तर दिले गेलेले नाही. सुमारे ४० वर्षांपूर्वी प्रस्थापित- रिपब्लिकन पक्षांच्या विरोधात ‘दलित पॅन्थर’च्या रूपाने तरुणांचे बंड झाले. त्यात चैतन्य होते, नवा आशावाद होता आणि वेगळा आत्मविश्वास होता. त्या चैतन्याचा अविष्कार साहित्यिक होता. परंतु तो अविष्कार आत्मकथने, आत्मनिवेदनात्मक कादंबऱ्या, प्रक्षोभक कविता आणि उग्र नाटके यापलीकडे गेला नाही. दलित पँथर्सना परिवर्तनच नव्हे तर क्रांतीच अभिप्रेत होती. त्यांच्यापैकी काही मार्क्‍स-लेनिनवादाने, काही नक्षलवादाने, काही अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या ‘ब्लॅक पॅन्थर्स’ चळवळीने तर काही मार्टिन ल्यूथर किंग या कृष्णवर्णीय आदर्शवाद्याच्या चळवळीने भारून गेलेले होते. त्या मार्टिन ल्यूथर किंग यांचा खून झाला पण त्यांचा एक अुनयायी आज अमेरिकेचा अध्यक्ष झाला आहे. ‘दलित पँथर्स’ने कोणता वारसा निर्माण केला? आजचे आंबेडकरवादी हे पूर्वीचे पॅन्थर्स होते. आता त्यांच्यातील आदर्शवादापेक्षा आक्रमकताच उठून दिसते. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला जगात कुठेही धक्का लागताच रस्ता रोको करणाऱ्या या संघटनांनी त्या पुतळ्यांइतकेच त्या विचारांचेही अधिष्ठान जपले असते तर राडा करून अस्तित्व दाखवायचे प्रसंग त्यांच्यावर आले नसते. ‘जग बदल घालून घाव.. सांगून गेले भीमराव’ या पंक्तींमधील फक्त ‘घाव’ लक्षात घेतला गेला, पण ‘बदल’ घडविण्याचे उद्दिष्ट दूर राहिले. मायावतींनीही सत्ता हाती आल्यानंतर सर्व दलित समाजाचे भले करण्याच्या योजना हाती घ्यायच्या ऐवजी स्वत:चे पुतळे कोटय़वधी रुपये खर्च करून बांधायला सुरुवात केली. जणू ते पुतळे आपल्याला पंतप्रधानपद मिळवून देतील असेच त्यांना वाटले. त्यांचा तो पंतप्रधानपदावर विराजमान होण्याचा मनसुबा लोकांकडूनच उधळला गेल्यानंतर आता त्यांची तीन वर्षांपूर्वीची लोकप्रियता ओसरू लागली आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही रिपब्लिकन पुढाऱ्याला तर त्यांच्या एक-दशांशही सामाजिक-राजकीय पाठिंबा मिळविता आलेला नाही. आता या रिपब्लिकन ऐक्यावर मंगळवारी शिक्कामोर्तब होणार, असे आवर्जून सांगितले जात असले तरी हे सर्व पुढारी आपला प्रचंड ‘इगो’, त्या ‘अहं’भोवती जमा केलेले अनुयायांचे कोंडाळे आणि काँग्रेस-राष्ट्रवादींच्या लाचारीने प्राप्त केलेली सत्तापदे सोडण्यास तयार आहेत का हे स्पष्ट झालेले नाही. डॉ. आंबेडकर यांना ध्येय साध्य करण्यासाठी त्याग अभिप्रेत होता आणि त्यांची केंद्रातील मंत्रीपद सोडायचीही तयारी होती. ती ध्येयवादी वृत्ती आजच्या रिपब्लिकन नेत्यांमध्ये आहे का हे त्यांनीच आत्मपरीक्षण करून ठरवायचे आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच तसे रिपब्लिकन ऐक्य या प्रयत्नातून उभे राहिले तर या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा राजकीय-सामाजिक इतिहास बदलू शकेल.